मोदी अजेय आहेत का?

25 Aug 2022 20:22:14
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अजेय स्थान निर्माण होण्याची तीन मुख्य कारणे दिसतात. पहिले कारण नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, संघविचारधारेला समर्पित त्यांचे जीवन, चारित्र्याचा आदर्श, निर्णयक्षमता, स्पष्ट कृती आराखडा ही सर्व त्यांची शक्ती आहे. दुसरे कारण मोदींच्या मागे पक्ष ठामपणे उभा आहे. पक्ष नसेल तर संघटन नसते. संघटन नसेल तर कार्यकर्ते नसतात. कार्यकर्ते नसले तर सामान्य लोकांपर्यंत जाण्याचे माध्यम नसते. हे सर्व नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेले आहे. तिसरे कारण नरेंद्र मोदी यांना मोठे करण्यात विरोधी पक्षांचादेखील फार मोठा वाटा आहे.

modi
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल "invincible' असा शब्दप्रयोग केला जातो.  "invincible' याचा मराठी अर्थ होतो ‘लढाईत ज्याला हरवणे अशक्य आहे’. नुकताच आपण कृष्णजन्म साजरा केला. श्रीकृष्णाला लढाईत हरविणे अशक्य होते. एकही लढाई न हरलेला सेनापती म्हणजे पहिले बाजीराव पेशवे आणि निर्णायक विजय मिळविणारे महान सेनापती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काळ बदलला, आता रणांगणावरील लढाया हा वेगळा विषय झाला आणि राजकीय क्षेत्रातील लढाई हा वेगळा विषय झाला. नरेंद्र मोदी हे राजकीय क्षेत्रातील लढवय्या नेते आहेत. सामान्य माणूस आणि प्रसिद्धी माध्यमे त्यांचे मूल्यमापन कसे करतात, हे जरा बघू या.
 
 
तुषार अहिर यांनी नेटवर एक किस्सा टाकलेला आहे. तो त्यांच्याच शब्दात आपण वाचू या -
 
‘गेल्या वर्षी मी लंडनमधील एका कॅफेत कॉफीचा आस्वाद घेत होतो. एक माणूस आतमध्ये आला. काही काळ माझ्याकडे पाहून मी बसलेल्या स्थानाजवळ तो आला. त्याने हळूच मला विचारले, “तुम्ही गुजराती आहात का?”
“मी भारतीय आहे.” मी म्हणालो.
 
 
“असं असं, तुम्ही गुजराती भारतीय असावेत. एक गुजराती माणूस आहे, तो म्हणतो, आम्ही 125 कोटी भारतीय आहोत, गुजराती आहोत असे म्हणत नाही.”
 
मला गंमत वाटली, मी त्याला विचारले, “तो कोण आहे?”
 
“तुमचे पंतप्रधान मोदीजी.”
 
“माझे पंतप्रधान? तुम्ही भारतीय नाहीत का?”
 
“नाही बंधू, मी पाकिस्तानी आहे.”
 
“मोदी पाकिस्तानसंबंधात अतिशय आक्रमक असतात, तरीही तू त्यांचे नाव आदराने कसे काय घेतले?”
 
तो म्हणाला, “राजकारणासंबंधात मला काही फारसे समजत नाही, परंतु त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना एक साधे ट्वीट केले आणि माझ्या बहिणीला वैद्यकीय उपचारासाठी भारतात येण्याचा व्हिसा मिळाला. पंतप्रधानांविषयी आणि भारतीय लोकांविषयी आदर बाळगण्यास एवढे एक कारण मला पुरेसे आहे.”
 
 
आमचे संभाषण झाल्यानंतर तो कॅफेच्या बाहेर पडला. वेटरकडे मी माझ्या बिलाची मागणी केली. वेटर म्हणाला, “तुमच्या शेजारी बसलेल्या गृहस्थाने तुमचे बील देऊन टाकले आहे.” मला एकदम जाणवले की, पंतप्रधान 125 कोटी भारतीयांकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन कसा बदलू शकतात?’
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रतिमा आहे, त्यामुळे ते ळर्पींळपलळलश्रश - अजेय वाटतात. या वेळचे त्यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकले तरी असेल किंवा वाचले तरी असेल. त्यांनी आत्मविश्वास, संघविचारांची सुस्पष्टता, पुढे काय करायचे आहे याची स्वच्छ दृष्टी, बुद्धिवाद्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत आचरणात आणता येईल अशी कार्यक्रमपत्रिका या भाषणात ठेवली. तिची अंमलबजावणी सुरू झालेलीच आहे आणि बघता बघता 2024 साल उजाडेल. राजकीय विश्लेषक आणि पंडित आतापासूनच चर्चा करू लागले आहेत की, 2024 साली पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का?
 
 
तसे पंतप्रधानांच्या शर्यतीत राजपुत्र राहुल गांधी आहेत, राजकन्या प्रियांका गांधी आहेत, आताच नितीश कुमारही या शर्यतीत उतरले आहेत, ममता बॅनर्जी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्याच आहेत. अरविंद केजरीवाल शेख मोहम्मदी स्वप्ने पाहत आहेत. उद्धव ठाकरे यांचे चेलेदेखील म्हणतात की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान असतील. पित्याचे नाव घेतले, म्हणून मुलाला कशाला बाजूला ठेवायचे? म्हणून काही स्तुतिपाठकांनी आदित्य ठाकरे यांनादेखील वरातीच्या घोड्यावर बसवायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा वरातीचा घोडा आता थकला आहे, म्हातारा झाला आहे. आपले वचन आहे, ‘मी म्हातारा झालो असेन, पण तृष्णा म्हातारी होत नाही.’
 
 
या सर्व गदारोळात जागतिक स्तरावरील मीडिया काय म्हणतो, याकडे जरा जाऊ या. नेटवर सनबीर सिंग रणहोत्रा यांचा एक लेख वाचायला मिळाला. लेखाची सुरुवातच त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजेय आहेत, ही गोष्ट आम्हाला माहीत आहे, परंतु मीडिया मात्र ही गोष्ट स्वीकारायला तयार नसतो. ही कडू गोळी त्यांना घेणं कठीण जातं. 2014पासून ही गोष्ट भिंतीवर लिहिली गेलेली आहे.’ लेखकाने आपल्या लेखात काही जणांची मते दिलेली आहेत. वीर संघवी हे नामवंत इंग्लिश पत्रकार आहेत. मोदींसंबंधी ते म्हणतात, ‘मोदी हे टेफ्लॉन कोटेड’ राजनेता आहेत. (टेफ्लॉनचा स्तर ज्याला लागला, त्या वस्तूवर ऊन-पाऊस-वारा-उष्णता कशाचाही परिणाम होत नाही.) वीर संघवी पुढे म्हणतात, ‘मोदी यांची लोकप्रियता बुलेटप्रूफ आहे.’
 
 
 
जागतिक मीडिया मोदींसंबंधी काय म्हणतो? सीएनएनचे म्हणणे असे आहे, (संदर्भ उत्तर प्रदेशच्या निवडणुकींचा आहे) वीस कोटी जनसंख्या असलेल्या राज्याच्या निवडणुका या सार्वत्रिक निवडणुकांची पूर्वनांदी समजली जाते. उत्तर प्रदेशातून लोकसभेसाठी सर्वाधिक खासदार पाठविले जातात. उत्तर प्रदेशातील यशामुळे 2024मध्ये होणार्‍या निवडणुकांसाठी मोदी यांना खूप बळ प्राप्त झालेले आहे.’
 
 
 
वॉशिंग्टन पोस्टचे म्हणणे असे आहे, ‘उत्तर प्रदेशच्या मतदारांनी अधिकारावर असलेल्या शासनाची पुनर्निवड कधी केली नाही. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी भाजपाला दुसर्‍यांदा निवडून दिले आहे. 2024 साली येऊ घातलेल्या निवडणुकीत मोदी यांना यशस्वीरित्या आव्हान देईल असा एखादा पक्ष किंवा नेता उभा राहील, याची कल्पनाही करता येत नाही.’ द इकॉनॉमिक्स म्हणतो, ‘राष्ट्रीय स्तरावर भाजपा शार्कसारखा शक्तिशाली झालेला आहे. विरोधकांनी एकत्र येण्याचा मार्ग जर शोधला नाही, तर 2024च्या निवणडणुका मोदी सहज पार करून जातील.’ वॉल स्ट्रीट जर्नलने याच प्रकारचे मत मांडले आहे. बीबीसीचे म्हणणे असे आहे, ‘उत्तर प्रदेशच्या विजयामुळे भाजपाची सत्तेवरील पकड मजबूत झाली आहे. विखुरलेल्या विरोधी पक्षांतील हवा भाजपाने काढून घेतली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर तिसरा जनादेश भाजपाला प्राप्त होईल, अशी चिन्हे दिसतात.’
 
 
 
मोदी यांचे हे स्थान निर्माण होण्याची तीन मुख्य कारणे दिसतात. पहिले कारण नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, संघविचारधारेला समर्पित त्यांचे जीवन, चारित्र्याचा आदर्श, निर्णयक्षमता, स्पष्ट कृती आराखडा ही सर्व त्यांची शक्ती आहे. तिच्याशी बरोबरी करील असा विरोधी पक्षांत एकही नेता नाही. वर जी नावे दिली आहेत, त्यांच्या क्षमतेविषयी न लिहिलेले बरे. कोणत्याही राजनेत्याचा उपमर्द करू नये, या पथ्याचे पालन केले पाहिजे.
 
 
दुसरे कारण असे की, मोदींच्या मागे पक्ष ठामपणे उभा आहे. पक्ष नसेल तर संघटन नसते. संघटन नसेल तर कार्यकर्ते नसतात. कार्यकर्ते नसले तर सामान्य लोकांपर्यंत जाण्याचे माध्यम नसते. हे सर्व नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेले आहे. भाजपाचे संघटन संघाच्या संघटन सिद्धान्तावर उभे आहे. या सिद्धान्तावर उभे असलेले संघटन अभेद्य आणि अत्यंत कार्यक्षम असते.
 
 
 
तिसरे कारण असे की, नरेंद्र मोदी यांना मोठे करण्यात विरोधी पक्षांचादेखील फार मोठा वाटा आहे. विरोधी पक्षांतील एकही नेता नरेंद्र मोदींविषयी चांगले बोलत नाही. काही जण सभ्य भाषेत वाईट बोलतात, तर काही जण अत्यंत गलिच्छ भाषा वापरतात. या सर्व अतिशहाण्या राजकारण्यांच्या लक्षात येत नाही की, आपण रावणाच्या किंवा कंसाच्या भूमिकेत गेलो, तर रामाचे किंवा कृष्णाचे सामर्थ्य वाढत जाते. नरेंद्र मोदी कुणाच्याही टीकेला उत्तर देत नाहीत. जनहिताची कामे करून ते उत्तरे देतात, म्हणजे जनता मोदींच्या वतीने या सर्वांना उत्तर देते. ही उत्तरे शिव्या घालणार्‍यांच्या मतपेट्या रिकाम्या करणारी असतात.
 
 
 
नरेंद्र मोदी यांच्या अजेयत्वाबद्दल जे मंथन चालू आहे, त्याचा हा थोडक्यात गोषवारा आहे. एवढ्यावरून वाचकांनी आणि कार्यकर्त्यांनी हुरळून जाऊ नये. 2024 साली विजयी व्हायचे असेल, तर कष्टाला पर्याय नाही. जनसंपर्काला पर्याय नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेला पर्याय नाही. समरसता, सद्भाव, समन्वय, सहयोग यांनादेखील पर्याय नाही. निवडणुका असोत की नसोत, वेगवेगळ्या स्तरांवर हे सर्व उपक्रम करत राहावे लागतात. ते कुणाच्या विजयासाठी करायचे नसून विचारधारेच्या प्रस्थापनेसाठी करायचे असतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे या विचारधारेचे राजकीय चेहरा आहेत. असे हे नातेसंबंध सदैव लक्षात ठेवायला पाहिजेत. मीडियातील चर्चेमुळे विजय मिळत नसतो आणि मीडियातील टीकांमुळे पराजयदेखील होत नसतो. विजय-पराजय हे आपल्या कष्टाचे फळ असते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0