एक होती राणी...!

16 Sep 2022 17:23:52
@चंद्रशेखर नेने
  
ब्रिटनच्या राजगादीवर दीर्घकाळ राज्य करणार्‍या राणी एलिझाबेथ द्वितीय हिचे नुकतेच निधन झाले. राज्य चालवण्याचे कोणतेही अधिकार नसले तरी, या राणीला देशात सर्वोच्च सन्मानाचे स्थान होते. तसेच जागतिक पटलावरही तिच्याविषयी आदरयुक्त दरारा होता. अशा या राणीची थोडक्यात कहाणी.

rani
 
आपल्या लहानपणी धार्मिक कहाण्यांमध्ये नेहमी सुरुवात असायची, ‘कोणे एके काळी, एक आटपाट नावाचं नगर होतं, तिथे एक राजा आणि एक राणी राज्य करत होते..’ असेच एक मोठे राज्य, राज्य कसले साम्राज्यच होते. सर्व जगावर पसरलेले. हे साम्राज्य इतके विस्तृत होते, की त्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नसे! म्हणजे सर्व जगात ह्या साम्राज्याचा असा एक तरी भाग असेच जिथे दिवसाच्या कुठल्या तरी तासात सूर्य तळपत असायचाच. त्याचे नाव होते ‘ब्रिटीश साम्राज्य’. 15 ऑगस्ट 1947 रोजी पर्यंत तर आपला भारतसुद्धा ह्याच साम्राज्याचा एक अंकित देश होता. पण दुसर्‍या महायुद्धात मात्र ब्रिटन ह्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, आणि जरी हे युद्ध ब्रिटनने जिंकले असले तरी त्या देशाची आर्थिक स्थिती मात्र अतिशय नाजूक झाली होती. त्यानंतर हे साम्राज्य सांभाळणे तेथील नेतृत्वाला अशक्य होऊन बसले. मग आधी भारत, त्यानंतर श्रीलंका, मग इस्राएल आणि पॅलेस्टाईन, मग आफ्रिकेतील आणि पश्चिम आशियातील अनेक देश, अशी एक रांगच लागली. सरते शेवटी 1984 साली ब्रुनेई हा पूर्व आशियातील देश स्वतंत्र झाला. असे देश स्वतंत्र झाल्यामुळे इंग्लंडचा महसूल घटत घटत रसातळाला गेला. म्हणजे तेथील सरकार आणि तेथील राजघराणे हळूहळू गरीब होत गेले. ह्या सर्व गरिबीचा आलेख ज्या दुर्दैवी राणीने साक्षात अनुभवला, ती राणी म्हणजे ‘क्वीन एलिझाबेथ द्वितीय’! 8 सप्टेंबर रोजी ती राणीसुद्धा आपल्या साम्राज्याप्रमाणेच अनंतात विलीन झाली. तिची ही कहाणी, थोडक्यात सांगितलेली!
 
 
1926 साली 21 एप्रिल रोजी एलिझाबेथ हिचा लंडन येथे जन्म झाला. तिचे काका आठवे एडवर्ड हे खरे तर राजे व्हायचे, पण त्यांनी एक घटस्फोटीत महिलेशी विवाह केल्याने, त्या वेळेच्या ब्रिटिश परंपरेनुसार त्यांना राजा होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे धाकटे बंधु सहावे जॉर्ज हे राजे झाले. त्यांची एलिझाबेथ ही ज्येष्ठ कन्या. त्या राजघराण्यातील नियमानुसार, ज्येष्ठ अपत्य, मग ते मुलगा असो की मुलगी, हेच राज्याचे वारसदार ठरते. म्हणजे केवळ योगायोगाने एलिझाबेथ ही युवराज्ञी झाली. पुढे तिचे लग्न 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीस आणि डेन्मार्क ह्या दोन्ही देशांचे राजपुत्र फिलिप माऊंटबॅटन ह्यांच्याशी झाला. ह्याच्या तीनच महिने आधी भारत स्वतंत्र झाला होता. म्हणजे एलिझाबेथ किंवा फिलिप हे कधीही भारताचे राजे किंवा राणी नव्हते! फिलिप ह्यांचे मामा, लॉर्ड माऊंटबॅटन ह्यांनीच भारतातील ब्रिटिश सत्तेचे हस्तांतरण केले. अशा प्रकारे ह्या युवराज्ञीचा भारताशी सुरुवातीपासूनच घनिष्ठ संबंध राहिलेला आहे. पुढे 1952 साली एलिझाबेथ आपल्या पतीबरोबर केनिया येथे सहलीस गेलेली असताना तिला आपले वडील, राजे सहावे जॉर्ज ह्यांच्या अकाली निधनाची दु:खद वार्ता मिळाली. त्यामुळे त्या दिवसापासून एलिझाबेथ ही ब्रिटनची राणी झाली. 2 जून 1953 रोजी एलिझाबेथ हिचा ब्रिटिश राणी म्हणून राज्याभिषेक झाला. म्हणजे राणी सुमारे सत्तर वर्षे राज्यावर होती! सर्व ज्ञात इतिहासात इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत राज्यावर असलेले फारच थोडे राज्यप्रमुख असतील! ह्यापूर्वीदेखील एक एलिझाबेथ राणी होऊन गेलेली असल्याने हिचे ‘एलिझाबेथ द्वितीय’ असे नामकरण झाले. फिलिप आपोआपच राणीचे सहकारी म्हणजे ‘राजे’ बनले! इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ब्रिटिश राज्यपद्धतीनुसार राजा अथवा राणी ह्यांना कुठलेही राज्य करण्याचे प्रत्यक्ष अधिकार नाहीत! सर्व अधिकार ब्रिटिश संसदेकडे असतात. राजा अथवा राणी हे राज्याचे केवळ नामधारी प्रमुख असतात. ब्रिटिश जनतेने हा राज्य करण्याचा अधिकार फार पूर्वीच सन 1649 साली त्या वेळेच्या चार्ल्स नावाच्या राजाशी लढाई करून मिळवलेला आहे. त्यामुळेच एलिझाबेथ आणि फिलिप हे नामधारी राष्ट्रप्रमुख होते. त्यांच्या हातात प्रत्यक्ष काहीही अधिकार नव्हते.
राणीला 1948 साली मुलगा झाला, त्याचे नाव ‘चार्ल्स’ ठेवले. हा ज्येष्ठ पुत्र, म्हणजेच परंपरेनुसार राज्याचा भावी राजा म्हणून तो युवराज झाला. परंपरेनुसार त्याला ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ ही पदवी दिली गेली. राणी आणि राजा ही दोघेही दीर्घायुषी होऊन गेले. राजे फिलिप हे वयाच्या 99 व्या वर्षी 9 एप्रिल 1921 रोजी मरण पावले. त्यानंतर अवघ्या दीड वर्षांच्या आतच एलिझाबेथचेही निधन झाले.
 
