पंतप्रधानपदी राहून इम्रान खान यांनी केलेल्या चुकांची यादी बरीच मोठी होईल. विरोधकांनी अविश्वास ठराव आणायचे ठरवल्यावर इम्रान यांच्या हातात वेळ भरपूर होता. पण त्याच वेळी त्यांची घमेंडही वाढलेली होती. आपले लष्करप्रमुख वेगळ्या दिशेकडे पाहत आहेत हे त्यांना कळायला हरकत नव्हती. देशात असंतोष माजतो आहे आणि वृत्तपत्रांमधून आपल्या सरकारवर कडवट टीका होऊ लागलेली आहे, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. महागाईने टोक गाठलेले असताना त्यांचे सरकार हताश होऊन या परिस्थितीकडे केवळ पाहत राहिले होते.
पाकिस्तानी संसदेचे उपसभापती कासीम सुरी यांनी लोकशाहीचाच मुडदा पाडला आहे, एवढेच काय ते म्हणायचे पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अटा बांदियाल यांनी बाकी ठेवले. अध्यक्षांनी पाकिस्तानची संसद बरखास्त केलेली असताना त्यांनी तिला जिवंत केले आहे. त्यांनी कासीम खान सुरी यांनी तहकूब केलेली सभा जिवंत केली आणि अविश्वासाचा ठराव रद्द करण्याचा त्यांचा निर्णय रद्द केला. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाला जीवदान देऊन अध्यक्षांनी त्यांचा स्वीकारलेला राजीनामाही रद्द ठरविला आणि संसद बरखास्तीचा निर्णय रद्द करून एक नवा पायंडा पाडला आहे. त्यांनी पाकिस्तानात खर्या अर्थाने घटनात्मक पेच उभा केला आहे.
असे असले तरी त्यांना पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागत आहे. आपल्या विरोधात अविश्वासाचा ठराव संमत होण्याचे आता काही टळत नाही, हे स्पष्ट होताच इम्रान खान यांनी अविश्वास ठरावावर चर्चाच होऊ न देता नॅशनल असेंब्लीची बैठकच स्थगित करायला उपाध्यक्षांना भाग पाडले. बैठक स्थगित होताच इम्रान यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष डॉ. आरीफ अल्वी यांची भेट घेऊन त्यांना नॅशनल असेंब्ली बरखास्त करायचा सल्ला दिला. डॉ. अल्वी यांनी इम्रान यांना “तुमच्यामागे बहुमत आहे कोठे?” असा सवाल करायला हरकत नव्हती, पण त्यांनी इम्रान यांना काहीच विचारले नाही. इम्रान खान यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावावर रविवार दि. 3 एप्रिल रोजी नॅशनल असेंब्लीमध्ये चर्चा व्हायची असताना इम्रान यांनी चक्क मैदानातून पळ काढला. त्यांनी आदल्या दिवशीच एका निवेदनाद्वारे ‘आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणारे आहोत’ असे म्हटले होते, प्रत्यक्षात त्यांनी पहिला चेंडू पडायचीही वाट पाहिली नाही आणि ते ‘हिट विकेट’ झाले. आपल्याविरुद्धच्या ज्या एका आंतरराष्ट्रीय कटाचा उल्लेख करून त्यांनी या विषयावर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या विषयाचा उल्लेख झाल्याचे सांगितले, त्या बैठकीची नोंद कोठे आहे, असा सवाल पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अटा बांदियाल यांनी सरकारी वकील बाबर अवान यांना केल्याने या सर्व प्रकरणात खोटेपणा असल्याचेच उघड होते आहे.
