दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी योगी श्रीअरविंद यांची 150वी जयंती आहे. यानिमित्त ‘आधुनिक क्रांतिकारक योगी श्रीअरविंद घोष यांचा जीवन परिचय
पंधरा ऑगस्ट रोजी आधुनिक युगातील क्रांतिकारक महायोगी अरविंद यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. आपला देश परकीयांच्या सत्तेपासून मुक्त होण्याचा - म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचासुद्धा हाच दिवस आहे. हा निव्वळ योगायोग नसून नियतीने घडवून आणलेला संयोग आहे. यासंबंधी योगी श्रीअरविंद असे म्हणतात की, “15 ऑगस्ट 1947 या दिवसाने एका नवीन युगाचा प्रारंभ होत आहे. अखिल जगतासाठी निर्माण होत असलेल्या एका नवीन युगाचा महत्त्वाचा दिवस असे स्वरूप आपण या दिवसाला देऊ शकू. या सर्व घटना एकाच दिवशी घडाव्यात, हे माझ्या कार्याला भगवंताची मान्यता मिळून त्यावर त्याचे शिक्कामोर्तब झाल्याचे चिन्ह आहे. एक प्राचीन युग संपून, नवीन युगाचा प्रारंभ या दिनाने सूचित होतो. परंतु स्वतंत्र राष्ट्र या नात्याने, आपल्या जीवनाने आणि कृतीने आपण या दिवसास अखिल जगतासमोर उघडल्या जाणार्या नवीन युगाचा, मानवतेच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्याचा एक महत्त्वाचा दिनांक असे स्वरूप देऊ शकू.”
श्रीअरविंदांचा हा संदेश अंत:करणाला भिडणारा आहे व त्यातील भविष्यवाणी ऐकणार्याला प्रेरणा देणारी व दिशा दाखविणारी आहे.
योगी अरविंद पुढे म्हणतात, “जी जी जागतिक आंदोलने सफल झालेली मी माझ्या आयुष्यात पाहावी अशी मी आशा बाळगली होती, पण जी त्या वेळी सत्यसृष्टीत उतरण्यास अशक्य अशा स्वप्नासारखी दिसत होती, ती बहुतेक सर्व आज एक तर जवळजवळ सफल होत असलेली मी पाहत आहे. या सर्व आंदोलनात स्वतंत्र भारत फार मोठा वाटा उचलू शकेल आणि नेतृत्व करू शकेल.
या स्वप्नातील पहिले स्वप्न होते, भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय ऐक्य मिळवून देणारे क्रांतिकारक आंदोलन. आज भारत स्वतंत्र झाला आहे; परंतु त्याने एकत्व प्राप्त केलेले नाही. पूर्वीचा हिंदू-मुसलमानांचा जातीय भेद इतका दृढ झाला आहे की, जणू काही ते राजकीयदृष्ट्या या देशाचे दोन कायमचेच भाग होऊन राहिलेले आहेत.
हे विभाजन जर अधिक काळ टिकले, तर भारत अतिशय दुर्बळ होऊन जाईल, एवढेच नव्हे, तर पंगू होईल. नेहमीच आपापसातील कलहांची शक्यता राहील. अर्थात त्यामुळे परकीय आक्रमण होऊन देश परकीयांच्या ताब्यात जाण्याचाही संभव निर्माण होईल. त्याचा अंतर्गत विकास आणि भरभराट यांना अडथळा येईल. त्याची नियती बदलून जाईल. पण तसे होता कामा नये; विभाजन नष्ट झालेच पाहिजे. एकत्व प्राप्त झालेच पाहिजे आणि ते होईलच. कारण भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते आवश्यक आहे.
भूतकाळात मानव-संस्कृतीच्या प्रगतीच्या कार्यात स्वीकारलेली जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यासाठी आशियाचे पुनरुत्थान आणि बंधनविमोचन हे दुसरे स्वप्न होते. त्यामध्ये भारताला काही वाटा उचलावयाचा आहे आणि ते कार्य भारताने अशा काही जोमाने आणि कर्तबगारीने सुरू केले आहे की, त्यावरून त्याच्यामध्ये काय काय संभाव्यता आहेत आणि राष्ट्र मंडळामध्ये तो कोणते स्थान घेऊ शकेल, हे अगोदरच दिग्दर्शित केले जात आहे.
तिसरे स्वप्न होते अखिल मानवजातीसाठी विशालतर, उज्ज्वलतर आणि उदात्त जीवन विकास पावण्यासाठी एक बाह्य परिस्थिती म्हनणून जगाचे एकीकरण. मानवजातीचे ते एकीकरण आज मार्गावर आहे. त्यामध्येही भारताने एक महत्त्वपूर्ण भूमिका घेण्याास प्रारंभ केला आहे. एकत्वाची एक नवीन भावना मानवजातीच्या मनाचा कब्जा घेईल.
भारताची जगाला आध्यत्मिक देणगी हे आणखी एक स्वप्न.. ते आधीच सुरू झालेले आहे. अनेक दुर्घटना घडत असताही भारताकडे अधिकाधिक लोकांचे डोळे आशेने लागून राहिले आहेत आणि भारताच्या केवळ शिकवणीचाच नव्हे, तर त्याच्या आत्मिक आणि आध्यात्मिक प्रत्यक्ष मार्गाचाही आश्रय वाढत्याच प्रमाणात घेतला जाऊ लागला आहे.
