जपानमधून मिळालेला जागतिक धडा

08 Sep 2022 19:43:54
युनिफिकेशन चर्चमुळे वाताहत झालेल्या एका कुटुंबातील तेत्सुया यामागामी नामक व्यक्तीने सूडापायी शिंझो आबे यांच्यावर गोळीबार केल्याचे आता समोर आल्याने खळबळ उडाली असून या निमित्ताने या युनिफिकेशन चर्चचा धनलोलुप चेहरा जगासमोर आला आहे. याचसोबत समृद्धीच्या मागे धावताना संस्कृतीला दूर केल्यास काय परिणाम उद्भवू शकतात, हेही जगाला जपानच्या रूपाने पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.
 
japan
 
 
नव्या जागतिक प्रवाहाची, आधुनिकतेची कास धरताना आपल्या मुळांपासून लांब गेले तर काय परिणाम उद्भवू शकतात, याची प्रचिती सध्या जपानमध्ये येत आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हत्येच्या तपासाचे धागे जपानमधील युनिफिकेशन चर्चपाशी जाऊन पोहोचले आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटले. युनिफिकेशन चर्च या एका ख्रिश्चन पंथाशी निगडित संस्थेचा प्रभाव जपानमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढला. या संस्थेने आपल्या भक्तांकडून प्रचंड प्रमाणात लुबाडणूक केली आणि असंख्य कुटुंबांची यात वाताहत झाली. दुसरीकडे या संस्थेचे शिंटो व बौद्धबहुल जपानमधील राजकीय नेत्यांशीही वरपर्यंत संबंध आहेत. त्यामुळे या युनिफिकेशन चर्चमुळे वाताहत झालेल्या एका कुटुंबातील तेत्सुया यामागामी नामक व्यक्तीने सूडापायी शिंझो आबे यांच्यावर गोळीबार केल्याचे आता समोर आल्याने खळबळ उडाली असून या निमित्ताने या युनिफिकेशन चर्चचा धनलोलुप चेहरा जगासमोर आला आहे. याचसोबत समृद्धीच्या मागे धावताना संस्कृतीला दूर केल्यास काय परिणाम उद्भवू शकतात, हेही जगाला जपानच्या रूपाने पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.
 
 
 
कार्यक्षमता, मेहनत, शिस्त आणि त्यातून आलेली समृद्धी याकरिता आपल्याकडे नेहमीच जपानचे उदाहरण दिले जाते. जगात आकाराने 62व्या क्रमांकाचा देश असलेला जपान याच शिस्त, मेहनत व कार्यक्षमतेच्या जोरावर आज जगातील पहिल्या पाच प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. विशेषत: दुसर्‍या महायुद्धात मानहानिकारक पराभव स्वीकारून, दोन अण्वस्त्र हल्ले पचवून अक्षरश: राखेतून नव्याने जपान आज या स्थानावर उभा आहे. मात्र या सर्व वाटचालीत जपानने पूर्णत: पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केला आणि तिथे जपानची गाडी रस्त्यावरून घसरली. मूलत: शिंटो, बौद्ध, कन्फ्युशिअस संस्कृतीचा प्रभाव असणार्‍या जपानची मूळ संस्कृती आधुनिकीकरणाच्या रेट्यात मागे पडत गेली. याच रेट्यात युनिफिकेशन चर्चसारख्या ख्रिश्चन संस्थांनी आपला प्रभाव वाढवला आणि राजकीय व्यवस्थेपासून सर्वत्र अलगदपणे शिरकाव केला. उपलब्ध माहितीनुसार विद्यमान पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या मंत्रीमंडळातील पाच मंत्री या युनिफिकेशन चर्चच्या पंथाशी संबंधित आहेत. शिंझो आबे यांच्या काळातही लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीवर या पंथाचा मोठा प्रभाव होता. 1954 साली स्थापना झालेल्या या पंथाने अशा प्रकारे जपानच्या प्रत्येक व्यवस्थेत शिरून आपला प्रभाव निर्माण केला. देशातील असंख्य शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक संस्थांवर या पंथाने कब्जा केला, अफाट संपत्ती जमवली, शेजारच्या दक्षिण कोरियात तर एक राजकीय पक्षही स्थापन केला. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संपर्क करून या मृतांच्या आत्म्यांना सद्गती मिळवून देण्याच्या नावाखाली चर्चला देणग्या मिळवून पैसे उकळण्याचा नवा किळसवाणा प्रकार जपानमध्ये या चर्चने रूढ केला. अशाच प्रकारे चर्चने संपत्ती हडप केल्याने रस्त्यावर आलेल्या कुटुंबातील तरुण तेत्सुया यामागामी याने सूडापायी शिंझो आबे यांची हत्या केली.
 
 
 
हा सर्व घटनाक्रम जपानमधील असला, तरी यातून मिळालेला धडा जागतिक आहे. समृद्धी आणि संस्कृती या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत आणि दोन्हींच्या समन्वयातूनच कोणताही समाज प्रगतीकडे वाटचाल करतो. यातील एक बाजू जरी मागे पडली तर काय होऊ शकते, याचे उदाहरण शिंझो आबे यांच्या हत्येतून पाहायला मिळते. या युनिफिकेशन चर्चच्या विरोधात जपानमध्ये गेली जवळपास 3 दशके संघर्ष सुरू आहे. आबे यांच्या हत्येनंतर हा संघर्ष आणखी उफाळून आला असून पंतप्रधान किशिदा यांना या युनिफिकेशन चर्चशी आपल्या पक्षाचे संबंध पूर्णपणे तोडणे भाग पडले आहे. शिवाय, जपान-द. कोरियामध्ये प्रभावी असणार्‍या या युनिफिकेशन चर्चचे कारनामेही या निमित्ताने उजेडात आले आहेत. परंतु यातील दुर्दैव हे की याकरिता शिंझो आबे यांच्यासारखा भारताचा एक मित्र गमवावा लागला. परंतु या निमित्ताने युनिफिकेशन चर्चसारख्या जगभरात अनेक देशांत कार्यरत असणार्‍या संस्था-संघटना, त्यांना परदेशातून येणारी रसद, आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात या अशा ’कल्ट’च्या मागे धावणारा समाजातील मोठा हिस्सा, त्यातून उद्भवणारे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक दुष्परिणाम हे सारे चर्चेत आले आहे. हा संपूर्ण विषय इतक्या गंभीर वळणावर पोहोचलेला असताना, कथित मुख्य प्रवाहातील एकाही मराठी प्रसारमाध्यमास या घटनेची दखल घ्यावीशी वाटली नाही, सवंग स्थानिक राजकारणाच्या पलीकडे डोकवावेसे वाटले नाही, ही आणखी एक दुर्दैवाची बाब. थोडक्यात, शिंझो आबे यांच्या हत्येच्या तपासातून समोर आलेल्या गोष्टींचा जागतिक धडा आपणही समजून घेऊ व आपल्या मुळांशी जोडलेल्या नाळेचे महत्त्व आतातरी समजून घेऊ, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0