व्यासमहर्षींचे दर्शन घडविणारी कादंबरी

विवेक मराठी    09-Jan-2023
Total Views |
- आशा कुलकर्णी
 

 Vyasa Maharshi 
ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशाच्या अक्षरमूर्तीला वंदन करताना श्रीज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की
तेथ व्यासादिकांच्या मती। तेचि मेखला मिरविती॥
 
श्रीव्यासांसारख्या महर्षींची थेट विश्वाच्या मूळ तत्त्वाला जाऊन भिडणारी दिव्य प्रज्ञा म्हणजेच या गणरायाच्या कमरेतील मेखला होय. या महर्षींनी आकाशाला गवसणी घालण्याइतके महनीय सांस्कृतिक कार्य केले आहे. व्यासमहर्षींनी तर आपल्या प्रचंड आध्यात्मिक संपदेची अशी घट्ट बांधणी केली आहे की आज हजारो वर्षे होऊनही त्यातले एक अक्षरसुद्धा इकडेतिकडे हलले नाही. ऋग्वेदाच्या ऋचेत एकूण चार लाख बत्तीस हजार अक्षरे आहेत, त्यात कानामात्रेचाही बदल झालेला नाही. नाहीतर आपल्याला चांगला अनुभव आहे की या डिजिटल युगातही शब्द कसे पटकन बदलले जातात, पण आपल्या महान वैदिक साहित्याला इतके नेटके आणि पक्के कसे बांधले गेले? ही किमया महर्षी व्यासांनी केलेल्या वेद वर्गीकरणाने झाली. त्यांनी वेदाचे फक्त चार भाग केलेत असे नाही, तर प्रत्येक वेदाची जणू मनोहर घोटीव मूर्तीच घडविली. त्या वेदमूर्तींना संजीवन दिले. जर वेद वाचनालयातल्या कपाटातच असते, तर त्यांना असे संजीवन मिळाले नसते. हजारो वर्षांपासून वेदांचे शास्त्रोक्त पठण केले जाते. त्यासाठी व्यासमहर्षींनी शिष्यपरंपरा निर्माण केल्या. त्यानुसार आजही आपल्या भारतात वेदपाठशाळा सुव्यवस्थितपणे चालू आहेत.
 
 
महर्षी व्यासांनी पुराणवाङ्मयाच्या संहिता तयार केल्या. उपनिषदातील अद्वैत सिद्धान्त प्रस्थापित करण्यासाठी ब्रह्मसूत्रे लिहिली. त्यांनी लिहिलेल्या महाभारताच्या इतिहासलेखनाने जीवनाचे सर्वांगीण व वास्तव चित्र उभे राहते व आपल्याला अविनाशी तत्त्वांची ओळख होते. असे अजोड कार्य करणार्‍या या थोर सांस्कृतिक शिल्पकाराचे सुंदर दर्शन आपल्याला डॉ. अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित ‘भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास’ या चरित्रात्मक कादंबरीतून घडते. महर्षी व्यासांचे पिताश्री महर्षी पराशर यांच्या जन्मापासून तर व्यासपुत्र शुकाचार्य ब्रह्मपदी लीन होईपर्यंतच्या विशाल कालखंडातील कथा या कादंबरीत रेखाटली आहे. त्यात जागोजागी अधिकृत संदर्भमंत्रही आहेत.
 
 
व्यासमहर्षींसारख्या थोर विभूतीचा उदय श्रेष्ठ कुलपरंपरेतूनच होतो, हे या कादंबरीत जाणीवपूर्वक अधोरेखित केले आहे. म्हणूनच व्यासमाता सत्यवती हिची जीवनकथा, तसेच व्यासपिता महर्षी पराशरांचे श्रेष्ठ ज्ञानकार्य यांचे वर्णन या कादंबरीत आहे. त्याप्रमाणे उन्नत आध्यात्मिक कार्य करणार्‍या आणि अजरामर साहित्य निर्माण करणार्‍या विविध ऋषींच्या महर्षी व्यासांना मिळालेल्या उपदेशाचेही वर्णन यात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यासमहर्षींनी संपूर्ण वेदाचे कसे वर्गीकरण केले असावे, याचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात केले आहे, वेदांप्रमाणेच पुराणसंहिता व ब्रह्मसूत्र याच्यावरील महर्षी व्यासांच्या लेखनाचीही योग्य दखल यात घेतली गेली आहे. यात व्यासांमुळेच कुरुवंश प्रवाहित झाला. त्यामुळे संपूर्ण महाभारतकथेत व्यास महर्षी अनिवार्यपणे अंतर्भूत आहेतच. पण जिव्हाळ्याच्या मार्गदर्शकाची भूमिका ठेवूनही महर्षींची या कथेशी असलेली अलिप्तता या कादंबरीत अचूक दाखविली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक असलेल्या या व्यासमहर्षींच्या सहधर्मचारिणीबद्दल इतिहास तसा मूकच आहे. तेव्हा व्यासपत्नीचे काल्पनिक चित्र समर्थपणे उभे करून लेखिकेने ती कसर भरून काढली आहे.
 
 
 
लेखिकेने लोकमानसात अपरंपार श्रद्धेचे स्थान असलेल्या भगवद्गीतेचे तसेच भागवतपुराणाचे सारभूत कथन केले आहे. अशा रितीने आपल्या पारमार्थिक सारस्वतात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या व्यासमुनींचे सर्वांगीण चित्रण या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका डॉ. अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी घडविले आहे आणि व्यास क्रिएशन्स या प्रकाशनाने या पुस्तकाला सुबक व पुठ्ठ्याच्या मजबूत बांधणीतून प्रकाशित केले आहे. त्यात प्रसंगोचित सुंदर चित्रेही दिली आहेत.
 
 
पुस्तकाचे नाव - भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास
लेखिका - विद्यावाचस्पती अनुराधा सुधीर कुलकर्णी
प्रकाशक - व्यास क्रिएशन्स
पृष्ठसंख्या - 540.
मूल्य - 800 रु.