राज्य शासनाच्या पाटबंधारे खात्यात नोकरी होती. सरकारी नोकरी म्हणजे सगळे जीवन कसे सुख-समाधान पण धारूरकरांना ते फार भावले नाही. पाटबंधारे खात्यात नोकरी करताना आपल्यातील स्वयंसेवक गुदमरतो आहे असे त्यांना सतत वाटत होते. समोर घडणार्या राजकीय घटना खुणावत होत्या. सरकारी नियमांप्रमाणे हातात लेखणी घेता येत नव्हती. अशा स्थितीत जगणे हे जगणे नाही असे वाटून त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर पत्रकारिता त्यांना खुणावत होती. मराठवाड्यातच जन्मले व वाढले असल्याने त्या मातीची सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आपल्या मनोवृत्तीला पटेल अशा देवगिरी तरुण भारतात ते रुजू झाले.
दिलीप धारूरकर यांच्या अकाली निधनामुळे विलक्षण धक्का बसला. एका प्रबुद्ध संघ स्वयंसेवकाचे जाणे काय असते याचा अनुभव दिलीप धारूरकर यांच्या निधनामुळे, त्यांचा विशाल मित्रपरिवार घेत आहे. दिलीप धारूरकर यांचे वय व प्रकृती दोन्ही त्यांनी अशी ‘एक्झिट’ घ्यावी अशी नव्हती. पण काळाने आघात केला. संभाजीनगरच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संघ स्वयंसेवक हा फक्त संघस्थानावरच स्वयंसेवक नसतो तर तो आयुष्यभर व जिथे जाईल तिथे स्वयंसेवक वृत्तीने वागत असतो, हा अनुभव दिलीप धारूरकर यांनी आपल्या जीवनातून दिला. खरे म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर अभियांत्रिक पेशात रुजायला व फुलायला काही हरकत नव्हती. त्याप्रमाणे त्यांना राज्य शासनाच्या पाटबंधारे खात्यात नोकरी मिळाली. सरकारी नोकरी म्हणजे सगळे जीवन कसे सुख-समाधान, समृद्धीचे असते. पण धारूरकरांना ते फार भावले नाही. पाटबंधारे खात्यात नोकरी करताना आपल्यातील स्वयंसेवक गुदमरतो आहे असे त्यांना सतत वाटत होते. समोर घडणार्या राजकीय घटना खुणावत होत्या. त्या घटनांमागील मानसिकता जाणून घेणारे मन होते, पण सरकारी नियमांप्रमाणे हातात लेखणी घेता येत नव्हती. अशा स्थितीत जगणे हे जगणे नाही असे वाटून त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर पत्रकारिता त्यांना खुणावत होती. मराठवाड्यातच जन्मले व वाढले असल्याने त्या मातीची सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आपल्या मनोवृत्तीला पटेल अशा देवगिरी तरुण भारतात ते रुजू झाले. त्यांना श्रीरामपूर आवृत्तीची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी ते सांभाळीत असताना राहुरीला कृषी विद्यापीठ परिसरात तरुण भारत असोसिएटची बैठक झाली. त्या निमित्ताने त्यांच्याशी पहिला परिचय झाला. त्या बैठकीसाठी मी व लक्ष्मणराव जोशी नागपूरहून आलो होतो. तर देवगिरी तरुण भारतच्या संपादक विभागाचे प्रमुख म्हणून मनोहर कुळकर्णी आले होते. ती बैठक तशी परिवाराच्या संपादक विभागात अनेकांना बाहेर जायला लावणारी, एका अर्थाने फाटाफूट करणारी होती. मुंबईच्या सांज तरुण भारतच्या जबाबदारीतून सुधीर जोगळेकर काही महिन्यांनी मुक्त झाले. त्या पाठोपाठ मनोहरराव कुळकर्णी यांनाही देवगिरी तरुण भारत सोडावा लागला. दिलीप धारूरकर यांच्यावर देवगिरी तरुण भारतच्या संपादनाची जबाबदारी आली. ते देवगिरी तरुण भारतचे संपादक झालेत. श्रीरामपूरला असणारे दिलीप धारूरकर संभाजीनगरला सपरिवार स्थलांतरित झाले. प्रखर राष्ट्रवाद तर होताच त्याला शैलीदार लेखणीची जोड मिळाली होती. राष्ट्रजीवनात चुकीचे करण्यावर तुटून पडायला धारूरकरांना मनापासून आवडत असे. त्यांच्या लेखणीने विरोधकांची भंबेरी उडवत असे. मात्र असे करताना कुठलाही वावगा शब्द वापरला जाणार नाही याबाबत ते दक्ष असत. शिवाय विनोदाचे अभिजात अंग त्यांना होते. त्यामुळे नर्म, खुसखुशीत विनोदही त्यांच्या लेखणीतून सहज उतरत व वाचकांचे रंजन होत असे. त्या काळातच विवेकजी घळसासी (सोलापूर), लक्ष्मीकांत जोशी (मुंबई सांज तरुण भारत) व दिलीपजी धारूरकर व नागपूर तरुण भारतची संपादकीय चमू असे अग्रलेख लिहीत असे व ते पहिल्यांदा परिवारातील सर्व वृत्तपत्रांनी स्वीकारले होते. सर्व तरुण भारतात एका दिवशी, एकच अग्रलेख असे सूत्र स्वीकारले गेले. वाचकांना विविध शैलीचे प्रभावी अग्रलेख वाचायला मिळू लागलेत.
