@रघुनंदनगिरी
संत-महापुरुष लोकांना भक्तिमार्ग दाखवतात. ईश्वर आराधनेचा आणि सुखप्राप्तीचा सर्वात सोपा व सरळ मार्ग म्हणजे भक्ती होय. अशी भक्ती करणारे अनेक साधुसंत या भारतात होऊन गेले. महाराष्ट्र तर संतांची भूमी! या संतमालिकेत अठराव्या शतकात योगिराज श्रीगंगागिरी महाराज झाले. महाराजांकडून संकुचित वृत्तीच्या लोकांना ‘वसुधैव कुटुंबकम्’चे शिक्षण दिले जात होते. सहिष्णुता, दया, क्षमा, परोपकार, समदृष्टी या मानवी मूल्यांची जोपासना करण्याकरिता स्वत: आचरण करून लोकांना प्रेरणा दिली.
गोदावरी तिरावरील पुणतांबा तीर्थापासून 20-25 कि.मी. अंतरावर कापूस वाडगाव आहे. तेथे सात्त्विक वृत्तीचे एक गोसावी कुटुंब राहत होते. तेथे शके 1936, सन 1814मध्ये श्रीगंगागिरी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव अन्नपूर्णा व सोमवारपुरी, तर वडिलांचे नाव देवगिरी होते. हे दांपत्य ईश्वर आराधनेत आपला काळ घालवीत असे. त्यांचे वडील गावात पोथीवाचन, पूजापाठ आणि धर्मकार्य करीत असत. त्यामुळे महाराजांच्या बालमनावर त्याचे संस्कार होऊ लागले, म्हणून बालवयातच ते भगवंताच्या भक्तीत रमू लागले. वयाच्या दुसर्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. तेव्हापासून मातेनेच त्यांचे संगोपन केले. त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून विविध ग्रंथांचा अभ्यास केला. ते आपल्या मित्रांसोबत गाई चारण्यासाठी रानात जात असत, त्या वेळी ते ग्रंथवाचन, ध्यान आणि भगवद्भक्ती करीत असत.
महाराज साधारणपणे 12 वर्षांचे झाले होते. त्या वेळी ते गावातील पोथीवाचन करू लागले. रामायण-महाभारतातील कथा सांगून ते समाजास बोध देऊ लागले. त्यांच्या भजन-प्रवचनाला परमार्थप्रेमी समाज जमू लागला. परिसरातील गावांतूनही त्यांना आमंत्रण येऊ लागली. अशा प्रकारे ते भक्ती प्रचार-प्रसाराचे कार्य करू लागले. याच काळात त्यांच्या मातोश्रींनी देह ठेवला. त्या वेळी त्यांना फार दु:ख झाले. कारण आईने त्यांना परमार्थाचे धडे दिले होते. कुटुंबात आणखी दोन बहिणी होत्या, परंतु त्याही विवाहित होत्या. आता आई देवाघरी गेल्या. गावकर्यांनी त्या मातेची समाधी बांधली. ते दर वर्षी आईची पुण्यतिथी साजरी करू लागले.
कुस्ती हा गंगागिरी महाराजांचा आवडता खेळ होता. त्यांनी कसरत करून त्यात प्रावीण्य मिळविले होते. नामांकित पहिलवान म्हणून ते परिसरात प्रसिद्ध झाले होते. एकूणच आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे नाव झाले होते. एकदा महाराज पुणतांबा यात्रेस गेले होते. त्यांनी तेथे आपल्यापेक्षा फार मोठ्या पहिलवानास पाडले. त्यांच्या मित्रांनी आणि चाहत्या मंडळींनी त्यांच्या नावाचा जयजयकार केला. त्यांनाही बरे वाटले. यात्रा करून परत येत असताना मातुलठाण येथेच संध्याकाळ झाली. त्यांचे काही स्नेही तेथे राहत होते. त्यांनी आग्रह करून त्यांना ठेवून घेतले. तेथे मंदिरात श्रीलक्ष्मणगिरी महाराज नावाचे महान साधू राहत होते. महाराजांनी त्यांचे दर्शन घेतले. महाराजांचे मित्र त्या साधूंना त्यांनी कुस्तीत जय कसा मिळविला ही वार्ता सांगू लागले.
महाराजांनीदेखील कुस्तीचे चित्र डोळ्यापुढे आणून सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा ते सत्पुरुष अंतर्मुख झाले. मग त्यांनी महाराज सुयोग्य आहेत असे पाहून परमार्थिक मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “बाळ, या पैलवानास चीत करणे एवढे महत्त्वाचे नसून जो काळ आजपर्यंत सर्वांना पराजित करीत आला आहे, त्याला पाडण्यात खरा पुरुषार्थ आहे. या मानवी पैलवानास पाडण्यासाठी व्यायाम करावा लागतो. परंतु कालरूपी पैलवानास पाडायचे असेल, तर त्याकरिता भक्तिमार्ग अनुसरावा लागतो.” महाराजांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे साधनेचा वेग वाढविला.
