अमेरिकन गोळीबार आणि सामाजिक हिंसा

03 Jun 2022 12:17:25
राज्यघटनेतील दुसर्‍या दुरुस्तीने दिलेले शस्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य हे अमेरिकेतील वाढत्या हिंसाचाराचे एक कारण आहे. त्याचप्रमाणे तेथील दुभंगलेली विवाहसंस्था व कुटुंबव्यवस्था, त्यामुळे येणारे एकटेपण आणि ढासळणारे मानसिक आरोग्य, संस्कृतीहीन सुबत्ता, हिंस्र मोबाइल गेम्सचा अतिरेकी वापर आदी अनेक बाबी त्यासाठी कारणीभूत असल्याचे दिसते.

america

22 मे 2022 हा अमेरिकन इतिहासातील एक अत्यंत दुर्दैवी आणि काळाकुट्ट दिवस धरला जाणार आहे. या दिवशी टेक्सास राज्यातील युवल्डे (र्णींरश्रवश) नामक गावामध्ये रॉब एलिमेंटरी स्कूल या शाळेत 18 वर्षांचा साल्वाडोर रामोस नावाचा एक मुलगा अचानक येतो काय, चौथीच्या वर्गात शिरतो काय आणि तिथल्या 19 लहान मुलांना आणि त्यांच्या दोन शिक्षकांना मारतो काय... तिथे येण्याआधी त्याने त्याच्या आजीवरही गोळीबार केला होता. कुठल्याही संवेदनशील मनासाठी सुन्न करणारी घटना होती, अजूनही आहे. साधारण दीड तास चालू असलेल्या निर्घृण हिंसाचाराचा अंत ह्या 18 वर्षांच्या गुन्हेगाराला मारून झाला. त्याच्या मरणाने अक्षम्य गुन्ह्यामागील एक जीवन संपले हे जितके सत्य आहे, तितकेच असे घृणास्पद कृत्य त्याला का करावेसे वाटले असेल, या प्रश्नाचे उत्तर कायमच अनुत्तरित राहिले, असे म्हणावे लागणार आहे.
 
 
या घटनेच्या आधी दोन आठवडे, बफेलो या न्यूयॉर्क राज्यातील शहरात आणखी एका 18 वर्षीय गौरवर्णीयाने 10 जणांची आणखी एका गोळीबारात हत्या केली, त्या हल्ल्यात 3 जण जखमी झाले. ह्या हल्ल्यामागे अमेरिकन वंशवाद कारणीभूत होता असे अजून कायद्याने नसले तरी परिस्थितिजन्य पुराव्यामुळे म्हटले जात आहे.
बफेलोमधील अथवा नंतरच्या युवल्डे टेक्सासमधील घटना या दुर्मीळ प्रकारातील नव्हत्या, तर अमेरिकेत सातत्याने घडणार्‍या हिंसाचारातील भाग होत्या. 2022च्या सुरुवातीपासून गेल्या पाच महिन्यांतील जर बंदुकीसंदर्भातील हिंसाचार पाहिला, तर कुठल्याही सजग मनाला अस्वस्थता आल्याशिवाय राहणार नाही. ुwww.gunviolencearchive.org या स्वतंत्र संकेतस्थळावरील माहितीप्रमाणे, बंदुकीच्या हिंसाचारामुळे एकूण अनैसर्गिक मृत्यू - 17822, त्यातील उद्देशाने अथवा आजाणतेपणे झालेल्या मानवी हत्या - 7922, आत्महत्या - 9900, जखमी - 14874, समूहात केलेले गोळीबार हिंसा प्रसंग - 228.
 
 
लेख अधिक भावनात्मक करण्याचे टाळण्यासाठी यातील अधिक विस्तृत आकडेवारी देण्याचे टाळत आहे. पण वरील केवळ गेल्या पाच महिन्यांतील आकडेवारी एकूणच प्रसंगाचे गांभीर्य दाखवते.


