विद्यापीठांमधील डाव्या कंपूचा खरा चेहरा!

01 Apr 2022 15:23:01
पं. नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने सुरू झालेल्या विद्यापीठाला प्रथमपासूनच कम्युनिस्टांच्या दोन्ही गटांनी आपला बौद्धिक अड्डा बनवला. आपली पाळेमुळे भारतात भक्कम करण्यासाठी इतिहास, भाषा, संस्कृती, चालीरिती, परंपरा या राष्ट्रवादाच्या प्रमुख घटकांची मोडतोड करण्याचे काम या व आणखी काही विद्यापीठांतून सुरू झाले. इतर विद्यापीठांत सहसा न आढळणारे आयोजनाचे व आचारांचेही स्वातंत्र्य या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच मिळाले. नेमक्या याच स्वातंत्र्याचा लाभ उठवत जागोजागच्या राधिका मेननसारख्या विद्वान-विदुषींनी देशविरोधी विचार ‘व्यवस्था विरोधाच्या’ आवरणाखाली पद्धतशीरपणे मांडायला सुरुवात केली.

kashmir

‘द कश्मीर फाइल्स’मध्ये पल्लवी जोशीने साकारलेली राधिका मेनन या प्राध्यापिकेची व्यक्तिरेखा आज भारतातील समस्त डाव्या ‘इकोसिस्टिम’चा चेहरा बनली आहे. काही मोजक्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये डाव्या प्राध्यापकांच्या टोळीने विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे कोणता बौद्धिक खुराक दिला आहे व अजूनही देत आहेत, हे या चित्रपटाने अत्यंत प्रभावी पद्धतीने समाजापुढे मांडले आहे. सर्व प्रकारच्या प्रचार-प्रसारमाध्यमांवर स्वातंत्र्यानंतर ज्यांची एकहाती पकड होती, त्या डाव्या इकोसिस्टिमला व त्यांच्या दांभिकपणाला आजवर मोलाची रसद पुरवणार्‍या केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील तथाकथित महारथींनाही या चित्रपटाने अक्षरश: गारद केले आहे. काश्मिरी पंडितांच्या वंशसंहाराच्या वास्तवाची दाहक जाणीव हा चित्रपट करून देतोच, त्याबरोबरच विद्वान म्हणून समाजात प्रतिष्ठेने मिरवणार्‍या अनेक अजेंडाधारी ‘कॉम्रेड्सनी’ आपापले हितसंबंध जोपासताना थेट देशभक्तीच्या भावनेचीही आजवर कशी थट्टा व खिल्ली उडवली, याचे विदारक दर्शनही घडवतो.
 

शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला

एल्गार परिषद खटल्यातील सत्यासत्यता कथन करून शहरी माओवादी व फुटीरतावाद्यांच्या देशविघातक कारवायांचा बुरखा फाडणारे पुस्तक.

“शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला”

