@विनायक महाजन
आपली भारतीय कृषी परंपरा (इंग्रज राजवटीपूर्वी) निशापच होती. भारतीय ते टाकाऊ, जुनाट, बुरसटलेले या मानसिकतेने आपले प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने हे आतातरी लक्षात येऊ लागले आहे. निसर्गाचे, पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे. वापरा व फेकून द्या या जमान्यात शाश्वतचे महत्त्वही हळूहळू लक्षात येऊ लागेल. या पृष्ठभूमीवर पारंपरिक नक्षत्राधारित किंवा निशाप शेतीचे महत्त्व सांगणारा लेख. लेखक स्वतः नक्षत्राधारित शेती करतात. त्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित हा लेख आहे.
प्रथम निसर्ग व त्यातून सर्व काही. अगदी आपला मनुष्यजन्मही. अशा या प्रबल किंवा सर्वशक्तिमान निसर्गात अनेक रहस्ये, गुपिते दडली आहेत. काही कोटी वर्षांची जडणघडण असणार्या या निसर्गात अफाट ज्ञानही आहे. हे विकासाचे ज्ञान समजून घेऊन आपल्या पूर्वजांनी उत्तम शेती तर केलीच आणि समृद्ध जीवनही जगले. संपूर्ण जगातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी भारतवर्षात येत होते. आक्रमण करून भूभाग जिंकून लुटण्याची आपली संस्कृती नाही. ‘आत्मवत् सर्व भूतेषू’ हे आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. झाडांची पूजा याला वेडगळपणा ठरवून त्याची चेष्टा करणारे आज ‘झाडे लावा झाडे जगवा’चे ज्ञान वाटत फिरत आहेत. कोणते झाड कोठे लावावे, कोणत्या दिशेला ते असावे येथपासून ते नक्षत्र वननिर्मितीपर्यंत अभ्यास वृक्ष आयुर्वेदात आहे.
निसर्गनिर्मितीमध्ये ऋतूंची म्हणजेच हवामानाची भूमिका मोठी आहे. याकरिता भारतीय कालगणना म्हणजे पंचांग हेही शास्त्र विकसित होते. उदा., रोहिणी नक्षत्रातील भात पेरणी. ही धूळपेरणी वर्षानुवर्षे अबाधितपणे सुरू आहे. भारतीय कालगणनेचे (पंचांगाचे) वैशिष्ट्य म्हणजे सूर्य व चंद्र यांच्या गतींचा समन्वय साधणारी कालगणना. पंचांग हे निसर्गचक्र समजून घेण्यास उपयुक्त कॅलेंडर आहे. निसर्गानुकूल शेती म्हणजे पंचांग व त्यातील नक्षत्रे समजून घेऊन केलेली शेती.
निसर्ग गुरू, या गुरूची तपश्चर्या काही कोटी वर्षांची आहे. त्यातून जो निसर्ग घडला ते उत्तर आहे. प्राण्यांची हत्या करून त्यांचे मास, कंदमुळे, फळफळावळ हेच अन्न असणारे आपले पूर्वज शेती करू लागले, तेव्हा निसर्ग हीच शाळा व गुरू होते. शेती ही निसर्गाचीच एक मर्यादित आवृत्ती आहे याचे भान ठेवायला हवे. तशी दृष्टी हवी.
शाश्वत
आपले जीवनच शाश्वत नाही, मग? आपली आयुष्यमर्यादा आहे, तशीच सृष्टीमध्ये जे जन्मले, ते नाश पावणारच आहे. याचेही एक चक्र आहे, ते शाश्वत आहे. शाश्वत हा शब्द त्या अर्थाने घेऊ या आणि अनेक गोष्टी शाश्वत आहेत का ते तपासू या. भारतीय कृषी परंपरा आज पुन्हा आवश्यक वाटू लागली आहे, कारण ती शाश्वत आहे. सकस अन्नाची गरज शाश्वत आहे. निसर्ग ऋतुचक्र शाश्वत आहे. भौगोलिक स्थितीनुरूप तेथे होणारी शेती शाश्वत आहे. तुझे आहे तुजपाशी ही स्थिती आहे. शेणखत, कंपोस्ट यांचा वापरच शाश्वततेचा मार्ग आहे.
पर्यावरणीय
पर्यावरण हा सध्या चलतीचा विषय आहे. त्यामुळे अनेक गुरूही तयार आहेत. व्यवहारात पर्यावरण सांभाळणे कसे शक्य आहे याची जितीजागती उदाहरणेदेखील आहेत. पण ते प्रसिद्धीपासून दूरच राहणे पसंत करत असावेत. प्रामुख्याने हवामान बदल, वायुप्रदूषण, जलप्रदूषण याच जोडीला प्लास्टिक बंदी या गोष्टींचा ऊहापोह पर्यावरणाच्या अनुषंगाने होतो. कारण या गोष्टींचे दुष्परिणाम आता सामान्य माणसाला जाणवू लागले आहेत.
शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जलप्रदूषण, जमीन प्रदूषण व काही प्रमाणात हवा प्रदूषित करणार्या घटकांचा वाढता वापर होत आहे. प्रदूषणकारक, विषारी उत्पादने, रासायनिक खते उत्पन्नवाढीच्या नावाखाली शेतकर्यांच्या माथी मारली जातात. या सर्व निविष्ठा उत्पादकांचे चांगभले होते. पर्यावरण, शेतकरी व जनता यांचे मात्र नुकसान होते. भारतीय गो आधारित कृषी परंपरा पर्यावरणीयच आहे. त्यातील विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. त्याला नक्षत्र मुहूर्तांची जोड देऊन केलेली निशाप शेती शाश्वत तर आहेच व आरोग्यदायकही आहे.
नक्षत्र
चंद्रनक्षत्र दर दिवशी बदलते. त्या त्या नक्षत्राचा प्रभाव त्या दिवसावर असतो. हा प्रभाव पंचमहाभूतांच्या माध्यमातून नक्की करण्यात आला आहे. बीजपेरणी करताना, लागवड करताना त्याचा सकारात्मक उपयोग करता येतो. वनस्पती कोणत्या पंचमहाभूताचे प्राबल्य असणारी आहे, त्याची सांगड त्याच पंचमहाभूताचे प्राबल्य असणार्या नक्षत्राशी घालून तो दिवस लावणीयोग्य समजला जातो. त्याचे एक कोष्टक खाली देत आहे.
वायुतत्त्व - अश्विनी, मृग, पुनर्वसू, उत्तरा, हस्त, चित्रा, विशाखा या नक्षत्रांच्या दिवशी सुगंधी वनस्पतींची लागवड करावी.
अग्नितत्त्व - भरणी, कृत्तीका, पुष्य, मघा, पूर्वा, स्वाती, पूर्वाभाद्रपदा ही नक्षत्रे बीजयुक्त फळांच्या लागवडीस पोषक.
जलतत्त्व - आर्द्रा, आश्लेषा, मूळ, पूर्वाषाढा, शततारका, रेवती, उत्तराभाद्रपदा या नक्षत्रांत पाले व रसदार फळे देणार्या वनस्पती लागवड.
पृथ्वीतत्त्व - रोहिणी, अनुराधा, ज्येष्ठा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, अभिजित या नक्षत्रांत कंदमूळवर्गीय वनस्पती लागवड.
ही नक्षत्रे त्या त्या वनस्पतीच्या पंचमहाभूतांशी साधर्म्य असणारी आहेत. त्या जोडीने चंद्राचाही विचार घेऊन मुहूर्त नक्की करावा लागतो. त्याकरिता चंद्राची सहा गतिचक्रे लक्षात घेणे आवश्यक आहे.
चंद्र
पृथ्वीला सर्वात जवळचा (उप)ग्रह चंद्र, जो पृथ्वीवरील पाण्यावर प्रभाव पाडतो - उदा., समुद्राच्या (विपुल पाणी) भरती-ओहोटीची वेळ चंद्रतिथीशी निगडित आहे. सर्व वनस्पतींमध्ये पाणी 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वनस्पतींच्या कार्यावर चंद्राचा प्रभाव पडतो.
शुक्ल पक्ष, पौर्णिमा, त्यानंतर कृष्ण पक्ष, अमावस्या हे 29.5 दिवसांचे चक्र.
चंद्र, शनी समोरासमोर (चंद्र, मध्ये पृथ्वी, शनी एका सरळ रेषेत - 1800) 27.3 दिवसांचे चक्र.
चढता चंद्र व उतरता चंद्र हे 27.3 दिवसांचे चक्र.
सूर्य भ्रमणकक्षा व चंद्र भ्रमणकक्षा एकमेकास छेदणारे दोन बिंदू (अध्याऋत) हे 27.2 दिवसांचे चक्र.
चंद्र पृथ्वीजवळ व लांब (लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेमुळे) 27.5 दिवस
चंद्राची नक्षत्रांबरोबरची स्थिती हे 27.3 दिवसांचे चक्र.
वनस्पतींवर या प्रत्येक चक्राचा बरा-वाईट प्रभाव होत असतो. तो जाणून घेऊन शेतीच्या कामांचे नियोजन उपयुक्त ठरते - उदा., शुक्ल पक्ष, पौर्णिमा ते कृष्ण पक्ष, अमावस्या 29.5 दिवसांचे चक्र - शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रभाव वाढता असतो. पौर्णिमेच्या आधी 48 तासांपासून जमिनीतील ओलावा वाढलेला राहतो. तसेच वनस्पतीचा जीवरस वर चढण्याचे प्रमाण वाढते. बीज अंकुरण चांगले होते, तर आर्द्रता वाढत्याने बुरशीही जोरात वाढते. द्रवरूप खते सहजी घेतली जातात.
