@बळीराम गायकवाड । 9820724369
मॉस्को येथे झालेल्या एका विशेष परिषदेत मार्गारिटा रुडोमिनो ग्रंथालयाच्या जगप्रसिद्ध प्रांगणामध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते अनावरण पार पडले. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी साहित्यासाठी गौरवास्पद बाब आहे. या सोहळ्याचा थोडक्यात वृत्तान्त.
’भारत-रशिया यांच्यातील परराष्ट्र संबंधांची पंचाहत्तरी - साहित्य आणि कला, संस्कृती यावरील प्रभाव’ या विषयावर मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को रशिया, या रशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय ग्रंथालयामध्ये एक परिषद नुकतीच पार पडली. मुंबई विद्यापीठाचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीज, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र आणि रशियामधील लोमोनोसोव मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज ऑफ द रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, पुश्किन रशियन लँग्वेज इन्स्टिट्यूट आणि सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी ही सहा विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने 14-15 सप्टेंबर 2022 रोजी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य, त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
सवलतीच्या दारात ४००/- रुपयाला उपलब्ध.
https://www.vivekprakashan.in/books/social-justice-warrior-anna-bhau-sathe/
या परिषदेच्या सुरुवातीला मार्गारिटा रुडोमिनो ग्रंथालयाच्या जगप्रसिद्ध प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या विशेष उपस्थितीत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पार पडले. या सोहळ्यास मार्गरिटा रुडोमिनो ग्रंथालयाचे संचालक पावेल एल. कुझमीन आणि ग्रंथालयाचे इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच भारतातून आमदार सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, संस्थेच्या भव्य प्रांगणामध्ये डिजिटल वॉलवर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारी पाच मिनिटांची एक चित्रफीत दाखवण्यात आली. प्रा. डॉ. बळीराम गायकवाड व दिल्लीचे प्रा. सोनू सैनी यांनी बनवलेला हा लघुपट सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेणारा ठरला.
भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतांनी ह्या कार्यक्रमास सुरुवात झाली. पावेल एल. कुझमीन ह्यांनी या पुतळा अनावरणाच्या प्रसंगी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील आंतरराष्ट्रीय प्रवाह, त्यांच्या विचारांची समकालीन गरज आणि त्या अनुषंगाने अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे त्यांच्या संस्थेमध्ये होत असलेले अनावरण या संदर्भामध्ये भूमिका मांडली आणि भारतातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीज विभागाचे संचालक डॉ. संजय देशपांडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाचे द्विराष्ट्रीय संबंधांबाबत असलेले महत्त्व विशद केले. यासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्था व त्यांच्या योगदानाबाबतही त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची महती विशद करताना अण्णा भाऊ साठे स्वत: एक चालतेबोलते विद्यापीठ होते, असे ते म्हणाले. “महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण गौरवाचा, अभिमानाचा आहे. वंचित, श्रमिकांचा आवाज आज रशियात बुलंद झाला,” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊ न शकलेल्या अण्णा भाऊंच्या साहित्यावरच अनेक विद्वान कशा प्रकारे उच्च शिक्षण घेत आहेत, हेदेखील फडणवीस यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि विधान मंडळामध्ये पारित झालेला ठराव या कार्यक्रमाच्या ठिकाणी पुनश्च एकदा वाचून दाखवला. तसेच या संस्थेचे डायरेक्टर जनरल पॉवेल कुझमीन यांच्याकडे तो ठराव सुपुर्द केला.
भारत सरकारच्या आयसीसीआर संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे हे या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित होते. त्यांनी या घटनेकडे भारत-रशिया द्विराष्ट्रीय संबंधांच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने कसे पाहिले जाऊ शकते किंवा पाहायला हवे, या अनुषंगाने मांडणी केली.
