स्वच्छतादूत पद्मश्री एस. दामोदरन

19 Jul 2022 12:12:46
 
 ग्रामालयाच्या माध्यमातून दक्षिण भारतातील अनेक गावांमध्ये शौचालये बांधण्यासाठी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी एस. दामोदरन यांना यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मुलींना व महिलांना मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत ते जनजागृती करतात.
 
padmshree
 
आयुष्यात घडणार्‍या सामान्य घटनांमध्येच आयुष्याला असामान्य वळण देण्याची ताकद असते. अनेकदा सामान्य वाटणार्‍या या घटना आयुष्याला लक्ष्य देतात आणि त्यातूनच चाकोरीबद्ध आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. 30 वर्षांपूर्वी एस. दामोदरन यांनी त्रिची तामिळनाडू येथील मारुथुर गावी एक घटना पाहिली, ज्याने त्यांना हादरवून सोडले. याच घटनेतून त्यांनी एक ध्यास घेतला आणि त्याच ध्यासाने त्यांचा प्रवास पद्मश्रीपर्यंत झाला आहे. आज दक्षिण भारतातील 600 गावे आणि 200 झोपडपट्ट्या उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी काम केले आहे आणि या कामाचा गौरव म्हणून विद्यमान केंद्र सरकारने यंदा पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे. या वेळी पद्म गौरव लेखमालेत आपण एस. दामोदरन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
 
 
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीपर्यंत देश शौचालयमुक्त झालेला असेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच केली होती. त्यानुसार तसा तो झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांची ही घोषणा कोणत्याही नागरिकाला आनंद देणारी आणि जगात देशाची मान उंचावणारी आहे. जो देश महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहतो, ज्याची अर्थव्यवस्था पहिल्या पाच-सहा बड्या देशांमध्ये गणली जाते आणि ज्याला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली आहेत, अशा हजारो वर्षांचा इतिहास असणार्‍या देशात नागरिक पहाटे उठून उघड्यावर शौचास बसतात, ही लांच्छनास्पद गोष्ट होती आणि त्यांनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टच्या भाषणात या गोष्टींचा जाहीर उल्लेख केला. खरे तर त्या वेळी अनेकांनी या घटनेची खिल्ली उडवली, पण सत्य मांडण्याची ताकद जगाने अनुभवली आणि त्यातूनच असे कार्य करणार्‍या दूरस्थ नागरिकाला प्रेरणा मिळाली, हे कार्य अधिक जोमाने सुरू झाले.
 
 
padmshree
 
एकदा त्रिची येथे एक महिला आपल्या दोन मुलांना काही मीटर अंतरावर सोडून उघड्यावर शौचास गेली होती. मात्र, भरधाव वेगात आलेल्या बसने त्यांना धडक दिली. या दुर्घटनेचे प्रमुख कारण म्हणजे स्वच्छतागृहांचा अभाव होता. तेव्हाच एस. दामोदरन यांनी अशा कारणामुळे कोणत्याही महिलेने आपली मुले गमावू नयेत याची काळजी घेण्याचे ठरवले आणि हेच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि या कार्याला सुरुवात झाली.
 
 
 
59 वर्षीय एस. दामोदरन यांनी 1987मध्ये ग्रामालयाची स्थापना केली आणि तेव्हापासून ते पाणीपुरवठा, स्वच्छता सुविधा, मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषण याबाबत जनजागृती करत आहेत. दक्षिण भारतातील अनेक गावांमध्ये शौचालये बांधण्यासाठी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तीन सदस्यांपासून सुरू झालेल्या ग्रामालयांची संख्या आता 85 आहे.
 
 
च.उेा. पूर्ण केल्यानंतर, त्यांनी सुरुवातीला अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचा एक मार्ग म्हणून ग्रामालय सुरू करण्याचा विचार केला. तथापि, त्यांनी गावोगावी सर्वेक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की सर्वात मोठी समस्या म्हणजे पिण्याचे पाणी आणि उघड्यावर शौचास जाण्याने होणारे आजार. म्हणून, स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवून आणि स्वच्छता सुधारून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली.
 
 
 
ग्रामालयाने 2003मध्ये तिरुचीमधील थांडवमपट्टी हे पहिले उघड्यावर शौचमुक्त गाव विकसित केले. आज देशातील हे असे पहिले गाव आहे. दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये 600 गावे आणि 200 झोपडपट्ट्या उघड्यावर शौचमुक्त करण्यासाठी त्यांनी काम केले. त्यांनी ग्रामालयाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये आणि शाळांमध्ये सहा लाखांहून अधिक शौचालये बांधली आहेत. एस. दामोदरन यांनी दोन लाखांहून अधिक शाळकरी मुलींना मासिक पाळीतील स्वच्छता शिकवली आहे. एस. दामोदरन हे एका मध्यमवर्गीय शिल्पकाराच्या कुटुंबातील पहिले पदवीधर आहेत. त्यांच्या ग्रामालय या संस्थेने 2021मध्ये तिरुची येथे ‘हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज’ची स्थापना केली आहे, जी स्वच्छता कर्मचार्‍यांना त्यांचे जीवन कसे सुधारायचे आणि कचरा सुरक्षितपणे कसा हाताळायचा हे शिकवते.
 
 
त्यांनी दक्षिण भारतात अनेक मॉडेल प्रकल्प तयार केले आहेत. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरएसपी, टीएससी, एनबीए, एलसीएस (लो कॉस्ट सॅनिटेशन कम स्कॅव्हेंजर्स रिहॅबिलिटेशन प्रोग्राम) आणि एसबीएम ग्रामीण यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सहा लाखांहून अधिक कायमस्वरूपी मॉडेल घरगुती शौचालये बांधण्यात आली, ती आजही चांगली वापरली जातात.
 
 
दामोदरन यांनी मासिक पाळीत पुन्हा वापरता येण्याजोगे कापड पॅड सहा वर्षांपूर्वी डिझाइन आणि विकसित केले. हे पॅड्स ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणार्‍या किशोरवयीन मुली आणि महिलांपर्यंत पोहोचले आहेत. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी आतापर्यंत, पुन्हा वापरता येण्याजोग्या 5,91,000हून अधिक कापडी पॅड्सचे वितरण केले गेले आहे, परिणामी त्या भागांतील वातावरणाचे, जमिनीचे आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळणे शक्य झाले. घरोघरी शौचालय बांधण्याविषयी जनजागृती करून आणि स्वच्छता शिक्षणाद्वारे ते महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी कार्य करत आहेत.
 
 
 
ते त्यांच्या एका मुलाखतीत म्हणतात, “माणसाचे वर्तन बदलणे ही सोपी गोष्ट नाही. अजूनही मोठ्या संख्येने लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच संसाधनांचा अभाव किंवा तांत्रिक ज्ञान यासारख्या आव्हानांनी स्वच्छता कार्यक्रमांच्या यशामध्ये अनेक अडथळे निर्माण केले आहेत. पण आता हळूहळू बदल घडतो आहे.”
 
 
ग्रामालय आणि एस. दामोदरन यांनी संपूर्ण दक्षिण भारतातील शाळांमध्ये सुमारे 500 शौचालये बांधण्यासाठी हातभार लावला आहे आणि लोक उघड्यावर शौचास जाऊ नयेत यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी देशभरातून आणि परदेशातून त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्यांचे कार्य खरे तर शब्दांत मांडणेदेखील सोपे नाही. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0