हिंदू धर्मातील आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर

विवेक मराठी    25-Apr-2022
Total Views |
या महात्म्याच्या नावावर आपापली राजकीय दुकाने चालवणारी काही मंडळी अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या महात्मा बसवेश्वरांना जातीय मापदंड लावून त्यांच्या विचारांना हरताळ फासण्याचे महापाप करीत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जागतिक स्तरावर महात्मा ठरलेल्या बसवेश्वरांना अतिशय खुजे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसू लागली आहेत.

veershaiv lingayat samaj
भारत हिंदू राष्ट्र झाले पाहिजे, असे आजमितीला सर्वांनाच वाटत आहे. पण त्यासाठी आधी समाज एकसंघ आणि सशक्त व्हायला नको का? अर्थात या प्रश्नाचे उत्तर समाज मोठा, सशक्त आणि एकसंघ झालाच पाहिजे असेच मिळेल. समाज सशक्त होण्यासाठी आपल्या महापुरुषांचे कार्य आणि त्यांच्या विचारातील व्यापकता आपण सर्वप्रथम समजून घेण्याची गरज आहे. तद्वतच महात्मा बसवेश्वर समजून घ्यायचे असतील, तर या महात्म्याचा सर्वांगाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. गेल्या तीन-चार शतकांमध्ये महात्मा बसवेश्वरांबाबत अनेक अभ्यासकांनी विपुल असे लेखन केलेले आहे. या महात्म्याबाबत विपुल प्रमाणात साहित्यसंपदा उपलब्ध असली, तरी महात्मा बसवेश्वरांना एका विशिष्ट जातीत आणि समाजात बंदिस्त करून त्यांना त्या जातीपुरते आणि समाजापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकर्षाने जाणवते, हे येथे खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे. महात्मा बसवेश्वरांनी स्वत:चा असा कोणताही स्वतंत्र सिद्धान्त जगासमोर मांडलेला दिसत नाही. त्यांनी हिंदू परंपरेतील जीर्ण झालेल्या आणि समाजासाठी घातक असणार्‍याच रूढी-परंपरांवर आघात करून समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी आपली संपूर्ण हयात खर्च केली. हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान त्यांनी सोप्या आणि बोलीभाषेत आणून त्याविषयी हजारो वचने लिहिली. मातृभाषा कन्नड असल्यामुळे महात्मा बसवेश्वरांनी लिहिलेली वचने कन्नड भाषेत असली, तरी अलीकडे त्या वचनांचा मराठी अनुवाद करून अनेक लेखकांनी ती मराठी भाषेत प्रकाशित केलेली दिसतात. वेद, उपनिषदे, आगम लोकभाषेत मांडून ती समाजाच्या प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍या महात्मा बसवेश्वरांना आम्ही मात्र एका समाजामध्ये बंदिस्त करून त्यांच्या मोठेपणाचा निव्वळ अपमानच करत नाहीत काय? हा प्रश्न त्यांच्या प्रत्येक अनुयायाने स्वत:ला विचारायला हवा. हिंदू धर्माचेच एक प्रमुख अंग असलेल्या वीरशैव संप्रदायाचे पुनरुत्थान करणारे आणि हिंदू धर्मपरंपरेत अनन्यसाधारण अशा सुधारणा घडवून आणणारे बसवेश्वर सार्‍या विश्वाला समजले, पण त्यांना समजून घेण्यात अजूनही आपण गल्लत करत आहोत, हे प्रामुख्याने सकल वीरशैव लिंगायत बांधवांनी समजून घेतले पाहिजे.
सा. विवेकच्या facebook  पेजला like करा...

