विद्वेष हीच शरदनीती

28 Jul 2022 18:01:14
 
 
sharad pawar
शरद पवार सत्तेबाहेर राहू शकत नाहीत. सत्ता असतानाचे शरद पवार आणि सत्ता नसतानाचे शरद पवार या दोन प्रतिमा महाराष्ट्राला माहीत आहेत. जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेबाहेर असतात, तेव्हा त्यांची होणारी तडफड पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी असते. या तडफडीतून विद्वेषी विचार पुढे येतात. हा विद्वेष पेलताना ते आपलाच पूर्वेतिहास विसरतात आणि नवा इतिहास मांडताना एका विशेष वर्गावर आपला मारा करतात. यातून त्यांना जातीय धुव्रीकरण साधायचे असते आणि त्यातून ब्राह्मण विरुद्ध इतर अशी सामाजिक दुफळी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
 
मागील आठवड्यात शरद पवारांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाषण करताना ‘’बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अन्याय केला” असे वक्तव्य केले. शरद पवारांचे हे वक्तव्य फार गंभीरपणे घेण्यासारखे नसले, तरी अशी मळमळ का येते यामागील कार्यकारणभाव समजून घ्यायला हवा. शरद पवारांचे चाहते, खुशमस्करे त्यांना जाणता राजा म्हणतात आणि आपण जाणते नाही आहोत हे शरद पवार वेळोवेळी सिद्ध करतात. शरद पवारांचा राजकीय, सामाजिक इतिहास याची साक्ष देतो. सामाजिक न्यायाची भाषा तोंडी असणारे शरद पवार सामाजिक विद्वेषाला खतपाणी घालणारा व्यवहार कसा करतात, हे वेगळे सांगायला नको. काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते, “शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही.” तेच शरद पवार शिवकार्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणार्‍या स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपतीवर अन्याय केला असा आरोप करतात, यासारखा कोणताही दैवदुर्विलास नाही. शरद पवारांच्या कृपेने स्वयंघोषित इतिहासतज्ज्ञ गावोगावी जन्माला आले आहेत आणि आम्ही सांगू तोच इतिहास खरा असा त्यांचा दावा असतो. खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची कार्यपद्धती असते. शरदाचा वरदहस्त डोक्यावर असल्यावर आपल्याला कुणाची भीती असणार? अशा गुर्मीत हे तथाकथित इतिहास संशोधक वावरत असतात. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्रीमंत कोकाटे. याच कोकाटेंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. बाबासाहेब पुरंदरे हे एक प्रतीक आहेत. श्रद्धा, परिश्रम आणि भक्तीने बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेले छत्रपती देव, देश आणि धर्मासाठी लढणारे आहेत, काशीविश्वनाथ मुक्त झाला पाहिजे, अशी जाज्ज्वल्य प्रेरणा जागवणारे आहेत. आणि शरद पवारांना असे छत्रपती नको आहेत हाच कळीचा मुद्दा आहे, म्हणून जेव्हा जेव्हा शरद पवारांना संधी मिळते, तेव्हा तेव्हा ते बाबासाहेब पुरंदरे यांना टीकेचे लक्ष्य करतात. शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराज कसे हवेत? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या चेल्यांनी याआधीच दिली आहेत. छत्रपतींबरोबर ब्राह्मण नव्हते आणि असतील तर ते विरोधात होते, हे एकमेव सूत्र घेऊन शरद पवारांचे लाडके इतिहास संशोधक काम करत असतात आणि शरद पवार वेळोवेळी त्याला पुष्टी देण्याचे काम करतात. शरद पवारांचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य अशी धारणा असणारे मग तोच इतिहास खरा असा डिंडोरा पिटत राहतात.
 
