“श्रद्धेय दत्तोपंतांचं द्रष्टेपण पोहोचवणं हे उद्दिष्ट!” - प्रा. श्याम अत्रे

07 Apr 2022 12:22:45
2020-2021 हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन ज्येष्ठ प्रचारक आणि भारतीय मजदूर संघ या जगातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे संस्थापक कै. दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. भारतीय मजदूर संघाबरोबरच परिवारातील अनेक संघटनांच्या सैद्धान्तिक बांधणीत, कामाच्या दिशादिग्दर्शनात दत्तोपंताचे मोलाचे योगदान आहे. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत त्यांच्या जीवनकार्याचा, तत्त्वचिंतनाचा आणि मौलिक ग्रंथसंपदेचा परिचय करून देणारा ‘दत्तोपंत ठेंगडी : द्रष्टा विचारवंत’ हा ग्रंथ भारतीय मजदूर संघाच्या ठाणे जिल्हा शाखेने प्रकाशित केला. प्राचार्य श्याम अत्रे यांनी या ग्रंथाची निर्मिती व त्याचे साक्षेपी संपादन केले आहे. प्रा. श्याम अत्रे हे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असून त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम केले आहे. सामाजिक समरसता मंचाच्या घडणीतही त्यांचे वैचारिक योगदान आहे. या ग्रंथाच्या अनुषंगाने प्रा. अत्रे यांच्याशी केलेल्या संवादाचे शब्दांकन...

dattopant

श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी ग्रंथनिर्मितीमागची भूमिका काय होती? या ग्रंथाच्या अंतरंगाविषयीही थोडं सांगावं.

दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधत, भारतीय मजदूर संघाच्या ठाणे जिल्हा शाखेने ‘श्रद्धेय कै. दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समिती’ची स्थापना केली होती. प्रतिष्ठित उद्योजक आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व माजी जिल्हा संघचालक मधुकरराव चक्रदेव या समितीचे अध्यक्ष होते. वीस सदस्यांच्या या समितीने कै. दत्तोपंतांचं जीवन, कार्य आणि चिंतन यांची चिकित्सा करणार्‍या राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. समितीचा कार्यवाह या नात्याने माझ्यावर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दोन दिवसीय चर्चासत्रातल्या नऊ सत्रांचे विषय, त्यांचे वक्ते असं सगळं निश्चित झालं. यामध्ये भारतभरातले 4 वक्ते आणि महाराष्ट्रातले 5 वक्ते सहभागी होणार होते. मात्र कोविडच्या प्रकोपामुळे हे चर्चासत्र रद्द करावं लागलं. हे चर्चासत्र रद्द झाल्यामुळे ग्रंथ करण्याचा निर्णय घेतला. ‘गौरव ग्रंथ’ असं त्याचं स्वरूप असणार नाही, तो वैचारिक ग्रंथ असेल हे नक्की होतं. श्रद्धेय दत्तोपंतांचं जीवनकार्य, त्यांचं चिंतन आजच्या पिढीसमोर यायला हवं, त्यावरच्या चिकित्सेचं जतन व्हायला हवं, या विचाराने ग्रंथाची निर्मिती करण्याचा निर्णय समितीने घेतला.


दत्तोपंतांचं वैचारिक योगदान लक्षात घेऊन, या ग्रंथातली पहिली 100 पानं तत्त्वचर्चेला वाहिलेली आहेत. पंडित दीनदयाळजींच्या एकात्म मानवदर्शन या संकल्पनेचा विस्तार दत्तोपंतांनी ‘Third Way'’मधून केला आहे. या मांडणीचं महत्त्व लक्षात घेऊन ग्रंथातल्या दुसर्‍या भागात त्यावर चर्चा आहे. अर्थचिंतन हे दत्तोपंतांचं आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण योगदान. त्यावरचे लेख ग्रंथाच्या तिसर्‍या भागात समाविष्ट केले आहेत. त्याचबरोबर संस्था उभारणीसाठी दत्तोपंतांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे. संस्थांचं वैचारिक भरणपोषण करणं, त्यासाठी कार्यकर्ते उभे करणं, इतकंच नव्हे तर कार्यपद्धती विकसित करून देणं हेही त्यांनी केलं आहे. म्हणूनच त्यांचं संस्थात्मक उभारणीतलं योगदान अधोरेखित करणार्‍या लेखांचा यात समावेश आहे. तसंच त्यांच्या तीन ग्रंथांचा परिचयही करून दिला आहे.



dattopant 
 प्राचार्य श्याम अत्रे यांनी या ग्रंथाची निर्मिती व त्याचे साक्षेपी संपादन केले आहे.
 
 
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे लेख सहाव्या भागात आहेत. आणि संघाचे ज्येष्ठ प्रचारक, भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव गोरे यांनी केलेल्या श्रद्धांजलीपर भाषणाने ग्रंथाचा समारोप केला आहे. असा सगळ्या दृष्टीने परिपूर्ण ग्रंथ सिद्ध झाला आहे.
संघविचार आजच्या युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांपर्यंत आपली पुस्तकं पोहोचायला हवीत. तिथल्या प्राध्यापकांना ती माहीत असायला हवीत. दत्तोपंतांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचले, तर संघटनात्मक कामात ते दिशादर्शक ठरतील या विचाराने राज्यातल्या किमान 1000 महाविद्यालयांतल्या ग्रंथालयांमध्ये हा ग्रंथ पोहोचवण्याचा समितीने निर्णय घेतला. अभाविपच्या मदतीने त्या दिशेने कार्यवाही सुरू आहे.
 
द्रष्टे आणि समत्व दृष्टी असलेले कृतिशील आणि अस्सल भारतीय विचारवंत अशी दत्तोपंत ठेंगडींची ओळख आहे. त्यांचं वेगळेपण, थोरपण तुम्ही कसं सांगाल?
 
कोणत्याही प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी ही केवळ संघाने दिली म्हणून दत्तोपंतांनी स्वीकारली, असं झालेलं नाही. दत्तोपंत हे रूढ चौकटीच्या पल्याड जाऊन (Out of the box) विचार करणारे होते, हे त्यांचं वैशिष्ट्य. समस्येचा तळ गाठण्याची त्यांची वृत्ती होती. ज्याला समस्येचा तळ गाठता येतो त्यालाच त्याचं विश्लेषण करता येतं आणि त्यावर नेमका उपाय योजता येतो. दत्तोपंतांच्या सगळ्या लेखनात - मग तो आर्थिक असो, सामाजिक असो वा राष्ट्रीय की कामगारांशी संबंधित.. प्रश्नाचा तळ गाठण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसून येते.

दत्तोपंतांच्या वाचनाचा परीघही खूप विस्तृत होता. कोणताही विषय त्यांना वर्ज्य नव्हता. म्हणूनच एखाद्या विषयाच्या मांडणीत ते आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात भारतीय प्रश्नाचा विचार करू शकत असत. देश उभारणीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी ‘थर्ड वे’ या आपल्या पुस्तकात दीनयाळजींनी मांडलेल्या एकात्म मानवदर्शन या संकल्पनेचा विस्तार केला. जगभरातले सगळे वाद - इझम्स कोसळताना दिसत असताना, भारतीय चिंतनाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला राष्ट्र उभारणी कशी करता येईल हा त्यांच्या पुस्तकाचा गाभ्याचा विषय आहे. भारतीय तत्त्वज्ञानाची सैद्धान्तिक भूमिका आणि तिचं वेगवेगळ्या क्षेत्रात होणारं उपयोजन अशी मांडणी त्यांनी केली आहे.


’दत्तोपंत ठेंगडी - द्रष्टा विचारवंत’
’दत्तोपंत ठेंगडी - द्रष्टा विचारवंत’ या ग्रंथाच्या काही प्रती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
पृष्ठे -400 किंमत रु.500/-(कुरिअर खर्चासह)
संपर्क - प्रा. श्याम अत्रे.
9324365910

दत्तोपंतांचे विचार कार्यकर्त्याला कृतिप्रवण करतात. म्हणूनच समाजात त्यांच्या विचारांची घुसळण सातत्याने झाली पाहिजे. उदाहरणादाखल एक नमूद करावंसं वाटतं. 1983 साली जेव्हा सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली, त्याच्या पहिल्या बैठकीत दत्तोपंतांनी या नावातल्या तिन्ही शब्दांंतल्या एकेका शब्दाचं जे विश्लेषण केलं, त्या मांडणीतून आम्हाला कामाची दिशा समजली. समता आणि समरसता या दोन्हीची गरज असताना तुमचा आग्रह समरसतेचा का? यावर त्यांनी जे उत्तर दिलं, ते मी कायम लक्षात ठेवलं. समता ही भौतिक संकल्पना आहे, तर समरसता भावनिक संकल्पना आहे. समाज जोडण्याकरिता समता जेवढी आवश्यक आहे, त्याहून अधिक समरसतेची आवश्यकता आहे. त्यांच्या अशा मांडणीतूनच प्रश्नाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन लक्षात येतो. त्यांचं द्रष्टेपण जाणवतं.


dattopant

सामाजिक समरसता मंचासारख्या संघटनेच्या उभारणीत दत्तोपंतांचं वैचारिक योगदान आहे, तसं भारतीय मजदूर संघ आणि दत्तोपंत हे एक समीकरणही लोकांच्या मनात आहे. अशा आणखी किती संस्थांच्या पायाभरणीत दत्तोपंतांचं वैचारिक योगदान आहे?
 