शेवटचे स्वप्न होते मानवाला उच्चतर आणि विशालतर चेतनेप्रत उचलून नेऊ शकेल अशी विकासक्रमातील पुढची पायरी चढणे. आत्मविकासाने ही उत्क्रांती सुरू होणार असल्याने तेथेही भारताने त्याची आद्य प्रेरणा दिली पाहिजे. तिचे केंद्रस्थान भारतच राहिला पाहिजे. भारताच्या मुक्तता दिनामध्ये हा सर्व आशय मी पाहत आहे.”
भगवान म्हणतात, “माझा संदेश देण्यासाठीच मी या राष्ट्राचा अभ्युदय करीत आहे. जगतासाठी ते वर उठत आहे. जगाच्या सेवेसाठी मी त्यांना स्वातंत्र्य प्रदान करीत आहे.”
श्रीअरविंदांच्या ऐहिक जीवनाचे पृथक्करण तीन भागांमध्ये करता येईल - (1) बालपण, इंग्लंडमधील शिक्षण व आय.सी.एस. परीक्षेचा कालखंड व बडोदा येथे गायकवाडांकडे नोकरी. (2) क्रांतिकार्य व राजकारण व (3) साधना, सिद्धी व समाधी.
डॉ. कृष्णधन घोष व स्वर्णलता यांच्या पोटी कलकत्त्यामध्ये दि. 15 ऑगस्ट 1872 रोजी श्रीअरविंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील इंग्रजांच्या आत्यंतिक प्रभावाखाली असल्यामुळे त्यांनी श्रीअरविंदांना भारतीय संस्कारांपासून दूर ठेवण्याची आटोकाट काळजी घेतली. लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटते की, जेव्हा श्रीअरविंद बडोदा येथे आले, तेव्हा ते इंग्लिश, फ्रेंच, ग्रीक व लॅटीन या भाषांचे मर्मज्ञ व जाणकार असूनदेखील त्यांनी बंगाली व संस्कृत शिकण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या पाचव्या वर्षीच श्रीअरविंदांना दार्जिलिंग येथील निवासी कॉन्व्हेंट शाळेमध्ये दाखल करण्यात आले. इ.स. 1876मध्ये त्यांचे सर्व कुटुंबच इंग्लंड येथे स्थलांतरित झाले, कारण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांना इंग्लंड येथेच राहावयास जाणे योग्य वाटले.
रेव्हरंड विलियम यांच्या मार्गदर्शनाखाली बाल अरविंदच्या शिक्षणाला व संस्काराला प्रारंभ झाला. वयाच्या सातव्या वर्षी या बालकाला डिवेट लॅटिन व इंग्लिश भाषा व श्रीमती डिवेट इतिहास, भूगोल, गणित व फ्रेंच शिकवू लागले. वडिलांनी बाल अरविंदला भारतीयांशी संपर्क ठेवण्यास मनाई केली होती. तसेच चर्चमध्ये जाऊन त्यांचे नामकरण ‘अरविंद आक्राइड घोष’ असे करण्यात आले. मात्र श्रीअरविंद यांनी ‘आक्राइड’ या नावाच्या शेपटापासून लवकरच स्वत:ची सुटका करून घेतली. 11व्या वर्षीच त्यांना साक्षात्कार घडला की, जगाच्या भावी घडामोडींमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे.
श्रीअरविंदांचा स्वभाव शांतिप्रिय व संयमशील होता. एकदा ते क्रिकेट खेळण्यास गेले, मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. वडिलांच्या अतिखर्चाच्या सवयीमुळे त्यांना अनेक वर्षे अपुर्या आहारावर काढावी लागली. तसेच लंडनच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ओव्हरकोटदेखील विकत घेता आला नाही. मात्र ही गरिबी त्यांच्या अग्नीसारख्या प्रतिभेला कुंठित करू शकली नाही. याच काळात त्यांनी युरोपच्या इतिहासाचा अभ्यास केला, तसेच इटालियन, जर्मन व स्पॅनिश साहित्याचादेखील परिचय करून घेतला.
इ.स. 1885मध्ये ते सेंट पॉल शाळेमध्ये दाखल झाले. त्यांचे लॅटीन भाषेचे ज्ञान पाहून तेथील मुख्याध्यापकांनी त्यांना ग्रीकदेखील शिकविण्यास प्रारंभ केला. चार वर्षांनी साहित्यामध्ये बटरवर्थ व इतिहासामध्ये ब्रेडफोर्ड पारितोषिक प्राप्त करून ते किंग्ज कॉलेज केम्ब्रिज येथे दाखल झाले. या कॉलेजमधील लॅटिन व ग्रीक कवितांची सर्व पारितोषिके त्यांनी पटकाविली.
इ.स. 1890 ते 1892 या काळात ते केम्ब्रिजमध्येे किंग्ज कॉलेजात होते. ज्यासाठी इतरांना साधारणत: तीन वर्षे लागतात, ती क्लासिकल ट्रायपॉसची परीक्षा त्यांनी दोन वर्षांत दिली आणि त्यातही ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. पण नियम असा होता की, तीन वर्षांनंतरच बी.ए. ही पदवी बहाल करावयाची. श्रीअरविंदांनी पदवीची काहीच कदर बाळगली नव्हती. ज्ञान काही मोडत तुटत नाही की हरवत नाही. त्यांना तेथे दोन वर्षे पुरेशी वाटली.
