आपले प्रजासत्ताकीय सामर्थ्य

20 Jun 2022 16:53:07
प्रजासत्ताकात प्रजा ही राजा असते. याचा अर्थ प्रजा सार्वभौम आहे. सर्व सत्तेचा उगम प्रजेतून होत असतो. प्रजासत्ताक ही राजेशाही नाही. राजेशाहीचा मुख्य गुण घराणेशाहीचा आहे. आपल्या प्रजासत्ताकाचे स्वरूप कसे आहे? जनता म्हणून आपण खरोखरच राजे आहोत का? की आपल्यावर कुणीतरी हुकमत गाजविणारी घराणी आहेत?

india
भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणते की, "We, The People Of India, Having Solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULER DEMOCRATIC REPUBLIC..' त्याचा मराठी अनुवाद असा, ‘आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य...’ यातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द 1976पर्यंतच्या संविधानात नव्हते. 1976 साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी उद्देशिकेत हे शब्द घुसडले. पण या लेखात या दोन शब्दांविषयी आज लिहायचे नाही. आज आपल्याला मूळ इंग्लिशमधील REPUBLIC या शब्दाविषयी लिहायचे आहे. रिपब्लिक या शब्दाला गणतंत्र किंवा प्रजासत्ताक असे दोन शब्द दिले जातात. त्यातील प्रजासत्ताक हा शब्द आपण घेऊ.

रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक याचा अर्थ काय होतो? हा शब्द कुठे आणि केव्हा प्रचारात आला? का आला? शासनपद्धतीत त्याचे अर्थ कोणते होतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय प्रजासत्ताकाच्या अर्थाचा बोध होणार नाही. सामान्य भाषेत प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य. प्रजासत्ताकात प्रजा हीच राजा असते. पुढे प्रश्न निर्माण होतो की, राजा म्हणजे काय? राजा म्हणजे एखाद्या देशाचा सार्वभौम सत्ताधीश. हा राजा वंशपरंपरेने गादीवर येतो. तो मेला की, त्याचा मुलगा किंवा बायको किंवा मुलगी किंवा त्याच्या राजवंशातील कुणीतरी सत्तेवर येते. म्हणजे सत्ता घराण्याच्या हाती राहते. राजा म्हणजे राजेशाही आणि राजेशाहीचा अर्थ वर दिल्याप्रमाणे होतो.

प्रजासत्ताकात प्रजा ही राजा असते. येथे राजाचा अर्थ वर दिलेल्या राजाच्या अर्थाप्रमाणे होत नाही. प्रजा ही राजा आहे, याचा अर्थ प्रजा सार्वभौम आहे. सर्व सत्तेचा उगम प्रजेतून होत असतो. प्रजा जे ठरवील ते राज्यात येईल. प्रजेला मान्य नसणारी कोणतीही गोष्ट राज्यात होणार नाही. या अर्थाने प्रजा सार्वभौम राजा असते.

प्रजासत्ताक ही राजेशाही नाही. राजेशाहीचा मुख्य गुण घराणेशाहीचा आहे. एका घराण्याची सत्ता हे राजेशाहीचे व्यवच्छेदक लक्षण असते. एक घराणे संपले की त्याची जागा दुसरे घराणे घेते. नावे बदलतात, परंतु राजेशाहीचे स्वरूप बदलत नाही. अमेरिका सोडली, तर जगातील सर्व देशांचा इतिहास म्हणजे राजेशाहीचा इतिहास आहे. या राजेशाहीविरुद्ध प्रजेने वेगवेगळ्या देशांत उठाव केले आहेत. इंग्लंडच्या प्रजेचा उठाव रिपब्लिक या शब्दाला जन्म देणारा आहे.

