रक्तपेढी नव्हे, रक्तदान चळवळ

30 Aug 2022 17:39:03
@सुहास वैद्य | 9922915254
 1993च्या सुरुवातीला डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार रक्तपेढी असावी असा विचार झाला आणि त्यातूनच 6 सप्टेंबर 1993 रोजी दत्ताजी भाले रक्तपेढीचा जन्म झाला. यावर्षी रक्तपेढीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. यातून मिळणारा आनंदाचा आणि सात्त्विक समाधानाचा ठेवा अनमोल आहे, कारण समाजाच्या सादाला सेवारूपी प्रतिसाद आहे. एका अर्थाने ‘दत्ताजी भाले’ हे नाव सार्थक करताना आजच्या भाषेत बोलायचे तर रक्तपेढीचा हाच ‘ब्रँड’ तयार झाला आहे आणि आज 30 वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. रक्तपेढीच्या माध्यमातून केलेल्या सामजिक कार्याचा आढावा घेणारा लेख...
 
blood bank
 
संभाजीनगरच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयात उपचारांसाठी भरती केलेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया करायची ठरल्यानंतर शस्त्रक्रियेच्या वेळी लागणार्‍या रक्तासाठी त्या रुग्णाजवळ रक्तदान करणारे कोणीच नव्हते, त्या वेळी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर स्वत: रक्तदान करण्यासाठी तयार होतात.. डॉक्टर रक्तदान करतात, शस्त्रक्रिया यशस्वी होते आणि रुग्ण बरा होऊन घरी जातो..
पत्नीला तिच्या आजारपणात रक्त मिळायला आलेल्या अडचणी लक्षात ठेवून तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी शंभर किलोमीटर्सचा प्रवास करून कुणी रक्तदाता रक्तदान करायला रक्तपेढीत येतो..
 
 
रक्तपेढीने वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या पत्राचा भावनिक आशय लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातून कुणी रक्तदाता रक्तदान करायला संभाजीनगरच्या रक्तपेढीत येतो..
 
आपल्या परिसरात रक्तदान शिबिर आहे ही बातमी वृत्तपत्रात वाचून, रक्तदान करायला कुणी रक्तदाता सायकलवरून भर पावसात शिबिरात येतो..
 
 
ह्या आणि अशा असंख्य जणांच्या योगदानातून दत्ताजी भाले रक्तपेढीची रक्तदान चळवळ भक्कमपणे उभी आहे.
1993च्या सुरुवातीला डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार रक्तपेढी असावी असा विचार झाला. ही रक्तपेढी शहरातील सर्वांची रक्ताची गरज पूर्ण करू शकेल अशी असावी, हे हळूहळू निश्चित करण्यात आले. 1989 साली डॉ. हेडगेवार रुग्णालय स्थापन करताना तत्कालीन संस्थापक डॉक्टरांनी स्वत:जवळची पूंजी आणि त्यावर मिळालेले बँकेचे तुटपुंजे कर्ज उपयोगात आणलेले होते. रक्तपेढी उभी करायची तर ती सर्व समाजाला आपली वाटावी आणि प्रारंभिक खर्च जर समाजातून उभा राहिला, तर रक्तसंकलनाचा आणि वितरणाचा खर्चही कमी होईल, या उद्देशाने निधी गोळा करायला सुरुवात केली.
 
 
dattaji bhale
 
शुद्ध सात्त्विक कार्याला समाज भरघोस पाठिंबा देतो, याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात पाहायला मिळतात. 1899 साली स्वदेशी आंदोलनाची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी पैसा फंड सोसायटी स्थापन करण्यात आली होती आणि त्यातून तळेगाव येथे काच कारखाना निर्माण करण्यात आला होता. 1970 सालात कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारक अशाच श्रद्धानिधीतून उभे करण्यात आले आहे. 2024मध्ये बांधून पूर्ण होणारे अयोध्येतील राममंदिर या प्रकारे गोळा केलेल्या श्रद्धानिधीतूनच उभे राहणार आहे.
 
