संभाजी ब्रिगेडचा इतिहास विसरण्यासाठी उद्धव ठाकरे कोणती गोळी आपल्या निष्ठावान अनुयायांना देणार आहेत? बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावानेसुद्धा ज्यांच्या अंगाचा तिळपापड होतो, अशा ब्रिगेडींच्या खांद्याला खांदा लावून कोणता खरा शिवसैनिक उभा राहू शकेल? नाईलाज म्हणून, निष्ठा म्हणून किंवा नक्की ठरत नाही म्हणून जे १५ आमदार आज उद्धवरावांच्या मागे आहेत त्यांना ही युती मान्य होणार आहे का?
उरल्यासुरल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड नावाच्या एका नावापुरत्या पक्षाशी युती करण्याची घोषणा केली. त्यासाठी शुक्रवार दुपारचा मुहूर्तही साधला. या घोषणेतून त्यांनी बाकी काही मिळविले असेल नसेल, मात्र आपला गट, पाठीराखे आणि कुटुंब या सर्वांना एका फटक्यात केविलवाणे करून टाकले. तसेही इतके दिवस हे सगळे हास्यास्पद बनले होतेच. सत्तेच्या सारीपाटात त्यांचा पराभव तर आधी झालेलाच होता, पण त्या पराभवावरही वरताण अशी नामुष्की त्यांनी ओढवून घेतली आहे.
संभाजी ब्रिगेड ही तशी एक बदनाम संघटना. ना शेंडा ना बुडखा अशा या संघटनेचा मुख्य आधार म्हणजे ब्राह्मणद्वेष आणि मुस्लिमप्रेम. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या विद्वज्जनांच्या संस्थेत धुडगूस घालून पुढे आलेली ही संघटना. त्यानंतर तिने राजकीय पक्षाचे आवरण घेतले. अशा लोकांशी युती करून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम तेवढे केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत बेइमानी करून २०१९मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. या अभद्र आघाडीतून महाविकास आघाडी सरकार नावाची एक हिंदूविरोधी आघाडी जन्मास आली. त्यातून शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेल्या आमदारांची – आमदारांचीच कशाला, अगदी सामान्य कार्यकर्त्यांचीही कानकोंडी होऊ लागली. परंतु आधी कोरोना महामारी आणि नंतर खुद्द उद्धव यांचे आजारपण यांमुळे या सर्वांनी अडीच वर्षे कळ काढली. अखेर एक दिवस कडेलोट झाला आणि या आमदारांनी उद्धव यांची साथ सोडली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती जागवत आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजपसोबत आले.
त्यावेळी उद्धव यांनी करुणरसाचा बाजार मांडत जी फेसबुक लाईव्हची आवर्तने केली, त्यात त्यांनी हाच मुद्दा वारंवार उगाळला होता. 'मला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने नव्हे तर माझ्याच माणसांनी दगा दिला,' हेच पालुपद ते घोळत राहिले. यातच त्यांच्या तोकड्या आकलनाचे दर्शन होत होते. शिवसेनेने हिंदुत्वाशी प्रतारणा केली, ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार नव्हतीच. तशी प्रतारणा करावी, हाच मुळात त्यांचा अजेंडा होता. मंदिरे बंद आणि रमजान खुलेआम, हिंदूंच्या सणांवर बंदी आणि अल्पसंख्याकांना मोकळीक असा कारभार करायला या दोन पक्षांची हरकत असायचे काहीही कारण नव्हते. ती तक्रार होती शिवसेनेच्या नेत्यांची, आमदारांची आणि अगदी खालपर्यंत नगरसेवक व शाखाप्रमुखांचीही. पण त्यांचीच दखल घ्यायला उद्धवराव तयार नव्हते. त्याचीच परिणती म्हणून शिंदे व त्यांच्या शिलेदारांनी स्वतंत्र (किंबहुना मूळची वाट) चोखाळली.
