वीरशैव लिंगायत हे हिंदूच

02 May 2022 19:13:27
@शरद गंजीवाले । 9881909748

वीरशैव लिंगायत समाज सर्व हिंदू सण, परंपरा, यात्रा करतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग आणि अनेक शिवमंदिरांचे पौरोहित्य आज वीरशैव लिंगायत समाज करत आहे. अनेक हिंदू संघटनांचे पदाधिकारी लिंगायत आहेत. अनेक लिंगायत विठ्ठलाचे वारकरी आहेत. मग वीरशैव लिंगायतांचे वेगळेपण कसे सिद्ध करणार?
 

veershaiv lingayat samaj
वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा एक प्रमुख घटक आहे, परंतु गेल्या काही दिवसात वीरशैव लिंगायत हे हिंदू नाहीत अशा स्वरूपाचा प्रचार काही विद्रोही, राष्ट्रद्रोही लोकांमार्फत केला जात आहे. एका बाजूला वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे अशा स्वरूपाचा शब्दभेद करून या समाजात उभी फाळणी घडवून आणण्याचे पाताळयंत्री कारस्थान आणि दुसर्‍या बाजूला या समाजाला राष्ट्राच्या प्रमुख हिंदू प्रवाहातून विभक्त करण्याचे कुटिल षड्यंत्र अशा दुहेरी अग्निदिव्यातून वीरशैव लिंगायत समाजाची वाटचाल आज चालू आहे. ज्या ’वीरशैव’ शब्दाची व्याख्या अशी केली जाते -
 
 
वी शब्देन उच्चते विद्या शिवजीवैक्यबोधिका।
तस्या रमन्ते ये शैवा वीरशैवास्तु ते मता:॥

त्या वीरशैव शब्दाचेच पर्यायवाचक, संस्कारवाचक, आचरणवाचक नाम म्हणजे ’लिंगायत’ शब्द. शिव-जीव ऐक्य किंवा लिंगांग सामरस्य नावाची संकल्पना ही वीरशैवांच्या परम ध्येयाचे, साध्याचे ते एक नाव आहे.

लिंगमध्ये जगत्सर्वम्। त्रैलोक्यं सचराचरम्।
लिंगबाह्यात परम नास्ति । तस्मै लिंगायते नम:॥

 
असे ज्या परम शिवाच्या प्रतीकाचे वर्णन केले गेले, इष्टलिंगाचे केले गेले, ते इष्टलिंग या मार्गावरचे साधन आहे आणि

लिंगेन सह जीवीत्वम। लिंगेन सह पंचत्वम॥
 
अशा स्वरूपाच्या अविचल जीवननिष्ठेने साधना करणारा वीरशैव या मार्गावरील साधक आहे, आणि म्हणून ज्यांना हा साध्य-साधन-साधकविवेक कळला, त्यांना वीरशैव आणि लिंगायत या शब्दभेदांमधून माजवल्या गेलेल्या बुद्धिभेदाचा फोलपणा कळला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु असे सांगितले जाते आहे की बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत नावाच्या स्वतंत्र धर्माची स्थापना केली. असेही सांगितले जाते की पंचाचार्य परंपरा ही महात्मा बसवेश्वरांच्या नंतरची आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, साक्षात भगवान शिवाच्या आज्ञेनुसार शिवाच्या पाच मुखांतून प्रकटलेल्या रेवणाराध्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य या पाच जगद्गुरू पंचाचार्यांनी वीरशैव संप्रदायाची स्थापना केली आणि या संप्रदायाच्या प्रसारासाठी काशी, केदारनाथ, श्रीशैल्य, उज्जैन आणि रंभापुरी येथे पीठे स्थापन केली. रेवणाराध्य उर्फ रेणुकाचार्य यांनी अगस्ती ऋषींना लिंगदीक्षा देऊन शिवाद्वैत किंवा शक्तिविशिष्टाद्वैत सिद्धान्ताचा उपदेश केला, यावरच शिवयोगी शिवाचार्यांनी ‘सिद्धान्त शिखामणी’ हा वीरशैवांचा ग्रंथ लिहिला. महाभारतात, आगमात वीरशैव शब्दाचा प्रथम उल्लेख आढळतो, परंतु लिंगधारणेचे उल्लेख अथर्ववेद, लिंग पुराण यासह आगमातही आढळतात. जगद्गुरू पंचाचार्यांनी शक्तिविशिष्टाद्वैताच्या तत्त्वज्ञानाच्या पायावर संस्थापित केलेला आणि जगज्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी, महाज्ञानी अल्लमप्रभू, महासाध्वी अक्कमहादेवी, प्रकांडपंडित चन्नबसवण्णा, प्रतिभावंत सिद्धरामेश्वर, संतशिरोमणी मन्मथस्वामी यांनी प्रचारित आणि प्रसारित केलेला हा शैव पंथातीलच एक वीरशैव लिंगायत संप्रदाय आहे.