मात्र हे सगळे सुरू असताना परिवारातील वृत्तपत्रांना लक्ष्मी प्रसन्न नसल्याचा अनुभव वारंवार यायला लागला. त्यात देवगिरी तरुण भारत बंद पडला आणि दिलीपजींसमोर मोठा यक्षप्रश्न उपस्थित झाला. वैचारिक निष्ठा निभवीत असताना जगायचे कसे हा प्रश्न समोर येईल असा विचार त्यांनी कदाचित सरकारी नोकरी त्यागताना कधीच केला नव्हता. पण संघ स्वयंसेवकांत संकटावर मात करीत जगण्याची एक उपजत वृत्ती असते. ती दिलीप धारूरकरांमध्येही होतीच. संभाजीनगरचे प्रतिनिधी म्हणून ते बघायला लागले. अग्रलेख लिखाण, स्तंभलेखन याशिवाय परिवाराबाहेरील वृत्तपत्रांना मदत करणे यातून दिलीप धारूरकर न तुटता, न झुकता उभे राहिलेत. पण परिवारातील वृत्तपत्रांची स्थिती एकादशीच्या घरी महाशिवरात्र अशी होती. त्यामुळे पैसे केव्हा हातात येतील याची काळजी, चिंता सतत राहत होती. ती तोकडी मदतही मिळायची नाही म्हणून दिलीप धारूरकर व संगीता वहिनी धारूरकर यांनी 'युगंधर' नावाचे मासिक सुरू केले. पद्धतशीर प्रचार करून त्याची वाचकसंख्या वाढवली. प्रशासनातील अधिकारीही हातभार लावू लागले, पण आर्थिक गणित जमतच होते असे नाही. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले. राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे सरकार पराभूत होऊन भाजपाचे सरकार शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. इकडे परिस्थितीशी झगडत असलेल्या धारूरकरांना राज्याचे माहिती आयुक्त करण्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली. धारूरकर ते पद स्वीकारतील काय हा प्रश्न होता, पण संघ स्वयंसेवक अधिकार्यांची आज्ञा पाळतो या न्यायाने त्यांनी होकार दिला. पण तत्पूर्वी अनेक जबाबदार्या त्यांनी संघव्यवस्थेत घेतल्या होत्या. ते प्रचार व प्रसार विभागाच्या केंद्रीय टोळीत होते. उत्तम वक्तृत्व असल्यामुळे ठिकठिकाणी नारद जयंतीला त्यांना आमंत्रित केले जात असे. त्याही जबाबदार्या होत्या. याशिवाय संघ परिवारातील व्यक्तींसाठी पत्रलेखनावर एक सुरेख पुस्तक दिलीप धारूरकर यांनी सिद्ध केले होते. या जबाबदार्यांतून मुक्त झाल्यावर ते महाराष्ट्राचे माहिती आयुक्त झालेत. त्यांना नागपूरची जबाबदारी मिळाली.
