रामनाम दृढ घ्यावे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रतिष्ठान

विवेक मराठी    04-Jul-2022
Total Views |
 
 गोंदवलेकर महाराज संस्थान काय आहे, ही येथे येऊन दोन दिवस श्री महाराजांच्या अदृश्य सहवासात राहून अनुभवण्याची गोष्ट आहे. अन्य सामाजिक कामाबरोबरच विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे, कोरोना महामारीच्या काळात संस्थानने आपले रुग्णालय व रुग्णवाहिका उपचारासाठी उपलब्ध करून दिली होती. तसेच हंगामी उभारलेल्या रुग्णालयासाठी संस्थानने शंभर बेड पुरवले होते.

Shri Gondavalekar Maharaj
 
देह ठेवायच्या अगोदर सुमारे एक वर्ष श्री गोंदवलेकर महाराजांनी सर्वांच्या सांगण्यावरून एक मृत्युपत्र करून ठेवले होते. त्यांनी देह ठेवल्यावर, मृत्यपत्रात लिहिल्याप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली. समाधीची व मंदिराची व्यवस्था पाहण्यास पंच नेमले. सोमवार दि. 22 डिसेंबर 1913 रोजी पहाटे सहाला दहा मिनिटे कमी असताना गोंदवल्याचा अध्यात्मसूर्य मावळला. त्यांच्या निकटवर्ती शिष्यांच्या सहकार्याने समाधी मंदिर बांधून झाले. इ.स. 1914, शके 1836मधील मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णपक्षात प्रतिपदेच्या दिवशी वेदोक्त पद्धतीने श्री महाराजांच्या पादुकांची स्थापना झाली. दर वर्षी मार्गशीर्ष महिन्यात कृष्णपक्षातील प्रतिपदा ते दशमीपर्यंत श्री महाराजांच्या पुण्यतिथीचा विशेष कार्यक्रम होतो. श्री महाराजांचे पट्टशिष्य ब्रह्मानंद महाराजांनी घालून दिलेल्या दंडकाप्रमाणे दहा दिवस अहोरात्र नामस्मरण, पुराण, कीर्तन, भजन, पादुकांची पालखीतून मिरवणूक, आल्यागेल्याला अन्नदान असे कार्यक्रम होत असतात. ‘श्री समर्थ संस्थान गोंदवले’ असे समाधी मंदिराचे नाव ठेवून, नित्य-नैमित्तिक कार्यक्रम आखून देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम वर्षभर चालू असतात. ह्याशिवाय नैमित्तिक विशेष कार्यक्रम म्हणजे 1) श्रीरामनवमी, 2) श्री हनुमानजयंती, 3) श्री नृसिंह जयंती, 4) श्री गुरुपौर्णिमा, 5) गोकुळाष्टमी, 6) विजयादशमी, 7) दासनवमी हे अविरतपणे होत असतात.
 
 
सर्वच नैमित्तिक कार्यक्रमांना सर्व भक्तांना उपस्थित राहून त्याचा लाभ घेणे शक्य होत नाही. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने गावागावांत श्री महाराजांच्या अनुग्रहित नामधारकांचा समूह तयार झाला. गोंदवले येथील नित्य व नैमित्तिक उपासना पद्धती मार्गदर्शक ठेवून आठवड्यातून एकदा, तर काही ठिकाणी प्रत्येक एकादशीला, जेथे शक्य आहे तेथे रोजसुद्धा उपासना होऊ लागली. अशा काही केंद्रांची नावे सांगता येतील, ती म्हणजे 1) मिरज उपासना केंद्र, 2) जयसिंगपूर उपासना केंद्र, 3) शिरूर उपासना केंद्र, 4) कल्याण उपासना केंद्र, 5) ठाणे उपासना केंद्र, 6) इंदोर उपासना केंद्र, 7) अहमदाबाद उपासना केंद्र, 8) नागपूर उपासना केंद्र, 9) धुळे उपासना केंद्र, 10) फलटण उपासना केंद्र, 11) डोंबिवली उपासना केंद्र, 12) कराड उपासना केंद्र, 13) पुणे उपासना केंद्र, 14) सातारा उपासना केंद्र, 15) साखरखेर्डा उपासना केंद्र, 16) गोवा उपासना केंद्र. सर्व उपासना केंद्रे लोकांचे ऐच्छिक दान अथवा संस्थांचे साहाय्य ह्यावर चालतात. ‘कोणा मागू नका काही’ हे महाराजांचे ब्रीदवाक्य तंतोतंत पाळले जात आहे.
 