रशियन सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर विभागाचे अधिकारी नागेझदा एरकिमन आणि मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स रशिया यांच्या अधिकार्यांचीही या ठिकाणी भाषणे झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे रशियन भाषेमध्ये उपलब्ध असलेले भाषांतर, त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रांसाठी आणि मानवतेच्या लढ्यासाठी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे माहात्म्य या अनुषंगाने या अधिकार्यांनी मांडणी केली. मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पॉवेल कुझमिन, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकरजी या मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या परिषदेचा दुसरा टप्पा म्हणजे परिषदेचा उद्घाटन सोहळा. पॉवेल कुझमीन यांनी स्वागताध्यक्ष या भूमिकेतून या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासंदर्भातली भूमिका मांडली. यानंतर सेंटर ऑफ सेंट्रल युरेशियन स्टडीजचे संचालक डॉ. संजय देशपांडे यांनी प्रास्ताविक केले आणि सर्वांचे स्वागत केले. यानंतर 1960च्या दशकामध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या, रशियन भाषेमध्ये भाषांतरित झालेल्या साहित्याच्या प्रती खूपच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने ह्या परिषदेच्या निमित्ताने सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘बुंतार’ या अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या रशियन भाषांतरित ग्रंथाचे पुन:प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा. अश्विन रांजणीकर यांनी अण्णा भाऊ साठे लिखित ‘माझा रशियाचा प्रवास’ या पुस्तकाच्या केलेल्या इंग्लिश अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यानंतर ‘बुंतार’ या पुस्तकातील काही परिच्छेदांचे मराठी, इंग्लिश, हिंदी आणि रशियन भाषांमधून वाचन करण्यात आले.पॉवेल कुजमिन यांनी रशियन भाषांतर, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा भाऊंच्या मराठी परिच्छेदाचे, तर राहुल नार्वेकर यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यातील इंग्लिश परिच्छेदाचे वाचन केले. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यातील हिंदी भाषेतील परिच्छेदाचे वाचन केले.
यानंतर या आंतरराष्ट्रीय परिषदेला शुभेच्छापर विचार मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सभागृहाला उद्देशून भाषण केले.
यानंतर रशियन सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि डिपार्टमेंट ऑफ सोशल डिप्लोमसी विभागाच्या एकतेरीना तोरूबारोवा यांनीही विचार मांडले.
लोमोनोसोव मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीचे संचालक प्रा. अलेक्सी मसलाव यांनी अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आशियाई आणि युरोपीय देशांसाठी कसे महत्त्वपूर्ण आहे या अनुषंगाने मांडणी केली.
प्रा. ए. स्टयालीराव , रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर ह्युमॅनिटी यांनी या परिषदेचे अनन्यसाधारण महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले.
त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या अभ्यास मंडळाचे सदस्य सुनील वारे यांनीही अध्यासनाची भूमिका मांडली आणि मार्गरिटा रुडोमिनो संस्थेशी तीन वर्षापासून सुरू असलेला पत्रव्यवहार आणि या परिषदेसाठी कराव्या लागणार्या अनेक आवश्यक गोष्टींचा लेखाजोखा मांडला.
या परिषदेमध्ये इंडियन बिझनेस अलायन्स मॉस्कोचे अध्यक्ष सॅमी कोटवानी यांनीही विशेष निमंत्रित म्हणून पूर्णवेळ हजेरी लावली होती आणि भारत मैत्रिसंबंध आणि व्यापार दृढ करण्याची गरज अधोरेखित केली. दिशा फाउंडेशनचे व्हाइस प्रेसिडेंट अभिषेक सिंग, इगोर सिद (पब्लिशर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल) यांनीही या वेळी आपले विचार व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी तसेच माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, माजी प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश या वेळी वाचून दाखवण्यात आले.
त्यानंतर हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषांतून आभारप्रदर्शन केले गेले. प्रा. बोरिस झखारिंन यांनी रशियन भाषेतून, डॉ. बळीराम गायकवाड यांनी मराठीतून, तर डॉ. सोनू सैनी यांनी हिंदीतून आभारप्रदर्शन केले.
यानंतर विशेष सत्रात के. रत्नप्रभा (आयएएस) यांचे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर भाषण झाले. या सत्रात लुदमिला खोखलोवा यांनीही मत मांडले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक यांचेही विशेष व्याख्यान झाले. ह्या दोन दिवसीय परिषदेमध्ये एकूण 36 शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले.