स्वरानंदरूपम् शिवोऽहम् शिवोऽहम्

12 May 2022 18:10:14
पं. शिवकुमार शर्मा या स्वर्गीय वादकाचा स्वरविश्वातला लौकिक वावर आता थांबला आहे. सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ सुरेल कारकिर्दीनंतर मांडीवर घेतलेलं संतूर खाली उतरलं आहे. पण वाटतं, हिमालयाच्या पहाडीत कुठेतरी हा स्वरयोगी आपल्या निर्मितीची अलौकिक स्वरगंगा मस्तकावर धारण करून ध्यानस्थ बसला असेल. सत्तर वर्षं आपल्या स्वराभिषेकाने रसिकांना तृप्त करून संतूरला शास्त्रीय संगीतात सन्मानानं बसवून हा शिवयोगी पुन्हा आपल्या शिवस्वरूपात विलीन झाला आहे.


pandit

हिमालयाच्या कुशीत जन्माला आलेलं आणि पहाडांच्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांचा अनुभव देणारं नजाकतदार वाद्य - संतूर! ही स्वरगंगा हिमालयाच्या हिरव्या डोंगरउतारांवर खळाळत, नादत वाहत होती. पाईन-देवदारांची सळसळ, त्यातून वाहणार्‍या बर्फाळ वार्‍यांची झुळूक, घुंगरासारखे छुमछुमत वाहणारे झरे, पक्ष्यांची किलबिल.. अशा मंत्रमुग्ध करणार्‍या वातावरणाचा साक्षात अनुभव तिच्या एका झंकारातून येई. हिमालयाची प्रगाढ शांतता, पावित्र्य, शुद्धता, अंतर्मुख करणारी भव्यता आणि मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य संतूरच्या आघातातून साकार होत होतं.
जम्मू-काश्मीर परिसरातल्या सूफियाना मौसिकी या काव्यगायन परंपरेचं हे वाद्य. सूफी तत्त्वज्ञान सांगणार्‍या कविता, गीतं यांना साथ करणारं. अनेकदा गायकच स्वतः संतूर वाजवत गात असत. काश्मीरच्या खोर्‍यात अन् सूफी परंपरेतच बंदिस्त असणार्‍या या वाद्याला जगासमोर आणलं ते पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मांनी. एका साथीच्या वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीतातलं एक प्रमुख वाद्य म्हणून प्रस्थापित करण्याचं आणि त्याच्या एकल वादनाला अलोट लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचं अतिशय अवघड आणि मोलाचं काम शिवकुमारजींनी केलं. एका अर्थी संतूरची स्वरगंगा आपल्या भगीरथ प्रयत्नांनी हिमालयातून भारताच्या मुख्य भूमीवर आणली आणि पाहता पाहता तिच्या प्रवाहात सारं संगीतविश्व न्हाऊन निघालं.

पंडितजींचं संतूरवादन म्हणजे रसिकमनांना स्वरांचं, नादाचं, लयीचं सचैल स्नान! एकेक हलका, नाजूक आघात जसा आकाशातून येणारा अलवार थेंब!

सिलसिलाची शीर्षकधून वाजू लागते आणि पर्वताच्या अंगावरचे देवदाराचे हिरवे रोमांच, हिरवळीचे मखमली उतार, डोंगरांच्या खांद्यावर विसावलेलं निळं आकाश, अंगावरची धुक्याची ओढणी, खोल दरीत उतरलेले ढग मध्येच उन्हाचे चुकार तुकडे सारं नजरेला दिसतं, त्वचेला जाणवतं आणि कानातून अमृतधारा आत झिरपताहेत असं वाटतं. पंडितजींचं वादन म्हणजे सर्वेंद्रियांनी भोगण्याचा एक देहातीत अनुभव! त्यांच्या वादनाइतकीच लोभस होती ती त्यांची स्वरलीन, तल्लीन मुद्रा! असं वाटायचं की ते इथे नाहीच आहेत. पहाडाच्या एखाद्या शिखरावर बसून ते एकटेच वाजवत आहेत आणि सारी सृष्टी ते अलौकिक स्वरगुंजन ऐकून डोलते आहे.
 
