@राहुल देशपांडे । 9325395252
ज्येष्ठ चित्रकार व बोधचित्रकार रवी परांजपे (87) यांचे पुण्यात 11 जून रोजी निधन झाले. परांजपे यांनी व्यक्तिचित्रे, समूहचित्रे, निसर्गचित्रे, स्थिरचित्रे अशा विविध चित्रप्रकारांत काम केले. तसेच सर्वच रंगमाध्यमांवर प्रभुत्व असल्यामुळे प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने माध्यमांची हाताळणी करून त्यांनी सातत्याने अभिव्यक्ती करीत स्वत:ची अशी एक प्रतिमा निर्माण केली होती. चित्रनिर्मितीतील भरीव योगदानाबरोबरच चित्रकला क्षेत्रातील घडामोडींबद्दल स्वत:ची परखड मते मांडणारे लेखनही त्यांनी केले. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेेख.
दर ते वेचावे आणि सुंदर करोनी मांडावे स्व आणि इतरांसाठी’ अशी सौंदर्यवादी भूमिका घेऊन सहा दशकांहून अधिक काळ ज्येष्ठ आणि आदरणीय चित्रकार रवी परांजपे यांनी सातत्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण चित्रनिर्मिती केली. उपयोजित व अभिजात कलेतील त्यांचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक व मार्गदर्शक ठरेल, हे निश्चितच आहे.
8 ऑक्टोबर 1935 रोजी बेळगाव येथे रवी परांजपे यांचा जन्म झाला. घरातूनच कलेचे संस्कार व वातावरण लाभले. पुढे चित्रकार के.बी. कुलकर्णी यांच्याकडे व जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी चित्रकलेचे उच्चशिक्षण पूर्ण केले. 1960च्या सुमारास त्यांनी व्यावसायिक चित्रकार म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. रतन बात्रा स्टुडिओ, टाइम्स ऑफ इंडिया, बोमास अशा संस्थांतून जाहिरात व प्रकाशन अशा दोन्ही क्षेत्रांत शैलीदार कलावंत म्हणून त्यांनी आपली ओळख लवकरच निर्माण केली. नवीन सर्जनक्षितिजांचा शोध घेत सतत नावीन्यपूर्ण व दर्जेदार कलानिर्मिती करताना अभिजात कलेची मूल्ये आपल्या व्यावसायिक कामात कायमच जपली. परिणामस्वरूप 1996 साली त्यांना उपयोजित कलेतील सर्वोच्च मानाचा ‘कॅग हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार प्राप्त झाला.

स्वातंत्र्योत्तर भारतात नवनिर्मितीचे वारे वाहत असताना समाजात घडून येणारे बदल, जीवनशैलीतील बारकावे, शेती, औद्योगिक क्रांती, पंचवार्षिक योजना यांचे प्रतिबिंब त्यांच्या उपयोजित कामात स्पष्टपणे दिसते. म्हणूनच 1960-70च्या दशकातील त्यांचे काम हे त्या कालखंडाचा दृश्य दस्तऐवज म्हणून महत्त्वाचे ठरते. भारताबरोबरीने त्यांना नैरोबी येथेही कामाची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीस कलात्मक उंची मिळाली. जाहिरात मोहिमा, पोस्टर, कॅलेंडर्स याबरोबरीनेच बुक व मॅगझीन कव्हर्स, एडिटोरियल इलस्ट्रेशन अशा उपयोजित कलेतील सर्वच कलाप्रकारांत त्यांनी उत्तम दर्जाचे काम करून आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय ‘पर्स्पेक्टिव्ह रेंडरिंग्ज’ हा कलाप्रकार त्यांनी आपल्याकडे रुजवला व त्यात मानदंड ठरेल असे काम करून ठेवले.
मूळचा अभिजात कलाकाराचा पिंड असलेल्या रवी परांजपे यांनी अभिजात चित्रकलेच्या क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. सशक्त, ऊर्जायुक्त व भावस्पर्शी रेषा, अनोखे रंगभान, रंगलेपन तंत्रातील वेगळेपण, आकार व चित्रअवकाश यांचे नाते सांभाळत केलेली निर्दोष चित्ररचना या कलेतील घटकांबरोबरच त्यांनी विविध चित्रविषय हाताळले. भारतीय ग्रामीण जीवन, संस्कृती, पारंपरिक जीवनशैली, लोककला यांच्या जोडीने ब्रिटिश वास्तवदर्शी रेखांकन अणि आधुनिक कलेतील सकारात्मक विचार यांचे एकत्रीकरण त्यांच्या पेंटिंग्जमधून दिसून येते. म्हणूनच त्यांची पेटिंग्ज एकाच वेळी आधुनिक आणि अस्सल भारतीयत्व दर्शवणारी ठरतात.

