आपण नास्तिक आहोत, त्यामुळे हिंदू धर्म, परंपरा यांच्याशी आपला काही संबंध नाही. आपण सेक्युलर आहोत, त्यामुळे रामायण महाभारतापेक्षा आपल्याला कुराण अतिपवित्र वाटते. पुणेरी पगडीचा आपल्याला तिटकारा आहे, पण जाळीदार गोलटोपी आपण सन्मानाने मिरवतो. अशी राजकीय प्रतिमा असलेल्या व्यक्तीला गणेश मंदिरात बोलावले कशासाठी? आणि नास्तिकता जपणार्या साहेबांनी ते निमंत्रण का स्वीकारले? असा प्रश्न विचारला गेला आहे आणि त्याचे उत्तर म्हणून नास्तिकतेचे ढोलताशे वाजू लागले आहेत.
गेल्या वर्षी पुण्यातील काही मंडळींनी वैचारिक/साहित्यिक कार्यक्रम आयोजित केला होता. दोन दिवस चालणार्या या कार्यक्रमात पवारसाहेब उपस्थित राहणार होते. आणि या कार्यक्रमाचे नामकरण ’वशाटोत्सव’ असे करण्यात आले होते. पवार साहेबांचे लाडके पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मानसपुत्र या कार्यक्रमाचे आयोजक होते. पण काही कारणांमुळे हा वशाटोत्सव रद्द केला गेला. हे सारे पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे पवारसाहेब यांनी मांसाहार केला म्हणून दगडूशेठ गणपती मंदिरात जाण्यास दिलेला नकार. मागच्या आठवड्यात पुण्यात हा प्रसंग घडला. ज्या दिवशी पवारसाहेब दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जाणार होते, त्या दिवशी सकाळपासूनच दूर चित्रवाहिन्यांवर पवारसाहेब आणि गणपती मंदिर यांच्याशी संबंधित बातम्या चालू होत्या. पवारसाहेबही स्वयंप्रेरणेने मंदिरात निघाले नव्हते. तर या कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण त्यांनी स्वीकारले होते. कार्यक्रम पूर्वनियोजित होता. ठरल्याप्रमाणे पवारसाहेब मंदिरापर्यंत आले आणि त्यांना साक्षात्कार झाला, आपण आज मांसाहार केला आहे, आपण मंदिरात जाऊन दर्शन घेता कामा नये. मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांनी वशाटभक्षणाची कबुली देऊन तेथूनच गणरायाला हात जोडले. या घटनेची नोंद प्रसारमाध्यमातून घेतली गेली.
आमच्या मनात यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण झाले आहेत.पवारसाहेबांकडून या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा नाही. कारण ते काय आहेत? कसे आहेत? हे त्यांनीच वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे पवारसाहेबांच्या महिमामंडणाचे कामही महाराष्ट्रभूमीत अविरतपणे चालू असून केवळ शरद चालिसा गाण्याचे काम काही मंडळींनी उक्ते घेतले आहे. थेट लोकसभेतच शरद पवार नास्तिक असल्याचा निर्वाळा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्यामुळे पवारसाहेब दगडूशेठ गणपतीला गेलेच कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे? शरद पवार नास्तिक आहेत, तर मग त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले कशासाठी? शरद पवार नास्तिक आहेत, असू शकतात. ते कसे असावेत हे त्यांचे त्यांनी ठरवायचे आहे. आस्तिक, नास्तिक या दोन्ही संकल्पना ज्या हिंदू धर्माशी संबंधित आहेत, त्याच हिंदू धर्माने त्यांना नास्तिक म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र या आस्तिक-नास्तिक संकल्पना सोईसोईने वापरू नयेत अशी अपेक्षा असते. पवारसाहेब दीर्घकाळ राजकारणात आहेष. काही वर्षांपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघातून पवारसाहेबांनी लोकसभेची निवडणूक लढवली. तेव्हा प्रचाराचा नारळ आपल्या मूळ गावी मारूती मंदिरात वाढवला होता आणि त्याच्या सचित्र बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. तेव्हा पवारसाहेब नास्तिक नव्हते आणि आता नास्तिक आहेत असे म्हणायचं का? बरं पवारांची नास्तिकता सार्वत्रिक आहे का? आपण नास्तिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी, ‘पवारांनी देशाला रामायण, महाभारत यांची गरज नाही,’ असे वक्तव्य केले होते. हे पवार साहेबांचं खरं रूप की लॉकडाऊन च्या काळात तन्मय होऊन गीत रामायण ऐकणारे पवार खरे? असा प्रश्न आम्हाला पडतो. पवारसाहेबांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सार्वजनिक वाटचालीत अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. वशाटभक्षणामुळे मंदिरात न जाणार्या पवारांनी मांसाहार बंद केल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी वाचल्या होत्या. त्यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. पवार मांसाहारी आहेत की शाकाहारी? पवार आस्तिक आहेत की नास्तिक? पवार नास्तिक असते तर त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिराचे निमंत्रण स्वीकारले नसते. त्याचप्रमाणे ते आस्तिक नसते तर त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वारावरच अभक्ष्यभक्षणाची आठवण झाली नसती. तर मुद्दा काय आहे की पवारसाहेब नास्तिक आहेत की आस्तिक? असा प्रश्न सामान्य हिंदू माणसाला पडू शकतो मात्र स्वतः पवारसाहेब अशा प्रश्नाला अपवाद आहेत, ते सर्वात आधी राजकारणी आहेत आणि सर्वात शेवटीही राजकारणी आहेत. त्यांची नास्तिकता, त्यांची आस्तिकता सोयीसोयीने प्रकट होत आलेली आहे. नास्तिकतेचा पुरस्कार करणारे शरद पवार मंदिराच्या दारापर्यंत येतात त्यामागे नक्कीच काही तरी कारण आहे. लवकरच हे समाजासमोर येईल अशी आशा करूया.
पवारसाहेबांच्या नास्तिकतेचा वारसा सुप्रिया सुळे यांना लाभला आहे. पुण्यात सत्यनारायणाला विरोध करून त्यांनी आपले नास्तिकपण सिद्ध केले होते. पण कालपरवा त्या पुन्हा आस्तिक झाल्याचा साक्षात्कार उभ्या महाराष्ट्राला झाला. ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे,’ असा नवस त्यांनी तुळजाभवानीला केला आहे. आता त्यांना तुळजाभवानी पावते की नाही? हे काळच ठरवेल. पवारसाहेबांनी आपले नास्तिकत्व सोयीच्या वेळी उघड केले. सोईचे नसेल तेव्हा आस्तिकतेचा टिळा कपाळी लावला. तोच वारसा त्यांच्या पुढील पिढीकडे जात आहे. आणि पवार साहेबाचे खुशमस्करे नास्तिकतेचे ढोलताशे वाजवत आहेत.