13 जानेवारी 1938 या दिवशी जम्मूखोर्‍यात हा तेजस्वी सरस्वतीपुत्र जन्माला आला. वयाच्या पाचव्या वर्षी वडील पंडित उमादत्त शर्मांकडे संगीताचं शिक्षण सुरू झालं. उमादत्तजींनी गाणं आणि तबला शिकवला.

 
पण त्यांची मनीषा होती ती शततंत्री वीणा या अद्भुत भारतीय वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीतातलं प्रमुख वाद्य म्हणून प्रस्थापित करण्याची. संतूर नावाने प्रसिद्ध असलेली शततंत्री वीणा मूळची भारतातली असली, तरी सूफियाना मौसिकी या गायनप्रकारातलं तिचं चलनवलन भारतीय रागपरंपरेपेक्षा बरंचसं भिन्न होतं. तिच्यावर पर्शियन संगीतपद्धतीचा प्रभाव होता. त्या वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताकरता अनुकूल करण्याकरता पंडित शिवकुमारजींनी आपली प्रतिभा, कल्पकता, मेहनत पणाला लावली. तेराव्या वर्षापासून वडिलांनी त्यांना संतूर शिकवायला सुरुवात केली. शिकता शिकता शिवजी अनेक प्रयोग करत गेले. वाद्याच्या रचनेपासून ते वादनाच्या पद्धतीपर्यंत अनेक बदल करत संतूर आजच्या स्थितीला पोहोचलं आणि भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीताचं दालन आणखीनच समृद्ध झालं.

प्रथम वडिलांच्या आग्रहामुळे तबला सोडून संतूरकडे वळलेले शिवकुमार या वाद्याच्या प्रेमात पडले आणि मग वडिलांचं स्वप्न हा त्यांचा ध्यास बनला. पंडितजी म्हणत की “प्रथम लोक साशंक होते की या वाद्याच्या मर्यादांमुळे हे स्वतंत्रपणे संपूर्ण रागदारी पेलू शकेल का? आणि लोकांचे हे अभिप्रायच माझी ताकद बनले. संतूरला स्वतःचं खास व्यक्तित्व आहे आणि ते जपूनच तिला स्वतंत्र, परिपूर्ण वाद्य म्हणून जगासमोर आणायचं, हा ध्यास मी घेतला.”

 
1955 साली मुंबईत हरिदास संमेलनात तेरा वर्षांच्या शिवकुमारचं संतूरवादन झालं. लोकांनी ते इतकं डोक्यावर घेतलं की आयोजकांना विनंती करावी लागली की आता आणखी वन्समोअर नकोत, कारण पुढचे कलाकार खोळंबले आहेत! त्या कार्यक्रमात व्ही. शांतारामांच्या कन्या ते वादन ऐकत होत्या. त्यांनी वडिलांना फोन लावला की या मुलाला व या वाद्याला ’झनक झनक पायल बाजे’मध्ये वापरा! 55 सालच्या झनक झनक पायल बाजेमधली संतूरची धून आजही कानाला अतिशय मधुर वाटते. ऐकताना नाचरे थेंब गिरक्या घेत घेत खाली उतरताहेत, असा भास होतो. या संगीताबरोबरच चित्रगीतातला संतूरचा पहिला वापर फार लोकप्रिय झाला आणि चित्रपटसंगीताला एक नवं ताजं टवटवीत वाद्य मिळालं.


pandit
मग आला ’कॉल ऑफ व्हॅली’ हा नितांतसुंदर स्वरानुभव देणारा वाद्यसंगीताचा अल्बम. पं. रविशंकरांची सतार, पं. ब्रिजभूषण काबरांची गिटार आणि शिवकुमारांचं संतूरवादन. या अल्बमने अफाट लोकप्रियता मिळवली.