चित्रविषयाला दिलेला भावनिक प्रतिसाद दृश्य स्वरूपात नोंदवण्यासाठी त्यांनी रंगमाध्यमाच्या शक्यतांचा वेगळा शोध घेतला आणि त्यातून स्वत:च्या रंगलेपन पद्धती विकसित केल्या. यामुळे त्यांच्या चित्रात दृश्यात्मक विविधता व त्यासाठी घेतलेले सौंदर्यनिर्णय दिसून येतात. हे त्यांच्या चित्राचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तैलरंग, जलरंग, अॅक्रेलिक्स, कलर पेन्सिल, पेस्टल अशा विविध रंगमाध्यमांवर त्यांची हुकमत होती व या सर्व रंगमाध्यमांत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण चित्रनिर्मिती केलेली आहे. आधी घेतलेल्या सौंदर्यनिर्णयांना नव्या निर्णयांची जोड देत नव्या सर्जनक्षितिजांचा शोध घेणे हे त्यांच्या चित्रनिर्मितीचे सूत्र राहिले आहे. म्हणून विविध टप्प्यांवरील त्यांची चित्रनिर्मिती पाहिली की, माध्यमांतील विविधता असली तरीही त्यात एक समान वैचारिक सूत्र जाणवते.
जागतिक चित्रपरंपरेचा डोळस अभ्यास केल्यामुळे त्यांनी इंप्रेशनिझम, पोस्ट इंप्रेशनिझम, नबी पेंटर्स, ग्लास्गो बॉइज याबरोबरच आधुनिक कलेतील सकारात्मक विचार आत्मसात केले व रंगसंयोजन, चित्ररचना, रंगलेपन यात आधुनिक कलेचे चित्रकाराला बहाल केलेले स्वातंत्र्य मनमुराद उपभोगले व वैविध्यपूर्ण चित्रनिर्मिती केली. भारतीय पारंपरिक चित्रकला, लोककला यातील चित्ररचना व रंगविचार यातून स्फूर्ती घेऊन त्यांनी वेगळ्या धाटणीची चित्रे तयार केली. त्यांच्या रेखांकनप्रधान चित्रशैलीला निराळ्या पद्धतीने व्यक्त होण्याची संधी यातून मिळाली. त्यांच्या चित्रांना म्हणूनच देशात व विदेशात मोठ्या प्रमाणावर रसिकांकडून व जाणकारांकडून दाद मिळाली. याची दखल म्हणूनच अलीकडेच त्यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चा मानाचा ‘रूपधर जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला.

अशा तर्हेने उपयोजित व अभिजात कलेतील हे मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले ते एकमेव भारतीय चित्रकार आहेत. सौंदर्यवादी वास्तवदर्शी चित्रनिर्मिती करताना ‘माझी चित्रे म्हणजे दृश्य संगीत आहेत’ अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर भारतीय चित्रकलेतील कमकुवत विचारांवर आधारित सौंदर्यद्रोही आधुनिक कलेला त्यांनी स्पष्टपणे विरोध केला. कोणत्याही कंपूशाहीत न अडकता गॅलरी व चित्रदलाल यांचे लांगूलचालन न करता केवळ आपल्या गुणवत्तेवर त्यांनी स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला. देशात व परदेशात त्यांच्या प्रदर्शनांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादाला म्हणूनच वेगळे महत्त्व आहे, असे वाटते.
स्वान्तसुखाय चित्रनिर्मितीबरोबरच त्यांनी चित्रकलेविषयक आपले विचार व ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने चित्रकलाविषयक पुस्तकांची निर्मिती केली. यात आधुनिक कलेतील महत्त्वाच्या चित्रकारांवर आधारित ‘शिखरे रंग-रेषांची’ हे महत्त्वाचे पुस्तक आहे, तसेच कृष्णधवल व रंगीत बोधचित्रातील वैचारिक व तांत्रिक बाबींचे सखोल विवेचन करणारी ‘माय वर्ल्ड ऑफ इलस्ट्रेशन’ पुस्तके महत्त्वाची आहेत. अभिजात कलानिर्मितीचा वैचारिक प्रवास व्यक्त करणारे ‘व्हेन आय सिंग थ्रू कलर्स’ तसेच आउटडोअर पेंटिंग व लाइफ ड्रॉइंग विषयांवरील पुस्तके पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत.