त्यांच्या भावनांची कदर करायचे सोडून उद्धव व त्यांचे गुलाम या नेत्यांना 'गद्दार' म्हणत हिणवत राहिले. 'तुम्ही काँग्रेस-एनसीपीला सोडा, आम्ही तुमच्यासोबत येतो,' असे हे नेते सांगत होते. त्याचा विपर्यास करत 'मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर बाजूला होतो,' असा कांगावा ते करत होते. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि उरलीसुरली शिवसेना (१५ आमदार+अनिश्चित संख्येतील पदाधिकारी व नगरसेवक) अर्थहीन झाली.
यावर उद्धवरावांनी उपाय काय काढला? तर संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. संभाजी ब्रिगेडशी ही युती करताना शरद पवार यांना नक्कीच उद्धवरावांनी नक्कीच विचारले असणार. त्यांना विचारल्याशिवाय उद्धवराव गेली अडीच वर्षे काहीच करत नव्हते. तसेही संभाजी ब्रिगेडचे कर्ते-करविते शरद पवारच असल्याचे नेहमीच सांगितले जाते. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड हे २०१९ मध्ये पुण्यातून काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशही केला होता. लोकसभा निवडणुकीत ते प्रचारात सहभागी झाले होते. मात्र संभाजी ब्रिगेड व शरद पवार हे नाते माहीत असल्याने काँग्रेस नेत्यांनी ऐनेवळी त्यांचा पत्ता कापून मोहन जोशी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेससारख्या बुडत्या पक्षाला जी जाण आहे ती जाणसुद्धा उद्धव ठाकरे यांना दाखवता आली नाही. याच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात धुमश्चक्री झाली होती. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलविण्यासाठी संभाजी ब्रिगेड हिंसक बनली होती. त्याला शिवसैनिक प्राणपणाने विरोध करत होते. त्या पुतळ्याची नासधूस केल्यावर झालेल्या महापालिका सभेत शिवसेना नगरसेवकांनी भाजप नगरसेवकांच्या बरोबरीने संभाजी ब्रिगेडच्या (पर्यायाने एनसीपीच्या) गुंडगिरीचा सामना केला होता. त्यानंतर दादरमधील शिवसेना भवनावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रांवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेऊन चाल करून जाण्याची धमकी दिली होती. त्यावेळी शिवसेना भवनला पोलीस संरक्षण पुरवावे लागले होते. इतकेच नाही तर ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम शिवरायांच्या नावाचा वापर करत राजकारण केले. मुस्लीम आणि मराठ्यांमध्ये दंगली पसरवल्या. आता शिवसेना शिवरायांपेक्षा बाळासाहेबांना मोठे समजू लागली आहे,’ असा आरोपही संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी केला होता.
हा सगळा इतिहास विसरण्यासाठी उद्धव ठाकरे कोणती गोळी आपल्या निष्ठावान अनुयायांना देणार आहेत? बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावानेसुद्धा ज्यांच्या अंगाचा तिळपापड होतो, अशा ब्रिगेडींच्या खांद्याला खांदा लावून कोणता खरा शिवसैनिक उभा राहू शकेल? नाईलाज म्हणून, निष्ठा म्हणून किंवा नक्की ठरत नाही म्हणून जे १५ आमदार आज उद्धवरावांच्या मागे आहेत त्यांना ही युती मान्य होणार आहे का? खरा विरोधाभास म्हणजे हेच आखरे काल उद्धवरावांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. “देशाला आज क्रांतीची गरज आहे. देशात विषमतावादी व्यवस्था असून लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठीच संभाजी ब्रिगेडची शिवसेनेशी युती होणे गरजेचे आहे. शिवसेना हा महाराष्ट्राचे हित जोपासणारा पक्ष आहे, म्हणूनच आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याचे आखरे यांनी पत्रकारांना सांगितले,” असा वृत्तांत सामनानेच दिला आहे. भांडारकर संस्था, लाल महाल आणि रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीजवळ धुडगूस घालणारे ब्रिगेडी आता लोकशाहीचे रक्षण करणार! आणि त्याला शिवसेना साथ देणार!!