https://www.facebook.com/Viveksaptahik

 
महात्मा बसवेश्वरांचे एकूणच जीवन संघर्षाने ओतप्रोत भरलेले आढळते. एका राज्याचा पंतप्रधान असूनदेखील समाजातील वंचित घटकांना, सामाजिक न्याय देता येत नाही ही सल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सामाजिक न्याय या शब्दाची व्याख्या अनेक प्रकारे करता येईल. पण सर्वसाधारणपणे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक न्याय, त्याचबरोबर प्रत्येकाला त्याच्या समूहाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, रितीरिवाज यांची जपणूक करण्याचा अधिकार, प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे उपसना करण्याचे स्वातंत्र्य या सर्ब बाबी ‘सामाजिक न्याय’ या संकल्पनेत येतात. आणि हे सारे अधिकार समाजाला घटनात्मक पद्धतीने वितरित करण्याचे काम प्रामुख्याने राजसत्तेचे असते. मात्र राजसत्तेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असूनही समाजातील उपेक्षितांना, वंचितांना सामाजिक न्याय देता येत नसेल, तर अशा पदाचा उपयोग तरी काय? या मुख्य जाणिवेतून बसवन्नांनी आपल्या पंतप्रधानपदाचा त्याग करून वैराग्याचा स्वीकार करीत समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी आपले आयुष्य वेचलेले अधोरेखित होते. मात्र, असे काम करण्यासाठी विशिष्ट असे अधिष्ठान आणि सिद्धान्त सोबत असावे लागतात. त्या अनुषंगाने वीरशैव महामत संस्थापकांनी मांडलेल्या सिद्धान्तांचा बसवन्नांनी स्वीकार करत जातवेद मुनींकडून वीरशैव संप्रदायाची दीक्षा घेतली. आजपर्यंत मी शैव होतो, आता वीरशैव झालो आहे हे वाक्य बसवन्नांनी सर्वप्रथम उच्चारल्याच्या नोंदी काही अभ्यासकांनी केलेल्या आढळतात. बसवान्नांनी वीरशैव संप्रदायाचाच स्वीकार का केला? त्यांनी अन्य पंथ का स्वीकारला नाही? वेद, उपनिषदे आदी वैदिक ग्रंथ असोत की तथागत गौतम बुद्धांची पिटके वा जैन मुनींचे आगम ग्रंथ असोत, यांनी कधीही भेदभावांना मान्यता दिलेली नाही. किंबहुना कोणताही धर्म आपल्याला ममता, करुणा, दया, प्रेम आणि समर्पण यांचीच प्रेरणा देतो, मनुष्या-मनुष्यांमध्ये अस्पृश्यतेसारख्या भेदभावांच्या निर्मितीचे कार्य कोणताही धर्म करीत नाही. सार्‍या धर्म-पंथांची ही एकसारखीच शिकवण असताना बसवेश्वरांनी वीरशैव संप्रदायाची निवड का केली असावी? या प्रश्नाचे उत्तर जाणीवपूर्वक शोधण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.


