सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून इतिहास-वर्तमान-भविष्याची केलेली ही सम्यक मांडणी हिंदू समाजाला भानावर ठेवणारी, मूळ उद्दिष्टाची जाणीव करून देणारी आहे. ती पथदर्शक आहे आणि भविष्यवेधीही. मात्र पीतपत्रकारितेत रमलेल्या धृतराष्ट्राच्या वारसदारांना ते कसे दिसावे?
आपल्या वाहिनीसाठी/वर्तमानपत्रासाठी जे सोयीचे, ते त्याच्या मथितार्थाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत, मागचे-पुढचे महत्त्वाचे संदर्भ गाळत उचलायचे आणि त्यावर आधारित बातमीचे रात्रंदिवस चालणारे गुर्हाळ घालायचे, ही मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांची रीत बनली आहे. त्यात बातमीचा विषय जर केंद्र सरकार, भाजपा वा रा.स्व. संघ संबंधित असेल, तर सोयीच्या बातम्या करून त्यांचा वेगाने प्रसार करायला या मंडळींना चेव येतो. गेली आठ वर्षे हेच चालू आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. त्या मालिकेतले अलीकडचे उदाहरण म्हणजे, सरसंघचालकांच्या भाषणातील एका उद्गारावरून या माध्यमांनी माजवलेले रण. “प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग पाहण्याची गरज नाही” हे ते वाक्य. नागपूर येथील तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी केलेल्या भाषणात सरसंघचालकांनी वरील उद्गार काढले. हे वाक्य म्हणजे, ‘संघ स्वयंसेवकांना सरसंघचालकांनी दिलेला घरचा अहेर आहे’ अशी समजूत करून घेत आणि देत, या विषयावरून घातली गेलेली चर्चेची गुर्हाळे म्हणजे या माध्यमकर्मींची समजशक्ती, आकलनशक्ती किती तोकडी आहे याचे एकेक नमुनेच आहेत. संपूर्ण भाषण ऐकण्याची, त्या विधानाला असलेले संदर्भ लक्षात घेण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही. कारण तसे केले तर जी बातमी तयार होईल, त्याने सनसनाटी निर्माण होणार नाही, समाजमन संभ्रमित होणार नाही, हे त्यांना पक्के ठाऊक आहे.
केंद्रातील मोदी सरकारने शब्द दिल्याप्रमाणे अयोध्या येथील राममंदिर विषयाची न्यायालयाच्या माध्यमातून तड लागली. एवढेच नव्हे, तर दुसर्यांदा सत्तेवर येताच या सरकारने प्रत्यक्ष मंदिर उभारणीचा शुभारंभही केला. यामुळे या देशातला बहुंताश हिंदू सुखावला. ज्या तीन मंदिरांना हिंदूंच्या भावजीवनात अनन्यसाधारण स्थान आहे, त्यांचा जीर्णोद्धार होणे म्हणजे शतकानुशतके निस्तेज झालेल्या हिंदूंमधील स्वत्वाची, त्यांच्यातील आत्मतेजाची केलेली जागृती आहे. या विषयाकडे पाहण्याचा हिंदूंचा दृष्टीकोन असा आहे. तो भावनिक असला तरी स्वाभाविकही आहे. कारण आक्रमक मुस्लिमांनी शतकानुशतके केलेली मानखंडना त्याच्या मुळाशी आहे. या मंदिरांची पुनर्उभारणी म्हणजे हिंदूंच्या स्वाभिमानाची पुन:प्रतिष्ठा करणे. त्या अर्थाने ती प्रतीकात्मक असली तरी विचारपूर्वक केलेली कृती आहे. आपले आत्मतेज जागे झाले आहे, हा संदेश पोहोचवणे असा त्याचा अर्थ आहे.
असे असले, तरी स्वधर्माचा अभिमान बाळगताना अन्य धर्मीयांचा द्वेष करावा लागतो ही आपली परंपरा कधीच नव्हती. छत्रपती शिवराय आणि थोरले नानासाहेब पेशवे यांचे उदाहरण या संदर्भात देता येईल. एखादा भूप्रदेश मुस्लीम शासकाकडून जिंकल्यानंतर त्यांनी सूडापोटी वा द्वेषापोटी मशीद पाडून मंदिराची उभारणी केली नाही, तर जिथे मंदिर पाडून मशीद उभी केली गेली होती, अशाच ठिकाणी पुन्हा मंदिराची उभारणी केली. इतकेच नव्हे, तर ज्या मशिदींना असा इतिहास नव्हता, त्या मशिदींसाठी इनामे चालू ठेवण्यात आली होती. (याच अंकात प्रकाशित झालेल्या लेखात आपल्याला त्याविषयी सविस्तर वाचता येईल.) तात्पर्य, केवळ सूडभावनेपोटी वा द्वेषापोटी अन्यधर्मीयांना दुखावणे ही हिंदूंची परंपरा नाही.
त्याचीच अप्रत्यक्ष जाणीव सरसंघचालकांनी करून दिली. म्हणून या विषयासाठी एका मर्यादेपर्यंत आपली समूहशक्ती खर्च करून, शक्तीची पूजा करण्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. कोणावर विजय मिळवण्यासाठी शक्ती संपादन करायची नाही, तर जो शक्तिमान असतो, त्यावर जग विश्वास ठेवते, म्हणूनच सत्याला शक्तीचा आधार दिला पाहिजे, अशी त्यांनी मांडणी केली. समृद्धीत शक्ती असते तशी एकात्मतेतही शक्ती असते, असे शक्तीचे आविष्कार सांगताना भारतातील विविध धर्मीयांनी देश म्हणून एकत्र असण्याची गरजही सरसंघचालकांनी अधोरेखित केली.
जो देश सामर्थ्यशाली असतो, त्याची खोडी काढण्याची वा त्याला जाब विचारण्याची हिंमत कोणी करू धजावत नाही, हे आज चीनच्या उदाहरणावरून समजून घेता येते. चीनमधील मुस्लीमधर्मीयांवर अन्याय-अत्याचार चालू असताना त्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत एकाही मुस्लीम राष्ट्राने दाखवली नाही आणि भारतात थोडे काही घडले तर हीच मुस्लीम राष्ट्रे छाती पिटत एकत्र येतात आणि आपला दबाव निर्माण करण्याचे विविध मार्ग चोखाळतात.
भारताला शक्तिशाली बनायचे आहे ते जगाला दिशा देणारा ‘विश्वगुरू’ होण्यासाठी. त्यासाठी संविधानाने आखून दिलेल्या चौकटीचे पालन करतच पुढची वाटचाल करायची आहे, असे सांगताना त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.
तात्पर्य, सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून इतिहास-वर्तमान-भविष्याची केलेली ही सम्यक मांडणी हिंदू समाजाला भानावर ठेवणारी, मूळ उद्दिष्टाची जाणीव करून देणारी आहे. ती पथदर्शक आहे आणि भविष्यवेधीही. मात्र पीतपत्रकारितेत रमलेल्या धृतराष्ट्राच्या वारसदारांना ते कसे दिसावे?