 
असाच अल्पस्वल्प श्रद्धानिधी हीच रक्तपेढीची आधारशिला आहे. कुणावरही एकदम ओझे नको, पण पैसे द्यावेसेही वाटले पाहिजेत, म्हणून अगदी दोन रुपयांच्या कूपनपासून सुरुवात झाली. रक्तदान आणि त्यासाठी रक्तपेढीचे महत्त्व शालेय मुलांना कळावे, म्हणून हे कूपन शाळाशाळांमध्ये वाटण्यात आले आणि त्याचबरोबर समाजाच्या सर्व स्तरांतून निधी जमवला गेला. सर्व तयारी झाली. रक्तपेढीला नाव काय असावे यावर चर्चा सुरू असताना त्या वेळचे महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. प्रल्हादजी अभ्यंकरांनी ‘दत्ताजी भाले’ यांचे नाव सुचवले. आणीबाणीच्या कालखंडात विभाग प्रचारक म्हणून दत्ताजींकडे दायित्व होते. जेव्हा असंख्य स्वयंसेवक मिसा कायद्याखाली कारावासामध्ये होते, त्या वेळी त्यांनी संपूर्ण मराठवाडा शब्दश: पायी पालथा घालून लाखो घरांतील संपर्क जिताजागता ठेवला. त्यांच्यावरही पकड वॉरंट असल्याने सार्वजनिक वाहनातून आणि दिवसाउजेडी प्रवास टाळून त्यांनी रात्री-अपरात्री प्रवास केले. यामध्ये कुठलीही अतिशयोक्ती नाही की त्यांनी नित्य नेहमीचा मार्ग बदलून शेतातून, बांधावरून, काट्याकुट्यातून, डोंगरदर्‍यांतून मार्ग काढत सर्वत्र जागता संचार ठेवला. ज्या काळात संपर्काची साधने खूपच मर्यादित होती, त्या काळात दत्ताजी अक्षरश: लाखो घरांपर्यंत पोहोचले. अनेकांना धीर दिला. असंख्य मने सावरली. घरातील कर्त्या पुरुषाच्या माघारी घरे जिवंत ठेवली. कधी कुणाचा भाऊ, कधी मित्र, कधी प्रेमळ मार्गदर्शक बनून त्यांच्यातील राष्ट्रप्रेमाचा वन्ही पेटता ठेवला.
सचोटी, कर्तव्यदक्षता, उच्च ध्येयाप्रती समर्पण, निर्मम कर्तव्यकठोरता अशा अनेक गुणसमुच्चयाचे दुसरे नाव ‘दत्ताजी भाले’.
6 सप्टेंबर 1993 रोजी सुरू झालेल्या रक्तपेढीच्या कार्यातून हीच गुणवैशिष्ट्ये समाजासमोर यावी, हा त्यामागचा उद्देश होता आणि आज 30 वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. एका अर्थाने ‘दत्ताजी भाले’ हे नाव सार्थक करताना आजच्या भाषेत बोलायचे तर रक्तपेढीचा हाच ‘ब्रँड’ तयार झाला आहे.
 
 
सुरुवातीच्या काळात दत्ताजी भाले रक्तपेढीसमोर अनेक आव्हाने होती. समाजात रक्तदानाविषयी जागरूकता नव्हती. रक्तदानासंबंधी अनेक गैरसमज होते. काही प्रमाणात व्यावसायिक रक्तदाते या समस्येलासुद्धा तोंड द्यावे लागले. आर्थिक गणित, रक्तसाठवण, वितरण, गुणवत्ता या सर्व कसोट्यांवर रक्तपेढी संघर्ष करत होती. दुसर्‍या बाजूला रक्तदान, जनजागृती, रक्तदाते या विषयातही दत्ताजी भाले रक्तपेढी अग्रेसर होत होती.
 