आणि मग संतूरचा सिलसिला सुरूच राहिला. 1980मध्ये आलेल्या यश चोप्रांच्या ’सिलसिला’ला शिवजींनी हरिप्रसाद चौरसियांबरोबर संगीत दिलं आणि चित्रपट संगीतकारांत ‘शिव-हरी’ ही संगीतकार जोडी जन्माला आली. शास्त्रीय संगीतातल्या या दिग्गजांनी चित्रपटक्षेत्रही गाजवलं.
‘सिलसिला’च्या तर शीर्षकसंगीतापासून सगळंच लोकांनी डोक्यावर घेतलं. ‘रंग बरसे’, ‘नीला आसमां सो गया’, ‘देखा एक ख्वाब’ ही गाणी अजूनही रसिकांच्या हृदयात खास स्थान टिकवून आहेत. ‘लम्हे’मधलं ’मोरनी बागमां बोले आधी रातमां’, ‘चांदनी’मधलं ’मेरे हाथो मे नौ नौ चूडियां है’ अतिशय लोकप्रिय झाली. चांदनीतल्याच ’तेरे मेरे होठोंपे मीठे मीठे गीत मितवा’ या गीताची माधुरी आजही तशीच आहे. ‘डर’मधलं ’जादू तेरी नजर’ही अफाट गाजलं.
 
शास्त्रीय संगीतातल्या अनेक रागांचं त्यांचं वादन लोकप्रिय आहेच. पहाडी राग, पहाडी धून हे तर संतूरचं माहेरघर! संतूरवर शिवजींचा मेघ ऐकणं म्हणजे स्वरतुषारात सचैल स्नान केल्याचा अनुभव. ललत, यमन, जोग, मारवा, भैरवी, चंद्रकंस, बसंत, अंतर्ध्वनी अशा रागांमधून त्यांनी एकाहून एक सरस स्वरानुभव रसिकांना दिलेत. झाकीरजींबरोबरची त्यांची जुगलबंदी असो वा हरीजींबरोबरचं वादन.. शिवजींच्या हातातलं नाजूक भासणारं संतूर या दिग्गजांना तोडीस तोड टक्कर देत असे! शिवजींचं वादन ऐकताना जरीच्या धाग्याने असंख्य बारकावे असलेलं कलाकुसरीचं भरतकाम पाहत आहोत असं वाटतं. पारंपरिक भारतीय रसिकाइतकंच आधुनिक संगीतप्रेमींनी त्यांच्यावर प्रेम केलं. त्यांच्या म्युझिक अल्बममधल्या रचना - खासकरून ‘माउंटन्स’, ‘सनराइज ऑन पीक’, ‘शिकारा बाय मूनलाइट’ या नितांतसुंदर छोट्या रचना आपल्याला खरोखरच दुसर्‍या विश्वात घेऊन जातात. संतूरच्या शंभर तारा आपल्या प्रतिभेने त्यांनी अशा छेडल्या की त्यातून लाखो सुंदर स्वरवाटा तयार झाल्या. त्या वाटेवर आपण चालू लागलो की आपण आपली दुःखं, विवंचना, लाभ-हानी, मान-अपमानच काय, ‘स्व’लाही विसरून जातो. त्या सुरावटीच्या दैवी आनंदात आपलं अस्तित्व विरघळून जातं.

