छत्रपती, पेशवे आणि पवार

12 Sep 2022 15:21:55
 दिल्लीत 10 व 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन झाले. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींसमोर पक्षाच्या विस्ताराचे स्वप्न मांडताना सत्ताधारी पक्षावर टीका केली गेली. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचे स्मरण करत ‘दिल्लीपुढे झुकणार नाही’ असा निर्धार व्यक्त केला गेला. मात्र हा निर्धार व्यक्त करताना शरद पवार आपलाच भूतकाळ विसरले काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

pawar
 
“छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच दिल्लीसमोर झुकले नाहीत. बाजीराव पेशवे यांनी इथूनच दिल्लीला आव्हान दिले. पेशव्यांनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये तळ ठोकला होता.” असे शरद पवार यांनी उद्गार काढले आहेत. दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. याच अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली. पुन्हा नव्याने अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मोदी सरकारला खुले आव्हान देत त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्षपद शरद पवार भूषवत आहेत. मागील पंचवीस वर्षांत राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास पात्र नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झाला नाही, इतकी या पक्षात प्रबळ लोकशाही आहे. या अधिवेशनात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलण्यास संधी न दिल्याने ते व्यासपीठ सोडून गेल्याची बातमी प्रकाशित झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात कुणी बोलावे आणि कुणी नाही हे ठरवणे त्या पक्षाची अंतर्गत बाब असली, तरीही माध्यमांतून बोभाटा झाला तो झालाच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल कशी असावी हे ठरवणे पक्षनेतृत्वाचे काम आहे. आपला पक्ष देशव्यापी आहे, हे सिद्ध करण्यासाठी अशी अधिवेशने होत राहतात. आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षावर टीका केली जाते. शरद पवारांनी अशी टीका केली आहे. त्याबाबतही आमचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही. शरद पवारांच्या भाषणातून जी मांडणी केली गेली, त्यातील विरोधाभास पाहिला की कोणते शरद पवार खरे? असा आम्हाला प्रश्न पडतो आहे.
 
 
शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला, तर आपल्या लक्षात येईल की त्यांना विस्मरणाचा असाध्य आजार आहे, किंवा ते राजकीय फायदा लक्षात घेऊन आपल्या भूमिका वारंवार बदलतात असेही म्हणता येईल. महाराष्ट्राचा जाणता राजा अशा शब्दांत शरद पवारांचा उल्लेख केला जातो. बहुधा त्यांना तो शब्दप्रयोग आवडत असावा, म्हणून त्यांनी माझा असा उल्लेख करू नका असे सांगितले नाही. मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही, असे जाहीर उद्गार त्यांनी काही वर्षांपूर्वी काढले होते. शिवछत्रपतींचा जाज्ज्वल्य इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी आयुष्य पणाला लावणार्‍या मंडळींचा केवळ जातीमुळे अपमान केला जात असताना शरद पवार मूग गिळून गप्प बसले की त्यांनी या कामासाठी मूक संमती दिली होती, हे स्पष्ट व्हायला हवे. कारण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संबोधित करताना शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली आहे. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वाहक आहेत की कामापुरता छत्रपतींचा उल्लेख केला आहे, हे स्पष्ट व्हायला हवे. शरद पवार म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीसमोर झुकले नव्हते. मात्र तेव्हा दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब होता. विद्यमान केंद्र सरकार शरद पवारांना औरंगजेबाची राजवट वाटते काय? हेही स्पष्ट व्हायला हवे. महाराष्ट्रातील जनता जातीजातीत विभागण्यासाठी खतपाणी पुरवठा करणारे शरद पवार कोणत्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहेत?
 
 
 
अशीच गोष्ट श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या बाबतीत आहे. शरद पवारांनी मनोहर जोशी यांची जात अधोरेखित करण्यासाठी ’श्रीमंत’ हा शब्द वापरला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रात पेशवाई आल्याची आवई शरद पवारांच्या चेल्यांनी उठली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तर अशा प्रकारची जातीय समीकरणे मांडायची होड लागली होती. पुण्यातील एका कार्यक्रमात पुणेरी पगडी नाकारून शरद पवारांनी आपण या जातीय राजकारणाचे समर्थन करत आहोत हे दाखवून दिले होते. पुणेरी पगडी म्हणजे पेशव्यांचे प्रतीक असा समज रूढ करण्यात शरद पवारांनी हातभार लावला होता. पुणेरी पगडी नाकारून फुले पगडीचा स्वीकार करत त्यांनी आपण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील सामाजिक जीवनात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी कायम अग्रेसर असणारे लोक शरद पवारांच्या आवतीभोवती आहेत. ते शरद पवारांना हवा तसा इतिहास मांडतात. पेशवाई म्हणजे बहुजन समाजाचे शोषणपर्व अशी त्यांची मांडणी असते. असे असताना शरद पवारांना दिल्ली अधिवेशनात बाजीराव पेशवे यांची आठवण का झाली? बाजीराव पेशवे आणि त्याचे कर्तृत्व शरद पवारांना आजच का आठवले?
 
 
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, तर असे लक्षात येईल की, शरद पवार हे आपल्या सोयीचा इतिहास मांडतात. बाकी अन्य गोष्टींशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. दिल्लीत जाऊन केंद्र सरकारविरुद्ध शड्डू ठोकताना शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांची आठवण झाली, त्यामागे ही राजकीय भूमिका आहे हे वेगळे सांगायला नको.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळ एक केला. अलुतेदार, बलुतेदार यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जात, संप्रदाय यांच्या पलीकडे जाऊन मराठा असल्याचा भाव महाराजांनी जागवला आणि सर्वांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. बाजीराव पेशवे यांनी दिल्लीचे तख्त जिंकले ते विविध जातींतील कर्तबगार हरहुन्नरी माणसांना सोबत घेऊनच. दिल्ली पेशव्यांनी नव्हे, तर महाराष्ट्राच्या बुलंद एकजुटीने जिंकली होती. हा इतिहास पाहिला, तर शरद पवारांच्या तो पचनी पडेल असे वाटत नाही. साडेतीन जिल्ह्यांपुरत्या मर्यादित असणार्‍या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा, विचाराचा कधी मागोवा घेतला आहे का? एका बाजूला पुरोगामी असल्याचे सोंग घ्यायचे आणि दुसर्‍या बाजूला जातीजातींतील गणंग आपल्या दिमतीला उभे करून आपण कसे जाणते राजे आहोत हे सिद्ध करण्यासाठी आटापिटा करायचा, ही शरदनीती आहे आणि त्यानुसार ते आपले रूप बदलत असतात. महाराष्ट्रात पुरोगामी म्हणवून मिरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे सोयीचे नाहीत, पण दिल्लीत केंद्र सरकारच्या विरुद्ध दंड थोपटताना शरद पवारांना याच महापुरुषांचा आधार घ्यावा लागतो.. हा नियतीने घेतलेला शरद पवारांचा सूड तर नाही ना?
 
 
Powered By Sangraha 9.0