आपण सारे भारतीय 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (पंचाहत्तरी) साजरा करणार आहोत. त्यामुळे भारतभर उत्साहाचे वातावरण असतानाच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ हा कार्यक्रम देऊन उत्साहात भर घातली आहे. याला आपण सोने पे सुहागा किंवा दुग्धशर्करा योग असेही म्हणू शकतो.
‘हर घर तिरंगा’ हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलेला कार्यक्रम. मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीने सर्व जग ग्रसले होते. या काळात मृत्यू भयाची टांगती तलवार असताना मा. पंतप्रधानांनी ‘घरोघर दिवा लावणे आणि थाळी वादन करणे’ असे दोन कार्यक्रम देशवासियांना दिले होते. त्यामागे सामूहिक ऊर्जा निर्माण होऊन नवचैतन्य निर्माण होण्यास देशाला बळ मिळाले, याचा आपण सर्वांनी अनुभव घेतला. मा. मोदींच्या सादाला प्रतिसाद देताना सर्व भारतियांनी मोदींनी दिलेल्या कार्यक्रमाचे स्वागत केले आणि उत्साहाने सहभाग नोंदविला. भारताच्या राजकीय इतिहासात अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रतिभेनुसार देशवासियांना काही कार्यक्रम दिले आहेत, त्यातीलच लालबहादूर शास्त्री यांचा ‘जय जवान, जय किसान’ हा नारा, महात्मा गांधी यांचा ‘दांडी सत्याग्रह.’ हाच वारसा घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना कार्यक्रम देत असतात आणि त्यात उत्साहाने सारे देशवासीय सहभाग नोंदवतात.
आपण सारे भारतीय 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (पंचाहत्तरी) साजरा करणार आहोत. त्यामुळे भारतभर उत्साहाचे वातावरण असतानाच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ हा कार्यक्रम देऊन उत्साहात भर घातली आहे. याला आपण सोने पे सुहागा किंवा दुग्धशर्करा योग असेही म्हणू शकतो. ध्वजासंबंधी एक संहिता आहे आणि त्या संहितेनुसारच काही नियम वा अटी आपल्या देशात आहेत. ध्वजाचा सन्मान राखणे आणि ध्वजाचा गैरवापर होऊ नये यासाठी काही नियम अथवा अटी या अनिवार्य असतात. या संहितेप्रमाणे त्यासंबंधीच्या नियमांचे पालन करून आपण 15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करूयात.
या कार्यक्रमात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा, यासाठी भारतातील प्रत्येक घरी तिरंगा देण्याचे कामही सरकारच्या वतीने केले जात आहे. यावरून नरेंद्र मोदींनी आतापर्यंत देशवासियांना दिलेले कार्यक्रम हे सहज करता येतील असे आहेत, हे लक्षात येते. 15 ऑगस्टच्या दिवशी देशभर सार्वजनिक सुट्टी असते. आतापर्यंत भारतातील काही सार्वजनिक ठिकाणे, महत्त्वाची कार्यालये, काही संस्था अशा महत्त्वाच्या ठिकाणीच स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. त्यामुळे लागोपाठ एक-दोन दिवस अशी सुट्टी असेल तर बहुतांश नागरिक हे 15 ऑगस्टला पर्यटनासाठी घराबाहेर गेलेले असतात.
आतापर्यंत स्वातंत्र्यदिनाची सुट्टी ही बर्याच जणांनी ‘सुट्टीचा दिवस’ म्हणूनच साजरी केली असेल, परंतु 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शहीदांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यासंबंधी कृतज्ञता म्हणून आणि पारतंत्रातून मुक्तता मिळाली हा आनंद साजरा करण्यासाठी हा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करीत असतो. नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ या एका कार्यक्रमाने देशात नवचैतन्य निर्माण केले आहे. हे नवचैतन्य स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी देशात सोनेरी पहाट झाल्याचा आनंद देत आहे. इतक्या वर्षांपासून या दिवसाचे महत्त्व माहीत असूनही अनेकजण केवळ सुट्टीचा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहत होते. मोदींच्या एका कार्यक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाकडे पाहण्याची मानसिकता बदलली आहे. भारतातील श्रीमंतातील श्रीमंत आणि गरीबातील गरीब सार्यांच्या घरावर आज तिरंगा अभिमानाने फडकत आहे. जातीभेद, वर्गभेद, वंशभेद, तसेच लहान मुले ते वृद्ध, स्त्री असो की पुरूष असे सारेचजण सर्व भेद दूर सारून आज भारतीय म्हणून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागला आहे. नरेंद्र मोदींच्या एका कार्यक्रमामुळे सर्वसमावेशकता काय असते आणि ती कशी प्रकट होते याचा अनुभव आज सारा देश घेत आहे.
भेदाभेद संपून देशात अभेद उत्पन्न करणारी उपासना पाहिजे. सर्व जणांना वाटले पाहिजे की, मी या देशाचाच भाग आहे, मी देशासाठी काही ना काही तरी करीत आहे. हे केवळ नागरिकत्व बहाल करून नाही तर देशाच्या कार्यक्रमात नागरिकांची सहभागिता निर्माण करून साध्य होणारी गोष्ट आहे. आपली राज्यपद्धती लोकशाहीची आहे. लोकशाहीत प्रजा ही राजा असते. आपल्या राज्यपद्धतीत लोकांची सहभागिता ही केंद्रीभूत आहे. लोकशाही राज्यपद्धतीचा अर्थच,‘सर्व जनतेच्या सहभागाची राज्यपद्धती.’ असा आहे. म्हणून लोकशाहीत सर्व प्रकारची सहभागीता अपेक्षित असते. ही सहभागिता जातीनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष असावी लागते. भारतीय म्हणून आपण सर्व एक आहोत. या भारतमातेची आपण संतान आहोत हा बंधुभाव सहजरित्या प्रकट होणे म्हणजेच विविधतेत एकतेचे दर्शन होणे होय.
‘हर घर तिरंगा’ या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कार्यक्रमाने सारे भेदाभेद दूर करून आपण भारतीय आहोत, ही एक भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना बळकट होताना दिसते आहे. 15 ऑगस्ट हा दिवस आपला राष्ट्रीय सण आहे. आज पंचाहत्तर वर्षांनंतर हा राष्ट्रीय सण खर्या अर्थाने सारे भारतीय एकत्र येऊन साजरा करीत आहोत. ‘हर घर तिरंगा’ या एका कार्यक्रमाने सर्व भारतभर सहभागितेचा अविष्कार पाहायला मिळत आहे. सणाचा दिवस येण्याआधी जी काही घरोघरी लगीनघाई बघायला मिळते, तीच स्थिती सर्व देशभर बघायला मिळते आहे. याचा आनंद काही औरच आहे.