 
पण शिवजींचं मुख्य योगदान आहे ते त्यांनी त्यांच्या चिंतनातून संतूरला दिलेल्या वादनतंत्राचं. तुतीच्या झाडाच्या लाकडाची मुख्य फ्रेम, बाजूच्या पट्ट्या - ज्यावर धातूच्या खुंट्या बसवलेल्या असतात, त्या अक्रोडाच्या लाकडाच्या आणि त्यावर ताणून बसवलेल्या धातूच्या शंभर तारा. त्यावरचे आघात हलके नि नाजूक व्हावेत, म्हणून वादकाच्या सोयीनुसार कमी-अधिक वजनाचे लाकडी स्ट्रायकर म्हणजे ’कलम’ टोकाला किंचित वाकलेले असतात. अशा प्रकारे आघात निर्माण करून वाजवण्याचं हे एकमेव तंतुवाद्य. त्याच्या प्रकारामुळे त्याची मुख्य मर्यादा अशी की त्यातून निर्माण होणारा नाद अगदी क्षणजीवी असतो. त्या स्वराला आस नसते - म्हणजे तो स्वर आपल्याला हवा तितका लांबवता येत नाही. एकेक सुटा थेंब पडावा तसे स्वर निर्माण होतात.

त्यातून एक सलग प्रवाही रागाचा अनुभव देणं हे अतिशय अवघड काम पंडितजींनी त्यांच्या अलौकिक प्रतिभेमुळे साध्य केलं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ’संतूरच्या मर्यादांना मी संतूरच्याच अन्य बलस्थानाने भरून काढलं.’ आलाप, जोड, झाला या सर्व प्रकारांनी परिपूर्ण, अतिशय रंजक आणि प्रसन्न अनुभव देणारं संतूर, सतार-बासरी यासारख्या प्रस्थापित वाद्यांशी आत्मविश्वासाने जुगलबंदी करू लागलं! शिवकुमारजींचा आधी गाण्याचा आणि तबल्याचा अभ्यास झालेला असल्यामुळे लय अन तिचा डौल त्यांच्या रक्तात भिनला होता, त्याचा त्यांना संतूरवादनात फायदा झाला.
 
संतूरचा सुटसुटीतपणा, मजबूतपणा यामुळे प्रवासातही ते नेणं सहज शक्य होतं. पाश्चात्त्य संगीतातल्या तंतुवाद्यांशी याचं बरंच साधर्म्य होतं, त्यामुळे परदेशात संतूर लवकर लोकप्रिय झालं. भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि आधुनिक काळाशी सुसंगत काहीशा उडत्या, हलक्याफुलक्या स्वरावली यामुळे संतूरला आणि शिवजींना अक्षरशः जगभर चाहते आणि विद्यार्थी मिळाले.



pandit 
 
“तुमची प्रेरणास्थानं कोणती?” असं शिवजींना विचारलं की ते पहिलं नाव घेत वडिलांचं. दुसरा गुरू निसर्ग! ते म्हणत, ’‘परमेश्वरकृपेने मी अशा जागी राहतो, जिथे निसर्ग मला खूप काही देतो, शिकवतो. निसर्गाच्या संगीतातून मला प्रेरणा मिळते. तिसरी प्रेरणा म्हणजे लोकांचा अविश्वास! संतूरमधून आलापी कशी येणार असं लोकांना वाटे. त्याच अविश्वासाला मी माझी प्रेरणा बनवत असे. लोक म्हणत, उत्कट वा करुण भावना व्यक्त करायला संतूर असमर्थ आहे.. पण त्यांना माहीत नव्हतं की भावना या वाद्यात नसतात, तर त्या वादकाच्या कलाकाराच्या हृदयात निर्माण होत असतात! ईश्वराने मला ते सामर्थ्य दिलं आणि संतूरने भावनांचे सर्व आवेग पेलून दाखवले.’

ही ईश्वरशरणता त्यांच्या ध्यानमग्न, स्वरमग्न मुद्रेतून, त्यांच्या वागण्या-बोलण्यातून अन त्यांच्या स्वरविचारातून झिरपत राहायची.
सिलसिला, कॉल ऑफ व्हॅली, चांदनी याच्या रेकॉर्डच्या प्लॅटिनम डिस्क झाल्या. राहुल शर्मा, सतीश व्यास यांच्याबरोबरच अनेक देशी-विदेशी शिष्य वाद्यसंगीताचं क्षेत्र गाजवू लागले. आधी पद्मश्री, मग पद्मभूषण यासारखे सन्मान मिळाले.