america
 
रॉब एलिमेंटरी स्कूलमधील गोळीबारादरम्यान भीतीने पळणारी मुले
 
 
अमेरिकन स्वातंत्र्याच्या वेळेस जशी राज्यघटना लिहिण्यात आली, तशाच नंतरच्या पंचवीस वर्षांहून कमी काळात 10 महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या झाल्या. त्यातील सगळ्यात पहिल्या घटना दुरुस्तीने (थोडक्यात) आचार-विचारस्वातंत्र्य दिले, तर दुसर्‍या घटना दुरुस्तीने शस्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य दिले. ही घटना दुरुस्ती (second amendment)  म्हणते - well regulated Militia, being necessary to the security of a free State, the right of the people to keep and bear arms, shall not be infringed.
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात अमेरिकन स्वातंत्र्यसैनिकांनी तत्कालीन शस्त्रांच्या बळावर ब्रिटिशांशी युद्ध केले आणि स्वातंत्र्य मिळवले. मात्र अमेरिकन मानसिकतेत असे दृढ विचार बसले आहेत की, हे स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर सामान्य जनतेकडे शस्त्र असणे गरजेचे आहे. उद्देश हा की जर कधी सरकार मनमानी करू लागले (हुकूमशाही आली) तर जनतेच्या हातात शस्त्रे असतील, ज्याने ते असे सत्तांध सरकार उलथवून देतील. 1791 साली, जेव्हा ही घटना दुरुस्ती झाली, तेव्हा हे वाटणे साहजिक होते. पण आत्ताच्या काळात लोकशाही संस्थारूपाने आणि बहुतांशी मनात रुजलेली असताना अमेरिकन जनतेला तेच वाटणे योग्य ठरते का? हा प्रश्न आहे. दोन टोकांचे विचार, आर्थिक हितसंबंध आणि सामाजिक मन:स्थिती या तीन व्यापक मुद्द्यांमध्ये त्याची कारणे दिसतात.


america
 
गोळीबारामध्ये मृत झालेल्यांचे समाधिस्थळ
 
अमेरिकन राजकीय आणि सामाजिक मते एकतर उदारमतवादी म्हणजे liberals/ डावे अथवा पारंपरिक conservative/उजवे या दोन प्रकारची असतात. डावे सरकारी हस्तक्षेप अधिक मान्य करणारे असतात. त्यांना दुसरी घटना दुरुस्ती काढून टाकून स्वसंरक्षणार्थ शस्त्र ठेवण्याचा नागरी हक्क काढून टाकायचा आहे, तर उजव्यांना कुठलीच तडजोड मान्य नसते. जे बर्‍यापैकी संतुलित विचारांचे आहेत, त्यांचे म्हणणे असे की शस्त्र बाळगण्याचा नागरी हक्क मर्यादित असू दे - ज्यामध्ये जरी नागरिकांना बंदुका ठेवता आल्या, तरी त्या ऑटोमॅटिक अथवा सेमी-ऑटोमॅटिक पद्धतीच्या नसाव्यात, ज्यामध्ये बेछूट गोळीबार होणे टाळता येऊ शकेल.
 
 
मग बंदुका ठेवण्याच्या बाजूने असलेले नागरिक, विचारवंत, राजकारणी यांचा आणखी एक मुद्दा असतो - अमेरिकेत विशेषत: शहरीकरण कमी असलेल्या दक्षिणेत आणि पश्चिम-मध्य भागात असे अनेक नागरिक आहेत, जे दुर्गम ठिकाणी राहतात. त्यांना रानटी प्राण्यांपासून अथवा स्वसंरक्षणार्थ बंदुका ठेवणे गरजेचे असू शकते आणि तसे ते बाळगतात.
 
 
थोडक्यात, स्वातंत्र्य आणि स्वसंरक्षण असे दोन मुद्दे बंदुकीच्या बाजूने होतात.
 
 
काही आकडेवारीनुसार नागरिकांकडे बंदुका असणार्‍या देशांमध्ये अमेरिकेचा नंबर पहिला आहे. Small arms Survey या संस्थेने तयार केलेल्या आकडेवारीनुसार केवळ अमेरिकेतच लोकसंख्येपेक्षा अधिक (120 प्रती 100 नागरिक) नागरी बंदुका आहेत. बंदुकांची प्रत्यक्ष वार्षिक उलाढाल अब्जावधी डॉलर्समध्ये आहे आणि त्याचा अप्रत्यक्ष आर्थिक फायदा त्याच्या कितीतरी पटीने अधिक आहे. अर्थात हा फायदा हा गन इंडस्ट्री आणि उजव्या बाजूच्या विचारसरणीस आर्थिक आश्रय देऊन पुढे करण्यात होतो. Guns Don't Kill People, People Kill People - अशा दिशाभूल करणार्‍या विधानांनी हे बंदूकप्रेमी जनतेला अधिकच टोकाचे समर्थक म्हणून तयार करण्याचे काम चालते.