याच पत्रकार परिषदेत उद्धवरावांनी पुन्हा आपली हिंदुत्वाची टेप वाजवली. आमची हिंदुत्वाविषयीची भूमिका रोखठोक आहे, महाराष्ट्राविषयीची भूमिका रोखठोक आहे, असे ते म्हणाले. 'शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यापासून जनाब उद्धव ठाकरे' इथपर्यंत झालेला प्रवास महाराष्ट्राच्या लोकांनी पाहिला आहे. कोण होतास तू, काय झालास तू, असे उद्वेगाने म्हणण्याइतपत झपाट्याने हा प्रवास झाला. तरीही आपण हिंदुत्वावर कायम असल्याची बतावणी उद्धवराव करू शकतात. म्हणजेच शरद पवार यांच्या संगतीने बाकी काही नाही तरी कोडगेपणा त्यांच्यात आला असल्याची ही निशाणी आहे.
हा झाला वैचारिक भाग. प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात तरी या युतीचा काही फायदा होण्याची शक्यता आहे का? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची २०१९मध्येही युती होती. त्यावेळी त्यांनी ४० जागांवर निवडणुका लढवल्या होत्या, पण त्यांना ३६ हजाराच्यावर मते मिळू शकली नव्हती. त्यांच्या मतांची टक्केवारी ०.०६ टक्के होती. चार वर्षांपूर्वी त्या संघटनेत फूट पडली. आज या संघटनेची अवस्था धनी टाकीना आणि चोर नेईना अशी झाली आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरे यांच्या हाती काय लागणार, हा प्रश्नच आहे.
खरे तर एकनाथ शिंदे यांनी धोबीपछाड दिल्यानंतर ठाकरे हे सैरभैर झाले. त्यांचे कुलमुखत्यारपत्र घेऊन माध्यमांसमोर बेटकोळ्या दाखविणारे संजय राऊत हेही गजाआड गेले. ज्यांच्या जीवावर त्यांनी अडीच वर्षे ऊतमात केला त्या शरद पवारांनीही तोंडात गुळणी धरली. त्यांच्या आणखी एक नव्या धनीण सोनिया गांधी आपल्याच पक्षाच्या विनाशपर्वाने जिकीरीला आलेल्या! त्यानंतर राज्याच्या राजकारणात टिकाव धरण्यासाठी म्हणा, किंवा आम्ही अजून शाबूत आहोत हे दाखवण्यासाठी म्हणा, पण ठाकरे यांना काही तरी करणे आवश्यक होते. हे काहीतरी करतो आहोत, असं दाखविण्याच्या धडपडीतूनच ही उफराटी युती आकाराला आली.
राजकीय लढाईत पराजय वाट्याला येणे, हे काही जगावेगळे नाही. आज राष्ट्रीय पातळीवर पाहिले तर चंद्राबाबू नायडू, मायावती, पंजाबमधील कॅ. अमरिंदर सिंग असे अनेक नेते व त्यांचे पक्ष राजकीयदृष्ट्या उतरणीला लागलेत. पण म्हणून त्यांच्यापैकी कोणी राजकीय आत्महत्या करण्यापर्यंत मजल मारलेली नाही. ज्यांच्या शब्दावर उद्धव ठाकरे आपला पक्ष चालवत आहेत ते शरद पवारसुद्धा ‘जरा सबुर’ याच धोरणाने शांत आहेत. आपल्या मुळातच वाकड्या असलेल्या चालीला शह मिळाला म्हणून अख्खा डावच उधळणारे उद्धव ठाकरे हे तसे विरळे नेतेच म्हणायला हवेत. नाही म्हणायला बिहारचे नीतिश कुमार हे आणखी एक अवदसा सुचलेले नेते त्यांच्या पंगतीत बसतील! बाकी हे एकमेवाद्वितीय! एक डाव हरला तरी पुढली बाजी जिंकूयाच, हा विश्वास बाळगणाऱ्या लढवय्याला किंवा खेळाडूला बाजीगर म्हणतात, सिकंदर म्हणतात. मात्र आपला एक डाव हरला म्हणून आणखी चार पट हारण्याची शिकस्त करणाऱ्याला काय म्हणावे? उद्धव बाळासाहेब ठाकरे !
देविदास देशपांडे
८७९६७५२१०७