केम्ब्रिज येथे भारतीय विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची एक गुप्त संस्था स्थापन केली होती. श्रीअरविंद त्याचे सभासद झाले. संस्थेचे नाव मोठे आकर्षक होते - ‘कमळ आणि कट्यार’. ‘माझे संपूर्ण जीवन मी भारताच्या बंधमुक्तीसाठी वाहीन’ अशी शपथ प्रत्येक सभासदाला घ्यावी लागे. याशिवाय भारतीय विद्यार्थ्यांची एक मजलिस (Majlis) होती. श्रीअरविंद त्यात सामील झाले. तिचे सेक्रेटरीही झाले. तिच्या कार्यात त्यांनी प्रामुख्याने भाग घेतला. अनेक क्रांतिकारक व जहाल भाषणे दिली. इंडिया ऑफिसने याची नोंद घेतली. त्यांच्या नावापुढे एक काळी खूण पडली. तेव्हापासून सरकारने त्यांच्यावर नजर ठेवली.
केम्ब्रिजमध्ये त्यांना ग्रीक आणि लॅटीन काव्याबद्दल पारितोषिके मिळाली. ते आय.सी.एस. परीक्षा पास झाले. पण त्यांना त्याविषयी आंतरिक ओढ नव्हती. त्यांना माहीत होते की, आय.सी.एस. म्हणजे ब्रिटिश सरकारचे जोखड मानेवर वागवायचे. या सरकारचे गुलाम होण्याची त्यांची इच्छा नव्हती. यापूर्वीच त्यांनी ब्रिटिश सरकारवर कडक टीका करण्यास सुरुवात केली होती. आय.सी.एस.नंतरच्या नोकरीच्या पिंजर्यात सापडायचे नाही, असा त्यांनी निश्चय केला आणि म्हणूनच घोड्यावर बसण्याच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याचा आपला बेत त्यांनी पार पाडला. पुन: पुन: संधी दिली गेली. पण ते वेळेवर हजरच राहिले नाहीत. ते त्यात उत्तीर्ण झाले असते, तर त्यांना सरकारी नोकरी पत्करावीच लागली असती. नोकरी नाकारून वडिलांना नाराज करणेही त्यांना शक्य झाले नसते.
1893 साली ते भारतामध्ये आले. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारात 200 रुपये पगारावर त्यांची नियुक्ती झाली. जेव्हा ते मुंबईच्या अपोलो बंदरामध्ये उतरले, तेव्हा त्यांना अपूर्व शांतीची अनुभूती झाली. जणू काही आई-मुलाची फार काळाने भेट झाली आहे. याविषयी श्रीमाताजी म्हणाल्या की, “भारतमाता एक आध्यात्मिक सत्ता आहे, एक देवी आहे. भारतमाता सार्या विश्वाची माता आहे.”
भारतात येऊन केवळ सहा महिनेच झाले होते. पण तेवढ्या अवधीतही त्यांनी राजकीय चळवळीचा, देशाच्या तत्कालीन परिस्थितीचा, देशकार्य, तत्कालीन नेते, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे विचार या सर्वांचा सांगोपांग अभ्यास केला होता. याच सुमारास त्यांचे केम्ब्रिजचे एक जुने मित्र, मजलिसचे एक सभासद, त्या वेळच्या ‘इंदुप्रकाश’चे संपादक के.जी. देशपांडे यांनी श्रीअरविंदांना त्यांच्या वर्तमानपत्रात एक लेखमाला लिहिण्याची विनंती केली. त्यांना मजलिसची आठवण असली पाहिजे. ती श्रीअरविंदांची ज्वलंत, जोरदार, क्रांतिकारक भाषणे - स्वदेशभक्तीने थरारलेली, मातृभूमीच्या प्रेमाने ओथंबलेली, इतकी हृदयस्पर्शी, अंत:करण हलवून सोडणारी! श्रीअरविंदांच्या लेखणीतून काहीतरी नवीन आणि जोरदार लेखन मिळावे या इच्छेने त्यांनी तत्कालीन भारतीय राष्ट्र सभा, तिचे पुढारी, त्यांचे ध्येय आणि राजकीय प्रगती या विषयांवर लेख लिहिण्याची विनंती केली. योग्य संधीचा फायदा घेऊन अरविंदबाबूंनी लेख पाठविण्यास प्रारंभ केला. नि:संदिग्ध शब्दांत आपली मते प्रतिपादित केली. अशा रितीने त्यांचे पहिले राजकीय कार्य सुरू झाले.