veershaiv lingayat samaj
 
पंधराव्या शतकात संतशिरोमणी मन्मथस्वामींनी ‘परमरहस्य’ नावाच्या संस्कृत ग्रंथाची मराठी टीका लिहिली. या परमरहस्य ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायात मन्मथ स्वामींनी असे म्हटलेय की

‘पाची आचार्य शिवाचाराशी मुळ। तयापासुनी शिवाचार सकळ। वीरशैव मार्ग प्रबळ । विस्तार जाहला ॥ तोचि मुळीचा शिवाचार। कल्याणी अवतरला बसवेश्वर। त्यानेही केला विस्तार शिवाचाराचा । पुढचे वाक्य फार महत्त्वाचे आहे, कोणी म्हणती शिवाचार नवा झाला। बसवेश्वरांपासुनि उत्पन्नला । तो ते नेणोनि बोलती बोला अज्ञानपणे ।’ आणि इथून पुढे त्यांनी असे म्हटले आहे, ‘धर्म वीरशैव रसातळी जाता झाला बसवेश्वर त्राता ।’

 
वीरशैव लिंगायत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेले डॉक्टर एस.सी. नंदीमठ असे म्हणतात की “कुठल्याही कन्नड किंवा कुठल्याही संस्कृत वाङ्मयात महात्मा बसवेश्वरांनी नव्या धर्माला जन्माला घातल्याचा पुरावा आढळत नाही.” डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज असे म्हणतात की “महात्मा बसवेश्वर हे नवीन धर्माचे संस्थापक होऊ शकत नाहीत.” सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू बसव साहित्याचे, वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर इरेश स्वामी असे म्हणतात की “पंचाचार्य परंपरा ही महात्मा बसवेश्वरांच्या पूर्वीपासूनची परंपरा आहे, किंबहुना पंचाचार्य परंपरेतील जातवेद मुनी यांनी महात्मा बसवेश्वरांना वीरशैव संप्रदायाची दीक्षा दिली.” महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या वचन साहित्यात मी कोणत्याही नव्या धर्माला जन्माला घालतो आहे असे कुठेच म्हटलेले नाही. अशा स्वरूपाचे कोणतेही वचन त्यांच्या वचन साहित्यात सापडत नाही. स्वत: महात्मा बसवेश्वर आणि तत्कालीन सर्व शिवशरण यांच्या वचन साहित्यात लिंगायत हा शब्द कुठेच आलेला नाही, किंबहुना महात्मा बसवेश्वरांपासून ते हेमगल हंपपर्यंत तीस शिवशरणांच्या वचन साहित्यात सुमारे दोनशे एकवीस वेळा वीरशैव नावाचा शब्द आलेला आहे. परंतु तरीसुद्धा वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे अशा स्वरूपाची मांडणी करण्यात येत आहे, पंचाचार, षट्स्थल, अष्टावरण, गुरु-लिंग-जंगम, प्रसाद-पादोदक, मंत्र-रुद्राक्ष-भस्म या संकल्पना, उपास्य दैवत, उपासना पद्धती, उपासना तत्त्वज्ञान एक, परंतु तरीसुद्धा वीरशैव वेगळे लिंगायत वेगळे अशा स्वरूपाची विभागणी जाणूनबुजून केली जात आहे. कधी चातुर्वण्य नावाचे मेलेले मढे उकरून काढून, कधी आर्य-अनार्य वादाच्या शिळ्या कढीला ऊत आणून, कधी वेदोक्त-आगमोक्त वादाची, कधी वैदिक-अवैदिक वादाची फोडणी देऊन सांगितले जातेय की ‘तुम्ही हिंदू नाही’, तर कधी स्थावरलिंगांना विरोध करून, कधी मूर्तिपूजेला विरोध करून सांगितले जातेय की ‘तुम्ही हिंदू नाही’. हिंदू तत्त्वज्ञानातील ‘ओम् नम: शिवाय’ या मंत्राची दीक्षा महात्मा बसवेश्वरांनी जातवेद मुनी यांच्याकडून घेतली. हिंदूंचे उपास्य दैवत असलेला शंभू महादेव आणि वीरशैवांचे उपास्य दैवत असलेला शंभू महादेव एकच, हिंदूंच्या पूजाविधानातील मंत्र-रुद्राक्ष-भस्म आणि वीरशैवांच्या अष्टावरणातील मंत्र-रुद्राक्ष-भस्म एकच, हिंदू तत्त्वज्ञानातील तत्त्वमसि नावाचा सिद्धान्त आणि लिंगांग सामरस्य नावाचा सिद्धान्त एकच, हिंदू तत्त्वज्ञानातील ‘एकम् सत विप्रा: बहुधा: वदन्ति’ असे उपनिषदातील वाक्य आणि ‘कुडलसंगम देवनल्लदे इल्ल वेंदितु वेदा:’ अशा स्वरूपाचे महात्मा बसवेश्वरांचे वचन यांचे एक असणे यांना कधी दिसणार नाही.

