पराक्रमाचा मापदंड - विक्रांत

विवेक मराठी    22-Aug-2022
Total Views |
@विनायक श्रीधर अभ्यंकर । 9766049071 
 
अमृतमहोत्सवी वर्षात देशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका भारतीय आरमाराच्या जंगी ताफ्यात (Nevel Fleetमध्ये) दाखल होत असून ‘मराठी अधिकारी’ तिचे सारथ्य करणार आहे. ही देशी बनावटीची परंतु प्रत्ययकारक व मजबूत (Effective and Powerfull) नौका आपल्या पाठीवर हजारो दर्यासारंग वाहणार आहे. शिवाय वीस युद्धसज्ज विमाने उदरात घेऊन क्षीरसागरावर विराजमान होणार आहे. पूर्वीच्या ‘विक्रांत’ची कहाणी भूषणभू आहे. त्याचीच ही एक साठवण.

Ins Vikrant
 
1971चे युद्ध हे भारत-पाक युद्ध म्हणण्यापेक्षा ‘बांगला देश मुक्तिसंग्राम’ होता. या युद्धाने इतिहास घडवला. 14 दिवसांत 93000 सशस्त्र सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडून पूर्व पाकिस्तानची लष्करी जोखडातून मुक्तता करत आम्ही, भारतीय सैन्याने ‘बांगला देश’ हा नवा देश जगाच्या नकाशावर कोरला. हे युद्ध म्हणजे भारतीय नौदलाला मिळालेली सुवर्णसंधी होती, पर्वणी होती ‘हम भी कुछ कम नही’ हे सिद्ध करण्याची. यापूर्वीच्या युद्धात भारतीय नौदल फक्त ‘गस्त’ घालण्यासाठीच वापरले गेले. ही संधी नौदलाने आव्हान समजून स्वीकारली. हे युद्ध खरे तर आठ दिवसांतच संपले. 11 डिसेंबरला मेजर जनरल गंधर्वसिंग ढाक्क्याच्या वेशीवर उभे राहून लेफ्टनंट जनरल अब्दुल अमीर नियाझीला खडसावत होते. ‘शरणागती पत्करतोस का हकनाक मरतोस?’ शरणागतीची संपूर्ण प्रक्रिया होण्यास 16 डिसेंबर 1971 हा ‘विजय दिन’ उजाडला. संध्याकाळी अ‍ॅडमिरल नीलकंठ कृष्णन ‘विक्रांत’ युद्धनौकेवर पोहोचले. “ही पाहा पाकिस्तानी अ‍ॅडमिरल मोहम्मद शरीफ यांची मी हिसकावलेली पिस्तूल!” ती पाहताच आम्ही सर्व जण उत्स्फूर्तपणे गरजलो, “भारत माता की जय!”
 
 
अ‍ॅडमिरल कृष्णन, पी.व्ही.एस.एम., डी.एस.ओ. हे इंग्रजी शौर्यपदक पटकवणारा तामिळी अय्यर. आव्हाने स्वीकारणारा दर्यासारंग. डफरीनवरची परीक्षा पहिल्या नंबरने पास झाल्याने त्यांना रॉयल इंडियन नेव्हीमध्ये निवडण्यात येऊन दुसर्‍या महायुद्धातल्या पराक्रमाबद्दल त्यांना डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस क्रॉस मिळाला होता.
 
 
1971च्या युद्धात त्यांच्यावर नौदल पूर्व विभाग ध्वजाधिकारी (FOC-in-c East) ही महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. या युद्धात त्यांनी विक्रांत या महाकाय विमानवाहू युद्धनौकेचा इतका प्रत्ययकारक (Effective) उपयोग करून घेतला, त्यामुळे पूर्व पाकचे कंबरडेच मोडले.
 
