अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतानातारतम्य हवं - पल्लवी जोशी
12 Apr 2022 13:19:10
1990च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या झालेल्या वंशसंहाराची भेदक जाणीव करून देणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच, खरं तर त्याचे ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाने नवनवे विक्रम रचायला सुरुवात केली. अनेक अडथळ्यांना पार करत, आवश्यक तिथे संघर्ष करत पण भूमिकेशी आणि चित्रपटातील मांडणीशी ठाम राहण्यात विवेक अग्निहोत्री आणि त्यांची टीम यशस्वी झाली. सुरुवातीला केवळ साडेचारशे स्क्रीन उपलब्ध झालेला हा चित्रपट आठवड्याभरातच 5000 स्क्रीनवर दाखवला गेला. दुर्दैवी वास्तवावर आधारित, अंतर्मुख करणार्या अतिशय गंभीर विषयावरच्या चित्रपटाला जाणत्यांसह सर्वसामान्यांनी भरभरून दिलेली दाद ही दखल घेण्याजोगी. या चित्रपटाने एका नव्या नॅरेटिव्हला - उद्बोधनाला जन्म दिला आणि एकाच वेळी संपूर्ण समाजापर्यंत विचार पोहोचवण्यासाठी हे माध्यम किती उपयोगी पडू शकतं, याची जाणीव या चित्रपटाने करून दिली.
या पार्श्वभूमीवर, या चित्रपटाच्या निर्मात्या, त्यासाठी झालेल्या संशोधन कार्यातील एक महत्त्वाच्या सदस्या आणि चित्रपटातील राधिका मेनन ही व्यक्तिरेखा विलक्षण परिणामकारकतेने पडद्यावर साकारणार्या पल्लवी जोशी यांची विवेकच्या फेसबुक पेजसाठी आणि यू ट्यूब चॅनलसाठी मुलाखत घेण्यात आली.
विवेक अग्निहोत्रींच्या ‘बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’, ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटांची चर्चा झाली, विशिष्ट वर्तुळात त्यांच्यावर टीकाही झाली.. या पार्श्वभूमीवर द कश्मीर फाइल्ससारख्या गंभीर, विवाद्य विषयावर टीका होणं हे तुम्हांला अपेक्षितच असणार. ट्रेलर रिलीज झाल्यापासून तशी टीका चालू झालीही. मात्र चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्व स्तरांतल्या प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अशा भरभरून प्रतिसादाची कल्पना केली होती का? या प्रतिसादाने काय वाटलं?
प्रतिसाद चांगला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. कारण द ताश्कंद फाइल्सपासून आमचा असा प्रेक्षकवर्ग तयार व्हायला लागला होता. आम्ही आगामी चित्रपटातून काय दाखवतो याचं त्यांना औत्सुक्य होतं, आतुरता होती. मात्र कमर्शियल सिनेमातल्या लोकांना हा विश्वास नव्हता. एका ठरावीक वर्तुळापलीकडे या चित्रपटाची दखल घेतली जाणार नाही, असं त्यांना वाटत होतं. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. म्हणून फक्त साडेचारशे स्क्रीन्स उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ‘हे कमी होतील, कारण चित्रपटाला प्रतिसाद चांगला मिळणार आहे’ असं आम्ही सांगूनही स्क्रीन्स वाढवून मिळाले नाहीत. या चित्रपटाची जाहिरात नाही. कुठेही पोस्टर्स नाहीत, होर्डिंग्ज नाहीत. ज्या थिएटरमध्ये दाखवला जाणार होता, तिथेही बाहेर पोस्टर लावलेलं नाही असं सुरुवातीचं चित्र होतं. ज्या चित्रपटाला अशा प्रकारे कमी लेखलं गेलं, तो प्रदर्शित झाला त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत हजार स्क्रीन्स करावे लागले. आणि त्याने पंधरवड्यातच 5 हजार स्क्रीन्सचा टप्पा गाठला. हा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, तो अपेक्षित नव्हता. कश्मीर फाइल्स चालवण्याची जबाबदारी लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वत:कडे घेतली. हे कल्पनेच्या पलीकडलं होतं.
विषय जर ताकदीचा असेल, तो निर्भीडपणे मांडला गेला असेल आणि तो भारतीय मूल्यांशी संबंधित असेल तर तो प्रेक्षकांना जास्त भावतो, अशा विषयांना ते उचलून धरतात हे यावरून लक्षात आलं.
पल्लवीजी, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतलीत. या दोन्ही भेटींविषयी, तुमच्यात झालेल्या चर्चेविषयी आम्हांला उत्सुकता आहे.
मी मोदीजींचा खूप आदर करते. त्यांनी आपल्या देशाला जी दिशा दिली आहे आणि आपल्या कामामधून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची जी तेजस्वी प्रतिमा निर्माण केली आहे, ती कौतुकास्पद आहे, आदराने मान झुकावी अशी आहे. याआधी परदेशात गेल्यावर आम्हाला जी वागणूक मिळायची, ती काही फार चांगली नव्हती. आज मात्र आम्ही भारतातून आलो आहोत हे सांगताना आमच्या बोलण्यात अभिमान असतो आणि तो देहबोलीतूनही दिसतो. हा आत्मविश्वास जागृत करण्याचं श्रेय मोदीजींना आहे. माझ्या आठवणीतला तरी हा पहिला नेता आहे.
ते लोकांशी ज्या पद्धतीने बोलतात, त्यांचं शांत चित्ताने ऐकून घेतात हेदेखील शिकण्यासारखं. वास्तविक त्यांचा संपूर्ण दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये बांधलेला असतो. मात्र बोलावलेल्या व्यक्तीशी बोलताना त्याचा कोणताही ताण त्यांच्या बोलण्यात, देहबोलीमध्ये नसतो. आलेल्या व्यक्तीला इतकं ‘अटेन्शन’ देणं, महत्त्व देणं हे कौतुकास्पद वाटतं मला. आणि यात सातत्य आहे. मी आजवर तीन वेळा मोदीजींना भेटले आहे. दर वेळी मला हाच अनुभव आला आहे. समोरची व्यक्ती जेव्हा बोलत असते, तेव्हा ते अतिशय शांतपणे, एकाग्रतेने ऐकत असतात. कधीही मध्ये थांबवणार नाहीत की दुर्लक्ष करणार नाहीत. सदैव हसतमुख असतात. समोरच्या व्यक्तीला भेटीचा ताण येऊ नये असा त्यांचा ‘अॅप्रोच’ असतो. भेटल्यावर सुरुवातीला ते स्वत:च ‘चला, आधी फोटो काढू या’ असं म्हणत वातावरणातला ताण घालवतात. मग चहापाणी होतं. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मलाच काही स्पेशल वागणूक मिळते आहे. पण आलेल्या सगळ्यांशी त्यांचं वागणं असंच असतं. हे खरोखरच खूप शिकण्यासारखं आहे.
अमितजींकडेही तसाच आपुलकीने आदरातिथ्य करण्याचा अनुभव. आम्हाला खास नाश्त्याच्या वेळी भेटीचं आमंत्रण होतं. नाश्त्याची खास तयारी होती. अगदी हसतखेळत, गप्पा मारत आम्ही नाश्ता केला. अमितजी चांगले ज्योतिषी आहेत, उत्तम पत्रिका बघतात हेही त्या भेटीतच मला कळलं.
या दोघांनीही विवेकला द कश्मीर फाइल्सबद्दल कौतुकाची थाप दिली. ‘सत्य तुम्ही सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. याला खरंच खूप हिंमत लागते. हे साध्यासुध्या माणसाचं काम नाहीये’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
प्रदर्शित होण्याआधीही आमच्याविरोधात फतवे निघाले होते. पण आम्ही त्याला बधलो नाही. ज्या पद्धतीने हा चित्रपट करण्याचं प्रॉमिस आम्ही काश्मिरी पंडितांना दिलं होतं, त्या पद्धतीने तो चित्रपट पूर्ण केला. या सगळ्याची माहिती त्या दोघांना होती, त्यामुळे तर त्या दोघांना विवेकचं विशेष कौतुक वाटलं. एका चित्रपटाला पंतप्रधानांनी, देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीने दाद देणं हाच आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, एखाद्या पुरस्काराच्या तोडीचा आहे.
तुमच्या दोघांच्या नावाने फतवे निघालेले असतानाही त्याने विचलित न होता, निडरपणे तुम्ही हातात घेतलेलं काम यशस्वीपणे तडीस नेलंत. अशी निडरता दाखवून काम करता येतं असा संदेश यातून अन्य माध्यमकर्मींपर्यंत पोहोचवण्याचं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम या चित्रपटाने केलं आहे. अन्य निर्मात्यांचे ‘द केरळ फाइल्स’, ‘इफ्तिकार’ हे आगामी काळात येणारे चित्रपट ही त्याचीच उदाहरणं म्हणता येतील.
तुम्ही म्हणता तसं आम्ही निमित्तमात्र असूही.. पण लोक आज धाडस करताहेत, याचं कौतुक वाटतं. आपल्याच देशामध्ये आपल्याच इतिहासाबद्दल बोलताना आपल्याला का भीती वाटावी? लोकशाही देशात सत्य बोलायला आपल्याला भीती वाटत असेल, तर आपण लोकशाहीचं केलेलं हे अध:पतन आहे. आपल्या राष्ट्रीय बोधचिन्हावरच ‘सत्यमेव जयते’ असं लिहिलेलं आहे. मात्र त्याचा विसर पडून, खोटं दाखवून पैसे कमवायचे उद्योग आजपर्यंत चालत होते. ‘द कश्मीर फाइल्स’ने या सगळ्यावर आघात केला आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ देशातलेच नव्हे, तर परदेशात राहणारे भारतीयही संघटित आहेत, हा संदेश जगात पोहोचण्याची खूप आवश्यकता होती, ती या चित्रपटामुळे पूर्ण झाली असं मला वाटतं. भारत हा एक छोटा देश आहे, परदेशी वर्तमानपत्रांनी भारताविषयी काहीही लिहिलं - अफवा पसरवल्या तरी खपून जातं, असं परदेशी वर्तमानपत्रांना वाटतं आणि आपल्याकडचे काही लोक या वर्तमानपत्रांची भलामण करतात, अशा सगळ्यांपर्यंत भारतीय संघटित आहेत हा संदेश या चित्रपटाने पोहोचवला. एका विवेक अग्निहोत्रीचं वा एका पल्लवी जोशीचं हे काम नाही. असे आणखी खूप जण पुढे यायला हवेत. त्यामुळे असे चित्रपट येणार आहेत हे ऐकून खूप बरं वाटलं. याची खूप आवश्यकता आहे.
सिनेमॅटिक लिबर्टी ही संकल्पना आपल्याकडे एक बचावाची ढाल म्हणून वापरली जाते. मात्र जेव्हा फक्त आणि फक्त सत्य कथन करायचं असतं, वास्तव सर्वांसमोर ठेवायचं असतं तेव्हा ही लिबर्टी घेण्यावर मर्यादा येतात. अशा वेळी कलावंत म्हणून कुचंबणा होते की अधिक कस लागतो? तुम्हाला काय वाटतं?
सिनेमॅटिक लिबर्टीशिवाय चित्रपट बनवता येत नाही. त्यामुळे लिबर्टीज आम्हीही घेतल्या आहेत. पण वास्तव घटनांवर आधारित चित्रपट तयार करताना लिबर्टी घेताना जे तारतम्य पाळावं लागतं, ते आम्ही पाळलं. कसोशीने पाळलं. अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेणं म्हणजे सत्याशी द्रोह नाही, याचं भान बाळगलं.
आम्ही चित्रपटात व्यक्तिरेखांची मूळ नावं बदलली आहेत. ती एवढ्याचसाठी की, ज्या लोकांची हत्या झाली, ज्या बायकांवर अतिप्रसंग ओढवले, त्यांच्या नावांची चर्चा होऊन त्यांच्याशी संबंधितांना दु:ख होऊ नये म्हणून. त्यांची नावं पब्लिक डोमेनमध्ये असली, तरी मुद्दाम एखाद्या व्यक्तिरेखेला त्यांचं नाव देणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही.
विस्थापित काश्मिरी पंडितांचा आकडा 6 ते 7 लाखाच्या दरम्यान आहे. आम्ही 700हून अधिक मुलाखती रेकॉर्ड केल्या. यापैकी 100 व्यक्तिरेखाही एका चित्रपटात घेणं अशक्य होतं. तेव्हा अनेकांकडून ऐकलेले कॉमन प्रसंग आम्ही चित्रपटात घेतले. एकच कुटुंब आणि त्या कुटुंबावर झालेले अत्याचार असा फोकस ठेवला. काही व्यक्तिरेखा एकत्र केल्या. काही संवाद वेगवेगळ्या भूमिकांना दिले. संवेदनशीलतेशी फारकत न घेता आम्ही एका सूत्रात कथा, व्यक्तिरेखा बांधण्यासाठी आवश्यक तेवढी लिबर्टी घेतली.
यानंतर ‘दिल्ली फाइल्स’ येणार आहे याची माहिती आहे. तो पाहायची तर उत्सुकता आहेच, पण त्यानंतर आणखी कोणत्या फाइल्स उघडल्या जाणार आहेत, तेही समजून घ्यायला आवडेल.
आपल्या देशाच्या बोधचिन्हात जे तीन सिंह आहेत, ते Right to Truth, Right to Justice, Right to Life and Freedom या तीन विचारांचं प्रतीक आहेत, असं आम्ही मानतो. तोच लोकशाहीचा पाया आहे. म्हणून या तीन विचारांसाठी आम्ही तीन चित्रपटांची निर्मिती करायचं ठरवलं. पैकी पहिला ‘द ताश्कंद फाइल्स’ झाला, त्यानंतरचा ‘द कश्मीर फाइल्स’ही झाला. यानंतर ‘दिल्ली फाइल्स’ करतो आहोत. त्यासाठीच्या रिसर्चला सुरुवातही झाली आहे. आमची संशोधनावर आधारित निर्मितीची गती पाहता आणखी वर्ष-दीड वर्षात तो प्रदर्शित व्हायला हवा.