मधाचा ‘मद’

27 Jun 2022 18:26:15
या लढाईत भाग घेण्यासाठी राजाने नेमलेले वेगवेगळे अधिकारी, मंत्री वेगवेगळ्या गटात गेले. राजाला सोडून गेले. मंत्र्याने राजाला हे सर्व सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, ‘‘असले दहा गेलेत तर मी छप्पन उभे करीन. माझ्या वडिलांची पुण्याई खूप मोठी आहे. तू मध खायचे सोडून नसत्या गोष्टी मला कशाला सांगतोस? बस आणि मध-भात खा.’’


shivsena
 
ही ब्रह्मदेशातील राजाची गोष्ट आहे. गोष्ट तशी काल्पनिक आहे. या राजाचे वडील सम्राट होते. त्यांना वडिलोपार्जित राज्य मिळाले नव्हते. अत्यंत कष्टाने, कौशल्याने आपल्या सर्व विरोधकांचा पाडाव करून त्यांनी हे राज्य संपादन केले. राज्य मिळविणे हे अतिशय कठीण काम असते. त्याचे श्रेय जरी एका माणसाला दिले जात असले, तरी एकटा माणूस राज्य मिळवू शकत नाही. त्याला सहकारी लागतात. हे सहकारी निष्ठावान, प्रामाणिक, राजाच्या शब्दासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असणारे असावे लागतात.

 
अशी निष्ठावान माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत. अनुयायांत निष्ठा निर्माण करण्यासाठी तसे आचरण ठेवावे लागते. ब्रह्मदेशातील या राजाचे आचरण तसे होते. त्याचे ध्येय निश्चित होते आणि या ध्येयासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी असे. वाट्टेल ते याचा अर्थ ‘मनाला वाट्टेल ते’ असे नव्हे. राजाने आपले ध्येय ठरविले होते की, लोकांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला पाहिजे. आपल्या हक्कांसाठी लढण्याची जिद्द निर्माण केली पाहिजे आणि आपले हक्क संघर्ष करून मिळविले पाहिजे. या बाबतीत त्याने कधीही तडजोड केली नाही. आपल्या विचारांवर तो अतिशय ठाम राहिला.

अशा नेत्याने, म्हणजे राजाने निष्ठावान सरदार निर्माण केले. त्या सरदारांना हे माहीत होते की, आपला संघर्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी नसून किंवा राजवैभव भोगण्यासाठी नसून आपला संघर्ष स्वाभिमान आणि अस्मिता जागविण्यासाठी आहे. यामुळे आपणहोऊन सर्वांनी आपल्या निष्ठा आपल्या राजाच्या चरणी अर्पण केल्या. राजाने इच्छा प्रदर्शित करावी आणि या सर्व सरदारांनी ती पूर्ण करावी अशी परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू राजाचा प्रभाव वाढत गेला आणि कालांतराने त्याने राज्य निर्माण केले.
 
 
जन्माला आलेला कुणीही अमर नसतो. त्याला कधी ना कधी जावे लागते. तसा राजादेखील आपले जीवितकार्य पूर्ण करून वाढत्या वयामुळे स्वर्गवासी झाला. वारसा हक्काने हे राज्य त्याच्या मोठ्या मुलाला प्राप्त झाले. मोठ्या मुलाला राज्य प्राप्त करण्यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला नाही, कसलेही कष्ट करावे लागले नाहीत, केवळ मुलगा म्हणून राज्य त्याच्या पदरात पडले. सरदारांची ही अपेक्षा होती की, राजाचा मुलगा राजाच्या धैर्याने आणि राजाच्या विचाराने राज्य चालवील. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही.

हा तरुण राजा तरुण सल्लागारांच्या गराड्यात अडकला. एक-एक करून जुनी माणसे दूर केली. वडील ज्याप्रमाणे आज्ञा सोडीत, तशा आज्ञा यानेदेखील सोडायला सुरुवात केली. राजशिस्तीमुळे सरदार मंडळींनी काही काळ या आज्ञांचे पालन केले. राजाची निर्णयक्षमता, परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता, राजमित्र जोडण्याची क्षमता याच्या खूप मर्यादा होत्या. त्याचे सल्लागार त्याला सल्ले देत आणि काही मागचा-पुढचा विचार न करता तो हे सल्ले मानत जाई.
 