तरीही शिवजींच्या मते ते अजूनही प्रयोग करत होते, शिकत होते. ते म्हणत, ’सर्वात महत्त्वाची निसर्गदत्त प्रतिभा. मग महत्त्वाचं योग्य गुरू भेटणं. मग साधना. म्हणजे केवळ सराव नव्हे, तर आपलं मन सर्व प्रकारच्या संगीताकरता स्वीकारशील असणं. क्लासिकल, वेस्टर्न, चित्रपट संगीत, लोकसंगीत, गझल सर्व प्रकारचं संगीत मी ऐकलं. असा आपला पाया तयार झाला की मग महत्त्वाचं आहे ते त्या कलेला आपला स्वतःचा विचार देणं. आपल्याला काय करायचंय हे आपल्याला नेमकं ठाऊक असावं लागतं.

एकदा ते ठरलं की मग त्या दिशेने चालत राहणं हीच साधना.पण याचीही एक गंमत असते..

मला दूरवर एक शिखर दिसतं. मला वाटतं आपल्या सांगीतिक प्रवासाचं ते क्षितिज आहे. मी तिथे पोहोचायचा प्रयत्न करतो. तिथे गेलं की परत दूरवर मला एक नवंच क्षितिज दिसतं नि वाटतं, अरे, आता या प्रदेशाला धुंडाळायला हवं. मी पुन्हा चालू लागतो. माझी परमेश्वराला अशी प्रार्थना आहे की हा माझा शोध कधीही संपू नये..’

चौर्‍याऐंशी वर्षांच्या आयुष्यात जवळजवळ सत्तर वर्षं संतूर शिवकुमारजींच्या मांडीवर विसावलं आणि झंकारत राहिलं. त्या झंकाराने तिन्ही लोक भरून गेले. श्रेष्ठ वादक म्हणून त्यांच्या हृदयात असलेल्या स्थानाबरोबरच त्यांच्या अत्यंत लोभस, निगर्वी, ऋजू, विनयशील आणि अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची मोहिनी रसिकांवर होती.

 
शिवजींचा कार्यक्रम हा श्रवणीय अन तितकाच प्रेक्षणीय अनुभव असायचा. स्वर्गलोकीचा एखादा गंधर्वच आपल्याला श्रवणानंद देण्याकरता भूलोकी अवतरला आहे, असं त्यांना पाहताना वाटायचं. येत्या पंधरा तारखेला त्यांचा वादनाचा कार्यक्रम होणार होता. पण तत्पूर्वीच ते शिवतत्वात विलीन झाले.

 
पं. शिवकुमार शर्मा या स्वर्गीय वादकाचा स्वरविश्वातला लौकिक वावर आता थांबला आहे. सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ सुरेल कारकिर्दीनंतर मांडीवर घेतलेलं संतूर खाली उतरलं आहे. पण वाटतं, हिमालयाच्या पहाडीत कुठेतरी हा स्वरयोगी आपल्या निर्मितीची अलौकिक स्वरगंगा मस्तकावर धारण करून ध्यानस्थ बसला असेल. सत्तर वर्षं आपल्या स्वराभिषेकाने रसिकांना तृप्त करून संतूरला शास्त्रीय संगीतात सन्मानाने बसवून हा शिवयोगी पुन्हा आपल्या शिवस्वरूपात विलीन झाला आहे. त्याच्या लेखी आता तो कलाकार नाही, वादक नाही, संगीतकार नाही, गुरू नाही, पिता नाही, सहकारी नाही.. तो आता सृष्टीचा आदिम स्वर होऊन सर्व चराचरात विरघळून गेलाय. स्वरानंदरूपम् शिवोऽहम् शिवोऽहम् म्हणत हा स्वरयोगी रसिकांच्या मनात सदैव झंकारत राहील.

Powered By Sangraha 9.0