राष्ट्रपतिपदासाठी भाजपाप्रणीत आघाडीकडून ओरिसाच्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. भाजपा हा वैचारिक अधिष्ठान असलेला आणि त्यानुसार वाटचाल करणारा पक्ष आहे. याआधीही जेव्हा भाजपाला संधी मिळाली, तेव्हा भाजपाने अंत्योदय डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे.
सत्तेचे राजकारण हे मतपेढी आणि जनाधार यांच्या आधारे चालत असते. तुमचे विचार, तत्त्वे, भूमिका, कार्यपद्धती कितीही उच्च दर्जाची असली, तरी व्यापक जनाधार म्हणजेच संख्याबळ नसेल तर विचार प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. संख्याबळ वाढवण्यासाठी, म्हणजेच सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीच्या राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. भारतातील सर्वच राजकीय पक्ष अशा तडजोडी करत असतात. भाजपाही त्याला अपवाद नाही. भाजपाने मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर केलेली युती ही राजकीय तडजोड होती, हे पुढील काळात सिद्ध झाले आणि त्यातूनच दीर्घकाळ प्रलंबित असणारा 370 कलम हटवण्याचा प्रश्न मार्गी लावला गेला होता. असे असले, तरी सर्वच विषयांत राजकीय तडजोडी करण्याची आवश्यकता नसते, हेही भाजपाने दाखवून दिले आहे. उदाहरण म्हणून राष्ट्रपतिपदासाठी जाहीर केलेल्या उमेदवारांचा विचार करता येईल.
आजवर भाजपाला सत्ताधारी पक्ष म्हणून तीन वेळा राष्ट्रपतिपदाचे उमेदवार घोषित करण्याची संधी मिळाली. त्यानुसार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, रामनाथ कोंविद आणि आता द्रौपदी मुर्मू यांना भाजपा आणि मित्रपक्षांनी उमेदवारी दिली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे मुस्लीम समाजातून आले, तर रामनाथ कोविंद हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली असून त्या जनजाती (वनवासी) समूहाचे प्रतिनिधित्व करत आहेत. देशभरातील भाजपा आणि मित्रपक्षांची ताकद पाहता राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड होईल, असे सध्याचे चित्र आहे.
शाळा शिक्षिका ते राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार असा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास असला, तरी आमदार, मंत्री, राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले आहे. झारखंड राज्याच्या राज्यपालपदावर काम करताना त्यांनी जनजाती समूहाच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. अशा व्यक्तीला भाजपा व मित्र पक्षांनी उमेदवारी दिली आहे. काँग्रेस व मित्रपक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. पुढील महिन्यात निवडणूक होईल. या पार्श्वभूमीवर भाजपाचा अंत्योदयाचा मार्ग समजून घेतला पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानव दर्शन हे भाजपाचे वैचारिक अधिष्ठान असून अंत्योदय हे लक्ष्य आहे. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ही कार्यसूची आहे आणि त्यानुसारच या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली गेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अंत्योदय म्हणजे संधी, अंत्योदय म्हणजे पाठबळ, अंत्योदय म्हणजे सहभाग. भाजपाने याआधी देशाच्या सर्वोच्च स्थानी मुस्लीम, दलित समूहाला संधी दिली होती. आता जनजाती समूहाला ही संधी प्राप्त झाली आहे. असे करताना कोणत्याही प्रकारचे लांगूलचालन झाले नाही. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, रामनाथ कोंविद हे विज्ञान आणि कायदा या क्षेत्रांतील मान्यवर होते. द्रौपदी मुर्मू यांचेही शिक्षण क्षेत्रातील खूप मोठे योगदान आहे. गुणवत्ता आणि क्षमता लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करताना भाजपाने अंत्योदयाचा विचार दृष्टिआड केला नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की “आमच्यासमोर सांभाव्य उमेदवार म्हणून वीस जणांची यादी होती. त्यातून सर्वसहमतीने द्रौपदी मुर्मू यांचे नाव निश्चित झाले आहे. या प्रक्रियेमागे अंत्योदयाची प्रेरणा निश्चितच आहे. आपण सारे भारतीय आहोत, त्यामुळे आपण सर्व जण समाज आहोत अशी आपली भूमिका असेल, तर जिथे असमानता आहे,वंचना आहे, अज्ञान आहे, ती परिस्थिती बदलण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत.” जनजाती समूहाचे असंख्य प्रश्न आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य इत्यादी विषयांत या समाजाचे मागासलेपण जगजाहीर आहे. त्याचप्रमाणे धर्मांतराचा विळखाही या समाजाला पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने जनजाती समूहाला केंद्रस्थानी आणण्याचे काम भाजपा आणि मित्रपक्षांनी केले आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. भारताच्या पूर्वेकडील राज्यातील जनजाती समूहाच्या महिलेला उमेदवारी देताना अनेक पातळ्यांवर विचार केला गेला असेलच.
वर म्हटल्याप्रमाणे राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात. मात्र तडजोड कोठे करायची आणि तत्त्व व्यवहारात आणण्यासाठी आग्रही भूमिका कोठे घ्यायची, हे भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला माहीत आहे. त्यामुळे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निश्चिती ही अंत्योदयाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे आणि त्यासाठी भाजपा व मित्र पक्षांचे अभिनंदन केले पाहिजे.