इम्रान यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला जाणार म्हणताच त्यांचे धाबे दणाणले होते. त्यांनी इस्लामाबादेत एक मेळावा घेऊन विरोधकांना आपल्या पाठीराख्यांची ताकद दाखवायचा प्रयत्न केला होता. याच मेळाव्यात त्यांनी ‘आपल्याला दूर करण्यात आले तर पाकिस्तानला वाटेल तेवढी मदत दिली जाईल, पण जर ते पंतप्रधानपदावर कायम राहिले तर मात्र पाकिस्तानचे काही खरे नाही’ अशी धमकी अमेरिकेने दिल्याचे म्हटले. या विषयावर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले, त्याचीच विचारणा सरन्यायाधीशांनी केली, तेव्हा इम्रान यांचे वकील गोरेमोरे झाले नसतील तरच नवल. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘न्यूज’ने अमेरिकेत पाकिस्तानच्या दूतावासातच अमेरिकेबरोबरची ही चर्चा झाल्याचे म्हटले आहे. दक्षिण आशियाविषयक उपमंत्री डोनाल्ड लू यांनी ऑक्टोबर 2021मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन अर्थमंत्री शौकत तरिन, राजदूत आसूद माजिद खान यांच्याशी बोलताना ही अट घातल्याचे त्यात म्हटले होते. गंमत अशी की, खुद्द इम्रान खान यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात आणि पाकिस्तान टीव्हीवर बोलताना हा आरोप केला, पण नंतर लगेचच ‘एका मोठ्या देशाने आपल्याविरुद्ध हे कारस्थान रचले होते’ असे जाहीर केले. पंतप्रधानपदावर असलेल्या एका व्यक्तीला किती पाचपोच नसतो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. डोनाल्ड लू यांनी मात्र अशा तर्हेच्या आरोपावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. प्रत्यक्षात अमेरिकेच्या धमकीचे असे कोणतेही पत्र अस्तित्वात नसून इम्रान यांचे ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ शाह मेहमूद कुरेशी हेच या तथाकथित कारस्थानाचे कर्तेकरविते असल्याचे उघड होते आहे.
या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याच्या इम्रान खान यांच्या या सवयीचा नेहमीच फज्जा उडालेला आहे. अमेरिकेबरोबची ही बैठक जर ऑक्टोबर 2021मध्ये झाली असेल, तर तेव्हा इम्रान यांची रशिया-भेट झालेली नव्हती, किंबहुना तेव्हा ती नियोजितही नव्हती. आपण रशियाला जाऊन आल्याचा राग अमेरिकेने आपल्यावर काढला असल्याचे त्यांचे म्हणणे त्यामुळे थोबाडावर आपटते. कारण रशियन नेते व्लादिमीर पुतिन यांच्याशी 24 फेब्रुवारी 2022 रोजी क्रेमलीनमध्ये त्यांची भेट झाली. युक्रेनवर हल्ला करायला रशियाला तोच मुहूर्त योग्य वाटला होता. बरोबर तीन दिवस आधी युक्रेनमध्ये असलेल्या पाकिस्तानी राजदूताने युक्रेनला आपल्या देशाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. वास्तविक या वर्षाच्या प्रारंभापासूनच रशियाकडून युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे हे दिसत असूनही इम्रान यांनी आपला दौरा पुढे रेटला आणि आपली अपरिपक्वता सिद्ध केली. कोणत्याही देशाच्या राजकारण्याने एवढा उद्दामपणा केला नसता. इथे एक उदाहरण द्यायला हवे ते अटलबिहारी वाजपेयी यांचे. 1979मध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्रिपदी असताना त्यांनी आपली चीनभेट अशाच कारणांसाठी रद्द केली होती. तेव्हा चीनने व्हिएतनामवर आक्रमण केले आणि वाजपेयी त्याच वेळी चीनमध्ये कँटनला होते. या आक्रमणाची माहिती कळताच त्यांनी आपल्यासमवेत असलेले चीनचे भारतातील तेव्हाचे राजदूत चेन चाओ युआन यांच्याकडे भारताच्या वतीने कडक निषेध व्यक्त करून माघारी परतायचा निर्णय केला (19 फेब्रुवारी 1979). काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या घटनेचा गौरव करून इम्रान खान यांना तसे करता आले असते, असे स्पष्ट केले. पण कोठे वाजपेयी आणि कोठे हा क्रिकेटपटू इम्रान, असेच म्हणायची वेळ पाकिस्तानी जनतेवर आली आणि आता तर प्रत्येक जणच इम्रान खानांच्या नावाने बोटे मोडताना दिसतो आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कंवर जावेद बाज्वा यांनीही अशीच बोटे मोडली. इम्रान खान यांचे सरकार संकटात असतानाच बाज्वा यांनी ‘रशियाने युक्रेनवरील आक्रमण विनाशर्त मागे घेऊन युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा मान राखायला हवा’ असे जाहीर केले आणि इम्रान खान यांच्या भोंगळ आंतरराष्ट्रीय धोरणाला जबर तडाखा ठेवून दिला. इम्रान यांची रशिया-भेट ही भीक मागायच्या उद्देशाने होती आणि त्यातही त्यांना सपशेल अपयश आले. पुतिन यांनी त्यांच्या तोंडाला चक्क पाने पुसली. त्यामुळे अमेरिकेचे तूप आणि रशियाचे तेल, या दोन्हींना पाकिस्तानला मुकावे लागले. पाकिस्तानला परतल्यावर त्यांना भारताच्या तटस्थ परराष्ट्र व्यवहाराची वाखाणणी करणे भाग पडले. त्यांना बहुधा हे माहीत नसावे, की भारताचे परराष्ट्र धोरण हे राजकीय पक्षांच्या विचारसरणीपेक्षा नेहमीच देशहिताला अधिक प्राधान्य देणारे राहिले आहे.