New Lamps for Old - ‘जुन्याऐवजी नवे दीप’ या सूचक मथळ्याखाली श्रीअरविंदांनी आपली लेखमाला लिहिली. या लेखात त्यांचे सूक्ष्म निरीक्षण दिसून येते. त्यात त्यांनी तत्कालीन काँग्रेसच्या मवाळ धोरणावर कडाडून टीका करून, भविष्यकालीन ध्येयांविषयी राष्ट्रात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लेखांवर आपले नाव घातले नाही. कारण बडोदा संस्थानाच्या नोकरीत असल्याने उघड रितीने राजकीय विषयावर लिहिणे त्यांना शक्य नव्हते. पहिले दोनच लेख प्रसिद्ध झाले असतील-नसतील, तोच राजकीय गोटात खळबळ माजली, प्रचंड प्रक्षोभ उठला. काँग्रेस नेते विचार करू लागले - याचा लेखक कोण असावा? शोध सुरू झाला. पण कोणालाच पत्ता लागला नाही. त्या वेळचे प्रसिद्ध महाराष्ट्रीय पुढारी न्यायमूर्ती रानडे यांनी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकांना इशारा दिला की, असेच लिखाण चालू राहिले, तर त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरला जाईल. त्या सर्वांना इतकी दहशत बसण्याइतके त्या लेखांत होते तरी काय? तुम्ही ते लेख वाचलेत तर तुम्हाला कळून येईलच, पण त्यातील
काही मुख्य मुद्दे खाली दिले आहेत -
काँग्रेसविषयी मी म्हणेन की, तिची ध्येये चुकीची आहेत. ती ध्येये साधण्यासाठी लागणारी प्रामाणिकपणाची आणि सर्वस्व वाहण्याची वृत्ती तिच्याजवळ नाही. योजलेल्या पद्धती बरोबर नाहीत. नेते म्हणून त्यांना योग्य प्रकारची माणसे लाभलेली नाहीत. सध्या आपण आंधळ्यांनी मार्गदर्शन केलेले, अगदी आंधळे नाही पण एका डोळ्याने आंधळे आहोत.
विचार करून किंवा उपजत बुद्धीने परिस्थितीचे अचूक आकलन होणे आणि दक्षतेने तिचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे हे राजकारणाचे खरे रहस्य आहे. आणि नेमकी तीच गोष्ट करण्यात आपण अयशस्वी झालेले आहोत.
आपल्यामध्ये प्रामाणिकपणाची, म्हणजेच दुसर्या शब्दात शक्तीची वाण आहे.
बडोद्याला परत येताना वाटेत मुंबईला थोर पुढारी न्या. रानडे यांना ते भेटले. न्या. रानडे ‘इंदुप्रकाश’मधील लेखांनी अगदीच गडबडून गेले होते. अर्धा तास त्यांची मुलाखत झाली. त्यात त्यांनी अरविंदबाबूंना असे सुचविले, “काँग्रेसवर आघात आणि जालिम टीका करण्याऐवजी तुरुंग-सुधारणा यासारखे काही कार्य करण्याचा प्रयत्न करणे अधिक बरे. असे कार्य अधिक उपयुक्त होईल.” (पुष्कळ वर्षांनंतर अलीपूरच्या तुरुंगात काळ्याकुट्ट भयाण कोठडीत असताना, श्रीअरविंदांना त्यांचे हे शब्द स्पष्टपणे आठवले.) त्या काळच्या मवाळ पुढार्यांची ही अशी विचारांची बैठक होती.
भूपालचंद्र बोस यांची कन्या मृणालिनीदेवी यांच्याबरोबर 30 एप्रिल 1901 रोजी श्रीअरविंद यांचे लग्न झाले. लग्नानंतर ते बडोद्यास आले. मृणालिनीदेवी यांना जेमतेम सलग 11 महिने श्रीअरविंदांबरोबर राहायला मिळाले. श्रीअरविंदांनी मृणालिनीदेवींना लिहिलेली पत्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहेत. अतिशय वाचनीय असे हे पुस्तक आहे. त्यामध्ये श्रीअरविंदांच्या मानसिकतेचा परिचय होतो. आपल्या सहधर्मचारिणीकडून असणार्या अपेक्षांची अभिव्यक्ती श्रीअरविंदांनी या पत्रांमध्ये केलेली आहे.
इ.स. 1901मध्ये मांडवले यांनी श्रीअरविंदांना क्रांतिकारक जीवनाची शपथ दिली.
इ.स. 1902मध्ये ते क्रांतिकार्य करण्यासाठी प्रथमच मिदनापूर येथे गेले. नंतर कलकत्ता येथे येऊन त्यांनी पी. मित्र यांना क्रांतिकारक जीवनाची शपथ दिली. याच वर्षी भगिनी निवेदिता यांच्याशी त्यांची भेट झाली. इ.स. 1903मध्ये श्रीअरविंद यांनी ‘तडजोड नाही’ अशा शीर्षकाचा लेख लिहून, गुप्त रितीने छापून त्याचे वितरण केले.
इ.स. 1905मध्ये श्रीअरविंदांनी ‘भवानी मंदिर’ या नावाचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक म्हणजे वंगभंग आंदोलनाची अभिनव गीता होती, जिचे हातोहात वितरण झाले. या वेळी वातावरणच असे होते की, श्रीअरविंद यांच्यासारखी प्रसिद्धिपराङ्मुख व्यक्तीदेखील गुप्त राहू शकली नाही. ते पुढे आले आणि काँग्रेसच्या तत्कालीन नीतीला पर्याय म्हणून त्यांनी राष्ट्रस्वातंत्र्यासाठी तीन उपाय सुचविले -
गुप्त सशस्त्र क्रांतीची तयारी
विदेशी शासनाविरुद्ध खुला प्रचार
विदेशी शासनाशी पूर्णपणे असहकार
योगी विष्णू् भास्कर लेले यांच्याकडून श्रीअरविंदांनी मनाला चिंताशून्य करण्याची पद्धत शिकून घेतली व ते दैनंदिन व्यवहारातदेखील सतत निर्विकल्प समाधीमध्ये स्थित होऊन राहू लागले. नर्मदातटावर राहणारे गंगनाथ स्वामीदेखील आपले नियम विसरून श्रीअरविंदांचे निरीक्षण करू लागले.