प्रत्येक राज्याला शत्रू असतात. काही शत्रू उघड असतात, काही छुपे असतात, तर काही अस्तनीतील निखार्यातसारखे असतात. राजाला सतत सावध राहावे लागते. खर्यात मित्रांना ओळखावे लागते, त्यांना जवळ करावे लागते, त्यांच्याशी संबंध वाढवावे लागतात आणि दिखाऊ मित्रांना ओळखून चार हात दूर ठेवावे लागते. अस्तनीतील निखार्यांळना पाली-झुरळाप्रमाणे झटकून द्यावे लागते. या तरुण राजाला हे काही जमेना.

 
एके दिवशी राजवाड्याच्या खिडकीजवळ बसून तो मध आणि भात खात होता. हा ब्रह्मदेशातील राजा आहे. त्यामुळे मध आणि भात हा त्यांच्या आहारातील सामान्य प्रकार होता. खाता खाता मधाचा एक थेंब खिडकीतून खाली पडला. त्याच्याबरोबर जेवणारा आणि त्याच्या वडिलांशी एकनिष्ठ असणारा सरदार त्याला म्हणाला, ‘‘महाराज, मधाचा एक थेंब खाली सांडला आहे.’’ तरुण राजा म्हणाला, ‘‘अरे, सांडू दे, एका थेंबाने काय होते? वाडगाभर मध आहे, तुला हवं असल्यास त्यातील मध घे आणि खा.’’

 
थोड्या वेळाने मंत्र्याने खिडकीतून खाली पाहिले. एक उंदीर सांडलेला मध खाण्यासाठी आलेला होता. मंत्री राजाला म्हणाला, ‘‘महाराज, मध खाण्यासाठी उंदीर आलेला आहे.’’ राजा म्हणाला, ‘‘अरे, मध खाण्यासाठी उंदीरच येणार, कुत्रा थोडाच येणार?’’
मध खाणार्यार उंदराला समोरच्या खोलीतील एक मांजराने पाहिले आणि ती धावत आली. तिने उंदराला पकडले. त्याच वेळी शेजारच्या खोलीतील कुत्रा मांजरीला बघून भुंकत तिच्या अंगावर आला. उंदीर आणि मांजर, कुत्रा आणि मांजर यांचे वैर जन्मजात वैर आहे. मंत्र्याने हे पाहिले आणि राजाला म्हणाला, ‘‘महाराज, उंदीर खाण्यासाठी मांजर आली आणि मांजरीला बघून कुत्रा धावत आला. त्या दोघांचे आता भांडण सुरू आहे.’’ राजा म्हणाला, ‘‘जाऊ दे रे, तू मध-भात खा. मधाचा आस्वाद घे.’’

मांजरीच्या मालकिणीने पाहिले की, कुत्रा मांजरीवर धावून आला आहे. ती काठी घेऊन आली आणि तिने कुत्र्याच्या पाठीत काठी मारली. हे बघून कुत्र्याचा मालक त्या बाईच्या अंगावर धावून आला. त्या दोघांचे भांडण सुरू झाले. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. मंत्र्याने हे पाहिले आणि राजाला म्हणाला, ‘‘महाराज, मांजरीची मालकीण आणि कुत्र्याचा मालक भांडत आहेत.’’ राजा म्हणाला, ‘‘भांडू दे. मी त्या सर्वांना तुरुंगामध्ये पाठवून देईन. माझ्या राजवाड्याबाहेर भांडण करण्याची यांची हिम्मत कशी होते? मी त्यांच्या घरावर हातोडा मारीन, त्यांचा आवाज बंद करून टाकीन. ते काय समजतात स्वतःला? मी कोणाचा मुलगा आहे, हे त्यांना समजत नाही का? माझ्या बापाच्या नावाची भीती यांना वाटत नाही का?’’