भारतीय मजदूर संघाची वैचारिक बांधणी करताना त्यांनी श्रमिकांचं राष्ट्रीयीकरण, उद्योगांचं श्रमिकीकरण आणि राष्ट्राचं औद्योगीकरण या सैद्धान्तिक भूमिकेच्या पायावर भारतीय मजदूर संघाचं काम उभं केलं आहे. त्यात भारतीय तत्त्वज्ञानाचं, भारतीय चिंतनाचं किंवा भारतीय इथॉसचं प्रतिबिंब असणं अपेक्षित आहे. तसं न झाल्यास आपली उत्पादनं केवळ पाश्चात्त्यांची नक्कल ठरतील, असं त्यांचं मत होतं. आपल्याकडील जुन्या बलुतेदारी व्यवस्थेचा अभ्यास करून, त्यात कालसुसंगत बदल करून आपल्याकडच्या उत्पादनांची क्षमता कशी वाढवता येईल, त्यात वैविध्य कसं आणता येईल आणि हे करत असताना भारतीयत्व कसं जपता येईल याची मांडणी दत्तोपंतांनी केली. श्रमिकांचं राष्ट्रीयीकरण अशी अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. आपला देश डोळ्यासमोर ठेवून एकूण श्रमशक्तीचा विचार केला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. मग त्यात स्वदेशीचा विचार कुठपर्यंत होईल, आमच्या गरजांचा विचार कुठपर्यंत होईल, उत्पादनाच्या तुलनेत लागणार्‍या श्रमशक्तीचा विचार कुठपर्यंत होईल, त्याकरता लागणार्‍या भांडवलाचा विचार कशा प्रकारे केला जाईल.. या आणि अशा सगळ्या मुद्द्यांचा सुटा सुटा विचार न करता समग्रपणे करण्याची आवश्यकता मांडली. ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेतून श्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दत्तोपंतांनी मांडला. संप ही कुठल्याही समस्येच्या सोडवणुकीची सुरुवात असू शकत नाही, ते शेवटचं हत्यार आहे अशी त्यांनी मांडणी केली. चर्चा, विचारविनिमय करून दोघांचंही कमीत कमी नुकसान करणारा मध्यममार्ग काढणं ही भारतीय विचारपद्धती आहे. उद्योजक आणि कामगार या दोघांचंही नुकसान न होता, तो उद्योग भरभराटीला जाणं हे ध्येय असायला हवं. सगळ्यांचं हित हे एका दिशेने जाणारं आहे, ही त्यांची भूमिका होती. कामगार आणि मालक हे उद्योगातले भागीदार आहेत, त्यामुळे ते परस्परविरोधी असू शकत नाहीत असं ते म्हणत. अगदी यंत्र हादेखील उद्योगातील भागीदार आहे असं ते मानत. इतक्या आत्मीयतेने प्रक्रियेशी संबंधित सगळ्याच घटकांकडे बघण्याची दृष्टी त्यांनी दिली.

 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सैद्धान्तिक भूमिका मांडताना त्यांनी, शिक्षण हे एक शैक्षिक कुटुंब आहे अशी मांडणी केली. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक आणि शैक्षणिक धोरण ठरवणारे धोरणकर्ते या सगळ्यांचा एकत्रित विचार अपेक्षित आहे. त्या अर्थाने ते कुटुंब आहे. शिक्षक विरुद्ध विद्यार्थी, संस्थाचालक विरुद्ध विद्यार्थी असा संघर्ष त्यात अभिप्रेत नाही. म्हणूनच विद्यार्थी परिषदेतही संप हे शेवटचं हत्यार आहे. Indian content of education, Indian perspective of education यावर कसा भर दिला जाईल, याचा त्यांनी विचार केला. जे प्राचीन ज्ञान आहे, ते मूळ गाभ्याला धक्का न लावता कालपरिस्थितीनुसार युगानुकूल करण्याचा विचार मांडला. त्याचबरोबर पाश्चात्त्यांचा विचार स्वीकारताना तो देशानुकूल करून घेतला पाहिजे, हे त्यांनी सातत्याने मांडलं.

आजच्या नव्या पिढीला दत्तोपंतांचे विचार आणि कार्य समजावं म्हणून काय केलं पाहिजे? आजच्या समाजमाध्यमांचा त्यासाठी कसा उपयोग करता येईल?
 
या विषयाचा ज्यांचा अभ्यास आहे, त्यांनी तो समाजापर्यंत नेण्यासाठी ब्लॉगर बनलं पाहिजे. सर्वसामान्यांना समजेल अशा सहजसोप्या भाषेत विषयाची मांडणी केली पाहिजे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यूट्यूबवरून व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांपुढे हा विषय मांडायला हवा. आजची समाजमाध्यमं अधिकाधिक प्रभावीपणे वापरायला हवीत. वैचारिक जगतापर्यंत पोहोचण्याची माध्यमं म्हणून या सगळ्याचा विचार केला पाहिजे. या माध्यमातून व्याख्यानमाला, परिसंवादही आयोजित करता येतील. तरुणांसाठी, प्रौढांसाठी लेखन स्पर्धा आयोजित करता येईल.
 
 
दत्तोपंतांचे विचार कालातीत आहेत, त्यांचा जागर करणं ही समाजाची गरज आहे हे लक्षात घेतलं, तर ते पोहोचवण्याचे अनेक पर्याय दिसू लागतील.
 
Powered By Sangraha 9.0