हरित उद्योजकतेच्या दिशेने...

18 Jul 2022 12:38:37
पितांबरीचे कोकणातले दोन मोठे प्रकल्प म्हणजे दापोलीजवळील साखळोली गावचा ’पितांबरी फार्मस्टे’ आणि तळवड्याचा ‘पितांबरी इस्टेट’. आजघडीला तळवडे परिसरात ‘पितांबरी’चे एकूण 113 एकर जागेत विविध प्रकल्प सुरू झाले आहेत. हा परिसर एका टेकडीवर वसलेला आहे. इथे 37 प्रकारची जंगली झाडं आहेत आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची, 27 प्रकारच्या बांबूच्या प्रजातींची, कोको, जायफळ, मिरी, लवंग अशा मसाला पिकांची नव्याने लागवड केली आहे.
 
pitambari
 
तळवडे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी अर्जुना नदीकिनारी वसलेलं एक गाव. मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ ओणी नावाचं गाव आहे. या ओणीहून पूर्वेकडे एक फाटा जातो, तिकडे आत शिरल्यावर वाटूळ, सौंदळ, परटवली, ओशिवळे, रायपाटण अशी मजल-दरमजल करत नागमोडी वळणं घेत एसटी ’पाचल’ या गावी पोहोचते आणि तिथून नदीवरचा पूल पार केला की आपण तळवडे गावात जातो. या मार्गाने जाताना मध्येमध्ये राजापूरची जीवनवाहिनी असलेली अर्जुना नदी दर्शन देते. इथून जवळच ’ताम्हाणे’ नावाचं गाव आहे, जिथे पुण्याचे एक स्नेही आशुतोष जोशी यांनी एक जमिनीचा तुकडा घेऊन मातीचं नवीन घर बांधलंय व 53 प्रजातींची साडेसातशे झाडं असलेलं मूळ जंगल राखलंय. या ताम्हाणे गावात मागे एक-दोनदा जाणं झालं होतं. या वेळेस मुद्दाम तळवड्याला जाण्याचं कारण होतं ’पितांबरी’ कंपनीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई यांची भेट घेण्याचं आणि त्यांनी या परिसरात केलेले शेती-उद्योगविषयक उपक्रम बघण्याचं.
 
 
महाराष्ट्रातल्या नामांकित उद्योजकांमध्ये अग्रक्रमाने घेतलं जाणारं नाव म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई. तांब्या-पितळेची भांडी चकचकीत करणार्‍या पावडरपासून सुरुवात केलेला त्यांचा ’पितांबरी’ हा ब्रँड हा आज अनेक उत्पादनांमध्ये जगप्रसिद्ध झाला आहे. आज पितांबरीची 50पेक्षा जास्त उत्पादनं बाजारात आपलं स्थान पकडून आहेत. गेल्या 30 वर्षांच्या उद्योजकीय कारकिर्दीत अनेक प्रकारच्या यशापयशांतून मार्गक्रमण करीत आज एका वेगळ्या उंचीला पोहोचलेले प्रभुदेसाई वयाच्या साठीतही सतत नवीन स्वप्नं बघत असतात. असंच एक स्वप्नं, जे आज सत्यात उतरतंय ते म्हणजे कोकणात आपल्या मूळ गावी शेतीशी संबंधित काहीतरी उद्योग वाढवण्याचं. तळवडे हे प्रभुदेसाई परिवाराचं मूळ गाव. ’कोठारवाले प्रभुदेसाई’ अशी गावात त्यांची ओळख आहे. रवींद्र प्रभुदेसाई यांचे वडील वामनराव प्रभुदेसाई हे सुरुवातीला शिक्षणासाठी तळवड्याहून राजापूरला आणि नंतर ठाण्याला स्थायिक झाले. मात्र तळवड्याशी त्यांचा संपर्क कायम राहिला. दर वर्षी दत्तजयंतीचा उत्सव समस्त प्रभुदेसाई परिवार तळवड्यातच एकत्र साजरा करतो. त्यामुळेच पितांबरीचा जगभर विस्तार झाल्यावरही कोकणात आपल्या गावी काहीतरी करावं ही इच्छा रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मनात कायम होती. तळवड्यातच असणार्‍या निर्मलाकाकू प्रभुदेसाई यांच्या आग्रहाने या विचाराने मूर्त रूप घेतलं.
 