पंतप्रधानपदी राहून इम्रान खान यांनी केलेल्या चुकांची यादी बरीच मोठी होईल. विरोधकांनी अविश्वास ठराव आणायचे ठरवल्यावर इम्रान यांच्या हातात वेळ भरपूर होता. पण त्याच वेळी त्यांची घमेंडही वाढलेली होती. आपले लष्करप्रमुख वेगळ्या दिशेकडे पाहत आहेत हे त्यांना कळायला हरकत नव्हती. देशात असंतोष माजतो आहे आणि वृत्तपत्रांमधून आपल्या सरकारवर कडवट टीका होऊ लागलेली आहे, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. महागाईने टोक गाठलेले असताना त्यांचे सरकार हताश होऊन या परिस्थितीकडे केवळ पाहत राहिले होते. अगदी पाणी गळ्याशी आल्यावर ते आपल्या कार्यकर्त्यांना आणि नॅशनल असेंब्लीच्या स्वपक्षीय सदस्यांना काय सांगत होते, तेही पाहण्यासारखे आहे. डॉ. आरीफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्यावर त्यांचे पंतप्रधानपद पुढल्या निवडणुकांपर्यंत कायम राहणार असल्याचे त्यांचे हस्तक सांगू लागले. स्वाभाविकच त्यांचा राजकीय वकूब इम्रान खानांइतकाच असल्याचे त्यामुळे उघडकीस आले. मग त्यांनी या सगळ्या घटनांमागे परकीय शक्ती असल्याचे सांगायला प्रारंभ केला. आपल्याला पंतप्रधानपदावरून हुसकावून लावणे हा त्या कटाचा प्रमुख भाग असल्याचे त्यांचे म्हणणे होते. झुल्फिकार अली भुट्टो हे अशाच कटाचे बळी ठरले, हे सांगायलाही त्यांनी कमी केले नाही. भुट्टो यांना 4 एप्रिल 1979 रोजी फासावर लटकवण्यात आले आणि 3 एप्रिल रोजी इम्रान खान त्यांची आठवण जागवत होते. भुट्टोंचे कुटुंबीय इम्रान खानांच्या विरोधात संघर्ष करत होते. नॅशनल असेंब्लीची बैठक स्थगित होताच सर्व विरोधकांनी असेंब्लीच्या सभागृहातच बैठक मारण्याचा निर्णय घेतला. इम्रान खान यांनी दुसर्या दिवशी आपल्या समर्थकांना असेंब्लीसमोर निदर्शने करायचा आदेश दिला. त्याला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. इम्रान यांची राजकीय घसरगुंडी सुरू झाल्याचे हे लक्षण होते. इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाला गळती लागणार, हे स्पष्ट झाले तेव्हा इम्रान यांनी आपल्या विरोधकांना उद्देशून दमबाजी केली होती. त्यांनी म्हटले होते की, “हा इम्रान आता या ठिकाणी आहे म्हणून शांत आहे, पण रस्त्यावर उतरलेला इम्रान आतापेक्षा अधिक भयानक असेल हे लक्षात घ्या.” म्हणजे इथेही इम्रान यांच्या स्वत:विषयीच्या आडाख्यांनाच तडाखा बसला.
नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनात उपसभापती कासिम सुरी यांनी कामकाजाला प्रारंभ केल्यावर इम्रान यांचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहात या ठरावावर मतदान होऊ शकणार नाही, असे म्हटले होते. एका परक्या सत्तेच्या प्रेरणेने हा ठराव मांडला जात असल्याचे सांगून ही कृती राजद्रोहाची असल्याचे म्हटले. उपसभापतींनी त्यांचे म्हणणे मान्य करून अविश्वास ठरावाची कारवाई परकीय पैशाच्या जोरावर होत असल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी सदस्यांची मते खरेदी करण्यात आली असल्याचे सांगितले. एकेका व्यक्तीला 25-25 कोटी रुपये देण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला. त्यावर विरोधी पक्ष भडकणे स्वाभाविक होते. 342 सदस्यसंख्या असणार्या त्या सभागृहात त्या वेळी विरोधकांच्या बाजूने 180पेक्षा जास्त सदस्य हजर होते, याचाच अर्थ ते सर्वच्या सर्व राजद्रोही किंवा देशद्रोही आहेत असा होतो; म्हणूनच शाहबाज शरीफ यांनी अध्यक्षांना पत्र लिहून आमच्यापैकी कोण कोण देशद्रोही आहेत ते एकदाचे जाहीर करावे, म्हणजे आम्हालाही काळजी घेता येईल, असे स्पष्ट केले. त्याला अध्यक्षांचे उत्तर आले नाही. तिकडे इम्रान खान मात्र आपल्या समर्थकांना सांगत होते, की, “घबराना नही, अल्ला उपरसे देख रहा है।” इम्रान खान यांच्या कारवायांकडेही तीच शक्ती वरून पाहत असेल, यात शंका नाही. इम्रान खान यांनी तालिबानी सत्तेचे याआधी कौतुक केलेले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईद याच्या व्यासपीठावरून भाषणही ठोकलेले आहे. 2014मध्ये इस्लामाबादमध्ये सर्व रस्ते बंद करणार्या अवामी तेहरिकच्या मुल्ला ताहिरूल काद्रीला त्यांनी साथ दिलेली आहे. ते इम्रान आता हातातली खेळी चालली असल्याचे पाहून बेभान बनले आहेत.
आपल्या विरोधात सगळे वातावरण आहे, हे माहीत असताना इम्रान खान यांनी इस्लामाबादेत इस्लामी राष्ट्रांची परिषद घेतली. त्यात पॅलेस्टाइनचा आणि काश्मीरविषयाचा ठराव संमत करवून घेण्यात आला. खुद्द इम्रान यांनी केलेल्या भाषणात तर भारतातल्या मुस्लिमांवर होत असणार्या ‘अन्याया’बद्दल थयथयाट केला. हे सर्व करण्यामागे पाकिस्तानी जनतेची आणि सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांची सहानुभूती मिळवायचा हेतू होता. ती सहानुभूती तर मिळाली नाहीच, पण त्यांना त्याबद्दल पाकिस्तानी जनतेकडून कडव्या विरोधाचीच प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ते निवडून आल्यापासून आपल्याला एक साधा फोनही केला नाही, याबद्दलच्या भावना त्यांनी यापूर्वीच बोलून दाखवलेल्या आहेत. त्यांच्या त्या भावना आजही कायम आहेत.