 
 
रक्तदान, रक्तसाठवण आणि रक्तवितरण यामधील कुठल्याही वैद्यकीय प्रक्रियेत गुणवत्तेशी तडजोड करायची नाही, हे ब्रीदवाक्य आजसुद्धा तितक्याच कठोरतेने आमलात आणले जाते. याचे काही सामाजिक तोटे सहन करावे लागले, पण दीर्घकालीन कामात रुग्ण लवकर आणि कुठलेही साइड इफेक्ट न होता बरा होण्यात त्याचा उपयोग झाला, याचे त्या डॉक्टरांना आणि रुग्णाच्या नातेवाइकांना प्रत्यंतर आले आहे.
 
 
dattaji bhale
कुठलेही रक्तदान शिबिर उघड्यावर, मोकळ्या जागेत, क्रीडांगणावर, अस्वच्छ जागेवर घेऊ नये हा साधा नियम किंवा कायदा असूनही अनेक समाजसुधारक, नेते, पुढारी यांचा तो आग्रह असायचा. काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या कल्पनेत आपण चुकीचे काही करतो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे. अशा कितीतरी चुकीच्या समजुती आणि गैरसमज दूर करून ‘सुरक्षित रक्तदान’ ही संकल्पना रुजवण्यात दत्ताजी भाले रक्तपेढीने कसोशीने प्रयत्न केले आहेत. सर्व स्तरांवर गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आग्रह हा दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कार्याचा मेरुदंड ठरला आहे. आज रक्तदान आणि वितरण या क्षेत्रांत दत्ताजी भाले रक्तपेढीकडे सन्मानाने पाहिले जाते. दत्ताजी भाले रक्तपेढीने या क्षेत्रात नवनवीन मानदंड निर्माण केले आहेत. योगायोग असा की, शासनदरबारी त्याची महत्ता कळल्याने पुढे त्याचे कायद्यात रूपांतर झाले.
 
 
रक्तदात्याने रक्तदान केल्यावर त्याच्या रक्ताची ‘कावीळ ब’ ह्या आजाराची तपासणी करावी की करू नये? असा विचार शासन स्तरावर सुरू असताना दत्ताजी भाले रक्तपेढीने थोडा आर्थिक भार सोसत थोड्याफार प्रमाणात रुग्णाकडून भरपाई करून आपल्या प्रयोगशाळेत ही तपासणी अनिवार्य करून टाकली. त्याच काळात शासनाने सर्व प्रमाणित रक्तपेढ्यांना ‘एचआयव्ही किट’ मोफत पाठवले होते, ज्यामुळे रक्ततपासणीचा खर्च कमी झाला. दत्ताजी भाले रक्तपेढीने तत्काळ आपल्या सेवाशुल्कात त्या तपासणीचा खर्च कमी करून रुग्णांना त्याचा फायदा करून दिला.
 
 
 
जन्मतः ‘थॅलेसेमिया’ (Thalassemia) असलेल्या रुग्णांना दर महिना, तीन आठवड्यांनी रक्त द्यायची गरज असते. अशा वेळी अनेक पालकांचे मनोधैर्य आणि आर्थिक गणित कोलमडलेले असते. त्यांना किमान आपल्या बाजूने थोडा धीर द्यावा, म्हणून दत्ताजी भाले रक्तपेढीने अगदी सुरुवातीपासून आर्थिक भार सोसत अशा मुलांना विना सेवाशुल्क रक्त उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. त्यानंतर कितीतरी वर्षांनी शासनाने महाराष्ट्रातील सर्व रक्तपेढ्यांसाठी हा कायदाच केला की नोंदणीकृत ‘थॅलेसेमियाग्रस्त’ मुलांना विनामूल्य रक्त दिले जावे. दत्ताजी भाले रक्तपेढीने असे कितीतरी समाजोपयोगी पायंडे घातले आहेत, ज्यांचे आज कायद्यात तरी रूपांतर झाले आहे किंवा सर्व समाजमान्य झाले आहेत. दत्ताजी भाले रक्तपेढी अशा वेळी एक पाऊल पुढे असते. नवीन वैद्यकीय संशोधनानुसार थॅलेसेमिया रुग्णांना दिले जाणारे रक्त जर एकाच रक्तदात्याचे असेल तर रुग्णाला त्याचे साइड इफेक्ट कमी जाणवतात. त्यामुळे त्या रूग्णाला वारंवार रक्त देणार्‍यांंची साखळी निर्माण करणे अपेक्षित असते. त्याला ‘फेनोटाइप ब्लड डोनेशन’ म्हणतात. दत्ताजी भाले रक्तपेढीने अशी जवळजवळ 45 रुग्णांसाठी 540 रक्तदात्यांची साखळी निर्माण करून नवा विक्रम केला आहे. हे सर्व काम एका सेवाव्रतीने आपले लाइफ मिशन समजून अत्यंत काटेकोर पद्धतीने उभे केले आणि आजही त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
 