 
इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचे एक मुख्य कर्तव्य म्हणजे त्यांनी संसदेतील निवडलेल्या पंतप्रधानाला शपथ द्यायची असते. राणीने आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत एकूण 15 पंतप्रधानांना शपथ दिली होती! एक विलक्षण योगायोग म्हणजे पंधरावी शपथ दिलेल्या आणि सध्या पंतप्रधान असलेल्या ‘लिझ ट्रस’ यांचेदेखील नाव ‘एलिझाबेथ’ हेच आहे! म्हणजे एका एलिझाबेथने दुसर्‍या एलिझाबेथकडे राज्याची सूत्रे सोपवून एक्झिट घेतली असे म्हणता येईल!
 
 
 
राणीने 1953 साली राज्याभिषेकानंतर पहिलेच पंतप्रधान पाहिले ते म्हणजे विन्स्टन चर्चिल. हे 1951 साली दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी निवडून आले होते. ते राणीपेक्षा 51 वर्षांनी मोठे होते! शिवाय दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनला विजय मिळवून देणारे असल्याने त्यांना एक मोठे वलय प्राप्त झाले होते. त्यांच्यासमोर ही अगदी नवशिकी राणी होती. परंतु राणीला तिच्या मामांनी, म्हणजे लॉर्ड माऊंटबॅटन ह्यांनी उत्तमरित्या प्रशिक्षण दिले होते. दरबारी रीतिरिवाज, राजघराण्याची कर्तव्ये, राजकारणी नेत्याबरोबर करायची वागणूक अशा सर्व बाबतीत मामांनी दिलेले सल्ले तिने उत्तमरित्या आत्मसात केले. चर्चिल ह्यांनीदेखील तिच्या एकूण वागणुकीबद्दल तिचे कौतुकच केले आहे. त्यानंतरसुद्धा अनेक निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वाच्या पंतप्रधानांबरोबर राणीने उत्तमरित्या जुळवून घेतले. आपल्या पदाचा आब कसा राखावा, हे तिच्या एकूणच भारदस्त वागणुकीतून बघता येते. दुर्दैवाने तिच्या कारकीर्दीच्या संपूर्ण कालखंडात ब्रिटनची आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा सतत खालावतच गेली. आता तर नुकतेच ब्रिटिश अर्थव्यवस्थेचे जगातील पाचवे स्थान हिरावून भारताने त्याला सहाव्या स्थानावर ढकलले आहे. खुद्द ब्रिटन देशामध्येच आशियाई, आफ्रिकी वंशाच्या स्थलांतरित लोकांची प्रचंड आवक झाल्याने मूळ ब्रिटिश गोरे लोक त्यांच्याच देशात अल्पसंख्याक होतील की काय अशी भीती व्यक्त केली जाते.
 

