महाराष्ट्रातल्या ‘हुनर’बाज महिला उद्योजक

06 May 2022 12:17:32
 @सोनल तुपे 
 महाराष्ट्रातूनसुद्धा विविध भागांतून हस्तकला, पाककला संस्कृती जपणारी कलाकार मंडळी हुनर हाटमध्ये आपले स्टॉल्स लावून सहभागी झाली होती. महाराष्ट्रातल्या एकूण स्टॉल्सपैकी निम्म्याहून अधिक स्टॉल्स महिलांचेच आहेत, हे निरीक्षण मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेलं. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील हुनरबाज महिला उद्योजकांची भेट घेतली... या निमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय करून देणारा लेख.


hunnar

निर्जीव वस्तूंमध्ये जिवंतपणा आणण्याची किमया जर कोणी करू शकत असेल, तर तो म्हणजे एक कलाकार! आपल्या कलेच्या परीसस्पर्शाने हा कलाकार कधी एका निर्जीव कागदावर रेखाटलेल्या चित्रालाही बोलतं करतो.. तर कधी मातीतून घडवलेल्या शिल्पालाही आपलंसं करतो.. तर कधी एका साध्या दगडातही जीव आणतो...

अशाच एकापेक्षा एक सरस किमया लीलया साकारल्या आहेत आपल्या भारताच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या कलाकारांनी आणि या कलाकारांची ही कला पाहण्याची संधी जिथे मिळाली, जिथे या कलाकारांचं हुनर बघता आलं, ते ठिकाण म्हणजे ’हुनर हाट’!
आपल्या देशातल्या या अस्सल कलाकारांची ही हुनर जगासमोर यावी, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेलं हे एक उत्तम व्यासपीठ.



hunnar
केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने मुंबईत यंदाचं 40वं हुनर हाट प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळाली आणि भारताच्या कलावैभवाचं प्रतिभावान दर्शन मनाला खोलवर स्पर्शून गेलं.

देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या या कलाकारांची कला म्हणजे त्यांच्या प्रतिभेचं, मेहनतीचं आणि जिद्दीचं प्रतीकच! अशाच काही कलाकारांशी हितगुज करता आलं आणि त्यांच्या वेगवेगळ्या कहाण्या, त्यांच्याबद्दलचा, त्यांच्या कलेबद्दलचा आदर आणखीनच वाढवून गेल्या.


hunnar
महाराष्ट्रातूनसुद्धा विविध भागांतून हस्तकला, पाककला संस्कृती जपणारी कलाकार मंडळी हुनर हाटमध्ये आपले स्टॉल्स लावून सहभागी झाली होती. महाराष्ट्रातल्या एकूण स्टॉल्सपैकी निम्म्याहून अधिक स्टॉल्स महिलांचेच आहेत, हे निरीक्षण मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेलं. या प्रदर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील हुनरबाज महिला उद्योजकांचीच भेट झाल्याचं समाधान मिळालं.

शालिनीचा आकर्षक स्टोन आर्ट स्टॉल

सायकॉलॉजीमधून शिक्षण घेतलेली मूळची छत्तीसगडची पण आता महाराष्ट्राची झालेली शालिनी शाहू सध्या बदलापूरला राहते आहे. स्टोन पेंटिंग अर्थात दगडावर केलेलं नक्षीकाम, अगदी हुबेहूब खरी वाटणारी कागदापासून बनवलेली फुलं, कागदापासून बनवलेल्या आकर्षक बाहुल्या, पर्यावरणस्नेही पेन स्टँड, फूलदाणीवर केलेलं रेखीव नक्षीकाम असा कलेचा खजिना शालिनीच्या स्टॉलकडे सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.


hunnar
लहानपणापासून कलेचं हे बीज तिच्यात होतंच, पण त्याला लग्नानंतर नवर्‍याच्या पाठिंब्याने खर्‍या अर्थाने पालवी फुटली, असं म्हणता येईल. कुटुंब, मित्रपरिवार यांना आपल्या या कलेचा खजिना भेटवस्तूच्या रूपात देणं सुरू झालं आणि हळूहळू त्याचं रूपांतर व्यवसायात झालं. मग अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून ते लोकांसमोरही येऊ लागलं. लोकांना ते आवडू लागलं आणि मग या दांपत्याने या व्यवसायाला आपल्या लेकराप्रमाणे वाढवलं.

हळूहळू सरकारच्या योजनांविषयी माहिती मिळाली आणि हुनर हाटचा दरवाजा तिच्यासाठी खुला झाला. आपल्या कलेने तिने केवळ स्वतःचा व्यवसाय सुरू केला असं नाही, तर इतर महिलांनादेखील या निमित्ताने एक रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पण हा व्यवसायसुद्धा केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून नव्हे, तर आपण पर्यावरणाचं देणं लागतो, कला ही दुसर्‍यापर्यंत निःशुल्क पोहोचली पाहिजे, आपण नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, आपल्या कामातून मनाला समाधान मिळालं पाहिजे या भावनांना शालिनीने अर्थार्जनापेक्षा जास्त महत्त्व दिल्याचं दिसून आलं.