आपल्या चित्रनिर्मितीतून सौंदर्यविचारांचा पुरस्कार करताना त्यांनी सौंदर्यदृष्टीचे व्यापक परिणाम व महत्त्व कुटुंब, समाज व राष्ट्रहिताचे कसे ठरू शकते यावर चिंतन करून ‘नीलधवल ध्वजाखाली’, ‘तांडव हरवताना’, ‘भारत काल आणि आज’ अशी पुस्तके साकारली. यातून त्यांची चिंतनशीलता, भारतीय संस्कृती, आधुनिक भारताचे प्रश्न यावर केलेले भाष्य आणि त्यांच्या वैचारिक परिघाची व्याप्ती याची प्रचिती येते. सौंदर्यदृष्टीची पेरणी, समाज आणि कला, राष्ट्रउभारणी व संवर्धन यासाठी सौंदर्यदृष्टी कशी पोषक ठरू शकते, याबाबतचे त्यांचे चिंतन व विचार मौलिक असेच आहेत.
चित्रकलेच्या क्षेत्राबद्दलही ते खूप सजग होते. कलाशिक्षणातील दुरवस्था, कलाक्षेत्रात शिरकाव झालेल्या अनिष्ट रूढी यांच्यावर त्यांनी आपल्या लेखनातून सडेतोड मतप्रदर्शन मांडले, तसेच तरुण कलाकारांपुढील आव्हाने, प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘रवी परांजपे फाउंडेशन’ची स्थापना करून कलाप्रदर्शनासाठी कलादालन, कार्यशाळा, मार्गदर्शन मिळेल अशी कायमस्वरूपी व्यवस्था केली. अनेक गुणी कलाकारांना स्वत:च्या वडिलांच्या नावचा कृ.रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार प्रदान केला, ज्यायोगे या क्षेत्राला एक सक्षम व्यासपीठ मिळाले. ज्येष्ठ चित्रकार असूनही ते तरुण होतकरू कलाकारांना नेहमीच मार्गदर्शन करत असत. चित्रनिर्मितीतील तंत्र, शास्त्र आणि कलाविचार अशा सर्वच पातळ्यांवर ते योग्य पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन करत असत. कलाविषयक सर्व उपक्रमांत ते कायमच सहभागी होत असत, कारण कलाकार व समाज यांच्यामधील दरी कमी केली जावी, समाजातील सर्व घटकांना कला व कलाकारांबद्दल योग्य प्रतिमा असावी याबाबत ते जागरूक होते. सकाळ बालचित्रकला स्पर्धेसाठी त्यांनी अनेक वर्षे मार्गदर्शन केले. तसेच संस्कार भारतीबरोबरही ते संलग्न राहिले. चित्रकलेबरोबर शिल्पकला, संगीत, लोककला याबाबतही ते विशेष आस्था बाळगून होते. या सर्व उपक्रमांमागे कला समाजात रुजावी अशी त्यांची कायमच तळमळ असे, म्हणूनच स्लाइड शो, कलेविषयक व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा यासाठी त्यांचे मौलिक मार्गदर्शन असे.
रवी परांजपे यांनी उपयोजित कला, अभिजात कला असो, कायमच गुणवत्ता, दर्जा सांभाळत उच्च दर्जाची कलानिर्मिती केली. कोणताही कलाप्रकार असो, ती चित्ररसिकांवर दृश्यसंस्कार करण्याची एक संधी आहे असेच मानून त्यांनी काम केले आहे. म्हणूनच ते अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित होते. दयावती मोदी पुरस्कार, कॅग हॉल ऑफ फेम, रूपधर जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स, कोरियन डिझाइन जनरल, महाराष्ट्र राज्य पुरस्कार अशा चित्रकलेतील पुरस्कारांबरोबरच ‘भैरूरतन दमाणी पुरस्कार’ व साहित्यातील इतरही पुरस्कार त्यांना मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळातील परंपरा व आधुनिकता यांचा अप्रतिम संगम घडवणारा व उच्च दर्जाची कलानिर्मिती करणारा महत्त्वाचा चित्रकार म्हणून उपयोजित तसेच अभिजात चित्रक्षेत्रात त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाईल. त्यांच्यामागे असलेले कलासंचित पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, हे निश्चितच आहे.