 
1961 साली विक्रांत भारतीय नौदलामध्ये सामील झाली. ती विकत घेण्याचे ठरले, तेव्हा ‘हा पांढरा हत्ती भारत पोसू शकेल का?’ इत्यादी शंकाकुशंका काढण्यात आल्या. परंतु 1971च्या बांगला देश मुक्तिसंग्रामात विक्रांतवरील आकाशयोद्ध्यांनी इतका पराक्रम गाजवला की, हेच विरोधक म्हणाले, "One More Air Craft Carrier' ’ आणि नौदलाच्या ताफ्यात ‘विराट’ सामील झाली. व्हाइट टायगर, कोब्रा, हार्पून व अलीझे यांनी या युद्धात दिवसांत 50-50 उड्डाणे करून तीन दिवसांत पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडे मोडले, तर पाकिस्तानी भूदलाला भुईसपाट करून टाकले. विक्रांत हा पराक्रमाचा मापदंड ठरला. अ‍ॅडमिरल नीलकंठ कृष्णन व त्यांच्या चमूने एक इतिहास रचला. आशिया खंडात अवतरलेल्या या युद्धनौकेचे अप्रूप होते. या उत्कंठेपोटी 1963मध्ये विक्रांतवर ‘थरार’ होऊन युद्धसदृश संकटाला तोंड द्यावे लागले.
 

Ins Vikrant 
 
 
तत्कालीन कॅप्टन असलेले नीलकंठ कृष्णन हे विक्रांतचे मुख्याधिकारी (Commanding Officer) होते. 1962 मे महिन्यात सिंगापूरला युद्धसराव कॉमनवेल्थ अभ्यास (War exercise) करून आली होती. ऑफ कोचीन नांगर टाकून शांतपणे उभी होती. दिवस रविवार, वेळ पहाटेचे पाच. कॅप्टन कृष्णन पूजाअर्चा, गीतापठण यात व्यग्र होते. इतक्यात विक्रांतचा ड्युटी ऑफिसर (O.O.D.) व सिग्नल ऑफिसर (Commanding Officer) कॅप्टन केबिनसमोर ओरडले - “सर, एस.ओ.एस.” कृष्णनसाहेब क्षणाचाही विलंब न लावताच बाहेर आले. सिग्नल ऑफिसर सॅल्यूट ठोकत म्हणाला, “सर रडारवर अनोळखी युद्धनौका दिसत असून इकोही तसाच वाटतो.” कॅप्टन कृष्णन सोवळे नेसलेल्या अवस्थेत ब्रिजवर स्थानापन्न होऊन आदेश देऊ लागले. “इंजिन सुरू करा. सर्व गन ऑपरेट करा. युद्धसज्जतेची  (Action Station)  उद्घोषणा करा.”
 
 
“टॅलिओ, तुझे अलीझे उड्डाणास तयार ठेव.” टॅलिओ म्हणजे कमांडर आर.एच. तहिलियानी, अलीझे स्क्वाड्रनचे प्रमुख. ते नंतर अ‍ॅडमिरल होऊन 1 डिसेंबर 1984 ते 30 नोव्हेंबर 1987पर्यंत नौदल प्रमुख होते. लढाऊ विमान उडवणारा विक्रांतवरचा आकाशयोद्धा. आपली एअरक्राफ्ट हँगरमधून बाहेर काढून पुढील आदेशाची वाट पाहत उभे राहिले.
 
 
 
विक्रांत तयार होत असताना अनुभवी कॅप्टन कृष्णन यांनी ओळखले की ती युद्धनौका म्हणजे पाकिस्तानची ध्वजनौका क्रूझर पी.एन.एस. बाबर असून तिला संदेश पाठवला - ‘सईद, मागे फीर. खबरदार, पुढे आलास, तर जलसमाधी. हकनाक बेमौत मारला जाशील.’
 
 
’बाबर’चा कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सईद एहसान याने संदेश दिला - ‘डिअर ट्यूबी क्रिश, रिलॅक्स. माझ्या जहाजावर आमचे राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अयूब खान असून त्यांना विक्रांतचे दर्शन घ्यायचे आहे. विक्रांतला मुबारक व तुला फत्ते चिंतितो. तुझा बॅचमेट सईद.’ एहसान मोहम्मद (सी.ओ., पी.एन.एस. बाबर) हे दोघेही त्या वेळी कॅप्टन होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्नेही होते. दोघेही नंतर अ‍ॅडमिरलपदापर्यंत पोहोचले.
 