 
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजजीवनाची जी पुनर्मांडणी होत होती, त्यात साहजिकच वरचश्मा होता तो नवशिक्षित तरुणांचा. स्वातंत्र्यलढ्यातील तालेवार मंडळी एकतर काँग्रेस पक्षाच्या संघटनेत किंवा देशाच्या कारभारात मग्न होती. त्यातीलही बरीचशी आपापल्या आयुष्याच्या सरत्या कालखंडात पोहोचली होती. राजकीय पक्ष व राजकारण यांच्या पलीकडे जे एक मोठे व्यापक क्षेत्र आकाराला येत होते, ते होते शिक्षण, कला, प्रचार-प्रसारमाध्यमांचे. या क्षेत्रांच्या पायाभरणीचा हा काळ. इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असलेली, Humanities, Liberal arts, Modern Cinema, Theaterशी यांसारख्या नव्या व अपारंपरिक ज्ञानशाखांमध्ये पारंगत असलेली ही मंडळी स्वभावत: डाव्या विचारसरणीची होती. जगभरात कम्युनिस्टांचा प्रभाव वाढत असण्याचा तो काळ. संस्कृती, परंपरा, राष्ट्रवाद, धर्म या गोष्टींकडे तुच्छतेने पाहणे व माणसाच्या सर्व गरजा या प्रामुख्याने आर्थिक आहेत यांवर विश्वास ठेवणे हे या विचारसरणीचे वैशिष्ट्य. नव्याने उभ्या राहणार्‍या विद्यापीठांमध्ये, नुकत्याच सुरू झालेल्या बहुभाषिक प्रसारमाध्यमांमध्ये, साहित्य व नाट्यविषयक सरकारी संस्थांमध्ये या डाव्या मंडळींचा सहजतेने शिरकाव झाला. आजची पर्यायी उजवी विचारधारा तेव्हा संघटना बांधणीत मग्न होती. ती त्यांची प्राथमिक गरज होती. व्यक्तिनिर्माण व त्याद्वारे राष्ट्रनिर्माण हे त्या संघटना बांधणीचे सूत्र होते व संघपरिवारातील संस्था उपहास व तुच्छता सहन करूनही आपल्या या मूलभूत कामात गर्क होत्या. त्यामुळे डाव्या गटांना आपापल्या क्षेत्रांमध्ये ना कुणाची स्पर्धा होती, ना कुणाचा विरोध होता. नव्या विद्यापीठांमधील राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास या प्रमुख विभागांचा ताबा मुख्यत्वे याच गटातील प्राध्यापकांकडे गेला. अभ्यासक्रम तयार करण्यापासून नियमावली बनवण्यापर्यंत सर्व कारभार एक विशिष्ट ‘अजेंडा’ डोळ्यांपुढे ठेवून सुरू झाला. भारतीय इतिहासात मुगलांना मुख्य व मानाचे स्थान मिळाले. मुगल, ब्रिटिश व त्यानंतर थेट ‘इंडिया’ या तीन घटकांचा अभ्यास म्हणजेच केवळ भारताचा अभ्यास, हे ठासून सांगितले जाऊ लागले. भारतीय कुटुंबव्यवस्थेची मोडतोड करणारा स्त्री-वाद मान्यताप्राप्त होऊ लागला. भारत हे एक राष्ट्र नसून तो अनेक राष्ट्रांचा समूह आहे, हे बिनदिक्कत मांडले जाऊ लागले. त्यातूनच भारतीय सेनेला कायम वादग्रस्त ठरवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न सुरू झाला. कोलकाताचे जादवपूर, दिल्लीचे जे.एन.यू. व जामिया मिलिया, अलिगढचे ए.एम.यू. ही विद्यापीठे गेल्या सत्तर वर्षांत हा असा अजेंडा राबवण्यात अग्रेसर होती व आजही आहेत.


kashmir

कम्युनिस्ट कंपूचा संघविरोध

स्वातंत्र्य मिळण्याआधी रशियाच्या क्रांतीने दिपलेल्या कम्युनिस्टांच्या पहिल्या पिढीने पहिली काही वर्षे राष्ट्रीय काँग्रेसच्या अंगणातच आपला तंबू ठोकला होता. जवाहरलाल नेहरू त्यांना छुपे ‘कॉम्रेड’ वाटायचे. पण गांधी आणि पटेल यांच्या काँग्रेसमध्ये आपले वर्गलढ्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, याचा पुरता अंदाज आल्यानंतर त्यांनी वेगळ्या पक्षाची राहुटी उभी केली. स्वातंत्र्य मिळताच आपल्या भावी ‘वर्गलढ्या’ला पूरक ठरेल अशी वैचारिक मांडणी समाजाच्या सर्व स्तरांमध्ये केली पाहिजे, हे या कम्युनिस्ट कंपूचे महत्त्वाचे धोरण होते. ‘समाजात वर्ग-भेद असतातच आणि अस्सल कम्युनिस्टांनी ते अधिक तीव्र करीत क्रांती केली पाहिजे’ या सिद्धान्ताने पछाडलेला हा कंपू. त्यामुळेच या देशातील समाजाला एक ठेवणारा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हे या मंडळींचे प्रमुख लक्ष्य होते आणि या सांस्कृतिक राष्ट्रवादाची पाठराखण करणारा संघच आपला खरा शत्रू आहे, हेही त्यांनी ओळखले होते. म्हणूनच देशभरातील विद्यापीठांमधून ‘संघविरोधी’ - पर्यायाने हिंदुत्वविरोधी मांडणीला व त्याप्रमाणे थेट कृतीलाही सुरुवात झाली. संघसमर्थक प्राध्यापकांना, जे मुळातच संख्येने कमी होते, त्यांना कोणत्याही कमिटीतून खड्यासारखे वगळणे सुरू झाले. त्यांचे खच्चीकरण करण्याचे सर्व प्रयत्न अधिकृत समजले जाऊ लागले. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात जे कोणी प्राध्यापक, लेखक, कुलगुरू सहभागी झाले, त्यांना प्रचंड टीकेला तोंड द्यावे लागले व काही जणांचे राजीनामे घेतले गेले. संघविरोधाचा एक अलिखित अभ्यासक्रमच या ‘विद्वानांनी’ तयार केला व वर्षानुवर्षे तो विद्यापीठांमध्ये राबवला.
 
