मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत कोण जिंकणार, कोणता पक्ष सत्ता काबीज करणार याबाबत सर्वसामान्य माणूस आपले अंदाज वर्तवू लागला आहे. दीर्घकाळ समाजकारण, राजकारण करणारी अनुभवी मंडळी पुन्हा एकदा महानगरपालिकेत आपले प्रतिनिधी म्हणून जावीत अशी सर्वच मतदारांची भूमिका असते. मुलुंडचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे हे लोकप्रिय आणि कार्यतत्पर व्यक्ती आहेत. त्यांनी सलग दहा वर्षे नगरसेवकपद भूषवले असून अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यामुळेच अशा लोकप्रिय, कार्यसम्राट उमेदवारांना मतदार पुन्हा नव्याने संधी देतीलच. प्रकाश गंगाधरे यांचा सामाजिक व राजकीय प्रवास समजून घेताना त्याचे भविष्यातील व्हिजन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
आपला सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रवेश कसा झाला?
मी गिरणी कामगाराचा मुलगा. लहानपणापासून मी संघशाखेत जात आहे. माझे बालपण चुनाभट्टी येथे गेले. माझे काका आत्माराम गंगाधरे हे शाखेत जात असत. त्यांचे बोट धरून मी शाखेत जाऊ लागलो. महानगरपालिका शाळेत शिक्षण झाले, सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला, त्याच वेळी गिरणी कामगारांच्या संपामुळे वडिलांची नोकरी गेली. आर्थिक कोंडी झाली. टर्म फी भरू न शकल्यामुळे मी शिक्षण थांबवले. लहानपणापासून शाखेत जात असल्यामुळे सामाजिक भान आणि सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली होती. गिरणी कामगारांच्या संपामुळे अनेकांना अन्नधान्य घेणे होत नव्हते. तेव्हा वेदप्रकाश गोयल यांच्या मदतीने मी चुनाभट्टी परिसरात अन्नधान्यवाटप केले होते. चुनाभट्टी परिसरात शिवसेनेचा प्रभाव होता. एकदा बाळ ठाकूर यांना काही शिवसैनिकांनी मारहाण केली, तेव्हा शिवसेनेच्या कार्यालयात घुसून मी आणि माझ्या मित्रांनी जशास तसे उत्तर दिले होते. संघ, जनता पार्टी असा माझा प्रवास सुरू असताना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध व्हावे असे आंदोलन सुरू झाले. त्या वेळी मी विधानसभेत जाऊन पत्रके टाकली होती. त्या वेळी मला अटक झाली. एक दिवस कारावास झाला. वेदप्रकाश गोयल, वामनराव परब, रामभाऊ नाईक इत्यादी प्रमुख मंडळींशी चांगला परिचय झाला. काही काळ मी कुर्ल्याचे जनता पार्टीचे आमदार शमशुदिन खान यांच्यासोबत काम केले. शिक्षण अर्धवट सोडून दिले होते. अर्थार्जनासाठी मी छोटी छोटी कामे घेऊ लागलो. जनता पार्टीचा चुनाभट्टी-नेहरूनगर परिसराचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो होतो. वेदप्रकाश गोयल यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यामुळे मला अटलजी, अडवाणीजी, कल्याणसिंग अशा राष्ट्रीय नेत्यांचा सहवास लाभला. 1987 साली माझे लग्न झाले आणि मी मुलुंड पूर्वेला राहायला आलो.
निवडणुकीच्या राजकारणात आपला प्रवेश आणि वाटचाल कशी झाली आहे?