pitambari
 
पितांबरीचे कोकणातले दोन मोठे प्रकल्प म्हणजे दापोलीजवळील साखळोली गावचा ’पितांबरी फार्मस्टे’ आणि तळवड्याचा ’पितांबरी इस्टेट’. आजघडीला तळवडे परिसरात ’पितांबरी’चे एकूण 113 एकर जागेत विविध प्रकल्प सुरू झाले आहेत व त्यात कायमस्वरूपी 55 व हंगामी 200 एवढी माणसं कामाला लागली आहेत. साधारणत: 2010पासून प्रभुदेसाईंनी इकडे लक्ष घालायला सुरुवात केली. सुरुवातीला जमिनीचा एक छोटा तुकडा घेऊन त्यात औषधी वनस्पतींची लागवड केली. 2012मध्ये ’गुरुकृपा गृहोद्योग’ या नावाने पितांबरीची एजन्सी या भागात सुरू करून आपली उत्पादनं स्थानिक दुकानदार व ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. तीळ लागवड, हळद लागवड, आल्याची लागवड असे अनेक नवीन प्रयोग सुरू केले. काही यशस्वी होत होते, तर काही अयशस्वी होत होते. 2014 साली रसायनविरहित गूळ बनवण्याचा कारखाना सुरू केला. आज ’रुचियाना’ या नावाने बाजारात मिळणार्‍या पितांबरीच्या गूळ कणीला ग्राहकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. 2016पासून त्यांनी स्वत: विकत घेतलेल्या जागेत, तसंच आजूबाजूच्या शेतकर्‍यांना जमवून उसाची लागवड सुरू केली. 2018 साली 9 एकरांच्या परिसरात ’पितांबरी इस्टेट’ची स्थापना झाली. येथे पूर्वी ’यज्ञनगर’ या नावाने एक निसर्गोपचार केंद्र चालायचं.
 

pitambari
 
याच ’पितांबरी इस्टेट’च्या निसर्गरम्य आवारात त्या दिवशी रवींद्र प्रभुदेसाई यांच्याबरोबर चहा-नाश्त्याबरोबर अर्धा-पाऊण तास गप्पा झाल्या. त्यांचा बोलण्यातला साधेपणा, हसतमुखपणा, याबरोबरच सतत काहीतरी नवीन नवीन प्रयोग करून आपला उद्योगविस्तार करण्याची ध्येयदृष्टी गप्पा मारताना जाणवत होती. ’पितांबरी इस्टेट’चा काही भाग त्यांनी स्वत: फिरून दाखवला व नंतर त्यांचे सहकारी कुंजन साळवी यांनी संपूर्ण परिसर फिरून तिथल्या प्रयोगांची सविस्तर माहिती दिली. हा परिसर एका टेकडीवर वसलेली आहे. इथे 37 प्रकारची जंगली झाडं आहेत आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची, 27 प्रकारच्या बांबूच्या प्रजातींची, कोको, जायफळ, मिरी, लवंग अशा मसाला पिकांची नव्याने लागवड केली आहे. इथे एक छोटी गोशाळा आहे व त्यात गीर गाई पाळलेल्या आहेत.
 