चंद्र, शनी समोरासमोर (चंद्र, मध्ये पृथ्वी, शनी एका सरळ रेषेत - 1800) 27.3 दिवसांचे चक्र - चंद्र पाणीकारक आहे, तसाच कॅल्शियमकारक आहे. शनी सिलिकाकारक आहे. या दिवशी पेरणी केल्यास उगविणार्या वनस्पतीत रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी पिकात 10 टक्के वाढ होते.
चढता चंद्र व उतरता चंद्र हे 27.3 दिवसांचे चक्र - चढत्या चंद्रकालात पृथ्वी श्वास बाहेर सोडते, तर उतरत्या चंद्रकालात पृथ्वी श्वास आत घेते. तसेच रोजच्या दिवसात पहाटे ते दुपारपर्यंत पृथ्वी श्वास बाहेर सोडते, तर दुपारनंतर ते पहाटेपर्यंत पृथ्वी श्वास आत घेते. त्या वेळी मुळे जास्त कार्यरत होतात.
सूर्य भ्रमणकक्षा व चंद्र भ्रमणकक्षा एकमेकास छेदणारे दोन बिंदू (अध्याऋत) हे 27.2 दिवसांचे चक्र - या छेदनबिंदूपाशी चंद्र असण्याआधी 6 तास व नंतर 6 तास या काळात सूर्य आणि पृथ्वी या मार्गात चंद्राचा अडथळा ठरतो. त्या वेळी कोणतेही कृषी कार्य करू नये.
चंद्र पृथ्वीजवळ व लांब (लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेमुळे) 27.5 दिवस - अशी स्थिती महिन्यात एकूण दोन वेळा येते. जवळ असताना व लांब असण्याच्या वेळेआधी 12 तास व नंतर 12 तास पेरणी करू नये. याला अपवाद बटाटे लागवड आहे. चंद्र जवळ असताना बटाटे लागवड केल्यास बटाटे मोठ्ठे व कमी येतात, तर चंद्र लांब असताना बटाटे लावल्यास बटाटे आकाराने लहान व संख्येने अधिक येतात.
चंद्राची नक्षत्रांबरोबरची स्थिती हे 27.3 दिवसांचे चक्र - विविध नक्षत्रांमध्ये कोणत्या वनस्पती लावाव्यात, याचे कोष्टक याआधी दिले आहे.
याव्यतिरिक्त अमावस्या असताना कोणतेही कृषी काम करू नये. तसेच क्षय दिन, इष्टी या दिवशीही कृषी काम टाळावे.
अर्थात कोणतेही पीक कोणत्याही ऋतूमध्ये घेऊन चालत नाही. आपापल्या स्थानपरत्वे पावसाळी, हिवाळी व उन्हाळी असलेला पिकाचा क्रम बदलू नये. त्याकरिता पंचांगातील ऋतुचक्राचा वापर करावा - उदा., पावसाळी पिकाच्या पेरणीचा काळ हा रोहिणी (सूर्य) नक्षत्राचा आहे.
हवामान बदलाच्या काळात पंचांगाचा काटेकोरपणे उपयोग करून घेतल्यास शेतीचे नुकसान टाळण्यास मदतच होईल. अजूनही गावात जुन्या पिढीतील शेतकरी आहेत, ज्यांना पंचांग आधारित शेतीची माहिती आहे. ती माहीत करून घेणे अत्यावश्यक आहे. ज्ञानाचा हा अनमोल ठेवा आहे. तो जपला पाहिजे, अनुभवाच्या कसोटीवर तपासला पाहिजे. वयोवृद्ध शेतकरी कदाचित त्यामागचे विज्ञान सांगू शकणार नाहीत. ते आपण तपासू या.
माझ्या या अभ्यास प्रवासात पंचांगाशी संबध आला. सध्या प्रचलित पंचागात 27 नक्षत्रे दिली आहेत. वास्तविक ती 28 आहेत व वेदांमध्येही ती दिली आहेत. पृथ्वीचा व सर्व ग्रहांचा प्रवास सूर्याभोवती भ्रमणाचा आहे, म्हणजेच 360 अंशांचा आहे. या 360 अंशांना 27ने भागून प्रत्येक ठिकाणी एक एक नक्षत्र मानून जे पंचांग सिद्ध होते, त्याला निरयन पंचांग प्रणाली म्हणतात. निसर्गात मात्र या 28 नक्षत्रांची स्थाने एक-दुसर्यापासून वेगवेगळ्या अंतरांवर आहेत. त्या स्थानांची निश्चित गणिते आहेत. त्यांचा उपयोग करून जे पंचांग सिद्ध होते, त्याला सायन पंचांग प्रणाली म्हणतात. या पंचांगाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदयाच्या वेळी त्या दिवशीचे सूर्यनक्षत्र आपण पाहू शकतो, म्हणून याला दृक् सायन पंचाग म्हणण्यास हरकत नाही. हे जास्त विज्ञाननिष्ठ आहे. अशा या वेदप्रमाणित पंचांगाचा प्रचार व प्रसार करण्याचे मोठे कार्य मा. आचार्य लोकेश कित्येक वर्षे सातत्याने करत आहेत.
