चेहरा आणि मुखवटा

16 Jul 2022 14:52:26
आपल्या सोईचे असेल तसेच वक्तव्य करून दगडाखाली अडकलेले हात मोकळे करून घेण्यात शरद पवार पटाईत आहेत. मागील दहा-पंधरा दिवसांत त्यांची वक्तव्ये पाहिली की त्याचा प्रत्यय येतो, मग विषय नामांतराचा असो की पक्षफुटीचा. शरद पवार नेहमी स्वत:ला आणि स्वत:च्या पक्षाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात.

sharad pawar
 
महाराष्ट्रात गेल्या महिन्यात खूप वेगवान घडामोडी घडलेल्या आहेत. पंचवीस वर्षे सत्तेत राहू असे म्हणणारे सत्तेबाहेर गेले आहेत आणि अनपेक्षित असणारा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. आता आपल्याला सत्ता सोडावी लागणार आहे, हे लक्षात येताच काही निर्णय, घोषणा घाईघाईने घेतल्या गेल्या. त्यापैकी एक निर्णय म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतर होय. या दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर व्हावे ही तशी जुनी मागणी होती. आपल्या माथी असलेला कलंक पुसला जावा आणि आपल्या अस्मितेचा गौरव व्हावा, या भूमिकेतून विशेषत: हिंदू समाज नामांतराची मागणी सातत्याने करत होता. पायउतार होणार्‍या सरकारने ही मागणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे सहजासहजी झाले नाही. या निर्णयामुळे मिळणारा राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता. आपण हिंदुत्वाची नाळ तोडली नाही हे सिद्ध करण्याची संधी या निमित्ताने सरकारला - विशेषत: शिवसेनेला दवडायची नव्हती. महाआघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतला. खुद्द शरद पवारांनी त्याचे स्वागत केले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर समाजमाध्यमांतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. तुळजापूर तालुक्यातील काटगावसारख्या छोट्या गावात हिंसक घटना घडली. हिंदू समाजाने या निर्णयाचे स्वागत केले. मुस्लीम समाज विरोधी भूमिका घेताना दिसत आहे. खा. इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सांगितले की, “नामांतराचा विषय सर्वसहमतीचा नाही. आमच्या पक्षाचा नामांतराला पाठिंबा नव्हता.” शरद पवार यांच्या या वक्तव्याचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ असा की शरद पवारांना हिंदू अस्मिता आणि श्रद्धास्थाने याविषयी काहीही देणेघेणे नाही. दुसरा अर्थ असा की मुस्लीम समाज आपल्या पक्षाशी एकगठ्ठा जोडण्यासाठी केलेले हे वक्तव्य आहे.
 
 
 
‘बेभरवशाचा माणूस’ अशी राजकारणात शरद पवारांची प्रतिमा निर्माण झाली आहे, ती त्यांच्या कर्तृत्वामुळेच. बर्‍याच वेळा एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ते त्यात यशस्वी होतात. नामांतराचा निर्णय झाला तेव्हाचे पवार आणि मुस्लीम समाज मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे हे कळल्यानंतरचे पवार वेगवेगळे आहेत. नामांतराची घोषणा होताच हिंदू समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आणि इम्तियाज जलील यांच्या मोर्चापूर्वी मुस्लीम समाजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. मुळात नामांतराला शरद पवारांनी समर्थन करावे की विरोध, हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मात्र बहुसंख्य हिंदू समाज नामांतराची पाठराखण करणारा आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आपण केवळ मतपेढीचे राजकारण करत राहू, त्यापुढे बहुमत, अस्मिता, श्रद्धा यांना काही किंमत नाही असेच यावरून सिद्ध होते आहे आणि ते शरद पवारांच्या आजवरच्या कारकिर्दीस साजेसे आहे.
 
 
 
याच काळात शरद पवारांनी आणखी एक वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘’आपले आमदार फुटले नाहीत, पक्ष अभेद्य राहिला.” शरद पवारांनी स्वपक्षाचे केलेले कौतुक योग्य आहे, पण जो पक्ष फुटला त्याला जबाबदार कोण? शिवसेना फुटावी ही कोणाची सुप्त इच्छा होती? आणि ती पूर्ण करण्यासाठी हत्यार म्हणून कोणाचा वापर केला गेला? या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांनी दिली, तर महाराष्ट्रातील जनतेला हवेच आहे. ज्यांच्याशी अनैसर्गिक आघाडी करून सत्तेचा सोपान चढला, त्या पक्षात बंडाळी माजली तर होणारा आनंद आपला एकही आमदार फुटला नाही असे म्हणून साजरा करायचा की आपल्या पक्षात पेरलेले फुटीचे सुरुंग अजून फुटलेले नाहीत म्हणून चिंतेत राहायचे? शिवसेना पक्षात घडणार्‍या घडामोडी आपल्या पक्षातही घडू शकतात, या भीतीपोटी आपण एकसंध असल्याचे शरद पवारांना सांगावे लागत आहे का? आपला पक्ष एकसंध असून आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शिवसेना पक्ष एकसंध होणार नाही, शिवसेनेत नेतृत्वाचा वाद विकोपाला जाईल, शिवसेना संपेल आणि विद्यमान सरकार टिकणार नाही, असे भाकीत या निमित्ताने शरद पवारांनी केले आहे. शरद पवारांच्या या सर्व वक्तव्याचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, शरद पवार आपला चेहरा उजळ करून घेत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा केंद्रबिंदू शरद पवारांच्या आसपास राहिला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सोबत नको म्हणूनच. गेली अडीच वर्षे सत्तेत सहभागी झालेले शरद पवार सत्ता जाताच अस्वस्थ झाले आहेत आणि त्यांचा मुखवटा गळून पडताना खरा चेहरा समोर येऊ लागला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0