पाकिस्तान राजकारणातील तरुण चेहेरे
पाकिस्तानच्या जन्मापासून, तेथे निवडून आलेला एकही पंतप्रधान सलग पाच वर्षे सत्तेवर राहिला नाही, ही पाकिस्तानची शोकांतिका आहे. पहिले पंतप्रधान लियाकत अली हे 1947 ते 1951 या काळात सत्तेवर होते. ते पाकिस्तानच्या सत्तेवर 4 वर्षे 63 दिवस होते, पण सलग पाच वर्षे काही ते सत्ता हाती ठेवू शकले नाहीत. झुल्फिकार अली भुट्टो 3 वर्षे 325 दिवस सत्तेवर होते. बेनझीर भुट्टो सर्वात प्रथम 1 वर्ष 247 दिवस, तर दुसर्यांदा 3 वर्षे 17 दिवस पंतप्रधानपदी राहिल्या. नवाझ शरीफ पहिल्यांदा 2 वर्षे 254 दिवस, तर दुसर्या खेपेला 2 वर्षे 237 दिवस, त्यानंतर पुन्हा 4 वर्षे 53 दिवस सत्तेवर राहिले. पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ युसुफ रझा गिलानी यांचा राहिला. ते पाच वर्षे सत्तेवर राहतील, असे वाटले होते, पण त्यांनाही 4 वर्षे 86 दिवसांनी सत्ता सोडावी लागली. इम्रान खान यांना 3 वर्षे 229 दिवस सत्ता लाभली आणि अविश्वास ठरावावर सरळ बॅटनेच आपण खेळू सांगणारे इम्रान एक चेंडूही न पडता बाद झाले. या सर्व कालखंडात मध्ये मध्ये जे लष्करी हुकूमशहा येऊन गेले, त्यांची कारकिर्द मात्र बर्याच मोठ्या काळासाठी राहिली. आयूब खान ते परवेझ मुशर्रफ मार्गे झिया उल हक असा हा प्रवास होता. आताही कंवर जावेद बाज्वा इम्रान यांच्याकडून हाकलले जातील, मग ते उठावाद्वारे सत्ता ताब्यात घेतील असे वाटत होते, पण तसे घडले नाही. बाज्वा यांच्या जागी जर राहिल शरीफ असते, तर कदाचित पाकिस्तानात आणखी एकदा लष्करशाही अवतरली असती. इम्रान यांनी बाज्वा यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांच्याच पक्षाचे असेंब्ली सदस्य अमिर लियाकत यांनी या सर्व प्रकारानंतर स्पष्ट केले. गेले काही दिवस या दोघांमध्ये मतभेद असल्याचे दिसत होते, पण बाज्वा यांना दूर करण्याचा निर्णय कदाचित महागात पडेल, म्हणून इम्रान यांनी तो घ्यायचे धाडस केले नसण्याची शक्यता आहे. नवाझ शरीफ यांनी जनरल मुशर्रफ यांना दूर केल्यानंतरचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर असावा, म्हणून त्यांनी ते साहस टाळले असावे. आपल्याला पंतप्रधानपदावरून दूर करण्याचा आंतरराष्ट्रीय कट होता आणि तो अमेरिकेने आखलेला होता, असे इम्रान यांनी वारंवार सांगितले असले तरी तसा कोणताही पुरावा नाही, असे बाज्वा यांनी स्पष्ट करून इम्रान यांची बत्तिशी त्यांच्या घशात घातली आहे.
नवाझ शरीफ किंवा आसिफ अली झरदारी यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा जाहीरपणे सांगणारे इम्रान खान हेही आता अनेक अशाच कथांमध्ये अडकणार आहेत. राजकारणी असल्याने ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ निश्चितच नाहीत. मी पाकिस्तानी वृत्तपत्रात वाचलेल्या तीन कथा सांगितल्याच पाहिजेत. इम्रान खान अडचणीत असताना त्यांची त्यातून सुटका करण्यासाठी त्यांच्या तिसर्या पत्नीची - बुशरा खानची - काळ्या जादूवर श्रद्धा जडली होती; तिने कोंबड्यांना जिवंत जाळून या सर्व ‘अधर्मसंकटा’तून इम्रान खान कसे निभावून बाहेर पडतील हे पाहिले होते. किती कोंबड्यांना जिवंत जाळण्यात आले ते मात्र प्रसिद्ध झालेले नाही, पण हा आकडा बराच मोठा आहे आणि पंतप्रधानांच्या अधिकृत निवासातून किमान सात दिवस हे सर्व काम चालू होते, असे सांगण्यात येत आहे. तिची बहीण फराह खान हिने तिला या काळ्या जादूमध्ये (ब्लॅक मॅजिकमध्ये) सहकार्य केले होते, असे प्रसिद्ध झाले आहे. या फराह खानशी जोडलेली आणखी एक कथा आहे. ती बदल्यांसंदर्भात आहे. महत्त्वाच्या पदांवरल्या व्यक्तींना बदल्या हव्या असतील, तर त्या फराह खानला गाठत असत आणि आपले काम करवून घेत. यात फार मोठ्या रकमांची देवाणघेवाण होत असे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. इम्रान खानांचे सरकार पडताच सर्वप्रथम देशाबाहेर जाणार्या व्यक्तींमध्ये फराह खान होत्या, हा योगायोग असू शकत नाही. आता असे म्हटले जाते की, इम्रान खान यांचे बुशराबरोबचे संबंधही तुटण्याच्या बेतात आहेत आणि कदाचित आपल्याला त्यांच्या चौथ्या विवाहाची बातमीही ऐकायला मिळू शकते.