मात्र काळ बदलत होता. विद्यार्थ्यांमध्ये गुरू व नेता या नात्याने प्रिय असणार्या श्रीअरविंद यांनी बडोदा कॉलेजमधील 750 रुपये पगाराची नोकरी सोडून कलकत्ता येथील नॅशनल कॉलेजमधील 70 रुपये पगाराची नोकरी स्वीकारली.
या काळात ‘वंदे मातरम्’चे (इंग्लिश दैनिक) संपादन करण्यासाठी श्रीअरविंदबाबू बिपीनचंद्र पाल यांना जाऊन मिळाले. आपल्या क्रांतिकार्यासाठी आवश्यक असा सार्वत्रिक प्रचार करण्यायची संधी त्यांनी त्याद्वारा घेतली. संपूर्ण आणि अबाधित स्वातंत्र्य हे भारतातील राजकीय चळवळीचे उद्दिष्ट आहे हे उघडपणे जाहीर करणे आणि आपल्या पत्रात त्यावर पुन:पुन्हा जोर देणे हे त्यांचे आद्य कार्य होते. असे करण्याचे धैर्य असलेले ते पहिलेच भारतीय राजकारणी पुरुष होते आणि लागलीच ते यशस्वीही झाले. आपले स्वातंत्र्याचे ध्येय व्यक्त करण्याकरिता त्यांच्या पक्षाने ‘स्वराज्य’ हा शब्द लगेच उचलला आणि त्याचा लवकरच सर्वत्र प्रसार झाला. या पत्राने एक नवीन राजकीय कार्यक्रम जाहीर केला व विकसित केला - असहकार, नि:शस्त्र प्रतिकार, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, लवादातर्फे न्यायनिवाडा इत्यादी. सबंध राष्ट्रालाच एका प्रचंड आणि सुसंघटित अशा राजकीय चळवळीत सामील करावयाचे, त्यात भाग घेण्यास चेतना द्यावयाची, प्रोत्साहन द्यावयाचे अशी श्रीअरविंदांची इच्छा होती. केवळ पोकळ बडबड आणि नेभळट ठराव पास करणारी, कायद्याच्या चौकटीत हालचाल करणारी एक भित्रट केंद्रीय संस्था हे काँग्रेसचे रूप बदलून, तिला आपल्या ताब्यात घेऊन तिला क्रांतिकारक चळवळीचे एक प्रभावी साधन बनवावयाचे, अशी त्यांची कल्पना होती.
‘वंदे मातरम्’चा भारतभर प्रसार होऊ लागला. लोकांची मने बदलून त्यांना क्रांतिकार्यासाठी तयार करण्यामध्ये ‘वंदे मातरम्’चा जो प्रभाव दिसून आला, तो अनन्यसाधारण होता. तरीही त्यातील लेख अशा काही खुबीने लिहिलेले असत की, कोणीही त्यावर आक्षेप घेऊ शकत नसे. त्यावर खटला भरणे अशक्य असे. एका इंग्लिश संपादकाची अशी तक्रार होती की, “या पत्राच्या ओळीओळीतून राजद्रोहाचा वास येत असूनही, त्याची शब्दयोजना अशा काही खुबीने केलेली असते की, त्यावर कोणतेही कायदेशीर आक्षेप घेणे कठीण जात आहे.”
लो. टिळकांप्रमाणेच श्रीअरविंदांना ‘पौरुषहीन शांती’ मान्य नव्हती. अॅनी बेझंट यांनी त्यांना ‘भारताचे मॅझिनी’ असे संबोधिले होते. श्रीअरविंदांचा असा विश्वास होता की, शस्त्रबलाने स्वातंत्र्यप्राप्ती करून घेण्याचा राष्ट्राला जन्मसिद्ध अधिकार आहे. सर्वप्रथम श्रीअरविंद यांनीच स्वराज्य हा शब्द इन्डिपेडन्स या शब्दाला समानार्थी स्वरूपात वापरला होता. राजकारण त्यांच्यासाठी सत्ताप्राप्तीचे साधन नव्हते, तर आत्मनिवेदनामुळे होणारी दुर्गापूजा होती. इ.स. 1905मध्ये तत्कालीन राजकीय पक्षांच्या अवस्थेचे निरीक्षण केल्यावर त्यांनी असे ठरविले की, क्रांतीच्या तयारीबरोबरच काँग्रेसचे रूपांतरदेखील एका राष्ट्रवादी पक्षात करावयास लागेल.
इ.स. 1906मध्ये कलकत्ता काँग्रेसमध्ये दादाभाई नौरोजी यांच्यामुळे मवाळ व जहाल पक्ष या दोघांनी एकत्रितपणे पं. सखाराम गणेश देउस्कर यांच्याद्वारे तयार केल्या गेलेल्या ‘स्वराज्य’ या शब्दाचा प्रयोग करून प्रस्ताव संमत केला. मात्र हे मनापासून झाले नव्हते, सर्व प्रकारच्या उग्रतेपासून काँग्रेसला वाचवायचे, असे त्यांचे उद्दिष्ट होते. लो. टिळक व श्रीअरविंद यांचे असे म्हणणे होते की, काँग्रेसने इंग्रजी सत्तेचे आव्हान स्वीकारले पाहिजे. इ.स. 1905मध्ये स्वीकृत केल्या गेलेल्या वंगभंगाच्या कायद्यामुळे निर्माण झालेल्या आव्हानापासून पाठ फिरविण्याचा अर्थ होता की, काँग्रेसची आत्महत्या - देशाचा पराभव.
