सावध ऐका पुढल्या हाका

27 May 2022 18:26:04
समाजवास्तव आणि राजकारण हे नेहमीच वेगवेगळे असते. राजकारणात मैत्रीचा दुजोरा देणारे समाजजीवन एकमेकांच्या विरोधात किंवा राजकारण एकमेकांच्या विरोधात असणारे समाजजीवनात एका सेंद्रीय सूत्राने जोडलेले असू शकतात. हे समजून घेतले तर गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या घटनांचा परिणाम काय होणार आहे हे लक्षात येईल.

jay bhim
 
साधारणपणे मागच्या दशकात खा. रामदास आठवले यांनी भीमशक्ती-शिवशक्तीची घोषणा केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उदारपणे या घोषणेचे स्वागत केले होते आणि भारिप आठवले गट भाजपा-सेनेच्या युतीचा घटक झाला. महानगरपालिका, विधानसभा निवडणुका एकत्र लढवून महाराष्ट्रात सामाजिक समतेचा राजकीय प्रयोग यशस्वी झाला. 2014च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही एकत्रित शक्ती यशस्वी झाली. मात्र याच काळात दलित समूह हिंदुत्ववादी पक्षाच्या बाजूला झुकतो आहे, हे लक्षात घेऊन एक नवी घोषणा दिली गेली - ’जय भीम, जय मिम’. भाजपाला राजकीय विरोध करण्यासाठी अशी घोषणा देत महाराष्ट्रातील काही किरकोळ राजकीय नेत्यांनी आपल्या पक्ष-संघटनांना मुस्लीम विचारधारेच्या दावणीला बांधण्यात धन्यता मानली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, भाजपाला विरोध करण्यासाठी असा घरोबा झाला होता. ’शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ ही युद्धनीती डोळ्यासमोर ठेवून अनुसूचित जातीचे नेते आणि मुस्लीम पक्ष-संघटनेचे नेते यांनी हे साटेलोटे केले. निवडणुका झाल्या, दोन्हींकडच्या पक्षांचे नेते आपले उपद्रवमूल्य सिद्ध करून पुन्हा पुढच्या निवडणुकीपर्यंत शांत झोप घेणार आहेत. पण ’जय भीम, जय मिम’ ही घोषणा देत जी अनैसर्गिक एकजूट झाली, ती पुढे टिकून आहे का अनुसूचित जाती व मुस्लीम समाज यांचे संबंध कसे आहेत, याचा विचार कोण करते का? करत नसेल, तर गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या घटना त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत, असे आम्हाला वाटते. गेल्या दोन महिन्यांत अनुसूचित जातींमधील नवबौद्ध समाज आणि मुस्लीम समाज यांचे तथाकथित मधुर संबंध सांगणार्‍या पुढील घटनांच्या मुळाशी गेले, तर वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, हे लक्षात येईल.
 
संगमनेर येथे आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत घुसून हिरवे झेंडे फडकवत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा.
 
भिंगारनगर येथे आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक
 
किनवट, नांदेड येथे लग्नाच्या वरातीत घुसून भीमगीत बंद करून मारहाण, चार जण जखमी.
 
अकोला येथे एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या मूर्तींची विटंबना.
 
वरील चारही घटनांमध्ये पीडित नवबौद्ध समाज आहे आणि आक्रमण करणारा मुस्लीम समाज आहे. अन्याय झालेले पीडित हे कोणत्या समूहाचे प्रतिनिधित्व करतात आणि अन्याय करणारा समूह कोण आहे, हे तथाकथित प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत नाही. ते ‘दोन समूहांत वाद’ अशा शब्दांत या बातम्यांची वासलात लावतात. त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येत नाही. वरील चारही घटनांचा विचार केला, तर ‘जय भीम, जय मिम’ कोणत्या दिशेला चालले आहे, हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. या चार घटनांमधील अकोला येथील घटना प्रेमप्रकरणातून घडली आहे. मात्र बाकी तीन घटना म्हणजे ’बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ अशा प्रकारच्या आहेत. नवबौद्ध समाजाच्या मिरवणुकीत, वरातीत मुस्लीम कशासाठी घुसतात? कशासाठी दगडफेक, मारझोड करतात? या प्रश्नांची उत्तरे कोण शोधणार आहे का?
 

jay bhim
 
संगमनेर येथे आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत घुसून हिरवे झेंडे फडकवत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा.
  
‘जय भीम जय मिम’ची घोषणा देताना या दोन्हीही समाजांच्या नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपण काय करतो आहोत याचा विचार केला होता का? परस्परविरोधी विचारपरंपरा असणार्‍या या दोन समूहांचे राजकीय कडबोळे तयार करताना केवळ हिंदुविरोध हा समान बिंदू डोळ्यासमोर ठेवला असेल, तर अशा घटना वारंवार होत राहतील हे वेगळे सांगायला नकोच. नवबौद्ध समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा समाज असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम समाजाविषयी मांडलेली मते त्याला माहीत आहेत व ती मते बदलली जाऊ शकणार नाहीत, अशी आमची आजवर समजूत होती. स्वाभिमानी, राज्यघटनाप्रेमी असणारा हा समाज, राज्यघटनेला विरोध करणार्‍या समाजाशी हातमिळवणी कशी करतो? हे न उलगडणारे एक कोडे आहे. कारण केवळ राजकीय विरोधासाठी जर तुम्ही एकत्र आला असाल, तर सामाजिक जीवनात एकमेकांच्या व्यवहारात हस्तक्षेप कशासाठी? संगमनेर येथील मिरवणुकीत हिरवे झेंडे नाचवून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना नवबौद्ध समाजही पाकिस्तान समर्थक आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न मुस्लीम समाज करत आहे का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवबौद्ध समाजाने सावध व्हायला हवे. आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात राजकारण किती आणायचे आणि राजकारणासाठी घरोबा केलेल्या समूहाच्या किती दबावाखाली राहायचे, हे ठरवण्याची हीच वेळ आहे. कारण ज्या नेत्यांनी ‘जय भीम, जय मिम’ची घोषणा दिली, ते वरील चारही घटनांबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे आता समाजालाच विचार करावा लागणार आहे. नवबौद्ध समाजाने हा विचार करताना, तोफगोळे उडवून कोणी बामियान बुद्धमूर्ती खंडित केल्या? बुद्धगया येथे कोणी बाँबस्फोट केला? ब्रह्मदेशात बौद्ध भिख्खूंच्या हत्या कुणी केल्या? श्रीलंकेत बौद्धांवर अत्याचार करणारे कोण आहेत? हा पूर्वेतिहासही समजून घ्यायला हवा. समूहविशेष आणि त्यांची जागतिक मानसिकता समजली, तर आपण असंगाशी संग करत आहोत हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

jay bhim 
अकोला येथे एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या मूर्तींची विटंबना.
 
सामाजिक सहजीवन हे शांतिपूर्ण, प्रेमळ संबंध आणि सलोख्याचे असायला हवे हे जरी खरे असले, तरी आक्रमक भूमिका घेणारा, दहशतवाद, फुटीरतावाद यांचे समर्थन करणारा समूह आपला सहप्रवासी कसा असू शकेल? केवळ राजकीय नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी केलेल्या या जोडणीला आपण सत्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तपासून घेणार आहोत का?
Powered By Sangraha 9.0