pitambari
 
’पितांबरी इस्टेट’पासून जवळच असलेल्या 8 एकरांच्या प्लॉटवर प्रक्रिया उद्योग उभा केला आहे. तिथले व्यवस्थापक ओम्कार गोगटे यांनी त्याची सविस्तर माहिती दिली. या जागेत ’रुचियाना’ गूळ कणी, लाकडी व दगडी घाणा तेल, केळ्याचे वेफर्स, लेमन सॉस ही उत्पादनं बनवली जातात. ’साई-सरबती’ नामक विशिष्ट जातीच्या लिंबापासून हा सॉस तयार केला जातो. या लिंबाची लागवडही एका प्लॉटमध्ये करण्यात आली आहे. ’नेन्द्रान’ या दक्षिण भारतीय जातीच्या केळ्यांपासून वेफर्सही इथे बनवले जातात. ही केळी मोठ्या आकाराची पिवळसर रंगाची असतात. या प्रकल्पात एकूण साडेतीन एकरांच्या परिसरात सुमारे 1700 नेन्द्रान केळींची लागवड केली आहे. तेल काढण्याचे लाकडी आणि दगडी असे दोन घाणे इथे बघायला मिळाले. प्रत्यक्ष तेल काढण्याची प्रक्रिया चालू असताना बघता आली. पितांबरीचं ‘दगडी घाणा तेल’ हळूहळू बाजरात लोकप्रिय होत आहे. सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली ’रुचियाना गूळ कणी’ इथे तयार होते. ही गूळ कणी तयार करण्याचं काम साधारणत: नोव्हेंबरपासून मे महिन्यापर्यंत चालतं. उसाचे बारीक तुकडे करणं, रस काढणं, भल्यामोठ्या कढयांमध्ये तो आटवणं, तो सुकल्यानंतर त्याची कणी करणं व पुढे पॅकिंग हे सगळं काम मशीनद्वारे चालतं. या सगळ्याची माहिती ओम्कार गोगटे देत होते. उसाचा रस आटवण्यासाठी इंधन म्हणून उसाचीच चिपाडं वापरली जातात. रसातली मळी निघून जाण्यासाठी ‘रानभेंडी’ या वनस्पतीची पावडर घातली जाते. बाकी कुठल्याही प्रकारचं रसायन गूळ तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत वापरलं जात नाही. दिवसाला 2 टन एवढी या कारखान्याची उत्पादनक्षमता आहे. सर्वसाधारणपणे गुर्‍हाळात स्वच्छतेच्या बाबतीत अनास्था दिसते. उष्णतेमुळे घोंगावणारे कीटक आणि गंज चढलेल्या काहिली असं दृश्य दिसतं. आरोग्यदायक गूळ स्वच्छ वातावरणात तयार व्हावा असा आग्रह धरत रवींद्रजींनी गुर्‍हाळात न गंजणार्‍या स्टेनलेस स्टीलच्या काहिलींचा व उपकरणांचा वापर सुरू केला. कंपनीने स्वत:च्या सुमारे 60 एकर जागेत उसाची लागवड केली आहे व परिसरातल्या शेतकर्‍यांकरवी आणखी 60 ते 70 एकरांवर उसाची लागवड केली गेली आहे. उसाच्या ’कोईमतूर 86032’ आणि ’कोईमतूर 92005’ या दोन जाती प्रामुख्याने लागवडीसाठी निवडल्या आहेत. ऊस हे कोकणातलं परंपरागत पीक नाही, परंतु कोकणातही ऊस लागवड व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग होऊ शकतात, हे पितांबरीच्या उदाहरणातून आपल्याला बघायला मिळतं.
 