लो. टिळकांविषयी श्रीअरविंद यांनी सांगितले होते, “त्यांच्यामध्ये असे सारे गुण एकत्रितपणे आढळतात, ज्या गुणांमुळे कोणीही व्यक्ती आपल्या देशाचा व युगाचा प्रतिनिधी होऊ शकेल.”
सुरत काँग्रेसच्या वेळी या दोन्ही नेत्यांनी भारतीय इतिहासाला एक निर्णायक वळण दिले, ज्यामुळे स्वातंत्र्याचे वास्तव स्वरूप जनतेपुढे आले, एवढेच नव्हे, तर देशामध्ये राष्ट्रवादाचा पायादेखील पक्का झाला.
इ.स. 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी लोकांनी पाच वातींच्या दिव्याचे प्रतीकात्मक स्वरूपात प्रज्वलन केले होते. काँग्रेसमधील मवाळ गट स्वराज्याचा मुख्य मुद्दा सोडून परदेशी वस्तू, इंग्रज संचालित विद्यालये, कचेर्यांवर बहिष्कार, राष्ट्रीय स्व्यंसेवकांचे एकत्रीकरण, ग्रामव्यवस्थेमध्येे पंचायत पद्धतीची पुन:स्थापना या पाच गोष्टींची नवी मांडणी इच्छित होता. हे राष्ट्रवादी गटाला मान्य नव्हते.
बंगाल प्रांतीय काँग्रेसने मिदनापूर येथे होणार्या अधिवेशनाची सर्व सूत्रे श्रीअरविंद यांच्याकडे सोपविली होती. श्रीअरविंदांनी जाणले होते की ब्रिटिश सरकार दडपशाही सुरू करणार आहे. त्यांनी राष्ट्राला या दडपशाहीचा निर्भयतेने सामना करण्यास सांगितले. काँग्रेसमधील मवाळ गटाने सदर संमेलन प्रथम नागपूरमध्ये व नंतर सुरतमध्ये आयोजित करण्याची खेळी खेळली. संमेलनासाठी सुरत येथे 1300 मवाळपक्षी व 1100 राष्ट्रवादी एकत्र जमले. मात्र राष्ट्रवादींचा असा निर्धार होता की, काँग्रेस देशाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करेल किंवा तिचे विभाजन होईल. त्यांनी श्रीअरविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळी सभा घेतली. दुसर्या दिवशी काय होणार आहे, याची श्रीअरविंद यांच्याशिवाय इतर कोणा नेत्याला जाणीव नव्हती.
अधिवेशनाचे सभापती होते रासबिहारी घोष. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवाद्यांनी लाला लजपतराय यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासंबंधी बोलण्यासाठी लो. टिळक उभे राहिले. त्या वेळी अध्यक्षांनी त्या पुरुषसिंहाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते धीरगंभीरपणे व्यासपीठावर आले, प्रस्तावाचे वाचन केले व भाषणास सुरुवात केली. मवाळपंथीयांना हे सहन झाले नाही व त्यांनी लो. टिळकांवर फेकण्यासाठी खुर्च्या उचलल्या. राष्ट्रवादीदेखील प्रतिकारासाठी तयार होते. त्याच वेळी एक कोल्हापुरी चप्पल डॉ. रासबिहारी घोष यांच्यावर फेकण्यात आली. ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या खांद्याला लागली. सभेमध्ये चारही बाजूंना गोंधळ माजला.
तरुण राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेऊन लोकमान्यांचा अपमान करणार्यांना अद्दल घडविली. श्रीअरविंद व्यासपीठावर बसून शांतपणे हा तमाशा बघत होते. क.मा. मुन्शी यांच्या शब्दात याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे - ‘तेच निर्विकार गांभीर्य - जेव्हा सर्व काही समाप्त झाले, तेव्हा ते शांतपणे उठले, चपला घातल्या, छत्री घेतली व बाहेर निघून गेले.’ लोकमान्य, लाला लजपतराय व बिपीनचंद्र पाल यांच्यासारख्या राष्ट्रवादी लोकांच्या मागे श्रीअरविंद यांची प्रेरणा अत्यंत प्रभावीपणे उभी राहिली. टीकाकारांच्या मते, मातृपूजेच्या स्वरूपातील देशसेवा करण्याचे श्रीअरविंदांनी केलेले आवाहन आम जनतेच्या आकलनापलीकडील होते. तरीदेखील हजारो स्त्रीपुरुष त्यांचे भाषण ऐकत असत. त्यामध्ये अभिनिवेश नसे. त्यांच्या भाषणांचा मंत्राप्रमाणे परिणाम होत असे. त्यांना स्वत:ला आलेल्या अनुभवांतून या भाषणांचा उगम होत असे.
इ.स. 1906मध्येे ‘वंदे मातरम्’ या इंग्लिश दैनिकाचे संपादन करण्याची जबाबदारी श्रीअरविंदांनी घेतली. त्यातील लेखांमुळे ते सरकारच्या नजरेत आले.
दि. 30 एप्रिल 1908 रोजी मुझफ्फरपूर येथे जिल्हा न्यायाधीशांवर बाँब फेकण्याचा प्रयत्न झाला. पण श्रीअरविंदांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. दि. 1 मे रोजी कित्येक क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. दि. 2 मे 1908च्या पहाटे श्रीअरविंद झोपेत असताना, ब्रिटिश पोलीस हातात पिस्तुले घेऊन जिना चढून वर गेले आणि त्यांनी श्रीअरविंदांना अटक केली. त्यांना अलीपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले.
