‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट‘ आणि महाएमटीबी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ’स्पीसिज अँड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्राम’ मालिकेचे शनिवारी 9 जुलै रोजी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात अनावरण झाले. अनेक सागरी व वन्य जीव, त्यांच्या प्रजाती व त्यांचा अधिवास यांच्या, तसेच स्थानिक पातळीवर त्यांच्या संवर्धनाचे काम करणार्या कार्यकर्त्यांच्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओ मालिकेतून पाहायला मिळतील.
प्रत्येक सजीवाची एक परिसंस्था असते. मनुष्य उत्क्रांत होत गेला आणि लोकसंख्याही झपाट्याने वाढू लागली, परिणामी जंगलांवर, पाणथळ जागांवर अतिक्रमण झाले. तेव्हा मनुष्यवस्तीपासून दूर राहणार्या या जीवांनी आपले लक्ष वेधून घेतले. त्यानंतरची पायरी म्हणून आपण वने संरक्षित केली. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास सुरुवात केली. त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण राहील याची आपण सतत दक्षता घेतो. आपण बहुतेक वेळा वाघ पाहायला जंगलात जातो. पण त्याचे आपल्याला दर्शन होतेच असे नाही. वाघाची मर्जी आणि आपले नशीब यांचा ताळमेळ बसला, तरच आपली जंगल सफारी सफल ठरते. पण त्याव्यतिरिक्त असे कितीसे सागरी आणि वन्य जीव व त्यांच्या विविध प्रजाती आपल्याला माहीत असतात? आणि त्यातल्या किती जिवांच्या अधिवासाविषयी आपल्याला माहिती असते? काही इंग्लिश आणि हिंदी मालिकांनंतर प्रथमच मराठी भाषेतून ज्ञात-अज्ञात वन्य व सागरी जिवांविषयी माहिती ’स्पीसिज अँड हॅबिटॅट्स’ मालिकेतून आपल्याला मिळेल.
‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट‘ आणि महाएमटीबी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ’स्पीसिज अँड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्राम’ मालिकेचे शनिवारी 9 जुलै रोजी संध्याकाळी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीच्या बागेत) अनावरण झाले. या कार्यक्रमाला भारतीय वन सेवा (महाराष्ट्र)चे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विशेष म्हणजे लिमये यांनी प्रतीकात्मक पद्धतीने ‘क्लॅप’ मारून हे अनावरण केले.
दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, द हॅबिटॅट्स ट्रस्टचे प्रमुख ऋषिकेश चव्हाण यांच्यासह व्यासपीठावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) वीरेंद्र तिवारी, काळिंजे कांदळवन निसर्ग पर्यटन गट अध्यक्षा श्रुती तोडणकर, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी मालिकेच्या ट्रेलरचे व पहिल्या भागाचे सादरीकरण करण्यात आले.
’स्पीसिज अँड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्राम’ ही व्हिडिओ मालिका तब्बल 100 भागांची असणार आहे. अनेक सागरी व वन्य जीव, त्यांच्या प्रजाती व त्यांचा अधिवास यांच्या, तसेच स्थानिक पातळीवर त्यांच्या संवर्धनाचे काम करणार्या कार्यकर्त्यांच्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओ मालिकेतून पाहायला मिळतील. समुद्री गुहेत आढळणारे जीव, खेकडे, कासव, जंगली कुत्रे, विविध प्राणी व पक्षी अशा अनेक प्रजातींचा यात समावेश असेल. पहिल्या भागामध्ये सह्याद्रीत आढळणार्या महाधनेशाची (great hornbiची) गोष्ट चित्रित केली होती. त्यांच्या घरटे बांधण्याच्या प्रक्रियेपासून सहजीवनापर्यंत सर्वच बाबतीत सखोल माहिती या व्हिडिओतून सांगितलेली आहे. त्यांचा आवाज व जीवन जगताना येणारे संभाव्य धोके, त्याचबरोबर त्या धोक्यांवर ते कसे मात करतात याचे उत्तम चित्रीकरण या भागामधून पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार म्हणाले, “रेस्क्यूपासून सुरू झालेले काम रिसर्चपर्यंत येऊन पोहोचले आहे. आणि याचाच पुढचा टप्पा ‘स्पीसिज अँड हॅबिटॅट्स’ संवर्धनाचा असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रथम त्याची माहिती करून घ्यायला हवी. आपण पर्यावरण रक्षण करताना ऊठसूट झाडे लावतो. मोकळ्या माळरानांवरही झाडे लावतो. तसे करू नये. सड्यांची, मोकळ्या माळाची एक वेगळी परिसंस्था असते. तिच्यामध्ये आपण झाडे लावल्याने व्यत्यय येतो. मग आपण खरेच पर्यावरणाचे काम करतोय का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. या विविध परिसंस्थांची आणि त्यांच्यासाठी काम करणार्या तज्ज्ञांची माहिती आपल्याला या व्हिडिओ मालिकेमधून मिळेल.”
मुख्य अतिथी मा. सुनील लिमये म्हणाले, “या क्षेत्रात काम करत असलेल्या अधिकार्यांना व इतर वनरक्षकांना फार प्रजाती माहीत नसतात. पण त्या वनांत काम करणार्या स्थानिकांना याबद्दल बरीच माहिती असते. त्यांना संधी मिळायला हवी. या सर्वांना आधार देण्याचे, त्यांना प्रसिद्धी देण्याचे काम तरुण भारत करत असल्याने किरण शेलार यांचे आभार. ही फिल्म बघताना सतत जाणवते की अनेक गोष्टी आहेत ज्यांची माहिती आपण करून घ्यायला हवी, त्यांच्याविषयी जाणून घ्यायला हवे. महाराष्ट्र सरकार अनेक योजना राबवत आहे, ही सर्व अधिवास क्षेत्रे एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील असलेले हे सरकार अनेक संरक्षक क्षेत्रे उभारत आहेत. या कामात अनेक माणसांची मदत मिळते. त्या माणसांना उजेडात आणायला हवे. या मालिकेच्या निमित्ताने तरुण भारत हे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.”
मुंबई तरुण भारतचे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी, या मालिकेचे संहिता लेखक व सादरकर्ते अक्षय मांडवकर यांनी आपल्या संपूर्ण टीमचे या वेळी कौतुक केले. त्यांच्या विशेष गुणांमुळे चित्रीकरण आणि पुढील सर्व व्यवस्थापन कसे सहज शक्य झाले, याबाबत बोलताना अक्षय मांडवकर म्हणाले, “इतक्या वर्षांत जोडलेल्या अनेक माणसांमुळे हे शक्य झाले. मदतीला सतत तत्पर असलेल्या या टीममुळेच आज ही मालिका प्रदर्शित करू शकलोय. कॅमेरा टीमचे केतन वैद्य यांनी अत्यंत संयमाने सर्व चित्रीकरण हाताळले. ड्रोन पायलट सूरज बंगाल याच्या मदतीने उंचावरून चित्रीकरण करणे शक्य झाले. एखाद्या पक्ष्याची वैज्ञानिक माहिती देण्यासाठी ओमकार पाटील यांनी संशोधन साहाय्य केले. तसेच गणेश यांनी न कंटाळता अनेक अवघड वाटांवरून आमचे सारथ्य केले, तसेच त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने त्यांनी सर्व समजूनही घेतेले. अशी सर्व टीम सोबत असल्याने ही मालिका सादर करणे शक्य झाले आहे.’‘
मुंबई तरुण भारतचे पर्यावरण प्रतिनिधी उमंग काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.