pitambari
 
शेती, वृक्षलागवड आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग असा पितांबरीचा उद्योजकीय कार्यक्रम कोकणात विस्तारतो आहे. तिथले कर्मचारी वैभव सनगर यांनी अन्य काही प्लॉट्स आणि प्रकल्प दाखवले. ताम्हाणे गावात एका 13 एकरांच्या प्लॉटवर आंबा, नारळ, काजू, फणस यांच्या विविध जातींची लागवड केली आहे. याच गावात आणखी एका प्लॉटमध्ये सोनचाफ्याची 1500 आणि चंदनाची 3000 झाडं लावण्यात आली आहेत. इथेच अगरबत्ती बनवण्याचा कारखाना आहे. याच प्लॉटमध्ये गवती चहा (लेमन ग्रास) या गवताची लागवड करण्यात आली आहे. यापासून तेल बनवलं जातं आणि सौंदर्यप्रसाधनं, साबण इत्यादींमध्ये त्याचा उपयोग केला जातो. इथून जवळच असलेल्या परटवली या गावात 5 एकरांच्या एका प्लॉटमध्ये 32 प्रकारच्या बांबूंची लागवड केली आहे. तिथून जवळच असलेल्या आडवली येथे 23 एकरांच्या जागेत ’टुलडा’ जातीच्या बांबूची 18 एकरवर लागवड केली आहे व 5 एकरांवर केळी लागवड आहे. कोकणातल्या सगळ्याच शेतकर्‍यांसाठी आणि बागायतदारांसाठी पितांबरीचे हे नवनवीन प्रयोग प्रेरणादायक आहेत. शेती, पर्यावरण, पर्यटन या विषयांमध्ये आणखी भरपूर नवनवीन अभिनव प्रकल्प करणार असल्याचं रवींद्र प्रभुदेसाई यांनी सांगितलं. भविष्यात शाळा, देवस्थानं, पाणवठे, ग्रामपंचायती आणि स्मशानभूमी या पाच ठिकाणी भरपूर वृक्षलागवड करून ’पंचहरित क्षेत्र’ निर्माण करण्याची ’पितांबरी’ची योजना आहे. कंपनीने अ‍ॅग्रो डिव्हिजनमार्फत दापोलीजवळ साखळोली या गावी ’पितांबरी नर्सरी’ची निर्मिती केली आहे. यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जातिवंत मातृवृक्षापासून निर्मित विविध प्रकारची फळझाडं, फूलझाडं, शोभिवंत झाडं यांची निर्मिती केली जाते. कोकण कृषी विद्यापीठाकडून मिळालेल्या रोपांपासून व कलमांपासून याची निर्मिती केली जाते. अशा प्रकारच्या नर्सरी सर्वत्र तयार व्हाव्यात व त्या माध्यमातून शेतकर्‍यांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता पितांबरी नर्सरीने ’नर्सरी फ्रँचायझी’ हा उपक्रम सुरू केला आहे. यात विविध प्रकारची झाडं विक्रीकरता उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भविष्यात गोमय सेंद्रिय खतासह बियाणे, कीटकनाशकं व अवजारं उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यामुळे पितांबरी नर्सरी फ्रँचायझी केवळ खात्रीशीर उत्पन्नाचा व्यवसायच नव्हे, तर ‘वसुंधरा बचाव’ मोहिमेचा एक भागही आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सुपरस्टॉकिस्ट्सच्या आणि 357 तालुक्यांमध्ये पितांबरी नर्सरी फ्रँचायझीच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत 1 कोटी वृक्षलागवडीचं पितांबरीचं ध्येय आहे.
 
 
pitambari
 
गंमत अशी की ’उद्योजक’ आणि ’पर्यावरणवादी’ या दोघांचं मनातून एकमेकांशी पटत नाही! उद्योजक हा अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असतो. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून रोजगारनिर्मिती करण्यात उद्योजकांचा फार मोठा वाटा असतो. सतत नवीन नवीन लागवड करणं, प्रक्रिया उद्योग उभारणं, जास्तीत जास्त जमीन उत्पादक बनवणं, जागतिक बाजारपेठेत आपल्या उत्पादनांना स्थान मिळवून देणं, आर्थिक प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवणं अशी ध्येयं डोळ्यासमोर ठेवून उद्योजक आपली वाटचाल करत असतात. याउलट शेती-बागायतीसाठी किती जंगलं बुलडोझर लावून साफ केली जातायत, त्यामुळे मूळचं जंगल आणि जैवविविधता किती नष्ट होते आहे, कारखाने चालवण्यासाठी किती वीज वापरली जाते आहे व त्यासाठी किती कोळसा जाळला जातोय, व्यावसायिक लागवडीसाठी पाणी किती अमाप प्रमाणात उपसलं जातंय आणि या सगळ्याचा निसर्गावर किती ताण पडतोय! अशी गणितं पर्यावरणवादी मांडत असतात. हे दोन दृष्टीकोनांमधले फरक आहेत. यात एकाचं बरोबर आणि दुसर्‍याचं चूक असा निवडा नाही करता येऊ शकत. पण आज पर्यावरणभान वाढल्यामुळे उद्योजक आपल्या उद्योजकीय वाटचालीत पर्यावरणरक्षणाच्या काही तत्त्वांचा अवलंब करत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेवून पितांबरीची यापुढची वाटचाल असणार आहे, हे पाहून आनंद झाला.
 
 
Powered By Sangraha 9.0