हिंदू धर्मात अनेक पंथ-संप्रदाय, जाती-उपजाती आहेत. या प्रत्येक पंथ-संप्रदायांच्या, प्रत्येक जाती-उपजातीच्या वेगवेगळ्या चालीरिती आहेत. एक विलक्षण एकात्मता या सार्‍या विविधतेतून नांदती आहे, परंतु या विविधतेतून कुठेतरी विग्रह शोधून काढायचा आणि या विग्रहातून विद्रोहाची आग लावायची, अशा स्वरूपाचा काही मंडळींचा कार्यक्रम निश्चित झाला आहे.
सिद्धान्त शिखामणीमध्ये असा एक श्लोक आहे,

सांख्य योग: पाञ्चरात्र वेदा: पाशुपत तथा ।
एतानि मानभूतानि नोपहन्यानि युक्तिभि:॥
 
निरीश्वरवादी सांख्य दर्शन असेल, पतंजलींचे योगदर्शन असेल, पांचरात्र वेद दर्शन असेल, पूर्वमीमांसा शास्त्र असेल, पाशुपत दर्शन असेल या कोणत्याही दर्शनाचा अथवा शास्त्राचा उपमर्द करू नका’ असे स्पष्ट निर्देश या ‘सिद्धान्त शिखामणी’मध्ये दिलेले आहेत. श्रीपती पंडिताराध्यांनी वीरशैव भाष्य नावाच्या एका ग्रंथात असे लिहिले आहे की,
द्वैताद्वैत मते शुद्धे विशेषाद्वैत संज्ञके।
वीरशैवैक सिद्धान्ते सर्वश्रुति समन्वय:॥
द्वैत मत असेल, अद्वैत मत असेल, विशिष्टाद्वैत मत असेल या कोणत्याही मताचा उपमर्द करू नका. वीरशैवांची भूमिका ही सर्वश्रुती समन्वयाची असली पाहिजे, असा स्पष्ट दंडक या श्रीपती पंडिताराध्य यांनी घालून दिला आहे.

नीळकंठ शिवाचार्यांनी ‘क्रीयासार’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे, या क्रीयासार ग्रंथात त्यांनी वीरशैवांची व्याख्या अशी केली आहे की ‘विरोध रहीतं: शैवं वीरशैव विदुर्बुध: ।’

समन्वयशीलता हेच ज्या संप्रदायाचे प्रमुख तत्त्वज्ञान राहिले, प्रमुख वैशिष्ट्य राहिले, त्या संप्रदायाला हिंदू समाजापासून वेगळे काढणारे तत्त्वज्ञान अजून जन्माला यायचे आहे अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून संत शिवदासांचा अभंग मी या ठिकाणी सांगेन. त्या अभंगात असे म्हटले आहे की,
‘हरिहरा नाही द्वैत व्यर्थ वादकाचे मत
जैसी ब्रह्म आणि माया तैसी पुरुषाअंगी छाया
मायपीठ पांडुरंग वरी ब्रह्म शिवलिंग’
याच समन्वयशीलतेच्या सूत्रांना अनुसरून हिंदू समाजाच्या विविध अंगांमध्ये वीरशैव लिंगायत समाज अविभिन्नपणे मिसळून गेलेला आहे, म्हणूनच हिंदू समाजापासून वीरशैव लिंगायत समाजाला वेगळे काढण्याचे ‘दिवास्वप्न’ कुणी बघू नये.
 
