अभिजात लावणीस्राज्ञी

18 Apr 2022 15:17:14
लावणीसम्राज्ञी म्हणून ज्यांना नावलौकिक प्राप्त झाला, अशा ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वेळी पद्म गौरव लेखमालेत त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत. सुलोचना चव्हाण यांनी खरे तर बोर्डावरची लावणी माजघरात आणली आणि आज प्रत्येक मराठी माणूस त्यांची लावणी गुणगुणत असतो. लावणीचा ठसका आपल्या आवाजातून सादर करताना त्यांनी लावणी या गेय प्रकाराचा घरंदाजपणा आणि अभिजात लोकसंगीताची परंपरा समर्थपणे सांभाळली आहे.

vivek
 
लोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे विवाहापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे शालेय शिक्षण जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड होती, पण कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांनी कुठेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नाही. त्या काळी रेडिओवर आणि प्रसंगी ग्रामोफोनवर गाणी ऐकत तीच गुणगुणत बसायचे, हा एकच छंद त्यांना होता. त्या वेळी गायिका वत्सलाबाई कुमठेकरांची ऐकलेली, ’सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची’ ही लावणी त्या सतत गुणगुणत असायच्या. लहानपणी आपली मुलगी लावणी म्हणते आहे म्हणून त्यांनी वेळप्रसंगी आईचा ओरडाही खाल्ला आहे. त्यांनी श्रीकृष्ण बालमेळ्यात काम केले. हिंदी, उर्दू, गुजराती, मराठी नाटकांत बालभूमिका केल्या आहेत.
सुलोचना चव्हाण यांच्या मोठ्या भगिनीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. श्रीकृष्ण बालमेळ्याचे रंगभूषाकार दांडेकर चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. दांडेकर यांच्या ओळखीतून संगीत दिग्दर्शक शाम बाबू पाठक यांच्याकडे सुलोचनाबाईंनी पहिले चित्रपट गीत गायिले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी गायनाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांचा लावणी क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. ठसकेबाज आणि वेगळ्या धाटणीच्या आवाजाची गायिका म्हणून आचार्य अत्रे यांच्या ’हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटासाठी सुलोचनाबाई पहिली लावणी गायल्या. चित्रपटाला वसंत देसाई यांचे संगीत होते आणि नायिका होत्या हंसा वाडकर. ’मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊन बीए बीटी’ असे शब्द असलेली ती लावणी त्या काळी तुफान गाजली आणि आचार्य अत्रेंनी त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब बहाल केला.
पुढे त्यांनी राजा बढे यांच्या ‘कलगीतुरा’ चित्रपटासाठी काही लावण्या गायल्या. तो काळ तसा तमाशाप्रधान चित्रपटांचा होता. त्यामुळे प्रत्येक चित्रपटात दोन-तीन लावण्या तर हव्याच, हाच प्रत्येक निर्मात्याचा आग्रह असे. याच कलगीतुरा चित्रपटाचे दिग्दर्शक चव्हाण यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि पूर्वाश्रमीच्या सुलोचना कदम लग्नानंतर सुलोचना चव्हाण झाल्या. लग्नापूर्वी हिंदी चित्रपटांतून त्यांनी पार्श्वगायन केले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या सुलोचना कदम अथवा के. सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी मन्ना डे यांच्यासह ‘भोजपुरी रामायण’ गायिले.


vivek
लावणीत ठसकाही हवा आणि खटकाही हवा आणि हीच सुलोचनाबाईंच्या गायकीची खासियत आहे. पाठीमागे अंतरे कसेही असोत, पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे, हे त्यांचे स्पष्ट मत होते. मुखड्यावरच लावणी उचलली गेली पाहिजे, मग ऐकणारा त्यात गुंतूनच जातो. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातली गाणी सुलोचनाबाईंनीच गायला हवी, असा जगदीश खेबूडकरांनी आग्रह धरला आणि ’नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या ठसकेबाज लावणीने महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. या गाण्याने सुलोचना चव्हाणांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. मराठीबरोबरच हिंदी, गुजराती, तामिळ, पंजाबी, भोजपुरी या भाषांतही त्या गायल्या आहेत. 1965 साली ‘मल्हारी मार्तंड’ चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. 2010 साली संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्काराची श्रीमंती त्यांच्या पाठीशी आहे.
उमेदीच्या काळात गझल, भजन इत्यादी सर्व प्रकार त्यांनी सादर केले आहेत. पण खरी ओळख मिळाली ती लावणीसम्राज्ञी म्हणूनच. ‘मल्हारी मार्तंड’मधली ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ आणि ‘पदरावरती जरतारीचा’, तसेच ‘सवाल माझा ऐका’मधली ‘सोळावं वरीस धोक्याचं’ आणि ‘कसं काय पाटील बरं हाय का’ ही गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. गाण्याचा किंवा नृत्याचा कुठलाही कार्यक्रम असो, कोणते पुरस्कार सोहळे असो की मराठी वाद्यवृंदाचे कार्यक्रम, या गाण्यांशिवाय हे कार्यक्रम पूर्ण होतच नाहीत. अगदी ‘मराठी बाणा’सारख्या गाजलेल्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातही ‘खेळताना रंग बाई होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’ हे गाणे पुन्हा पुन्हा वन्स मोअर घेते. श्रीनिवास खळेंसाठी गायलेले ‘कळीदार कपूरी पान’, विश्वनाथ मोरेंच्या संगीतातील ‘औंदा लगीन करायचं’ आणि तुकाराम शिंदेंचे ‘पाडाला पिकलाय आंबा’ ही चित्रपटातील नसलेली गाणीसुद्धा तुफान लोकप्रिय ठरली आहेत.
याच ठसकेबाज आवाजाची जादूगार लावणीसम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाणांना भारत सरकारने यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. सामाजिक भान जपत कलाक्षेत्रात लावणीगायिका म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शांत, निगर्वी सुलोचनाबाईंना विद्यमान केंद्र सरकारने पद्मश्री हा सन्मान प्रदान करत त्यांच्या कार्याला खर्‍या अर्थाने लोकाभिमुख केले आहे. सुलोचनाबाईंना परमेश्वराने निरामय आरोग्य प्रदान करावे, हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे.
Powered By Sangraha 9.0