आपल्या हातून उमेदवारांची निवड करताना चूक झाली, तेव्हा आता आगामी निवडणुकीत मी उमेदवारांची निष्ठा पाहूनच त्यांना निवडेन, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी सभागृहात पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या त्यांच्या पक्षाचे केवळ वीस सदस्य उपस्थित होते, हे पाहून त्यांना आणि उपसभापती कासिम सुरी यांना धक्का बसला असण्याची शक्यता आहे, त्यातूनच पुढले सगळे नाट्य घडले. ते अर्थातच घटनेच्या चौकटीत न बसणारे असेच होते. जर त्या दिवशी विरोधकांच्या ठरावावर मतदान झाले असते, तर इम्रान यांचा पराभव नक्की होता. तसे घडले असते, तर लष्करी उठाव न होता मतदानातून सभागृहात पराभूत झालेले ते पहिले पंतप्रधान ठरले असते. इम्रान यांनी ते टाळले. इम्रान यांचा उर्मटपणा लक्षात घेता आणि त्यांनी टाकलेली पावले लक्षात घेता पाकिस्तानी जनता त्यांच्या पक्षाला परत निवडून सत्तेवर बसवेल असे वाटत नाही. मागल्या निवडणुकीत ते लष्कराचे प्रतिनिधी म्हणून गैरमार्गाने निवडले गेले. आता लष्कराची मर्जी त्यांच्यावर उरलेली नाही. पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते नवाझ शरीफ यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यात नक्कीच रस असेल. त्यांच्या मार्गात कायदेशीर अडचणी आहेत, त्या आधी दूर करून घ्याव्या लागतील आणि त्यानंतरच त्यांचे निवडून येण्याचे मार्ग सुकर होतील. त्यांची कन्या मरियम ही या खेपेला नवा चेहरा म्हणून रिंगणात असेल. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी हेही रिंगणात असतील. हे दोन्ही पक्ष एका विशिष्ट समान उद्देशाने एकत्र आले होते, मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांची तोंडे दोन दिशांना असतील. झिया उल हक यांची राजवट असताना हे दोन्ही पक्ष त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरले होते, त्याची ही पुनरावृत्ती झाली. आता ते एकमेकांच्या विरोधात लढतील, पण इम्रान यांच्या पक्षाला फायदा होऊ देणार नाहीत.
भारताच्या दृष्टीने कोणीही सत्तेवर आले तर फार फरक पडत नाही. नवाझ शरीफ सत्तेवर येऊ शकणार नाहीत, कारण त्यांच्यावर उत्तरदायित्व न्यायालयाने ‘कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास बंदी’ घातलेली आहे. त्यांना दहा वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आलेली आहे. सध्या ते आरोग्याच्या कारणास्तव इंग्लंडमध्ये आहेत. ते किंवा त्यांचे बंधू शाहबाज शरीफ सत्तेवर आले, तर भारताच्या दृष्टीने थोडे समंजस व्यक्तिमत्त्व पाकिस्तानात आहे, असे म्हणता येईल. बाकी सारे ‘दिशादर्शक’ लष्करी चौकटीतच बसलेले असतात, हा भाग विसरून चालणार नाही.