निशाप शेतीमधील शेतीकामाचे मुहूर्त हा भाग आतापर्यंत आपणासमोर मांडला. सुखी, संपन्न शेतकरी याकरिताचा हा पहिला टप्पा, जो निसर्गाशी नाते जोडणारा आहे. पुढील भाग शाश्वत याबाबत याआधी थोडे विवेचन केले आहे, त्यावर आणखी थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न. शेतकरी आत्महत्या हे सध्या शाश्वत आहे, पण इंग्रजपूर्व काळात उत्तम शेती हे शाश्वत होते. मग ते अशाश्वत कसे झाले? हेही जाणून घेणे गरजेचे आहे, म्हणजे शेतीतील शाश्वतता आपल्या लक्षात येईल. हे समजून घेण्यासाठी इंग्रजपूर्व काळात - म्हणजे आपल्या देशाला ‘सोने की चिडिया’ संबोधले जायचे, त्या काळापासून सुरुवात करावी लागेल.
आपल्या देशात जी सोन्याची खाण आहे, त्यामधून उत्पादित होणार्या सोन्याच्या कितीतरी अधिक पटीने सोने आपल्या देशात आहे. हे आपले नाही, आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व आहे. आणि हो, उत्तम शेती करून त्यांनी हे साध्य केले, हा इतिहास आहे. त्या वेळी जागतिक व्यापाराचा 30 टक्के वाटा आपला होता. सर्व जगभर मसाल्याचे पदार्थ, कापड, रेशमी कापड आपण पुरवत होतो. आपली शेती प्रगत होती. सर्व समाज सुखी, समृद्ध व सभ्य होता. तत्कालीन व्यापारी, अडते, मुघल व इंग्रज यांच्या रानटी वृत्तीने आपल्या सरळ व सभ्य स्वभावाचा गैरफायदा घेतला. या पृष्ठभूमीवर भारतात घडलेली 20व्या शतकाच्या सुरुवातीची एक घटना सांगतो. 1904 साली ब्रिटिश सरकारने सर अल्बर्ट हॉवर्ड या शास्त्रज्ञास भारतीय शेतकर्यांना रासायनिक शेती शिकविण्यास भारतात पाठविले ते त्यांच्या रासायनिक खतांसाठी गिर्हाइक तयार करण्यासाठी. या सर अल्बर्ट हॉवर्ड यांचे 1938 साली प्रसिद्ध झालेले पुस्तक ’अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट’ माझ्या वाचनात आले. यात या विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञाने काय लिहिले आहे? ‘रासायनिक खते वापरून जेवढे उत्पादन येईल असे मी सांगतो आहे, त्यापेक्षा जास्त उत्पादन भारतातील शेतकरी आत्ता घेत आहेत.’ हे लक्षात आल्यावर या थोर शेती शास्त्रज्ञाने रासायनिक शेती सोडून भारतीय कृषी परंपरेचा अभ्यास केला. त्याचे प्रमाणीकरण केले. त्याचे जगभरातील विविध पिकांवर प्रयोग केले व 1938 साली लिहून ठेवले - ‘भारतीय अशिक्षित शेतकरी हे माझे प्रोफेसर आहेत. हे खरे शास्त्रज्ञ.’ आत्महत्या हे शाश्वत वाटणार्या शेतीतून पुन्हा शाश्वत व संपन्न शेती व शेतकरी या मार्गाने जाण्यासाठी शासकीय पॅकेज नको. प्रत्येक शेतकर्याने स्वयंपूर्णतेचा वसा घेतला पाहिजे. बस, एकच करायचे - प्रथम आपल्या कुटुंबाच्या अन्नधान्यांच्या गरजांबाबत स्वयंपूर्ण व्हावयाचे. प्रथम कुटुंबाची अन्नसुरक्षा, मग विकाऊ व टिकाऊ पिकवून वाजवून पैसे घ्यावयाचे. शेतकर्याने गरीब राहण्याचा मक्ता घेतलेला नाही. बळी तो काळ पिळी यातील बळीराजा बना.