 
विक्रांतच्या बाजूने सुरक्षित अंतर राखत ‘बाबर’ ही पाकिस्तानी युद्धनौका नाविक परंपरेनुसार मानवंदना देत-स्वीकारत दिसेनाशी झाली. अ‍ॅन्टीएअर गन्स विसावल्या. विक्रांतच्या शिप्स कंपनीने सुटकेचा श्वास सोडला. कॅप्टन नीलकंठ कृष्णन हसत हसत आपल्या केबिनकडे परतले.
 
 


Ins Vikrant
 
अ‍ॅडमिरल नीलकंठ कृष्णन
 
1965च्या युद्धात पाकिस्तानने खोटा दावा केला होता - ‘आम्ही विक्रांत बुडवली’. हे खोटे होते. कारण विक्रांत तेव्हा डॉकमध्ये डागडुजीसाठी उभी होती. 1971मध्ये अ‍ॅडमिरल नीलकंठ कृष्णन भारतीय नौसेनेचे नेतृत्व करत होते, तर अ‍ॅडमिरल सईद एहसान मोहम्मद पूर्व पाकमध्ये धुरा सांभाळत होते. अ‍ॅडमिरल कृष्णन यांनी युद्घोत्तर अ‍ॅडमिरल सईद यांना सिग्नल पाठवला. ‘डिअर एहसू, ही तीच 1963मधील जाबांज विक्रांत, जिने तुम्हाला डुबवले.’ दोघेही दर्यासारंग मित्र होते. दोघांनाही बकिंगहॅम पॅलेसमध्ये खास समारंभात ‘डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस क्रॉस’ हे शौर्यपदक राणीच्या हस्ते बहाल करण्यात आले होते.
 
 
 
खरे तर लांब पल्ल्याची अण्वस्त्रे व नभांगणात अत्याधुनिक अवतरणारी विमाने यामुळे विमानवाहू युद्धनौका टिपण्यास फार सोपे. इझी टारगेट, पण अ‍ॅडमिरल कृष्णन यांचे कुशल नेतृत्व आणि विक्रांतवरील निपुण, तरबेज लढवय्ये हे आव्हान परतवून लावतात. ही विक्रांतची यशोगाथा आहे. पाकिस्तानी पाणबुडी विक्रांतचा माग घेत आली. पण तिला या युद्धाच्या सुरुवातीलाच शोधून आमच्या कमोर्टा व राजपूत या युद्धनौकांनी जलसमाधी दिली. पाकिस्तानपेक्षा हा अमेरिकेला धक्का होता. कारण ‘गाझी’ ही अत्याधुनिक पाणबुडी अमेरिकेने पाकला दिली होती.
 
 
विस्तार व गरज याचा विचार केला, तर आपल्या संरक्षण अंदाजपत्रकापेक्षा चीनचे व पाकिस्तानचे अंदाजपत्रक तिप्पट-चौपट असते.
 
 
आजमितीला चीनकडे 80 पाणबुड्या आहेत. त्यांच्या नौदलात विमानवाहू युद्धनौका नुकतीच दाखल झाली आहे. ‘ग्वादार’ हे बंदर पाकिस्तानने चीनला 50 वर्षांच्या भाडेपट्टीवर दिले असून चीन चीनव्याप्त तिबेटमधून रेल्वेमार्ग बांधत असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून पुढे जात आहे. चीनची अणुभट्टी कार्यरत झाली आहे. इथून पुढील युद्ध हे अंडरवॉटर वॉरफेअर व नभांगणातून लढले जाईल. 1971च्या युद्धात पाकने हेच केले. पाकने हॅगर, शुशुक व मँग्रो या फ्रान्सने बनवलेल्या डॅफ्ने क्लास पाणबुड्यांचा वापर केला व पश्चिम पाकिस्तानच्या संरक्षणावर भर दिला. तरीही आपल्या मिसाईल टुमदार बोटीने कराचीवर यशस्वी हल्ला केला आणि पाकिस्तानी विनाशिका खैबर व शहाजहान यांना जलसमाधी दिली.
 