मी चुनाभट्टी येथे राहत असताना कुर्ला नागरिक सहकारी बँकेची निवडणूक लढवली होती. सध्या मुंबई हाउसिंग फेडरेशन, मुलुंड जिमखाना इत्यादी ठिकाणी सदस्य म्हणून काम करत आहे. 87 साली मी मुलुंड पूर्वेत आलो आणि सामाजिक काम करता करता शक्य होईल तेवढे राजकीय काम करत होतो. मुलुंडमध्ये शिवसेनेचे प्राबल्य होते. तरीही मी काम करीत राहिलो. जनसंपर्क वाढवण्यासाठी मी गणपती विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करणे, दहीहंडी साजरी करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे इत्यादी उपक्रम राबवत असे. याच काळात किरीट सोमय्या, वामनराव परब इत्यादी नेते मंडळींशी परिचय झाला. 1992 साली युती तुटली आणि भाजपाला स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. मी जेथे राहत होतो, ते शिशिर शिंदे शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांच्या विरोधात उभे कोण राहणार? हा प्रश्न होता. मी मुलुंडमध्ये नवखा होतो, तरीही वामनराव परबांनी मला निवडणूक लढवण्याची संधी दिली. मी निवडणुकीत उभा राहिलो. प्रचार केला. अगदी थोड्याच मतांनी मी निवडणूक हरलो. त्यानंतर 1997 साली पक्षाने मला मुलुंड पश्चिमेतून उमेदवारी दिली, त्या वेळी मी अगदी थोड्या फरकाने हरलो. निवडणुकीत पराभूत होत असलो, तरी माझे सामाजिक काम सुरू होते. पुढे 2012 आणि 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुका लढलो आणि जिंकलो आहे. मुलुंडच्या राजकीय, सामाजिक जीवनात जवळपास पस्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे.
आपण नगरसेवकपदावर कार्यरत असताना केलेली महत्त्वाची विकासकामे कोणती आहेत?
मी पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर महानगरपालिकेचा विकास आराखडा माझ्या कार्यक्षेत्रात कसा राबवता येईल याकडे मी लक्ष दिले. मुलुंडमध्ये महानगरपालिकेचे अग्रवाल रुग्णालय आहे. पण तेथे असुविधाच खूप होत्या. त्या रुग्णालयात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. पत्रव्यवहार केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्या काळातील आयुक्त अजय मेहता आणि सीताराम कुंटे यांच्या भेटी घेऊ गांभीर्य लक्षात आणून दिले. तरीही प्रकरण मार्गी लागेना, तेव्हा मी मुलुंड स्टेशन येथे उपोषण सुरू केले आणि शेवटी तीनशे कोटीचा विकास प्रकल्प मंजूर झाला. आता टप्प्याटप्प्याने काम चालू आहे. त्याचप्रमाणे सहा एकर क्षेत्रावर मी उद्यान विकसित केले आहे.त्यासाठीही मला खूप पाठपुरावा करावा लागला. घाटकोपरनंतर मुलुंडमध्येच एक नाट्यगृह आहे. कालिदास नाट्यगृह. पण त्याची दुरवस्था झाली होती. मी या नाट्यगृहाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. नाट्यगृहाची आणि तरणतलावाची दुरुस्ती करून घेताना, आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण करून घेतले. तांबेनगरकडून चेकनाक्याकडे जाणारा रस्ता तयार करून घेतला. एसएससी रोडवर मधोमध असणारा मदरसा हटवून वाहतुकीचा अडथळा दूर केला. त्याचप्रमाणे पूर्व-पश्चिमेला जोडण्याचा पुलाजवळची अतिक्रमणे काढून टाकली. रस्ते रुंदीकरणात व विविध प्रकारच्या विस्तारीकरणात ज्यांची घरे तुटली, त्यांना मुलुंडमध्येच पुनर्वसन करून दिले. 2016मध्ये मी सुधार समितीचा अध्यक्ष झालो. मुंबईतील मेट्रोचे सर्व मार्ग आणि आराखडे मी अध्यक्ष म्हणून मंजूर केले आहेत. एमएमआरडीएच्या विविध योजना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न केले. शासनाचे वरिष्ठ अधिकारी, विविध खात्याने मंत्री यांच्याबरोबर मला बैठका करता आल्या. विशेषत: मुंबईतील एसआरए प्रकल्प गतिमान करण्यासाठी मी प्रयत्न केले आहे. महापालिकेत सेनेचे बहुमत आहे. पण सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपा काम करीत आहे. मी सेनेने बेस्टमध्ये केलेली भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. नुकतेच बेस्टने आठशे इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या. मात्र केवळ दोनशे बस खरेदी करण्याचा ठराव मंजूर झाला होता. मग आठशे बस कशा खरेदी केल्या? इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसताना ही खरेदी कशासाठी आणि कुणासाठी केली? असा मी प्रश्न उपस्थित केला होता. सेनेने या खरेदीत मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा माझा दावा आहे.