वीरशैव लिंगायत समाज सर्व हिंदू सण, परंपरा, यात्रा करतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग आणि अनेक शिवमंदिरांचे पौरोहित्य आज वीरशैव लिंगायत समाज करत आहे. अनेक हिंदू संघटनांचे पदाधिकारी लिंगायत आहेत. अनेक लिंगायत विठ्ठलाचे वारकरी आहेत. मग वीरशैव लिंगायतांचे वेगळेपण कसे सिद्ध करणार?

या स्वतंत्र धर्म आंदोलनातील सर्वात घातक खेळी जर कोणी खेळली असेल, तर ती कर्नाटकातील तत्कालीन सिद्धरामय्या सरकारने खेळली. ऐन विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना, न्यायमूर्ती नागमोहन दास समितीची निवड केली गेली. त्या नागमोहन दास समितीला लिंगायत अल्पसंख्याक आहेत की नाही? लिंगायत स्वतंत्र धर्म आहे की नाही? हे विचारण्यात आले. अत्यंत घाईघाईने या नागमोहन दास समितीने अहवाल दिला आणि त्यात सांगितले लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, त्यांना अल्पसंख्याक दर्जा द्यायला हरकत नाही. अत्यंत घाईघाईने राज्य सरकारकडून या शिफारशीचा चेंडू केंद्र सरकारच्या अखत्यारीत टोलवण्यात आला. वस्तुस्थिती अशी आहे धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानात कोणत्याही नव्या धर्माला जन्माला घालायची तरतूद नाही. 2013 साली केंद्र सरकारमधील गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी हा ठराव धिक्कारलेला आहे, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अल्पसंख्याक आयोगाने अशा स्वरूपाच्या सवलती देता येणार नाहीत हे स्पष्ट केले आहे. त्या वेळच्या कर्नाटक सरकारने जाहीर केले की आम्ही लिंगायतांना अल्पसंख्याकांचा दर्जा देत आहोत. त्याच वेळी तिथल्या मुसलमान समाजाने त्यांना सांगितले की आमच्या अल्पसंख्याकांच्या वाट्यात आम्हाला वाटेकरी मान्य नाही.

पंथाचा, जातीचा, संप्रदायाचा अभिनिवेश जरूर असावा, परंतु हा अभिनिवेश व्यक्त करत असताना आमच्या मातृभूमीशी प्रतारणा होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. आम्ही ‘हिंदू नाही’ म्हणायला लागला आणि हिंदू धर्माच्या सार्वभौम विशालतेला आवाहन द्यायला लागला, तर या देशात प्रत्येकाच्या वाट्याला फक्त आणि फक्त अराजक येऊ शकते आणि म्हणूनच स्वतंत्र धर्माची मागणी ही तिन्हीत्रिकाळ अराष्ट्रीय मागणी आहे, असे आमचे म्हणणे आहे. म्हणूनच या मागणीला आपण प्राणपणाने विरोध करू या. येत्या जनगणनेमध्ये सर्व वीरशैव लिंगायत बांधवांनी हिंदू म्हणून स्वत:ची नोंद करायची आहे, एवढेच मी या

निमित्ताने सांगेन आणि असा आशावाद व्यक्त करीन की,
हम समाज के चेतन प्रहरी घर घर पहुँच जगायेंगे
गली गली में नगर गाँव में दीप से दीप जलाएंगे
सब समाज हो वैभव से पुनीत जीवन लक्ष्य ह्मारा है
सब समाज राष्ट्रभाव से हो पुनीत जीवन लक्ष्य ह्मारा है
प्रभू का सदा सहारा है॥
Powered By Sangraha 9.0