 
Shri Gondavalekar Maharaj
 
श्री महाराजांच्या समाधी मंदिर स्थापनेपासून आजपर्यंत भरपूर सुधारणा केल्या गेल्या आहेत. त्यात भक्तांसाठी सर्व सोईंनी युक्त अशी निवासस्थाने, अद्ययावत स्वयंपाकगृह, भव्य असे भोजन हॉल, नामसाधना हॉल, कोठी गृह, गोशाळा, गावांतील सर्व मंदिरांचे नूतनीकरण, श्री महाराजांच्या जन्मस्थानी स्मृतिमंदिराची निर्मिती, सुलभ व सुरक्षित दर्शन व्यवस्था, मोठ्या प्रमाणावर गरम पाणी मिळण्यासाठी प्रत्येक इमारतीवर सौर ऊर्जेचा प्लँट, अखंडित वीजपुरवठ्यासाठी मोठे जनरेटर, अखंडित पाणीपुरवठ्यासाठी उंच जागी दोन मोठ्या टाक्या, मोफत रुग्णालय, नित्यपूजेला लागणार्‍या हार-फुलासांठी बाग, गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेत संगणकाची सोय इत्यादी उपक्रम धार्मिक कार्यक्रमांबरोबरच संस्था राबवत असते. विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे, कोरोना महामारीच्या काळात संस्थानने आपले रुग्णालय व रुग्णवाहिका उपचारासाठी उपलब्ध करून दिली होती. तसेच हंगामी उभारलेल्या रुग्णालयासाठी संस्थानने शंभर बेड पुरवले होते. तसेच त्या काळात पोलीस दलासाठी अन्नपुरवठा व आजूबाजूच्या इतर खेड्यांत मागणीप्रमाणे कोरडा शिधासुद्धा संस्थानमार्फत देण्यात आला.
 
 
श्री महाराजांनी आपल्या जीवनात अन्नदानाला फार महत्त्वाचे स्थान दिले. स्वामी विवेकानंद म्हणायचे की या गरीब देशातील भुकेलेल्या माणसाला अन्न न देता त्याला परमार्थ शिकवणे हा गुन्हा आहे. श्री महाराजांनी ही गोष्ट जाणली होती, म्हणून ते आपल्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला प्रथम पोटभर जेवायला घालायचे व मगच त्याला नामस्मरणाकडे प्रवृत्त करायचे. जेवढ्या मुबलकपणे त्यांनी नामाचा प्रसार केला, तितक्याच मुबलकपणे त्यांनी अन्नदानही केले. ते म्हणायचे, “खरा माणूस ‘तृप्त’ अन्नानेच होतो. पैसा द्या, वस्तू द्या.. त्याची तृप्ती होणार नाही! तो कधीही आता पुरे असे म्हणणार नाही. पण अन्न पोटभर जेवल्यावर तो स्वाभाविकच आता नको असे म्हणेल.” श्री महाराजांना देह ठेवून आज 108 वर्षे झाली, तरी श्री महाराजांच्या कृपेने अन्नदानाचे व्रत अव्याहत चालू आहे. येथे गादीपरंपरा नाही, तरी श्री महाराजांच्या पादुकांवर अनुग्रह दिला जातो. नाम कसे घ्यावे ते गुरुजी श्रद्धापूर्वक सांगतात व अनुग्रहित साधक श्रद्धेने त्याचे आचरण करतो व समाधान पावतो.
 