 
 
शरद पवारांच्या स्मृती वयोमानानुसार क्षीण झाल्या आहेत का? असा या निमित्ताने आम्हाला प्रश्न पडतो आहे. कारण ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर ते आरोप करत आहेत, त्याच बाबासाहेब पुरंदरे यांना कराडच्या अभिमत विद्यापीठातर्फे डी.लिट. देऊन सन्मानित करण्याचे काम शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्याचप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी शिवाजी पार्कमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या अस्थायी शिवसृष्टीला भेट देऊन शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे कौतुक केले होते. मग प्रश्न निर्माण होतो की सरडा ज्याप्रमाणे परिस्थितीनुसार आपले रंग बदलतो, तशीच शरद पवारांची स्थिती आहे का? कारण वर ज्या दोन घटनांचा उल्लेख केला आहे, त्या काळात शरद पवार सत्तेची ऊबदार दुलई पांघरून आपले जाणतेपण जपत होते. मागच्या आठवड्यात घडलेली घटना असू दे किंवा बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा असू दे.. या दोन्ही वेळी शरद पवार सत्तेबाहेर होते आणि दोन्ही वेळेस त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करताना पुरंदरे हे ब्राह्मण आहेत, हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता असली की सर्वधर्मसमभाव, जातीय सलोखा, सामाजिक समता अशा उच्च मूल्यांची कास धरणारे शरद पवार सत्ता गेली की जातवाद, ब्राह्मणांना विरोध अशी भूमिका घेतात. सोईनुसार बदलणारे शरद पवार जाणते कसे? हा प्रश्न आता सर्व सामान्य माणसाला पडू लागला आहे.
 
 
 
शरद पवारांना असा ब्राह्मणद्वेषाचा झटका सत्ता नसताना येतो. समाजात विद्वेष निर्माण करण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत असतात आणि त्यातून सामाजिक खळबळ झाली की सत्ताधारी पक्षांच्या माथी त्याचे खापर फोडायला ते मोकळे होतात, हा त्यांचा शिरस्ता आहे. त्यानुसारच त्यांनी सामाजिक खळबळ उडावी म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांना लक्ष्य केले आणि ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार आपल्या प्रवृत्तीनुसार समाजात विद्वेष माजवणारी व्यक्तव्ये करत राहणार आहेत, समाजाने ते किती गंभीरपणे घ्यायचे हा प्रश्न आहे. समाज फोडण्यासाठी काम करणारे संख्येने नेहमीच अल्प असतात. ते बहुसंख्य लोकांना आपण मांडत असलेला विषय खरा आणि योग्य आहे हे समजावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना खोडून काढणे, विरोध करणे आवश्यक असले, तरीही बहुसंख्य समाज तसा प्रयत्न करत नाही आणि मग तथाकथित इतिहासकार मंडळींना आयते कुरण मिळते. शरद पवारांसारखे त्याला राजकीय पाठबळ देतात. यातून समाज फोडण्याचा, दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपण काय करत आहोत याचा विचार करावा.
 
 
 
शरद पवारांनी जरी सेक्युलरपणाचा बुरखा पांघरून सामाजिक न्यायासाठी राजकारण करत असल्याचे सांगितले, तरी ते तसे नाहीत, ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी इतिहासाची पायमल्ली करण्याची त्यांनी तयारी असते. कधी ते शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही असे म्हणतात, तर कधी रामायण महाभारताची देशाला गरज नाही असे सांगतात. आपली संस्कृती, संस्कार, परंपरा, इतिहास यापासून फारकत घेण्यामागे शरद पवारांच्या मतांची गोळाबेरीज उभी असते. एका बाजूला सेक्युलरपणाचे ढोलताशे वाजवायचे आणि दुसर्‍या बाजूला जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून आपली मतपेढी बनवायची, ही शरदनीती आहे. याच नीतीचा वापर करून शरद पवारांनी जवळजवळ पन्नास वर्षे राजकारण केले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता महाभारतातील दुर्योधनाची गोष्ट आठवते. धर्म म्हणजे काय हे दुर्योधनाइतके दुसर्‍या कुणालाही कळले नव्हते.पण त्या धर्माचे आचरण करण्याची प्रवृत्ती दुर्योधनाकडे नव्हती. शरद पवारांचे अगदी तसेच झाले आहे. सामाजिक न्याय, सामाजिक एकात्मता आणि सामाजिक सन्मान या संकल्पना पवारांना कळत नाहीत, असे नाही. सामाजिक जीवनात कलह नको, सर्वांचा सन्मान करताना इतिहासाचे विकृतीकरण करू नये हे शरद पवारांना कळते. मात्र त्यांची प्रवृत्ती तशी नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. स्वभावाला औषध नसल्याने, आणखी काही काळ अशा विद्वेषाला आपणास सामोरे जावे लागणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0