महाराजांना वयाच्या विसाव्या वर्षी नाथबाबा नावाचे महान सत्पुरुष सद्गुरू म्हणून लाभले. त्यांनी महाराजांना गुरुपरंपरेप्रमाणे उपदेश केला. आपली गुरुपरंपरा आदिनाथ भगवान शिव द्ध मच्छींद्रनाथ द्ध गोरक्षनाथ द्ध गहिनीनाथ द्ध निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर अशी सांगितली. उपासना पद्धत सांगून समाजसेवेच्या कार्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. महाराजांनी गुर्वाज्ञेनुसार सराला बेटात कठोर साधना केली. एकांतस्थानी आराधना करीत ते योगात निष्णात झाले. त्यांना योगिराज म्हणून संबोधले जाऊ लागले. महाराजांना समाजास सन्मार्गी लावण्याची प्रेरणा भगवंतानेच दिली होती. ती आज्ञा मान्य करून जनताजनार्दनाच्या सेवेचे व्रत घेऊन महान कार्य केले. महाराजांनी समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी तीर्थयात्रा केल्या. पंढरी, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण इ. ठिकाणच्या वारी निमित्तानेदेखील त्यांचे तेथे जाणे-येणे होत असे. समाजप्रबोधनासाठी त्यांना एकत्र करणे आवश्यक होते. ब्रिटिशांच्या आणि निजामांच्या राजसत्तेमुळे समाज विसकळीत आणि हतबल झाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत सत्ताधारी मंडळींच्या डोळ्यात न खुपता समाज संघटित करून त्यास सुसंस्कारित करणे किती कठीण काम होते, याची कल्पना येते. परंतु हेच काम करण्याचे त्यांनी आखले होते. महाराजांनी यासाठी समाज एकत्रित करणे सुरू केले. त्याच काळात त्यांना संत श्रीज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत देऊन संत श्रीचांगदेव महाराज समाधी मंदिर पुणतांबा वारी सुरू करून मंदिर जीर्णोद्धार करण्यास सांगितले. मग वारीनिमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान इ. कार्यक्रम होऊ लागले. यासाठी समाज एकत्र जमू लागला. परिसरातील विचारवंतांचे आणि महाराजांचे सख्य होते. त्यांना महाराज भक्तिभावाच्या आचारणाची आणि समाजकार्याची प्रेरणा देऊ लागले. यामुळे समाधानकारक समाजप्रबोधन होऊ लागले.
महाराज म्हणत की, काही लोक पोटाची भूक भागविण्यासाठी काही न मिळाल्यामुळे निराश होऊन संसारातील सुखांसाठी नास्तिक होत असून आचरण बिघडू लागले आहे, याला जबाबदार सधन लोकच आहेत. सर्व लोकांची दु:खे नाहीशी करावी, त्यांचे अज्ञान नाहीसे करून त्यांना जगाचे ज्ञान द्यावे, परमेश्वराबद्दल सुगम ज्ञान देऊन भक्तिमार्ग दाखवावा, या हेतूने महाराजांनी नामसप्ताह आरंभ केले. महाराज कीर्तन-प्रवचनातून आणि इतर वेळी उपदेश करताना ‘लेने को हरिनाम, देनेको अन्नदान। तरने को लीनता, डूबने को अभिमान॥’ हे ब्रीदवाक्य नेहमी म्हणत असत. ते स्वत: याचे तंतोतंत पालन करीत असत. स्वत: नामसाधना करीत ते लोकांनादेखील त्याचे मार्गदर्शन करीत होते. दुष्काळात तर अन्न-अन्न म्हणून प्राण सोडणार्या जनतेसाठी महाराजांचे अंत:करण तीळ तीळ तुटत असे. ते त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध करण्यासाठी जिवाचे रान करीत. ते सप्ताहाचे निमित्त करून धनवानांना दानधर्मासाठी प्रेरित करून भुकेल्या दीनदुबळ्यांची भूक भागवत. एवढेच नव्हे, तर ज्यांना प्राणरक्षणासाठी दोन घास जे असेल ते मिळाले तर बरे, अशांना त्या बिकट परिस्थितीत मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करत होते. ज्याप्रमाणे एखादी गरीब आई आपल्या उपाशी बाळासाठी कोणताही संकोच न बाळगता हात जोडून पदर पसरून अन्नाची याचना करते, त्याप्रमाणे महाराजांनी शेठ-सावकारांसमोर अक्षरश: आपली झोळी पसरली. आपल्या आश्रमातील काही जमीन विकून अन्नदान केले. त्यांनी नामसप्ताहाव्यतिरिक्त दुष्काळी परिस्थितीत हरभर्याची घुगरी शिजवून भुकेल्यांकरिता गाडीबैलाद्वारे गावोगावी पाठविली.