 
 
मंदिर कसे असावे ह्याबद्दल महाराजांची कल्पना काय होती, त्याप्रमाणेच सद्य:स्थितीत मंदिर चालले आहे. ती कल्पना पुढीलप्रमाणे - ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते, त्याचप्रमाणे मंदिर हे अ-लौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे. आपल्या आचारधर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोकदेखील त्या पेशाला लायक असेच असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे. जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावे. प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जिवाला मंदिरात आल्यानंतर स्वत:च्या दु:खाचा काही काळ तरी विसर पडावा, असे तेथील वातावरण असावे. मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी. सारांश, मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे.
 
 


Shri Gondavalekar Maharaj
 
असे हे नामाचा प्रसार करणारे संस्थान गोंदवले बुद्रुक अथवा ’थोरले गोंदवले’ हे गाव सातारा-पंढरपूर मार्गावर सातार्‍यापासून 64 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून सासवड-फलटणमार्गे गोंदवल्यास थेट जाणार्‍या एस.टी. आहेत. येथे भोजन-प्रसाद आणि निवासी व्यवस्था ह्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आपले वाहन असल्यास येथे मोठा वाहनतळही उपलब्ध आहे. श्री महाराजांचे अन्नदानाचे महत्त्व ऐकून बरेच भाविक शिधा अर्पण करत असतात. त्यासाठी मोठी बाजारपेठसुद्धा आता तयार झाली आहे. नामस्मरणासाठी लागते माळ! ती सहसा इतर गावात, शहरात, इतकी छोटी वस्तू असूनसुद्धा मिळू शकत नाही, ती येथील दुकानात उपलब्ध असते.
 
 
 
खरे सांगायचे म्हणजे गोंदवलेकर महाराज संस्थान काय आहे, हे येथे येऊन दोन दिवस श्री महाराजांच्या अदृश्य सहवासात राहून अनुभवण्याची गोष्ट आहे. स्वत:चे व इतर नवीन भक्तांचे, तसेच येथे वर्षानुवर्षे येणार्‍या भक्तांचे अनुभव बघून, संगणकीय भाषेत म्हणावेसे वाटते की, आपण प्रवेशद्वारातून समाधी मंदिराच्या परिसरात प्रवेश केलात की तुमचा बौद्धिक संगणक आपोआप समाधी मंदिरातील सर्व्हरला जोडला जातो. मग तुमच्या मनात काय आहे, तुमची कुणाला भेटायची इच्छा आहे, तुम्हाला महाराजांना काय अर्पण करायची इच्छा आहे, तुम्हाला काही सेवा करायची इच्छा आहे का, तुमचा प्रश्न काय आहे, इत्यादी बारीकसारीक गोष्टी त्यांना ताबडतोब समजतात आणि आपोआप प्रतिसाद मिळाल्याचा अनुभव येतो. मग सहज दर्शनाला आलेला भाविक वारंवार येऊ लागतो. मग आपण अनुग्रह घ्यावा असे त्याच्या मनात येऊ लागते. अनुग्रह घेतो, मग सेवाही करावी अशी उत्कट भावना होऊ लागते. मग महाराज त्याला सेवेमध्येही सामावून घेतात. मंदिरात काकडआरतीनंतर नियमित होणारी भजने म्हणजे महाराज काय आहेत आणि आता तुम्ही काय करावे असे महाराजांना अभिप्रेत आहे, हे सांगणारा नित्यपाठ आहे असेच म्हणावे लागते. त्यांतील काही अवतरणे प्रस्तुत संदर्भाला अनुलक्षून पुढीलप्रमाणे, ‘जो जाई एकवार। तो विसरे घरदार। त्यासी देई नामसार....॥’, ‘आल्या अतिथा अन्न द्यावे। रामनाम दृढ घ्यावे।’, ‘नका धरू काही आस। नाम जपा श्वासोच्छ्वास। भाव ठेवा रामापायी। कोणा मागू नका काही।’
 
 
 
- एक सेवेकरी