मांजरीची मालकीण आणि कुत्र्याचा मालक यांचे भांडण चालू असताना दोन सैनिकी तुकड्या तेथे आल्या. त्यांनी चौकशी केली. एका सैनिकी तुकडीला मांजराच्या मालकिणीची बाजू खरी वाटली आणि दुसर्याअ सैनिकी तुकडीला कुत्र्याच्या मालकाची बाजू खरी वाटली. या तुकड्या दोघांचीही बाजू घेऊन आपापसात भांडण करू लागल्या. सैनिकच ते! केवळ शब्दाने नाही, तर शस्त्राने भांडण करू लागले. ही बातमी दोन्ही तुकड्यांच्या रेजिमेंटमध्ये गेली. आपल्या सहकार्यां ना मदत करण्यासाठी दोन्ही रेजिमेंटचे सैनिक आले. भांडणाचे पर्यवसान लढाईत झाले.. ही आपापसातील लढाई होती.
 
या लढाईत भाग घेण्यासाठी राजाने नेमलेले वेगवेगळे अधिकारी, मंत्री वेगवेगळ्या गटात गेले. राजाला सोडून गेले. मंत्र्याने राजाला हे सर्व सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, ‘‘असले दहा गेलेत तर मी छप्पन उभे करीन. माझ्या वडिलांची पुण्याई खूप मोठी आहे. तू मध खायचे सोडून नसत्या गोष्टी मला कशाला सांगतोस? बस आणि मध-भात खा.’’
 
राजाच्या हे लक्षात आले नाही की, ही लढाई नसून बंडाळी आहे. ती वेळीच शांत केली पाहिजे. ती शांत नाही केली, तर राज्य लयास जाईल. पण राजा मधाचा स्वाद घेण्यातच मग्न होता. मधाचा गोडवा त्याला काही सोडवत नव्हता. एका सैनिकाच्या तुकडीने इकडून-तिकडून पालापाचोळा, गवत गोळा केले आणि राजवड्याभोवती पेटवून दिले. तेव्हाचे ब्रह्मदेशातील राजवाडे लाकडाचे असत. बघता बघता राजवाड्याने पेट घेतला.


 
मंत्री राजाला म्हणाला, ‘‘महाराज, सैनिकांनी राजवाड्याला आग लावली आहे.’’ तेव्हा राजा थोडा जागा झाला. त्याने खिडकीतून खाली पाहिले, आग पसरत चालली होती. आता जर राजवाडा सोडला नाही तर आपण आगीत जळून जाऊ, असे त्याला वाटले, म्हणून तो परिवाराला बरोबर घेऊन अंगावरील कपड्यानिशी गुप्त दरवाज्याने राजवाड्याबाहेर पडला आणि पळाला. त्याचे प्राण वाचले, पण राज्य गेले.

बंड करणार्याि सैनिकांनी पुन्हा काही राजाला बोलावले नाही. मध-भात खाणारा राजा आम्हाला नको. आम्हाला आमच्यात मिसळणारा, आमची सुख-दुःखे जाणणारा, आमच्यावर संकट आले असता धावून येणारा, पाठीवर मायेचा हात ठेवणारा, भुकेल्या मुखात अन्नाचा घास देणारा राजा हवा, असे त्यांनी ठरविले. त्यांनी तसा राजा मिळविला.
 
 
ब्रह्मदेशातील लोककथेचे शीर्षक आहे ‘मधाच्या एका थेंबामुळे राज्य गेले’. कथा रचणारा प्रतिभावान मानला पाहिजे. त्याने सांगितले की, राजवैभवाचा मध हा सत्तेचा मद निर्माण करतो आणि मद शेवटी सत्तेचा शेवट करतो, म्हणून राजेलोकांनी खिडकीतून पडणार्याय मधाच्या एका थेंबाची काळजी केली पाहिजे.
 
9869206101
 
Powered By Sangraha 9.0