माहिती आयुक्त म्हणून नागपूरला रुजू झाल्यावर त्यांना रेशीमबागमध्ये डॉक्टर हेडगेवार व श्रीगुरुजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करायला जायचे होते, पण त्यातून मोठा वाद निर्माण होऊ शकतो आणि माहिती आयुक्तांनी स्वत:ची प्रतिमा एका विचारसरणीकडे झुकलेला अशी होऊ नये याचीही दक्षता घ्यावी लागते. त्यांनी पहिल्या दिवशी दर्शनाला जाणे रद्द केले. त्यामुळे त्या ठिकाणी होणारे स्वागत वगैरेही रद्द झाले. काही दिवसांनी, महिन्यांनी पत्रकार मित्राकडे येऊन, त्याच्या गाडीतून, कोणाला काहीही न कळविता ते आपल्या श्रद्धास्थानांचे दर्शन घेऊन आले. नागपूरला असताना त्यांनी अतिशय वेगाने समोर आलेल्या अपील, याचिका यांचा फडशा पाडणे सुरू केले. भराभरा याचिका निकालात निघू लागल्या. अगदी कायद्याला धरून, कुणालाही न दुखविता पण खंबीरपणाने त्यांचा कामाचा निपटारा सुरू राहायचा. त्यांच्या या न्यायबुद्धीमुळे ‘माहिती विश्वात’ त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. पेंडिंग केसेसची संख्या जवळजवळ शून्य झाली होती. फक्त त्या महिन्यात दाखल झालेल्या अपील तेवढ्या निकाली व्हायच्या शिल्लक राहत. यातच त्यांच्याकडे औरंगाबादची अतिरिक्त जबाबदारी आली. औरंगाबादला त्यांना माहिती आयुक्त म्हणून सरकारी बंगला मिळाला तर नागपूरला मात्र ते रविभवनातच राहत असत.
या काळात त्यांचा व्यापक जनसंपर्क सुरू होता. फक्त लिखाण मात्र पूर्णपणे बंद ठेवले होते. या जबाबदारीमुळे आर्थिक परिस्थितीही चांगली झाली होती. त्यावेळी धाराशिवची कौटुंबिक मालमत्ताही वारसाहक्काने त्यांच्याकडे आली. त्यातून आर्थिक सुसंपन्नता घरात नांदू लागली. संभाजीनगरला स्वत:चे घर बांधण्याचे काम सुरू झाले. त्यांचे महाराष्ट्रातील काम बघून त्यांची केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती जळजवळ झाली होती, पण कुठेतरी माशी शिंकली आणि दिल्लीला जाण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर धारूरकर त्या पदावरून निवृत्त झालेत. ते निवृत्त झाले याची बातमी येण्यापूर्वीच त्यांचा स्तंभ नागपूर तरुण भारतात सुरू झाला. दर रविवारी ते वाचकांना भेटायला येऊ लागले.
आर्थिक सुसंपन्नता आल्यावर इतके दिवस दडपून ठेवलेल्या प्रकृतीच्या तक्रारी बाहेर येऊ लागल्या. बायपास करावी लागली. कोविडचा त्रास झाला, पण या काळातही धारूरकरांचे लिखाण सुरूच होते. ‘प्रहार’ हा त्यांचा स्तंभ वाचकांना खूप आवडत होता. दर रविवारी तरुण भारत हाती आला की, वाचक पान 4 वरील त्यांचा प्रहार वाचीत असत. जुन्या लिखाण तंत्राबरोबर त्यांनी नवीन तंत्रही आत्मसात केले होते. ‘दिशाबोध’ या नावाने ते यूट्युबवर आपला मजकूर टाकू लागलेत. अल्पावधीत त्यांनी 50 वर दिशाबोध सिद्ध केले. मार्च 22 पासून सुरू झालेला हा उपक्रम त्यांना प्रकृतीमुळे थांबवावा लागला. कारण नंतर नंतर आवाज कमी पडू लागला. ‘काश्मीर फाईल्स’वर दोन भागांत त्यांनी केलेले विवेचन कुठल्याही राष्ट्रभक्त वाचकाच्या अंगावर रोमांच उभे करणारे असेच होते. दिलीप धारूरकर यांची ही पत्रकारितेतील सेकंड इनिंग रंग भरत असतानाच अचानक पडदा पडला आणि 1 ऑगस्ट 2022 ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एक प्रबुद्ध संघ स्वयंसेवक अनंताच्या प्रवासाला रवाना झाला. त्यांच्या निधनामुळे एक प्रखर राष्ट्रवादी चिंतक, विचारवंत, शैलीदार लेखक व सदैव आपले संघ स्वयंसेवकत्व जपणारा, ‘प्रहार’कार हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना मनात सहज येते- दिलीपजी, ‘‘अभी न जावो छोड के की दिल अभी भरा नहीं।’’
-सुधीर पाठक
8888397727