 
 
विक्रांतचा यथोचित वापर करत अ‍ॅडमिरल नीलकंठ कृष्णन या दर्याधुरंधर शूराने जोखीम पत्करून जो पराक्रम गाजवला, त्याला जोड नाही, तोड नाही. नाविक गणवेशातली ‘पी कॅप’ विशिष्ट पद्धतीने घालणार्‍या या थोर अधिकार्‍याने इतर अधिकार्‍यांची अडचण ओळखून एका बैठकीत अ‍ॅडमिरल नंदांना विचारले, ""Sir, may I smoke?'' होकार मिळताच प्रथम त्यांनी सिगरेट शिलगावली आणि मग बैठक खेळीमेळीत पार पडली. त्यांना माझा दीर्घ सलाम. 8 जून 1919ला जन्मलेल्या या जिगरबाज अधिकार्‍याने 30 जानेवोरी 1982ला हैदराबाद मुक्कामी शेवटचा श्वास घेतला.
 
 
 
बा विक्रांता, तू आता नजरेआड झालास. 31 जानेवारी 1997 या दिवशी तुझा कमिशन पेनंट उतरला. तू सेवानिवृत्त झालास. तुझ्या अंगाखांद्यावर आम्ही वाढलो. अनेक गोड आठवणींचा हलकल्लोळ माझ्या मनात पिंगा घालत आहे. ‘एक मुठ्ठी आस्मान’ या हिंदी सिनेमाच्या शूटिंगसाठी महान खलनायक.. छे, महानायक प्राणसाहेब सिकंद यांनी नेव्हल युनिफॉर्म घालून ‘नेव्ही स्टाइल’ म्हटलेले संवाद, मामासाहेब मधुकर तोडरमल यांनी धुंदफुंद हवेत समुद्रात सादर केलेले ‘गुलमोहर’ हे मराठी नाटक मी तुझ्याच कुशीत बसून पाहिले. हा बहुधा मराठी रंगभूमीचा सैनिकी पराक्रम.
 
 
 
विक्रांत या ‘नगरच्या’ अप्पा बळवंत चौकात (Fly Deckवर) डेक हॉकी खेळणे, गुलाबी रात्री हिंदी सिनेमा पाहत स्वप्नात विहरणे.. पोपटलाल, साठे, भाटिया, शेळके, परदेशी इत्यादी मित्रांनी इंजीन रूममध्ये तर ऑर्केस्ट्रा तयार केला होता.
 
 
 
इंजिन रूम म्हणून आठवण झाली- 1971च्या युद्धात विक्रांतचा एक बॉयलर, एक इंजीन नादुरुस्त असताना अ‍ॅडमिरल कृष्णन यांच्या बेदरकार नेतृत्वाला विक्रांतच्या शिप्स कंपनीने ‘झोकून’ युद्ध लढवलेले. विक्रांतही पराक्रम अवगुंठित करण्यास आतुर होते. युद्धाच्या इतिहासातला हा कळीचा मुद्दा होता. विशेषत: विक्रांतला जलसमाधी देण्यासाठी आतुर असलेल्या पाकिस्तान नेव्हल शिप गाझी या पाणबुडीला आम्हीच सागराच्या रसातळाला गाडले. हा पन्नास वर्षांपूर्वीचा भारतीय नौसेनेचा देदीप्यमान इतिहास आहे.
 
 
बा विक्रांता, तुझ्या फ्लायडेकवर नेव्ही बँडने घुमवलेले ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे स्वर आजही गुंजारव करत आहेत माझ्या कानात. अ‍ॅडमिरल कृष्णन व विक्रांत यांची नोंद घेतल्याशिवाय नौदल इतिहास पुढे जाऊनशकत नाही. तुम्हा उभयतांना या नाविकाचा दीर्घ सलाम. जय हिंद.
लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत.