अष्टपैलू अर्थमूर्ती डॉ. आशुतोष रारावीकर

12 Apr 2022 15:42:46
डॉ. आशुतोष रारावीकर यांच्या हातून राष्ट्रउभारणीच्या विविध आयामांना सुदृढ करण्याचे सत्कृत्य घडले आहे. त्यांच्या कार्यकतृत्वासह विविध क्षेत्रांतील त्यांची मुशाफिरी आणि मानवतेचे दर्शन त्यांच्या आगामी पुस्तकात वाचकांना घडणार आहे. त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारा लेख.

book
 
तीर्थक्षेत्र नाशिकच्या भूमीने आतापर्यंत अनेक नररत्ने प्रदान केली आहेत. त्यातीलच एक रत्न म्हणजे डॉ. आशुतोष रारावीकर. वडील सुविख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि आई संस्कृत पंडिता असे सुविद्य पालक लाभलेले आशुतोष यांना लहानपणापासूनच सुसंस्कृत व अर्थपूर्ण जीवनाचे शिक्षण लाभले. बारावीत बोर्डात प्रथम आल्याने ते सुवर्णपदकाचे व शासनाच्या प्रतिष्ठित शिष्यवृत्त्यांचे व परितोषिकांचे मानकरी ठरले. अर्थशास्त्रात केंद्र सरकारच्या फेलोशिपसह डॉक्टरेट, एम.बी.ए., गणिती व सांख्यिकी अर्थशास्त्रासह पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत एम.ए., नेट, सी.ए.आय.आय.बी., अमेरिकेतील सीएफए इन्स्टिट्यूट व आय.एम.एफ. - हार्वर्ड - एम.आय.टी. यांची प्रमाणपत्रेही त्यांना मिळाली आहेत.
मुंबई येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये संचालकपदावर कार्यरत असलेल्या डॉ. आशुतोष रारावीकरांनी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयामध्येही संचालकपदावर काम केले आहे. अर्थशास्त्र विषयात त्यांचे धोरणात्मक कार्य, लेखन, संशोधन, विश्लेषण असे भरीव योगदान आहे. आर्थिक व बँकिंग क्षेत्रात त्यांनी जबाबदारीची विविध पदे भूषवली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक क्षेत्रात सहभाग व व्याख्याने दिली आहेत. आर्थिक धोरण व सामाजिक कल्याणविषयक वैविध्यपूर्ण लेखन केले आहे. दारिद्य्रनिर्मूलन आणि अन्नसुरक्षा यासारख्या दुर्बल घटकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर त्यांनी लेखन केले असून भारत सरकारचे पारितोषिकही त्यांना मिळाले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अर्थशास्त्रासारखा किचकट वाटणारा विषय अत्यंत साध्यासोप्या भाषेत मांडण्याच्या कौशल्यामुळे सामान्य वाचकांनाही त्यातून आर्थिक साक्षरतेचा लाभ मिळतो.
सामाजिक, शासकीय, राष्ट्रीय स्तरावरील अर्थशास्त्र, साहित्य यासह अनेक क्षेत्रांत अमर्त्य सेन पुरस्कार, साहिर लुधियानवी पुरस्कार अशा दोनशेहून अधिक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. दूरदर्शनतर्फे प्रसारित त्यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष कार्यक्रमात ‘यशोशिखरावरील बहुआयामी प्रतिभेचा मनोहर कोहिनूर हिरा’ असा गौरव करण्यात आला. विविध दूरचित्रवाहिन्या व आकाशवाणी यांच्या कार्यक्रमात, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व वृत्तपत्रे यांमध्ये त्यांच्यावर व त्यांच्या पुस्तकांवर अनेक लेख व कार्यक्रम प्रसिद्ध होत असतात.
वडील अर्थशास्त्रज्ञ व आई साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या प्रदीर्घ सहवासाचा परीसस्पर्शही त्यांना लाभला. डॉ. रारावीकर यांचा संस्कृत, मानसशास्त्र, अध्यात्म अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास आहे. अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके, दीपावली विशेषांक यामध्ये त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. ‘यशपुष्प’ हे उत्तम कांबळे यांची प्रस्तावना असलेले पुस्तक कोरोना काळात प्रकाशित झाले.
डॉ. रारावीकर उत्तम वक्तेही आहेत. अत्यंत अमोघ व रसाळ अशा शैलीत विविध विषयांवरील व्याख्यानांतून ते श्रोतृवर्गाला मंत्रमुग्ध करतात. शिक्षणक्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी’ या मुंबई विद्यापीठाच्या विश्वविख्यात संस्थेच्या संचालक मंडळाचे ते विद्यमान सदस्य आहेत. अनेक इतर शासकीय व विद्यापीठांच्या समित्यांमध्ये सदस्य राहून त्यांनी अभ्यासक्रमांची रचना, नवप्रवर्तनात्मक विषयांचा अंतर्भाव व संशोधनात्मक दृष्टीचा विकास घडवला आहे.
 
अन्य क्षेत्रांतही त्यांचा मुक्त संचार असतो. विद्यार्थिजीवनापासून स्पोर्ट्स, अभिनय, नेतृत्व, तबलावादन, संगीत, वक्तृत्व, योग, लेखन, जागतिक पर्यटन अशा अनेक प्रांतांत ते लीलया संचार करीत आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानात कुशलता, माणसांना हाताळण्याची व जपण्याची क्षमता व कला त्यांच्यात आहे.
 
उच्चविद्याविभूषित व नामवंत लेखिका पत्नी वीणा व अर्थशास्त्रातील तज्ज्ञ सुपुत्र मिहीर यांच्या साथीने त्यांची कौटुंबिक मैफलही सुरेल झाली आहे. बालपणापासून ते योगविद्याप्रवीण व आध्यात्मिक साधक आहेत. अर्थशास्त्र आणि अध्यात्म या दोन पायांवर त्यांच्या आयुष्याची इमारत उभी राहिली. लोकसेवेचा ध्यास घेतलेला एक निरासक्त देशभक्त. अशा या बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या आगामी पुस्तकात त्यांच्या कार्यकर्तृत्वासह विविध क्षेत्रांतील मुशाफिरी आणि मानवतेचे मनोहर दर्शनही वाचकांना घडेल. राष्ट्रउभारणीच्या विविध आयामांना सुदृढ करणार्‍या या प्रेरणादायक दीपस्तंभाचा परिचय अनेकांना जीवनपथावर मार्गदर्शक ठरेल, याची खात्री आहे.
 
- पूनम पवार
Powered By Sangraha 9.0