साप्ताहिक विवेकच्या आगामी 'हिंदुत्व' ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार!
"हिंदुत्व ग्रंथ" नोंदणी अभियान

https://www.evivek.com/hindutva-granth/

 
 
 
राणीने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला पाहिलेले सत्तर वर्षांपूर्वीचे जग आता आमूलाग्र बदलले आहे. कुटुंबव्यवस्था, आर्थिक ताणतणाव, सामाजिक नात्यांची उसवलेली वीण, इंटरनेट आणि संगणक ह्यासारखे अफाट तांत्रिक बदल हे सर्व बघण्याचा आणि त्याचे तर्‍हेतर्‍हेचे आघात सोसण्याचा प्रसंग राणीवर वारंवार आला. परंतु ह्या सार्‍याला तिने धैर्याने आणि एका शांत वृत्तीने तोंड दिले. ह्या सर्वात तिला तिच्या पतीची मोलाची प्रदीर्घ साथ लाभली. कौटुंबिक परिस्थितीत तिला अनेक विलक्षण स्थित्यंतरे पहावी लागली. त्याची सुरुवात तिचा ज्येष्ठ पुत्र आणि युवराज चार्ल्सपासून झाली. त्याचे प्रेम कॅमीला पार्कर बॉल्स ह्या एका विवाहित स्त्रीवर होते आणि ती आपल्या पतीला घटस्फोट देऊन चार्ल्सबरोबर लग्न करण्यास तयार होती. पण त्यामुळे त्याच्या युवराज पदाला धोका निर्माण होईल म्हणून राणीने त्याचे लग्न डायना स्पेन्सर ह्या घरंदाज आणि सुस्वरूप तरुणीशी लावून दिले. पण जरी ह्या दाम्पत्याला दोन मुलगे झाले, तरी चार्ल्स आणि तिचा विवाह टिकला नाही. पुढे डायनाचा अपघाती मृत्यू झाला. आजही अनेकांचे असे मत आहे की, तिला तिच्या एका प्रियकरापासून मूल होणार होते, म्हणून ब्रिटिश गुप्तहेर खात्याने हा अपघात घडवून आणला. खरे-खोटे ते हेरखातेच जाणो. पण राणीला काही ह्या आपल्या मुलाकडून सुख आणि समाधान मिळालेले दिसत नाही. इकडे राणीला लाभलेल्या प्रदीर्घ आयुष्यामुळे चार्ल्सलादेखील त्याच्या तरुणपणी राजपदाचा लाभ झाला नाही. आत्ता कुठे राणीच्या निधनानंतर वयाच्या 73 व्या वर्षी तो राजा झाला! तेही त्याने जरी घटस्फोटीत स्त्रीबरोबर विवाह केला असला, तरी त्याला हा मान मिळालेला आहे. कारण मध्यंतरी ब्रिटनच्या राजघराण्याने आपली पारंपरिक बंधने शिथिल केली आहेत. राणीने नुकतेच त्याला आणि त्याच्या पत्नीला युवराज आणि सहकारी राणी म्हणजेच ‘क्वीन कॉन्सॉर्ट’ चा बहुमान प्रदान केला !
 
 
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी भारतातील ब्रिटिश राज्य आणि त्या काळातील गुलामगिरीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार नुकताच त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध ‘राज पथ’ हा रस्ता’ ब्रिटीश राज’ ची आठवण करून देतो, म्हणून त्याचे नवे नामकरण ‘कर्तव्य पथ’ असे केले आहे. त्याच ‘ब्रिटिश राज’चे एक जिवंत प्रतीक असलेल्या एलिझाबेथने ह्याच वेळी आपली एक्झिट घ्यावी, हा एक विलक्षणच योगायोग!
 
 
 
राणीबद्दल सर्व जगात एक आदराची भावना होती. खरे म्हणजे ब्रिटिश राजघराण्यातील अनेक मौल्यवान वस्तू, (उदाहरणार्थ जगप्रसिद्ध ‘कोहिनूर’ हिरा, जो की ब्रिटिश राजमुकुटात जडवलेला आहे,) हे सर्व त्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपल्या साम्राज्यातून लुटून आणलेले आहे. ही लूट त्यांनी परत करण्याचा दबाव त्यांच्यावर, म्हणजेच ब्रिटिश राज्यकर्त्यांवर त्यांच्या आधीच्या वसाहतींकडून येतच असतो. असे असले तरी अजूनपर्यंत तरी ब्रिटनने अशी कुठलीही मोठी वस्तू परत दिलेली नाही. तरीही राणीबद्दल एक आदरयुक्त प्रेम बहुतेक सर्व जगातून दिसून आले. विशेषतः इंग्लंड आणि अमेरिका ह्या दोन्ही देशांत असलेली, तिच्याबद्दलची आपुलकीची भावना, मला स्वतःला प्रत्ययास आलेली आहे. मला वाटते आपल्या लहानपणीच्या त्या कहाणीतील राजाराणीच्या रूपात आपण कदाचित ह्या इंग्लिश राणीला बघत असू! कारण अगदी पाश्चात्य परीकथांमध्येदेखील राजे, राण्या व राजपुत्रांच्या गोष्टी गुंफलेल्या आहेतच! आणि सध्याच्या काळातील दृश्य आणि शिवाय दीर्घकाळपर्यंत समोर असलेली ही ‘राणी‘ आपल्याला म्हणूनच कदाचित त्या रम्य बालकाळात घेऊन जात असावी! आता नवीन 73 वर्षीय राजाची कहाणी पुढे काय वळण घेते ते बघू या!
 
 
Powered By Sangraha 9.0