veershaiv lingayat samaj
भारतीय दर्शन शास्त्राच्या इतिहासात निगम आणि आगम ही दोन शास्त्रे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध मानली जातात. या दोन्ही शास्त्रांचा उगम भगवान शिवापासून झाला. शिवाच्या नि:श्वासापासून जे उत्पन्न झाले ते निगम आणि त्यांच्या वाणीतून जे प्रकट झाले ते आगम, असे मानले जाते. आगम आणि निगम या शास्त्रांचा अभ्यास करण्याची ही वेळ नाही. मात्र, आपला विशिष्ट शिवाचार सिद्ध करून नास्तिक मतांचे निराकरण करणे, आचारधर्माचे संपूर्ण आणि निर्दोष दर्शन घडावे या हेतूने वीरशैव सिद्धान्त प्रथम भगवान शिवाने पार्वतीला, नंतर षडाननाला सांगितला आणि त्यानंतर शिव संप्रदायातील प्रसिद्ध असलेल्या रेणुकादी पंचाचार्यांद्वारे त्याची भूलोकात प्रतिष्ठापना करविली. श्री रेणुकाचार्यांनी सर्वप्रथम अगस्ती मुनींना या सिद्धान्ताचा उपदेश केला. रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्तींना केलेल्या या उपदेशाचे संकलन करून श्री शिवयोगी शिवाचार्यांनी वीरशैव सिद्धान्तसूत्रे एका ग्रंथात एकत्रित केली. त्याच ग्रंथाला आज वीरशैवांचा श्रीसिद्धान्त शिखामणी असे संबोधले जाते. षटस्थल, पंचाचार आणि अष्टावरण अशा एकोणीस सिद्धान्तांवर आधारित असलेल्या वीरशैव संप्रदायामध्ये श्रम, शिवभक्ती, अहिंसा आणि क्षमा या तत्त्वांना प्राधान्य दिसते. शिवाय वीरशैव सिद्धान्तामध्ये स्पृश्य-अस्पृश्य, उच्च-नीचता, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत किंवा स्त्री-पुरुष असे भेदभाव याला कुठेही थारा नाही. जो श्रमाला महत्त्व देतो, दयाभाव ठेवतो, क्षमाशील आहे अशी व्यक्तिरेखा म्हणजे वीरशैव अशी वीरशैव या शब्दाची सरळ व्याख्या करता येऊ शकते.
महात्मा बसवेश्वरांनी वीरशैव संप्रदायाची दीक्षा घेण्यापूर्वी वीरशैव सिद्धान्ताचा सखोल अभ्यास करूनच वीरशैवमत स्वीकारलेले स्पष्टपणे अधोरेखित होते. वीरशैव महामत संस्थापकांनी मांडलेल्या सिद्धान्ताचा महात्मा बसवेश्वरांनी अतिशय प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार केल्याचे त्यांच्या एकूण कार्यप्रणालीवरून लक्षात येते. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वीरशैवांच्या आचरण पद्धतीमध्ये शिवउपासना, लिंगधारणा याबरोबरच श्रमाला महत्त्व दिले आहे. कन्नड भाषेत यालाच ‘कायक वे कैलास’ असे म्हणतात. पण श्रमाला महत्त्व देण्याचा नवा सिद्धान्त महात्मा बसवेश्वरांनी मांडलेला नाही. महाभारत काळात उपमन्यू शिवाचार्यांनी लिहिलेल्या शिवसहस्र नामावलीमध्ये भगवान शिवाला व्यवसाय या नावाने संबोधलेले आहे. त्यामुळे कायक वे कैलास हा नवीन सिद्धान्त बसवेश्वरांनी मांडलेला नाही, हे लक्षात येते. शिवाय उपमन्यू शिवाचार्यांनी भगवान श्रीकृष्णाला लिंगधारणेसंदर्भात केलेला उपदेशदेखील सर्वश्रुत आहेच. एकूणच विचार करता महात्मा बसवेश्वरांनी अतिशय पुरातन असलेल्या वीरशैव संप्रदायाचे पुनरुत्थान केले यावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. परंतु अलीकडे महात्मा बसवेश्वरांची अनुयायी असलेली काही मंडळी महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापन केल्याचा कांगावा करीत आहेत, ते साफ चुकीचे आहे. महात्मा बसवेश्वरांनी कोणत्याही नवीन धर्माची स्थापना केलेली नाही किंवा त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही वचनामध्ये तसे उल्लेख आढळून येत नाहीत. वीरशैव सिद्धान्ताचीच आचरण पद्धती असलेल्या लिंगधारणेला आणि इष्टलिंगपूजेला अनन्यसाधारण महत्त्व देत बसवेश्वरांनी समाजातील निरक्षर, अडाणी घटकांना धार्मिक प्रवाहामध्ये आणलेले आहे. वीरशैव हा धर्म नाही, हिंदू परंपरेचाच तो एक अविभाज्य घटक असून, महात्मा बसवेश्वरांनी तत्कालीन समाजाला हिंदू परंपरेतील कालबाह्य झालेल्या आणि समाजात विषमता निर्माण करणार्‍या काही रूढींतून बाहेर काढण्यासाठी, समाजील वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला, यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. तत्कालीन समाजातील प्रस्थापित मंडळींचा खंबीरपणे सामना करीत, समाजावर अधिराज्य गाजवणार्‍या प्रस्थापित सरंजामींना ताळ्यावर आणण्यासाठी काही क्रांतिकारक निर्णय राबवले. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करून बसवेश्वरांनी बाराव्या शतकातच सामाजिक एकतेचे बीजारोपण केले. प्रस्थापित ब्राह्मण समुदाय आणि वंचित असलेल्या ढोर समाजातील मुला-मुलीचे वैवाहिक संबंध घडवून आणणारे बसवेश्वर आंतरजातीय विवाहाचे जगातील पहिले पुरस्कर्ते ठरतात. समाजातील महिलांना, वंचित घटकांना त्यांची मते परखडपणे मांडता यावीत, म्हणून अनुभव मंटपाची स्थापना करणारे बसवेश्वर लोकशाहीचे जनक ठरतात. समाजातील वंचित घटकांना समान सामाजिक पातळीवर आणण्यासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे बसवेश्वर कदाचित यामुळेच महात्मा होतात, हे लक्षात घेण्याची नितांत गरज आहे.