यानंतर चित्तरंजन दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले. दि. 5 मे 1909 रोजी सर्व जण न्यायालयात स्वस्थ बसले होते. श्रीअरविंदांना फाशीची शिक्षा सुनावली जाणार असे सर्वांना वाटत होते. अशा वेळी चित्तरंजन दास यांनी बचावाचे भाषण असे काही उत्स्फूर्तपणे केले की, न्यायाधीशांवर, पंचांवर आणि सर्वच श्रोतृवर्गावर त्या भाषणाचा प्रभाव पडला. न्यायालयाने श्रीअरविंदांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
श्रीअरविंदांना पुन्हा पुन्हा अंतर्वाणी ऐकू येऊ लागली, ‘मी हे करीत आहे... मी हे करीत आहे.’
या खटल्यामधून निर्दोष सुटल्यावर ते गुप्तपणे पाँडिचेरी येथे निघून गेले व तेथेच स्थायिक झाले. त्यांनी सक्रिय राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवले.
मध्यंतरीच्या काळात देशामधील स्वातंत्र्यचळवळीचा उत्साह ओसरला होता व कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले होते.
दि. 7 एप्रिल 1920 रोजी श्रीअरविंद यांनी आपला धाकटा भाऊ वारींद्र कुमार घोष याला लिहिले होते की, ‘मी राजकारण का सोडले आहे... कारण आपले राजकारण भारताचे अस्सल राजकारण नाही.
मला भेदाभेद असलेला समाज अपेक्षित नाही. आत्मप्रतिष्ठ, आत्म्याच्या ऐक्याची मूर्ती असलेला संघ मला अपेक्षित आहे. ज्या लोकांना देवासारख्या जीवनाची इच्छा आहे, अशा लोकांचा संघ, देव-संघ. असा संघ एका जागी स्थापित करून पूर्ण देशभर त्याचा प्रसार करावा लागेल.’
याच वर्षी 24 एप्रिल रोजी श्रीमाताजी पाँडिचेरी येथे आल्या व त्यानंतर त्या बाहेर गेल्या नाहीत. पाँडिचेरी येथील आश्रमाला आता नैसर्गिक स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. इ.स. 1922मध्ये श्रीमाताजींनी श्रीअरविंद यांच्या घराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जेव्हा श्रीअरविंद इ.स. 1926मध्ये सिद्धि-दिवसानंतर एकांतवासात निघून गेले, तेव्हादेखील श्रीमाताजींनी त्यांच्या आश्रमाची सारी जबाबदारी घेतली.
इ.स. 1920मध्ये लो. टिळकांची जीवनज्योत निमाली. आता देशामधील राष्ट्रीय पक्षाला नेतृत्वाची आवश्यकता होती. इ.स. 1920मध्ये लो. टिळकांच्या प्रेरणेने जोसेफ बॅप्टिस्टा यांनी श्रीअरविंदांना एक पत्र पाठविले होते. त्या पत्राच्या उत्तरादाखल श्रीअरविंद यांनी लिहिले होते की, ‘मला भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे, ते मी माझ्या पद्धतीने करीत आहे. पाँडिचेरी माझ्या तपश्चर्येची गुहा आहे. ही तपश्चर्या वैराग्याची नसून वेगळ्या प्रकारची आहे. माझ्या मते आध्यात्मिकतेचा अर्थ म्हाणजे संसाराचा त्याग नाही. माझा असा विश्वास आहे की देश आता स्वातंत्र्याच्या रस्त्यावर आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर देश कोणते स्वरूप धारण करेल, हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.’
देश नेतृत्वहीन झाला. अशा अवस्थेमध्ये श्रीअरविंद यांचेच सर्वांना दीपगृहाप्रमाणे स्मारण झाले. नागपुराहून डॉ. मुंजे व डॉ. हेडगेवार यांनी पाँडिचेरी येथे जाऊन, श्रीअरविंदांना देशाचे नेतृत्व स्वीकारण्याचा आग्रह केला. परंतु श्रीअरविंद यांनी परत राजकारणामध्येे प्रवेश केला नाही. डॉ. हेडगेवार यांनीदेखील राजकारणापासून फारकत घेऊन रा.स्व. संघाची स्थापना केली.
मि. 5 जानेवारी 1925 रोजी लाला लजपतराय यांनी श्रीअरविंदांची भेट घेतली. तसेच डॉ. निहालचंद, राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन हेदेखील श्रीअरविंदांना राजकारणाच्या संदर्भात भेटले होते.
दि. 4 एप्रिल 1910 रोजी श्रीअरविंद पाँडिचेरी येथे गुप्तपणे पोहोचले होते. तेथेच त्यांनी आपल्या जीवनाला योगसाधनेमध्ये गुंतविले व श्रीमाताजींच्या सहयोगाने आश्रमाची स्थापना करून आपला पूर्ण वेळ योगसाधनेमध्ये व्यतीत करू लागले. यादरम्यान श्रीअरविंदांनी बरेच लेख लिहिले व ‘सावित्री’ या महाकाव्याची निर्मिती केली.