इंग्लंडच्या प्रजेने राजाच्या अनियंत्रित सत्तेवर 1215च्या मॅग्ना चार्टाने अनेक बंधने आणायला सुरुवात केली. राजाचे सार्वभौम अधिकार क्रमश: कमी करत आणले. ते अधिकार इंग्लंडच्या प्रजेने पार्लमेंटकडे द्यायला सुरुवात केली. पार्लमेंट म्हणजे संसद. संसद लोकांनी निवडली जाते. लोकप्रतिनिधींची मिळून संसद होते. संसदेकडे सार्वभौम अधिकार म्हणजे लोकप्रतिनिधींकडे सार्वभौम अधिकार आले. 1215पासून सुरू झालेली ही प्रक्रिया 1688पर्यंत चालली. 1688पासून राजाचे बहुतेक सर्व सार्वभौम अधिकार ब्रिटनच्या पार्लमेंटकडे हस्तांतरित झाले. अठराव्या शतकापासून राजा नामधारी राजा झाला. युद्ध पुकारण्याचा, तह करण्याचा, कर बसविण्याचा त्याचा अधिकार संपला. एकोणिसाव्या शतकात तो खेळातील पत्त्यातील राजाप्रमाणे मूल्य असलेला, पण शक्ती नसलेला राजा झाला. प्रजा सार्वभौम झाली, म्हणजे ती राजा झाली. या सार्वभौम प्रजेने राजघराणे कापून काढले नाही. आपला प्रतिनिधी म्हणून त्याला जिवंत ठेवले. इंग्लंडचा राजा किंवा राणी जनतेने निवडून न दिलेली, पण जनतेचे प्रतिनिधित्व करणारी एक संस्था झाली. इंग्लंडचे प्रजासत्ताक असे आहे.

अमेरिकेचे प्रजासत्ताक इंग्लंडपेक्षा थोडे वेगळे आहे. अमेरिकेच्या प्रजासत्ताकाने वंशपरंपरेने कुणाला सत्ता दिलेली नाही. अमेरिकन राज्यघटनेने प्रजासत्ताक निर्माण करताना सर्व प्रकारची घराणेशाही नाकारली आहे. कुठल्याही राष्ट्रपुरुषाचे राजघराणे वंशपरंपरेने अमेरिकेच्या राजगादीवर येत नाही. जनता त्याला निवडून आणत नाही. वॉशिंग्टन, जेफर्सन, मेडिसन, अलेक्झांडर हॅमिल्टन, बेंजामिन फ्रँकलिन, अब्राहम लिंकन इत्यादी अमेरिकेचे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांची घराणी अमेरिकेवर राज्य करीत नाहीत. अमेरिकेचे प्रजासत्ताक, घराणेशाहीमुक्त प्रजासत्ताक आहे.

आपणही आपल्या देशाला प्रजासत्ताक म्हणतो. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिवस असतो. या दिवशी आपण लोकशाही राज्यव्यवस्थेत गेलो आणि आपणच आपले राजे आहोत, याचा आनंद आपण साजरा करीत असतो. स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्षे झाली आहेत. पुढील वर्षी आपण 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करू. आपल्या प्रजासत्ताकाचे स्वरूप कसे आहे? जनता म्हणून आपण खरोखरच राजे आहोत का? की आपल्यावर कुणीतरी हुकमत गाजविणारी घराणी आहेत?

आपल्या उद्देशिकेत रिपब्लिक शब्द आहे, पण प्रत्यक्षात आपण आदर्श प्रजासत्ताक राज्यात जगत नसतो. घराणेशाही ही आपल्याकडे कायम झालेली आहे. पंतप्रधान पं. नेहरू यांचे घराणे सुरू झाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल-प्रियंका गांधी हे रांगेत उभे आहेत. राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. प्रियंका गांधींना मुले आहेत, ती उद्याच्या रांगेत आहेत. हे झाले केंद्राच्या बाबतीत. अनेेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांत हीच स्थिती आहे. मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्ष हा घराणेशाहीचा पक्ष आहे. लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी हा पक्षदेखील घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातील शिवसेना घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हादेखील घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. ही घराणेशाही प्रजासत्ताकाच्या संकल्पनेत बसत नाही.

घराणेशाहीची ही लागण केवळ मुख्यमंत्री, पंतप्रधान, पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व एवढ्यापुरती मर्यादित राहत नाही, ती खाली झिरपत जाते. खासदारकीची घराणेशाही सुरू होते, आमदारकीची घराणेशाही सुरू होते, नगरसेवकांची घराणेशाही सुरू होते. थेट खाली ग्रामपंचायतीपर्यंत हे घराणेशाहीचे लोण पसरते. घराणेशाही आपल्या घराण्यातील व्यक्ती सोडून इतर कुणालाही सत्तेच्या राजकारणात पुढे येऊ देत नाही. आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होणार नाही, याची काळजी घराण्यातील प्रत्येक नेता घेत असतो. तो असे सांगत असतो की, मीच सर्वेसर्वा आहे. मलाच सर्व काही कळते. माझ्या घराण्याचे वलय आहे. माझ्या नावामुळे मते मिळतात. यामुळे मी काय म्हणतो ते तुम्ही सर्वांनी ऐकले पाहिजे आणि मी जे काही म्हणतो ते केले पाहिजे. माझ्याविरुद्ध बोलण्याचे धाडस करता कामा नये.