 
या सगळ्याचा परिणाम असा झाला की थॅलेसेमिया रुग्णांना रक्तदात्यासाठी धावपळ करावी लागत नाही आणि रुग्णाचे रक्त देण्याचे वेळापत्रकही सांभाळले जाते. इथे त्यासंबंधी एका पालकाचा अनुभव नमूद करण्यासारखा आहे. त्याच्या थॅलेसेमियाग्रस्त पाल्याला रक्ताची गरज असायची, त्या वेळी अनेक रक्तपेढ्या रक्ताची उपलब्धता नाही म्हणून रक्त देण्यास नकार देत होत्या. रक्त देण्याची वेळ येऊनही आठ आठ दिवस त्याच्या मुलीला रक्तासाठी तडफडावे लागे. आईवडील म्हणून त्यांची होणारी घालमेल असह्य असायची. पण जेव्हा दत्ताजी भाले रक्तपेढीत नोंदणी झाली, त्या दिवसापासून फक्त “रक्त घ्यायला कधी येऊ?” एवढ्या फोनवर रक्ताची उपलब्धता होत आहे.
 
 
ज्या समाजाकडून आपण काही घेतो, त्या समाजाला आपण देणे लागतो ही भावना इथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये असल्याने विविध स्तरांमधील समाजबांधव सेवाव्रती म्हणून कायमस्वरूपी या कार्याशी जोडले गेले आहेत. सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या याच सेवाव्रतींकडून आजही रक्तदान जनजागृतीचे काम केले जाते. यामध्ये नवनवीन उपक्रम, अभिनव कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
रक्तदान करणार्‍या रक्तदात्याचा जन्मदिनांक रक्तपेढीच्या अर्जात नोंदला जातो. त्या रक्तदात्याला दर वर्षी त्याच्या वाढदिवसाला स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या शुभेच्छांचे पत्र रक्तपेढीकडून पाठवले जाते. गेली तीस वर्षे इथे स्वयंप्रेरणेने, निरलस वृत्तीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांकडून त्याचे लिखाण केले जाते. काही वर्षांपूर्वी एका प्रथितयश वृत्तपत्राने आणि सामाजिक काम करणार्‍या एका विश्वस्त संस्थेने पथनाट्य स्पर्धा आयोजित केली होती. दत्ताजी भाले रक्तपेढीने जनजागृतीची संधी समजून लगेच त्यात भाग घेतला आणि रक्तदान या विषयावरचे पथनाट्य सादर केले.
 
 
त्याच्या कितीतरी आधी रक्तपेढीने याच विषयावरची पथनाट्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करून शहरात वातावरण निर्माण केले होते. रक्तदान चळवळ मजबूत करण्यासाठी रॅलीचे, गणेशोत्सव रक्तदान देखावा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या सर्व स्पर्धांच्या बक्षीस वितरणासाठी वंदना गुप्ते, द.मा. मिरासदार, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले अशा मान्यवरांना बोलावून चळवळीत सक्रिय झालेल्यांना प्रोत्साहित केले आहे.
 