महाराजांच्या अंगी असलेल्या नम्रतेचे वेळोवेळी दर्शन होते. त्यांच्या जीवनातील फक्त एकच प्रसंग आपण पाहिला, तरी आपल्या लक्षात येईल. संत भानुदास महाराज बेलापूरकरांनी पांडुरंगाचे नवीन देवालय उभारले होते. त्या वेळी उत्सवप्रसंगी महाराजांसह अनेक महान साधुसंतांना आमंत्रण दिले होते. संतपूजनाच्या वेळी अग्रपूजा महाराजांची करावी असे ठरविले. परंतु महाराज अमानी मानदं लक्षणांनी युक्त होते. स्वत: मानसन्मान न घेता ते दुसर्यास देत असत. ते नम्रतेने म्हणाले, “आता फार सकाळ असून उतारवयामुळे थंडी वाजत आहे. आपणा सर्वांच्या स्नानानंतर आम्ही स्नान करतो, तोपर्यंत ऊन पडेल.” मग एक-एक संतास चौरंगावर बसवून तेल उटणी लावून स्नान घालावीत. मग वस्त्र इ. अर्पण करावीत. अशा प्रकारे सर्वांचे झाले. त्यानंतर महाराज आले. त्यांनी हे सर्व पाहून समाधान व्यक्त केले. मग त्यांनी संतांनी स्नान केलेल्या तीर्थजलास नमस्कार केला, ते प्राशन करून त्या संततीर्थात स्नान केले.
महाराजांच्या कार्यामुळे समाजात मोठे परिवर्तन घडू लागले. बहुजन समाजाला महाराजांच्या कीर्तन-प्रवचनातून सन्मार्गाचे धडे मिळू लागले. साधुसंतांची जीवनचरित्रे ऐकायला मिळत होती. महाराजांच्या उपदेशाने प्रेरित होऊन सामान्य लोकांनादेखील सदाचार आणि सद्व्यवहार आवडू लागला. विशेष म्हणजे गावोगावी भक्तिमार्गाचा प्रवाह वाहू लागला. प्रत्येक गावात भजनी मंडळे स्थापन झाली. या निमित्ताने दुरून साधुसंत आणि इतर लोक एकत्र जमत. त्यांच्या एकमेकाशी ओळखी होत. सप्ताह करणार्या गावकर्यांना फार मोठे कार्य सांघिक रितीने करण्याचा प्रत्यक्ष धडा मिळत असे. सहकार्यात फार मोठी शक्ती आहे, ही शिकवण महाराजांनी भक्तांना दिली. सप्ताह ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त एकत्र येत. त्यामुळे एकमेकांच्या चालीरिती, व्यवहारज्ञान, शेतीतंत्रे यांची माहिती मिळे. महाराजांकडून संकुचित वृत्तीच्या लोकांना ‘वसुधैव कुटुंबकम्’चे शिक्षण दिले जात होते. त्यांनी हे विश्वचि माझे घर ही शिकवण देऊन लोकांची मने आणि हृदये विकसित केली. सहिष्णुता, दया, क्षमा, परोपकार, समदृष्टी या मानवी मूल्यांची जोपासना करण्याकरिता स्वत: आचरण करून लोकांना प्रेरणा दिली. असे अनेक सप्ताह करून विश्वास, सुख, शांती आणि समाधानाचा महामंत्र दिला.
महाराजांनी आजन्म ब्रह्मचारी राहून संन्यासधर्माचे काटेकोर पालन केले. त्यांचे अनेक शिष्य होते. सर्व जाती, पंथ आणि संप्रदायातील लोक त्यांच्या विचाराने प्रभावित होते. त्यामुळे सर्वच त्यांच्याकडे येत होते. तेदेखील सर्वांना भेदभावाच्या भिंती पाडून एकसमान वागणूक देत असत. अठराव्या शतकात चारही वर्णांच्या लोकांना एका पंगतीत बसवून जेवण करायला लावणे इतके सोपे नव्हते. तेही कार्य त्यांनी केले. त्यांच्या सहवासात आलेल्या शिष्यांना त्यांनी शिक्षा-दीक्षा दिल्या. त्यांनी अनेक साधक घडविले. त्यांना संजीवनी (जिवंत) समाधी घेण्याची इच्छा होती. परंतु भगवंताच्या आदेशाने त्यांनी ते रद्द केले. पुढे ते आपल्या आयुष्याच्या 88व्या वर्षी शके 1824 (सन 1902)मध्ये श्रीक्षेत्र सराला बेट येथे समाधिस्थ झाले. त्यांचे मुख्य शिष्य सद्गुरू श्रीदत्तगिरी महाराज यांनी हे कार्य अव्याहतपणे चालू ठेवले. त्यांच्यानंतर सद्गुरू श्रीनाथगिरी महाराज, सद्गुरू श्रीसोमेश्वरगिरी महाराज, सद्गुरू श्रीनारायणगिरी महाराज या महापुरुषांनी परंपरा चालविली. शके 1931 (सन 2009)पासून हे परंपरागत समाजोद्धाराचे सेवा कार्य श्रीगुरू महंत स्वामी श्रीरामगिरी महाराज नि:स्वार्थी भावनेने करीत आहे. योगिराजांविषयी, परंपरेविषयी आणि श्रीक्षेत्र सराला बेटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी संस्थानद्वारे प्रकाशित योगिराज सद्गुरू श्रीगंगागिरी महाराज चरित्र ग्रंथ वाचावा.
- रघुनंदनगिरी