महिला चरित्र कोश - कोशसाहित्यात एक पुढचे पाऊल

विवेक मराठी    07-Sep-2022
Total Views |

rss 
 
आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. सर्व क्षेत्रांत भारताने स्वातंत्र्योत्तर काळात फार वेगाने प्रगती केली, याचा आपल्याला अभिमान आहे. विशेष म्हणजे प्रगतीच्या या वाटेवर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचेही योगदान आहे. इंग्रजी शिक्षणामुळे ज्ञानाची कवाडे उघडी झाली, स्त्रियांवर घातलेली बंधने आणि सामाजिक विषमता या आमच्या त्रुटींची आम्हाला जाणीव झाली आणि अवघ्या पंचाहत्तर वर्षांत सामाजिक मनोभूमिका बदलली. आपल्या राज्यघटनेने व कायद्याने सांगितलेली स्त्रीपुरुष समानता आणि जातिभेद निर्मूलन आम्ही स्वीकारले आणि त्याचा अंगीकारही करत गेलो. आज सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा सहभाग आहे, याचे रहस्य वेदकालापासून रुजवलेला समतेचा विचार आणि उदार भारतीय संस्कृती यामध्ये आहे. वेदप्राणीत भारतीय संस्कृतीमध्ये जातिभेद नव्हते आणि स्त्रियांना अध्ययन-अध्यापनाचा मार्ग उपलब्ध होता, राजकारण आणि युद्धशास्त्र त्या जाणत होत्या. ज्ञान, संपत्ती आणि शौर्य या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेदकालापासून लक्ष्मी, सरस्वती आणि काली (दुर्गा) यांना देवता मानले आहे. स्त्रीमध्ये सामर्थ्य आहे याची जाणीव प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर दडली होती, म्हणूनच भारतात स्त्रियांना सहजपणे मताधिकार मिळाला. हा पाश्चात्त्य विचारधारेचा प्रभाव आहे, अशीच बहुतांश समाजाची भावना आहे. कारण ऐतिहासिक व मध्ययुगीन काळातील रूढी-परंपरांमुळे आमचा मूळ उदार दृष्टीकोन झाकोळून गेला होता.
  
भारतात स्त्रियांचा सन्मान केला जात होता, स्त्रीशक्तीवर भारतीयांचा हजारो वर्षांपासून विश्वास आहे, हा इतिहास उदाहरणांसह लोकांपुढे ठेवण्याचा संकल्प राष्ट्र सेविका समितीने केला. भारतीय इतिहासातील सर्व काळांत आणि सर्व क्षेत्रांत महिलांच्या कर्तृत्वाचे कसे दर्शन घडते, ते भारतीय समाजाला ज्ञात करून देण्यासाठी ‘अखिल भारतीय महिला चरित्र कोश निर्मिती’चे हे अवघड आणि मोठे काम समितीच्या संघमित्रा सेवा प्रतिष्ठानने हाती घेतले आहे.
  
 
इ.स.पूर्व काळातील भारतातील स्त्रियांचा जीवन परिचय करून देणारा महिला चरित्र कोशाचा ’प्राचीन भारत’ हा प्रथम खंड 17 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित झाला आहे. ’प्राचीन भारत’ या खंडात वेद-उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणे यांतील आणि बौद्ध व जैन ग्रंथांतील स्त्रियांच्या चरित्रांचा समावेश केला आहे. यासाठी महर्षी दयानंद संपादित मूळ वेद, पंडित सातवळेकर संपादित वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, थेरी गाथा व जैन ग्रंथ यांतून संदर्भ तपासून घेतले आहेत. संस्कृतच्या जाणकार चित्राताई जोशी यांनी मूळ संस्कृत श्लोक देण्याच्या कामात पुढाकार घेतला. याशिवाय अन्य संपादक डॉ. मेधा ब्रह्मपूरकर, सहसंपादक डॉ. मंजू शर्मा (जयपूर), अंजली वर्मा (डेहराडून) यांचे सहकार्य मोलाचे आहे. मुंबई विद्यापीठातील माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. शुभदा जोशी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना ही या ग्रंथाची आणखी एक जमेची बाजू आहे.
 
 
 
दोन हजार वर्षांपूर्वीच्या 452 महिलांची चरित्रे येथे आहेत आणि आणखीही काही महिलांची माहिती आमच्याकडे आहे, त्यासाठी एक पुरवणी कोश प्रकाशित करण्याचा मानस आहे.
 
 
 
यानंतर ‘मध्ययुगीन भारत’ या खंडात इ.स.1 ते 1800पर्यंत झालेल्या भारतीय महिलांचे कार्य आपण पाहणार आहोत. त्याशिवाय 1801-1900 अर्वाचीन भारत, 1901-1950 आधुनिक भारत, 1951-1975 स्वाधीन भारत, 1976-2000 स्वाधीन भारत असे सहा खंड करण्याची योजना आहे.
 
 
 
हे काम खूप मोठे आहे आणि आवश्यकही आहे. त्यासाठी समितीच्या अनेक सेविकांनी व अन्य अभ्यासकांनी माहिती पाठवली, पुस्तके उपलब्ध करून दिली. या पुढील खंडांसाठी अभ्यासकांनी जरूर माहिती पाठवावी. भारतातील कर्तृत्ववान महिलांचा इतिहास संकलित करून पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणे, हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे या भावनेतून काम चालू आहे. हा कोश हिंदीत असला, तरी प्रत्येक प्रांतातील भाषेत जाणे आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये हा कोश उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे, त्यासाठीही अनुवादकांचा सहभाग अपेक्षित आहे. जिज्ञासू वाचक आणि अभ्यासक या महिला कोशाचे अवश्य स्वागत करतील, असा विश्वास आहे.
 
 
- डॉ. विद्या देवधर
संपादक, प्रकल्प कार्याध्यक्ष