 
दत्ताजी भाले रक्तपेढीने गुणवत्ता आणि संबंधित कायदा याचे काटेकोर पालन केले. त्याचा सखोल अभ्यास केला. त्याचा सुसंगत अर्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपला व्यवहार ठेवला. हा व्यवहार इतका पारदर्शक आहे की, रा.स्व. संघ म्हटले की ज्यांना राजकीय अस्पृश्यता आठवते, ते विरोधी लोकसुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करायचे असेल किंवा त्यांच्यापैकी कुणाला रक्ताची गरज असेल, तर ‘आमचा राजकीय विरोध वेगळा आणि तुमची गुणवत्ता वेगळी’ असे म्हणून आवर्जून दत्ताजी भाले रक्तपेढीशी संपर्क करतात.
 
 
dattaji bhale
ह्या गुणवत्तेच्या आणि व्यावहारिक पारदर्शकतेच्या बळावर रक्तपेढीचे काम संभाजीनगरच्या बाहेर अनेक जिल्ह्यांत सर्वदूर पोहोचले आहे. राज्य रक्तसंक्रमण परिषदेला आणि राज्य शासनाला रक्तपेढीच्या या कार्याची दखल घ्यावी लागली. 2017 साली दत्ताजी भाले रक्तपेढीला राज्यातील सर्वोत्कृष्ट रक्तपेढीचा पुरस्कार मिळाला. दत्ताजी भाले रक्तपेढीने हा मान गेली पाच वर्षे सातत्याने टिकवून ठेवला आहे. या वर्षीसुद्धा शासनाचा सर्वोत्कृष्ट रक्तपेढीचा पुरस्कार दत्ताजी भाले रक्तपेढीला मिळाला आहे.
 
 
गुणवत्तेला प्राधान्य देत असताना रक्तपेढीने रक्तदान चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी असंख्य वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले. रक्तदान विषयावर चित्रस्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा याबरोबरीने 1 ऑक्टोबर राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस, जागतिक रक्तदाता दिवस यातून समाजप्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले आहे. याचा एक परिणाम म्हणजे रक्तपेढीच्या या कार्याला स्वयंप्रेरणेने खांद्यावर घेऊन ही चळवळ पुढे नेणारे अनेक सेवाव्रती कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत आणि होत आहेत. सामूहिक निर्णयप्रक्रियेतून रक्तपेढीच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलेले आहे. त्यांची ही कर्मशीलता इतकी विलक्षण आहे की, आपआपल्या कुवतीला जे झेपेल त्या गतीने रक्तदानाचे काम पुढे नेत आहेत.
 
 
शिबिर संयोजनात पुढाकार घेणारे एक कार्यकर्ते, प्रत्येक शिबिरात जोपर्यंत रक्तदात्यांची संख्या किमान 25 होत नाही, तोपर्यंत चहा पीत नाहीत. स्वत:च्या नोकरी-व्यवसायामुळे शिबिर आयोजित करायला वेळ मिळत नाही, म्हणून एक सेवाव्रती रोज एक रक्तदाता रक्तपेढीत घेऊन यायचे आणि त्याला रक्तदान करायला सांगायचे. असे त्यांनी सलग पंचवीस दिवस केले. अशाच एका सेवाव्रतींना रक्तदान शिबिर सुरू असताना मुंबईहून फोन आला की त्यांच्या नातेवाइकांना देवाज्ञा झाली आहे. शिबिर संयोजक म्हणाले की “काका, तुम्ही जा. आम्ही शिबिराचे पाहून घेतो.” सेवाव्रती म्हणाले, “जे गेले, ते माझ्या तेथे जाण्याने परत येणार नाही आहेत. त्यापेक्षा मी आत्ता इथे राहून जिवंत असणार्‍यांसाठी करत असलेले काम महत्त्वाचे आहे.”
 
 
 