कोविड काळात आपण खूप मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी काम केले, त्याचे स्वरूप काय होते?
डिसेंबर 2019नंतर आपल्या देशात कोविड या साथरोगाचा प्रसार वेगाने वाढत होता. त्या काळात खूपच भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुलूपबंदी जाहीर केली. अशा वेळी मी खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर माझ्या प्रभागात सेवा कार्य सुरू केले. जवळजवळ तीन महिने माझ्या कार्यालयात सकाळी-संध्याकाळी खिचडी वाटप होत असे. त्याचप्रमाणे गरजूंना अन्नधान्यवाटपही केले. हँडवॉश, औषधी काढे, मुखपट्टी यांचेही मोठ्या प्रमाणावर वाटप केले होते. महानगरपालिकेच्या वतीने एलबीएस रोडवर जंबो कोविड सेंटर सुरू झाले होते. पण तेथे असुविधा खूप होत्या. मी प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडे पाठपुरावा करून त्या अडचणी दूर केल्या. माझ्या पाठपुराव्याने या सेंटरमध्ये 32 आयसीयू बेड उपलब्ध झाले. मुंबईतील उत्तम काम करणारे कोविड सेंटर म्हणून मुलुंड केंद्राचा उल्लेख होतो. या सेंटरच्या उत्तम संचालनात माझा सहभाग राहिला आहे.
आपण सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता, त्यामागे काय उद्देश आहे?
मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. पक्षाची विचारधारा सातत्याने नागरिकांपर्यंत पोहचवणे हे कार्यकर्ता म्हणून माझे काम आहे. संपर्क, संवाद आणि समन्वय ही माझ्या कामाची त्रिसूत्री आहे. सामान्य माणूस पक्षाने विचारधारेपेक्षा कार्यकर्त्याचा चेहरा लक्षात ठेवतो, हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवातून समजून घेतले आहे. सामान्य माणूस आपल्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरा व्यक्त करण्यासाठी एकत्र येऊन अभिव्यक्त होण्याची संधी शोधत असतो. या पार्श्वभूमीवर मी दिवाळी पहाट, दहीहंडी असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतो आणि ते सातत्याने करतो. गुणवंत शालेय विद्यार्थी, मुलुंडमधील गुणवंत नागरिक यांचा सन्मान करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. अशा कार्यक्रमात विनोद तावडे, आशिष शेलार, सुनील देवधर इत्यादी नेते येऊन गेले आहेत. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी कधी कोणताच कार्यक्रम आयोजित करत नाही.
आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?
मुलुंडच्या विकासासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. भविष्यातील आव्हाने आणि प्रश्न लक्षात घेऊन मी काही महत्त्वाच्या विषयांवर काम करत आहे. त्यामध्ये मुलुंड पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणखी एक पूल असावा, यासाठी मी प्रयत्न करत आहे. अपना बाजारच्या बाजूच्या गल्लीतून मिठागर रोडवर जाणारा एक पादचारी पूल आहे. तेथे वाहतुकीसाठी एक पूल व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे मेट्रो रेल्वे सुरू झाल्यावर चेकनाक्यावर वाहतूक व्यवस्था बिकट होईल, हे लक्षात घेऊन एक पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी मी एमएमआरडीएशी संपर्क साधला आहे. हा मार्ग एससीसी मार्ग येथून सुरू होऊन थेट तीनहात नाक्यावर निघेल. मागील दहा वर्षांत अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि विकासकामे पूर्ण केली आहेत. यापुढेही त्याच मार्गाने मी जाणार आहे.