america
 
साधारण 25% अमेरिकन मुले एकच पालक असलेल्या परिवारात राहतात. बर्‍याचदा त्यांना वाढवणारी व्यक्ती ही त्यांची आई असते, कारण वडील सोडून गेलेले असतात. गेल्या काही दशकांपासून अधिक गतीने ढासळत जाणारी विवाहसंस्था, लग्न न करता होणारी मुले, इतर घरच्यांची आर्थिक, मानसिक आदी मदत नसणे अथवा असली तरी अत्यंत मर्यादित असणे यातून मुले वाढवताना विविध आव्हानांना अशा एकट्या पालकांना (परत, विशेषत: मातांना) तोंड द्यावे लागते. त्यातून त्या मुलांना वाढत्या वयात येणारे अनुभव, शाळेत काही वेळेस जाणवणारा एकटेपणा अथवा टोकाच्या मस्तीचा (bullying) करावा लागणारा अबोल सामना. भर म्हणून काय स्मार्टफोनपासून ते विशेष उपकरणांनी खेळले जाणारे हिंस्र विचारांचे व्हिडिओ गेम्स आदीचा एकत्रित परिणाम म्हणून टोकाची विकृती तयार होणे सहज शक्य होते. त्यात जर वयाच्या अठराव्या वर्षी सहज बंदूक मिळाली, तर डोक्यातील विचार हाताने प्रत्यक्षात आणणे अवघड जात नाही. अवघड जाते ते त्याचे स्वत:वर होणारे परिणाम, जे बहुतांशी लहान वयात जीवन संपण्यातच होतात. त्याव्यतिरिक्त मानसिक संतुलन बिघडलेली आणि मानसोपचारासाठी आधुनिक औषधांवर अतिअवलंबून अधिकच अस्थिर झालेली मनेदेखील अधिक हिंसक होतात, अशी संशोधनेदेखील झालेली आहेत. पण आज तरी वैचारिक दुभागणीमुळे आणि आर्थिक हितसंबंधांमुळे यावर कोणी गांभीर्याने तोडगा काढण्यासाठी विचार करताना दिसत नाही.
अमेरिकन मानसिकतेत, जर सरकारी सत्ता निरंकुश झाली तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून नागरिकांना शस्त्र बाळगण्याचे हक्क हवेत असे म्हटले जाते. पण भारतातील अनुभव काय आहे? 1975 साली आणीबाणी जाहीर करून इंदिरा गांधी आणि काँग्रेस सरकारने निरंकुश सत्ता राबवण्याचा प्रयत्न केला. जनतेकडे त्याविरोधात दोन हात करण्यासाठी शस्त्रे नव्हती. तरीदेखील जनतेच्या चळवळीने आणि लोकशाही मार्गाने सत्तांतर घडवून आणले. मग हे अमेरिकेसारख्या जगातील सर्वात प्रबळ लोकशाहीस का जमणार नाही? अर्थात अमेरिकन नागरिक या अनुभवाचा विचार कसा करतील अथवा त्यांना आधी हे स्वत:च्या जगाबाहेरील काही माहीत असेल का, हे प्रश्नच आहेत. ते अमेरिकन समाजाला त्यांच्या तरुण राष्ट्राची संस्कृती घडवताना शिकायचे आहेत. तूर्तास भारताने त्यातून काय शिकण्याची गरज आहे, याचा विचार करायला हवा.
 
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या विज्ञाननिष्ठ लेखांमध्ये ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ असा एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी आधुनिकतेकडे दुर्लक्ष करणार्‍या आणि बुरसटलेल्या पुराणमतवादाचा अत्यंत योग्य समाचार घेतला आहे. आज अमेरिकेतील विचारांची पद्धती काय दाखवते, तर बुरसटलेले विचार हे केवळ धार्मिक अथवा हजारो वर्षांपूर्वीचेच असतात असे नाही, तर जे स्वत:च्या विचारांशी अडून बसतात असे अगदी दोनशे-सव्वादोनशे वर्षांपूर्वीचे विचारदेखील समाजाला वेठीस धरू शकतात. स्थितिस्थापकत्व हेच अर्थातच सगळ्याचे कारण असते. ज्या स्थितिस्थापकत्वतेचा भारतीयांस तोटा झाला, त्यास दूर करून आज भारतीयांचे आणि पर्यायाने भारताचे जगातील स्थान अधिकाधिक महत्त्वाचे होत आहे. तसे होताना आपण अमेरिकेचे आणि जगभरचे आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आत्मसात केले. पण आज दोन शब्दात सांगायचे झाले, तर आधुनिकीकरण आणि अमेरिकीकरण यातील फक्त पहिलेच जवळ करण्याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0