दत्ताजी भाले रक्तपेढीत काम करणारा कर्मचारी इथल्या नि:स्वार्थी कार्यपद्धतीमुळे, याच कार्याचा राजदूत (Ambassador) कधी बनून जातो, ते त्यालाच कळत नाही. नव्यानेच लागलेला एक कर्मचारी रात्रपाळीसाठी रक्तपेढीत पोहोचला. जरा स्थिरस्थावर होत नाही, तोच त्याला डॉ. हेडगेवार रुग्णालयातून फोन आला की दुपारी तुमचे ज्या कंपनीत रक्तदान शिबिर झाले होते, तेथील एका कामगाराला खूप त्रास होतो आहे म्हणून तो इथल्या आपत्कालीन विभागात आला आहे. संबंधित कर्मचारी लगेच तेथे पोहोचला. तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला तपासले आणि सांगितले की “याने रक्तदान केल्यानंतर दिवसभरात काहीही खाल्लेले नाही, म्हणून हा त्रास झाला आहे. त्याला पटकन जेवण द्या.” त्याच्याबरोबर आलेल्या सहकार्‍यांना प्रश्न पडला की इतक्या रात्री पटकन कुठून जेवण आणायचे? ते असा विचार करेपर्यंत रक्तपेढीच्या कर्मचार्‍याने कामावर येताना आणलेला आपला घरचा जेवणाचा डबा त्या कामगाराला देऊन टाकला. स्वत: मात्र रात्रभर उपाशीपोटी आपली ड्यूटी केली.
 

dattaji bhale
 
केव्हातरी रात्री रक्तपेढीत एक वृद्ध महिला आली. ग्रामीण भागातून आलेली. शहरी वातावरणाला सरावलेली नसावी. तिचा नवरा शासकीय रुग्णालयात भरती होता. तिने त्याच्यासाठी रक्ताची मागणी केली होती. त्यासाठी सेवाशुल्क द्यावे लागते असे कळल्यानंतर ती कळवळून म्हणाली, “दादा, आता माझ्याकडे पैसे नाहीत. माझं हे डोरलं (मंगळसूत्र) ठेवून घे, पण मला रक्ताची बाटली दे. मी दोन दिवसांत पैशाची सोय झाली की सगळे पैसे देईन.” त्या गरीब असाहाय्य वृद्ध महिलेचे मंगळसूत्र घेणे शक्य नव्हते आणि नियमानुसार सेवाशुल्काशिवाय रक्त देणेही शक्य नव्हते. काउंटरवरच्या कर्मचार्‍याला काय करावे हा प्रश्न पडला. शेवटी त्याने विचार केला - जर या महिलेने आणून दिले तर ठीक, नाहीतर हे पैसे सामाजिक कामासाठी उपयोगात आले असे समजून त्याचे पैसे स्वत: भरले. ती वृद्ध महिला दुवा देत निघून गेली. तो कर्मचारी ही घटना विसरून गेला. चार-सहा दिवसांनी ती वृद्ध महिला पुन्हा रक्तपेढीत आली आणि त्या रात्री घेऊन गेलेल्या रक्ताच्या बाटलीचे पैसे काउंटरवर देऊन गेली.
 
 
 
ओ निगेटिव्ह हा तसा दुर्मीळ रक्तगट. शहरातील सगळ्या रक्तपेढ्या फिरून शेवटी रात्री दत्ताजी भाले रक्तपेढीत त्याची मागणी करायला आलेल्या रुग्णाच्या नातेवाइकाला रक्तपेढीच्या कर्मचार्‍याने सांगितले की “काळजी करू नका. तुमच्या रुग्णाला उद्या सकाळी हे रक्त लागणार आहे आणि ते तुम्हाला मिळेल.” नातेवाइकाला आश्चर्य वाटले. सकाळी तो नातेवाईक रक्तपेढीत आल्यावर त्याला जे दृश्य दिसले, ते पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. कारण तुमच्या रुग्णाला रक्त मिळेल असे रात्री ज्याने सांगितले होते, तोच कर्मचारी त्या रुग्णासाठी रक्तदान करत होता.
 
 
हे सर्व पाहिल्यानंतर त्याने त्याच्या गावात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केला. पहिल्या वर्षी शिबिरात पोहोचलेल्या रक्तपेढीच्या कर्मचार्‍यांचा हार-फेट्यांसहित सत्कार केला. आपण लोकांना रक्तदानाचे महत्त्व सांगतो, पण आपण हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून रक्तदान करू शकत नाही ही रक्तपेढीतील महिला कर्मचार्‍याची खंत होती. तिने ठरवून आपल्या आहारावर लक्ष केंद्रित केले. सर्व प्रकारची काळजी घेतली आणि लग्नाच्या वाढदिवशी दोघा पतिपत्नींनी ठरवून रक्तदान केले.
 