अशी एक समाधानी वृत्तीची कलाकार गेली पाच वर्ष आपल्या या कलेच्या माध्यमातून हा छोटासा व्यवसाय करते आहे. लॉकडाउनमध्ये जेव्हा कुठेही प्रदर्शनं भरवली जात नव्हती, त्या काळात तिने आपली ही कला इतरांनाही यूट्यूबच्या माध्यमातून अगदी नि:शुल्क शिकवली.

दगडांची शोधमोहीम, त्यानंतर त्यावर कलेचा हात फिरवण्यापूर्वी त्यावर होणारे संस्कार आणि नंतर झालेली सुंदर कलाकृती मनाला निर्मळ आनंद देऊन जाते, अशी प्रांजळ भावना शालिनी व्यक्त करते. पाच दगडांपासून सुरू केलेल्या स्टोन पेंटिंगचा प्रवास आता वर्षाला सुमारे 500 किलो दगडांपर्यंत येऊन पोहोचला आहे. जेव्हा या दगडांवर आपल्या कलेचा हात फिरतो, तेव्हा जे समाधान मिळतं ते शब्दात सांगताना शालिनी भावुक होऊन जाते. आपल्या कलेची व्याप्ती जास्तीत जास्त वाढवण्याचा तिचा मानस आहे. शालिनी आज 5 ते 10 महिलांना रोजगार देत आहे. हा आकडा तीन अंकी करण्याची तिची इच्छा आहे.
कादंबरीचा स्टॉल - प्लास्टिकचा वापर टाळा..
कादंबरी! हुनर हाटच्या प्रवासातली मला भावलेली दुसरी कहाणी... सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आणि पेशाने वकील असलेल्या कादंबरीने सरकारच्या या निर्णयाला आगळावेगळा पाठिंबा दर्शवला. तिने चक्क कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला. कापडाची निवड, त्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी, कापडी बॅगच्या डिझाइन्स, त्याचं शिवणकाम आणि त्याचं मार्केटिंग असं सगळं सांभाळत कादंबरी सुमारे 10 महिलांना रोजगार देत आहे.


hunnar

आपल्या या व्यवसायाच्या प्रगतीसाठी गेल्या 3 वर्षांपासून कादंबरी ग्राहकांच्या गरजानुरूप नवनवे बदल करत आपल्या व्यवसायाला फुलवत आहे. बाजारहाट करणार्‍या साध्या कापडी पिशवीपासून लॅपटॉपच्या कापडी बॅगपर्यंत ते फॅशनेबल कापडी पर्स अशा विविध डिझाइनच्या कल्पना साकारत एका यशस्वी महिला उद्योजकाच्या दिशेने आपली वाटचाल करत आहे.

स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्यात असेल, तर तुम्ही कुठल्याही समस्यांचा सामना करू शकता, हे सना खान या आणखी एका हुनरबाज महिला उद्योजिकेने हुनर हाटमध्ये दाखवून दिलं. दहावीपर्यंतचं शिक्षण घेऊन सना आपल्या स्ट्रॉच्या - अर्थात विशिष्ट गवतापासून बनवलेल्या मॅटच्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाची अर्थार्जनाची बाजू समर्थपणे सांभाळत आहे. शिक्षण कमी घेतलेलं असलं, तरी नवं नवं शिकण्याची तिची धडपड तिने स्ट्रॉ मॅटच्या व्यवसायासाठी केलेल्या संशोधनातून दिसून येते.


hunnar
आपल्या स्ट्रॉ मॅटच्या उत्पादनासाठी लागणार्‍या कच्च्या मालासाठी सनाने खूप शोधमोहीम केली. या मॅटला लागणारं गवत जिथे उगवतं, त्या तामिळनाडूमधून ती गवताचा कच्चा माल घेत असे. ते गवत कसं उगवतं, कसं टिकतं, याबद्दलची सगळी माहिती तिला ज्ञात आहे हे बघून तिच्या व्यवसायाबद्दल असलेली तिची आत्मीयता दिसून येते. याशिवाय स्ट्रॉ मॅटसाठी लागणारं कापड ती अहमदाबाद येथून मागवते आणि स्वतःच्या कारखान्यात त्याचं उत्पादन करते. व्यवसायात सुरुवातीला नुकसान सहन करत तिने या व्यवसायात जमही बसवला. पण अडथळे येतच होते. लॉकडाउनच्या संकटाने तर सनाचा कारखानाही बंद झाला. पण सनाची जिद्द कायम होती. तिने नेटाने या संकटाचाही सामना केला. कारखाना बंद झाला असला तरी सनाने इतरांकडून हे उत्पादन घेऊन आपला व्यवसाय नेटाने सुरू ठेवला आहे. तिच्या या जिद्दीला सलाम!

महाराष्ट्रतली खाद्यसंस्कृतीही या हुनर हाटमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. नंदुरबार, नागपूर, नाशिक इथूनही महिलांचेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स प्रदर्शनाला भेट देणार्‍यांची पोटं आणि मनं तृप्त करत होते.

एकूणच, भारताच्या कलासंस्कृतीच्या श्रीमंतीचा थाट, अर्थात हुनर हाट, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...


hunnar- लेखिका पत्र सूचना कार्यालय, मुंबई येथे माहिती साहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.


Powered By Sangraha 9.0