श्रीअरविंद ज्याला ‘माझे खरे कार्य’ म्हणतात, ते समजून घेणे जरुरीचे आहे. त्यांच्या योगाचे उद्दिष्ट काय होते, हे ते स्वत:च सांगतात - ‘दिव्य सत्याचा प्रकाश, शक्ती आणि आनंद जीवनात उतरवून त्याचे संपूर्ण परिवर्तन करणे हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे. या पृथ्वीवर आणि भौतिक अस्तित्वात दिव्य जीवन निर्माण करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. जीवनापासून पलायन किंवा केवळ संन्यात नाही. जीवन हे देवाच्या ‘दिव्य ज्योतीचा’ आविष्कार व्हावा, जग हे ‘अव्यक्त भगवंताची अभिव्यक्ती’ व्हावी.’
श्रीअरविंदांची शिकवण अशी आहे की, आपले जग हे चढत्या विकासक्रमाचे एक क्षेत्र आहे, स्थान आहे, भूमी आहे. जड कोटीतून वनस्पतिकोटीकडे, वनस्पतीतून पशुकोटीकडे, पशूतून मानवाकडे हा विकास होत असतो. या क्षणी तरी, मनुष्य हा विकासक्रमातील अखेरचा मुकुटमणी आहे असे भासत आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा या पृथ्वीवर कोणीही वरिष्ठ नाही असे तो समजतो. पण खरोखरीच ही त्याची चूक आहे, कारण त्याच्या भौतिक प्रकृतीत तो अजूनही जवळजवळ संपूर्णत: पशूच आहे. विचार करू शकणारा आणि बोलू शकणारा पशूच. अजूनही त्याच्या सवयींत आणि सहजप्रवृत्तींत तो पशूच आहे. तेव्हा या विकासाची पुढची पायरी चढून वर गेलेच पाहिजे. पशुतुल्य माणूस दिव्य मानव झाला पाहिजे. त्याने स्वत:त एक नवीन उच्चतर आध्यात्मिक जाणीव, चेतना, सत्यचेतना विकसित केली पाहिजे. यालाच श्रीअरविंद अतिमानस किंवा अतिमानस-चेतना म्हणतात. तसेच त्याने एक नवे जीवन, एक संपूर्णत: सुसंवादी, चांगले, सुंदर, सुखी आणि संपूर्णत: ज्ञानपूर्ण जीवन जगले पाहिजे.
श्रीमाताजींच्या म्हणण्याप्रमाणे, ‘या पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात ही चेतना स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्याभोवती जमलेल्यांना तिचा साक्षात्कार व्हावा, तिची प्राप्ती व्हावी यासाठी श्रीअरविंदांनी सर्व वेळ कारणी लावला. हेच त्यांचे मुख्य कार्य होते. पृथ्वीचे जीवन परिवर्तित करण्यासाठी ही महान शक्ती खाली आणावयाची आणि नवीन पृथ्वीवर, नवीन दिव्य जीवनाचा मार्ग दुसर्यांना दाखवावयाचा.’
1947मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर पाँडिचेरीमधूनच त्यांनी राष्ट्राला संदेश दिला व सदर लेखाच्या सुरुवातीलाच (भाग 1) दिलेले भाषण केले.
1950च्या सप्टेंबरमध्ये त्यांनी आपल्याच ‘लेखक शिष्याला’ सांगितले, “मला सावित्री लवकर संपविली पाहिजे.” कधीही घाई, धांदल न करता धिमेपणाने, स्वस्थतेने काम करणार्या व्यक्तीच्या तोंडी हे वाक्य त्याला अत्यंत अनोळखी वाटले. 5 डिसेंबर 1950 रोजी मात्र या विचित्र शब्दांचा अर्थ उमगला. या दिवशी मध्यरात्रीनंतर श्रीअरविंदांनी देह सोडला. त्यांनी याविषयी आधीच निर्णय घेतला होता, हे तर निश्चितच. कारण, इतर सर्व महान योग्यांप्रमाणे ते मृत्यूचे स्वामी होते. योगी ‘इच्छामरणी’ असतात असे आपण भारतीय मानतो. त्यांच्या या हेतुपुरस्सर, इच्छित, गूढ प्रयाणाविषयी फक्त श्रीमाताजींनाच सर्व काही माहीत आहे.
‘आपल्या गुरूंनी केवळ आपल्या सर्वांकरिताच स्वत:चा सर्वस्वी त्याग केला आहे. देह सोडणे त्यांना भाग पडले असे नाही. त्यांनी इतक्या उदात्त कारणासाठी देह सोडण्याचे पसंत केले की ते समजणे मानवी मनाच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यांनीच स्वत: सावित्रीमध्येे याचे स्पष्टीकरण दिलेले दिसते. असत्यसागराच्या पैलतिरी त्याला गेलेच पाहिजे. जगताच्या अंधारामध्ये प्रकाश आणण्यासाठी त्याने त्यात प्रवेश केलाच पाहिजे. चिरकालीन रात्रीमध्ये त्याने शिरलेच पाहिजे. आणि देवाचा अंधकार जाणला पाहिजे, जसा तो त्याचा प्रकाशसूर्यही जाणतो. यासाठी त्याने गर्तेमध्ये, विवरामध्ये गेले पाहिजे. यासाठी त्याने शोकमय विराट प्रदेशांवर आक्रमण केले पाहिजे. तेव्हाच तेथील ‘दु:खाचा कायदा’ संपुष्टात येईल.’
श्रीमाताजी असेही म्हणाल्या, “परिवर्तनाच्या त्यांच्या कार्यात अधिक पूर्णतेने मदत करता यावी, म्हणून त्यांनी आपल्या स्थूल भौतिक देहाचा त्याग केला.”