 
ही सर्व दत्ताजी भाले नावाची पुण्याई आहे. एका अर्थाने रक्तपेढीची पूंजी (Asset) आहे.
 
 
रक्तदान चळवळ समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचायची असेल, तर त्याला धार्मिकतेची जोड दिली पाहिजे असा विचार बोलून दाखवणार्‍या रक्तपेढीतील जनसंपर्क आधिकार्‍याने गावोगाव चालणार्‍या भागवत सप्ताहात, सार्वजनिक उत्सवात, कीर्तन-प्रवचनांत जाऊन तेथील संतमहंतांची भेट घेतली. त्यांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. तुमच्या कीर्तनकाल्याच्या निरूपणात शेवटी पाच मिनिटे रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगा, असे विनंतीवजा आवाहन केले. काही ठिकाणी तर त्यालाच व्यासपीठावर बोलावून माहिती सांगायला सांगितली. त्याचा परिणाम असा झाला की अनेक ठिकाणी धार्मिक कार्याबरोबर रक्तदानासारख्या सामाजिक कामाचे नियोजनही अनेक सप्ताहात होऊ लागले. रक्तदान कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले. रक्तदान चळवळीची परिणामकारकता समाजात बरेच सकारात्मक बदल घडवून आणताना दिसते आहे. रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी आता फक्त वाढदिवस, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच पाहिजे असे राहिले नाही.
 
 
आईवडील चारधाम तीर्थयात्रा पूर्ण करून सुखरूप आले, त्याप्रीत्यर्थ हे शिबिर घेण्यात आले. तीर्थयात्रा पूर्ण करून आल्यानंतर जो मावंदचा (सर्व आप्त व स्नेही यांना प्रसाद मिळावा म्हणून स्नेहभोजनाचा कार्यक्रम) कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात त्यांचे आप्त व स्नेही अशा एकूण 35 जणांनी रक्तदान केले. मुलीचे अपघाती निधन झाले तिची आठवण म्हणून, किंवा आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तेराव्या दिवशीच्या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करणारे एका प्रकारचे सामाजिक दायित्व पार पाडत आहेत.
 
 
ज्या आंतरराष्ट्रीय आस्थापनेत दत्ताजी भाले रक्तपेढीच्या प्रतिनिधीला प्रवेश मिळत नव्हता, दुर्दैवाने त्याच आस्थापनेतील व्यक्तीला त्यांच्या नातेवाइकांसाठी रक्ताची गरज पडली. रक्तपेढीच्या वतीने ते तत्काळ उपलब्ध करून दिले. तिने ही गोष्ट त्याच्या वरिष्ठांना सांगितली. त्यांनी दत्ताजी भाले रक्तपेढीच्या प्रतिनिधीला बोलावून घेतले, रक्तपेढीची माहिती घेतली आणि शिबिर आयोजित केले. त्या वेळी एक महिला कर्मचारी सोडली, तर आस्थापनेतील सर्व जणांनी रक्तदान केले.
 
 
अशाच एका कंपनीत एच.आर. मॅनेजरने अट घातली की आम्ही तुम्हाला फक्त दीड तास देऊ, त्यात जितके रक्तदाते होतील तेवढे तुमचे. पुढे एक मिनिटही इथे थांबता येणार नाही. दत्ताजी भाले रक्तपेढीच्या चमूने सैनिकी गतीने हालचाल करून दीड तासात 45 जणांचे रक्तदान करवून घेतले. म्हणजे दोन मिनिटाला एक अशी सरासरी होती. एच.आर. मॅनेजरने हे सर्व पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली की, “गेल्या वर्षी दुसर्‍या रक्तपेढीने कंपनीचा पूर्ण दिवस वाया घालवला आणि 22-23 जणांचे रक्तदान झाले. इथून पुढे दर वर्षी आमच्या सेफ्टी वीक कार्यक्रमात रक्तदान शिबिरासाठी तुम्हालाच बोलावत जाऊ.”
 