सा. विवेकच्या facebook पेजला like करा...

https://www.facebook.com/Viveksaptahik

हिंदू धर्मपरंपरेत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सामाजिक उत्थानाचे कार्य हाती घेतले, त्या सर्वांना हिंदू परंपरेतील प्रस्थापित वर्गाच्या अन्यायाचा सामना करावा लागला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली असो की जगद्गुरू तुकोबाराय असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत की धर्मनिष्ठ संभाजी महाराज असोत, अगदी अलीकडच्या काळात डोकावून पाहिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो की महात्मा फुले असोत.. या सर्वांनाच मोठ्या दिव्यातून मार्गक्रमण करावे लागलेले दिसते. या लोकांनी काळानुरूप धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचे कार्य इमानेइतबारे केलेले आहे. पण, यांच्या फार पूर्वीपासून - म्हणजे बाराव्या शतकामध्ये बसवेश्वरांनी सामाजिक क्रांतीचे बीजारोपण करून, हिंदू परंपरेतील प्रस्थापितांना मोठमोठे हादरे देत अनेक धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणलेल्या दिसतात. म्हणून अतिशय पुरातन असलेल्या वीरशैव संप्रदायाचे पुनरुत्थान करणारे बसवेश्वर हिंदू धर्मसुधारकदेखील ठरतात.

अलीकडे या महात्म्याच्या नावावर आपापली राजकीय दुकाने चालवणारी काही मंडळी अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या महात्मा बसवेश्वरांना जातीय मापदंड लावून त्यांच्या विचारांना हरताळ फासण्याचे महापाप करीत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जागतिक स्तरावर महात्मा ठरलेल्या बसवेश्वरांना अतिशय खुजे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसू लागली आहेत. वीरशैव सिद्धान्ताचा गाभा असलेल्या शिवउपासनेला लिंगायत या व्यावहारिक शब्दामध्ये बंदिस्त करून, स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी करीत आहेत. लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी केली असे सांगत वीरशैव समाजातील भोळ्याभाबड्या लोकांची दिशाभूल करून, समाजातील तरुणांचा बुद्धिभेद करीत आहेत. या लोकांचे मनसुबे नेमके काय आहेत, हे आपण वेळीच लक्षात घेतले पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे भारत हे हिंदुराष्ट्र व्हावे असे सर्वांना वाटते. पण त्यासाठी आपण एकसंघ झाले पाहिजे. बसवेश्वरांच्या नावाने दुकानदारी करणार्‍या लोकांना नेमके हेच नको आहे. हिंदू धर्माशी निगडित असलेले विविध संप्रदाय बाजूला करून घटनात्मकदृष्ट्या हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचा या लोकांचा डाव आपण ओळखला पाहिजे. हे लोक केवळ आपल्या संप्रदायाशीच नव्हे, तर आपल्या राष्ट्राशीदेखील गद्दारी करीत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम हिंदू आणि वीरशैव एकच आहेत हे सत्य स्वीकारून वीरशैव संप्रदायाच्या घटकांनी एकसंघ आणि सशक्त व्हावे. हिंदुस्थानाशी गद्दारी करून फादर आणि चादर संस्कृती पोसणार्‍या धर्मद्रोह्यांना आणि राष्ट्रद्रोह्यांना वेळीच आवर घातला नाही, तर... पुढची पिढी कदापिही आपल्याला क्षमा करणार नाही. म्हणून वेगळा धर्म मागणार्‍या आणि बसवेश्वरांच्या विचारांना हरताळ फासणार्‍या तथाकथित डाव्या विचारांच्या लोकांंचे बसवेश्वर आपणास हवे आहेत की, वीरशैव महामत जागतिक स्तरावर नेऊन, या समाजाला नवसंजीवनी देणारे महात्मा बसवेश्वर आपणास हवे आहेत हे ज्याचे त्याने ठरवावे, इतकेच या निमित्ताने सूचित करायचे आहे.
-डॉ. विजय जंगम (स्वामी)
कार्याध्यक्ष - प्रवक्ता
अ.भा. वीरशैव लिंगायत महासंघ