घराणेशाहीत ज्याच्याकडे राजकीय कर्तृत्व आहे, राजकीय दृष्टी आहे, कायदा करण्याचे ज्ञान आहे आणि परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे, असा घराण्याबाहेरचा नेता कुजविला जातो. त्याला पुढे येऊ दिले जात नाही. पक्षात त्याला दुय्यम किंवा तृतीय स्थानावरच ठेवले जाते. यात जसे त्या व्यक्तीचे नुकसान आहे, तसे समाजाचे आणि देशाचेही नुकसान आहे. घराणेशाहीची महती सांगण्यासाठी नेता लोकांच्या भावनेला कौशल्याने हात घालतो. मी अमुक अमुक यांचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी राजकारणातील महत्त्वाचे पद प्राप्त करावे. दुसरा नेता म्हणतो की, माझे वडील खरे जननायक होते, मी त्यांचा वारस आहे. वारसा हक्काने मीदेखील जननायक आहे. (माझे काही कर्तृत्व नसले तरीही) पक्षातील महत्त्वाची पदे मलाच मिळाली पाहिजेत.

घराणेशाहीचा नियम असा आहे की, घराणे सुरू करणारा कर्तृत्ववान असतो, त्याला एक दृष्टी असते, त्याचे विचार पक्के असतात, आपल्या ध्येयासाठी तो वाट्टेल ते करण्यास तयार असतो. वारसा हक्काने जो नेता होतो, त्याला फुकटात सर्व प्राप्त होते, मिळविण्यासाठी कष्ट करावे लागत नाही, तो फक्त फुशारक्या मारत बसतो. बापाने जे कमाविले आहे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे, हीच त्याची भावना असते. म्हणून त्याची भाषा उर्मट असते. तो इतरांना फारशी किंमत देत नाही. त्याच्या नावाभोवती वलय असते. हे वलय त्याचे काही काळ संरक्षण करते, पण ते जन्मभर पुरत नाही.

घराणेशाहीचा दुसरा नियम असा आहे की, घराणेशाही वाढवायची असेल तर वारशाकडे स्वत:चे स्वतंत्र कर्तृत्व असावे लागते. ते त्याने सिद्ध करून दाखवावे लागते. बापाच्या किंवा पूर्वजांच्या पुण्याईवर चिरकाल जगता येत नाही. इतिहासात अनेक राजघराणी कर्तृत्वहीन वारशांमुळे नाश पावली आहेत. लोकशाहीतील राजघराण्यांनादेखील हाच नियम लागू होतो. आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कष्ट करावे लागतात. लोकशाहीत जनतेत सतत जाऊन मिसळावे लागते. जनसंवादाला पर्याय नाही. मनोर्‍यात बसून राजसत्ता उपभोगता येते, पण लोकांच्या मनावर सत्ता गाजविता येत नाही, म्हणून मनोर्‍यातील सत्ता फार टिकत नाही. आपण प्रजासत्ताकात जगणारी प्रजा आहोत, म्हणून प्रजासत्ताकाच्या पहिल्या नियमाचे पालन आपण केले पाहिजे. हा पहिला नियम असा की, घराणेशाहीची सत्ता नको, सत्ता लोकांची हवी. लोकांच्या नावाने सत्ता भोगणार्‍यांची सत्ता नको. लोकांना जबाबदार असणारे सत्ताधीश हवेत. पक्षालाच केवळ जबाबदार असणारे सत्ताधीश नकोत. हे सर्व घडवून आणण्याचे सामर्थ्य प्रजेत - म्हणजे तुमच्यात आणि आमच्यात, म्हणजे आपल्या सर्वांत आहे, ते आपण ओळखावे.

Powered By Sangraha 9.0