 
रक्तपेढीत रक्त घ्यायला येणार्‍या एका नातेवाइकाची रक्तपेढीच्या जनसंपर्क आधिकार्‍याने सहज चौकशी केली. त्यांच्या रुग्णाला बर्‍याच प्रमाणात रक्ताची गरज लागत होती. सलग आठ दिवस ती व्यक्ती रक्ताची पिशवी घेऊन जात होती. त्यांचा रुग्ण बरा होऊन घरी जाताना ते म्हणाले की रक्तपेढीला काही मदत लागली तर निश्चित सांगा. त्यानंतर भर उन्हाळ्यात सगळ्या शहरभर रक्ताचा तुटवडा जाणवू लागला, तेव्हा त्या सन्माननीय व्यक्तीला फोन करून रक्तदान शिबिरासंबंधी मदत मागितली. त्यांनी तत्काळ त्यांच्या दहाही आस्थापनांतील एच.आर. मॅनेजर्सना बोलावून एकत्रित बैठक घेतली आणि रक्तदान शिबिराचे पूर्ण वर्षभराचे नियोजन करून दर दोन महिन्यांच्या अंतराने प्रत्येक आस्थापनेत शिबिर होईल, हे ठरवून टाकले. संपूर्ण जगात कोरोना महामारीचे थैमान चाललेले असताना व सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासत होती. परंतु रक्ताची व प्लाझ्मा घटकाची टंचाई भरून काढण्यासाठी अनेक जण दत्ताजी भाले रक्तपेढीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढे येत होते. 2020मधील अशा 250 रक्तदात्यांनी सिंगल डोनर प्लेटलेटसाठी व 100 रक्तदात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. Give blood and keep the world beating 2021  हे घोषवाक्य दत्ताजी भाले रक्तपेढीने नुसते खरे करून दाखवले नाही, तर जगून दाखवले.
 
 
दत्ताजी भाले रक्तपेढीला हे कसे जमते? याचे साधे उत्तर म्हणजे इथे काम करणारा प्रत्येक जण - अगदी रक्तपेढी प्रमुखापासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यापर्यंत संपूर्ण समर्पण भावनेने काम करतो. येताना जरी त्याच्या मनात फक्त कामाचे परिश्रमिक घ्यायचे इतकीच इच्छा असली, तरी इथल्या वातावरणात असलेले सात्त्विक भाव त्याला उच्चतम ध्येयाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणूनच या ठिकाणी काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला जेव्हा एकदा नाही, तर दोन वेळा शासकीय नोकरीची संधी दारात चालून आली आणि त्याचा मिळणारा मोबदला पाच पट अधिक होता, तरी केवळ जास्त पैसे मिळतील म्हणून तिने या सात्त्विक वातावरणाचा त्याग केला नाही. इथे काम करण्याचा आनंद काही वेगळाच आहे, म्हणून सलग न थकता 48 तास ड्यूटी करणारा कर्मचारी पुन्हा लगेच कामावर बोलावले, तरी यायला तयार होतो. रक्तपेढीचे वातावरण इतके कौटुंबिक आहे की सुरुवातीच्या काळात अनेक कर्मचार्‍यांनी दसरा-दिवाळीतसुद्धा सुट्टी न घेता ते सण मोठ्या आनंदाने रक्तपेढीत साजरे केले आहेत.
 
 
आज दत्ताजी भाले रक्तपेढीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. यातून मिळणारा आनंदाचा आणि सात्त्विक समाधानाचा ठेवा अनमोल आहे, कारण समाजाच्या सादाला सेवारूपी प्रतिसाद आहे. सामाजिक दायित्वाचे निर्वाहन करताना हे खर्‍या अर्थाने प्रत्याभिवादन आहे.
 
 
समर्थांच्या शब्दात थोडा बदल करून सांगायचे, तर हे सर्व
समाजधारणेसाठी सत्वर। ते सर्व ईश्वराचे अवतार।
जाले आहेत पुढे होणार। देणे ईश्वराचे॥
Powered By Sangraha 9.0