kashmir
 
वर्ग-भेद निर्मितीचे कारस्थान

स्वराज्यप्राप्ती हे प्राथमिक ध्येय असलेला काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यानंतर मतांच्या राजकारणात गुरफटल्याने आज ना उद्या आपल्या वैचारिक दहशतीच्या प्रभावात नक्की येईलच, हा या डाव्या गटांचा दृढ विश्वास होता. सुरुवातीच्या काळात रशियातील क्रांतीने दिपून गेलेले नेहरू स्वातंत्र्य मिळताच रशियाची नक्कल न करता मिश्र अर्थव्यवस्था राबवू लागले. भांडवलवाद व साम्यवाद यातील सुवर्णमध्य शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नेमका याचाच राग येऊन याच कॉम्रेड्सनी ‘अमेरिकेचा आश्रित’ अशा अश्लाघ्य शब्दांत त्यांची हेटाळणी केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने सुरू झालेल्या विद्यापीठाला प्रथमपासूनच कम्युनिस्टांच्या दोन्ही गटांनी आपला बौद्धिक अड्डा बनवला. आपली पाळेमुळे भारतात भक्कम करण्यासाठी इतिहास, भाषा, संस्कृती, चालीरिती, परंपरा या राष्ट्रवादाच्या प्रमुख घटकांची मोडतोड करण्याचे काम या व आणखी काही विद्यापीठांतून सुरू झाले. वास्तविक विविधतेने नटलेल्या या घटकांमधील एकत्व शोधण्याऐवजी त्यांतील विविधतेला ‘भेद’ समजण्याचे आणि त्यातूनच मुळात नसलेला ‘वर्ग-भेद’ निर्माण करण्याचे हे कारस्थान होते.
 
विद्यापीठीय स्वातंत्र्याचा गैरवापर
 
बरोबर 53 वर्षांपूर्वी, म्हणजे 16 नोव्हेंबर 1966 रोजी लोकसभेने ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ बिल’ संमत केले. तत्कालीन शिक्षणमंत्री न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागला हे या विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक. त्यांनीच या विद्यापीठाचा आराखडा प्रथम तयार केला आणि पंतप्रधान नेहरूंपुढे मांडला. नेहरूंना या प्रस्तावित विद्यापीठाची योजना आवडली, पण त्याला आपले नाव देण्यास त्यांचा सक्त विरोध होता. नेहरूंच्या निधनानंतर संसदेने हे बिल त्यांच्या नावासह मंजूर केले.
 
 
‘रोझेस इन डिसेंबर’ या आपल्या आत्मचरित्रात छागलांनी केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून आपले विचार व योजना, देशाची शिक्षण पद्धती, या नव्या विद्यापीठाकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा यांचे अतिशय मुद्देसूद विवेचन केले आहे (पृष्ठ क्रमांक 342 ते 375.)
While we should look ahead, try to be modern and rational, we should also have our feet solidly planted in the soil of our country. Education should have a 'swadeshi' orientation and relevance to Indian conditions ही आहे या विद्यापीठाच्या स्थापनेमागील छागलाजींची विचारधारा. शिक्षणाचे ‘भारतीयीकरण’ हा त्यांचा आग्रह. राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी व इंग्लिश यांचा संतुलित वापर असावा, ही त्यांची भूमिका. इतिहास लेखनामागे राष्ट्रीय दृष्टीकोनाची त्यांना वाटणारी आवश्यकता आणि मुख्य म्हणजे दिल्लीत उभ्या राहणार्‍या या नव्या विद्यापीठातून लोकशाहीची व धर्मनिरपेक्षतेची पाठराखण करणारी पिढी घडावी, हे त्यांचे स्वप्न असा सर्व उल्लेख छागलाजींनी त्यांच्या या आत्मचरित्रात केला आहे.
 
 
विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू जी. पार्थसारथी यांना न्या.छागलांनी या जबाबदारीसाठी विचारपूर्वक हेरले होते. संयुक्त राष्ट्र संघातील आपली मोलाची कामगिरी संपवून पार्थसारथी तेव्हा नुकतेच भारतात परतले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या प्रवाहाचे, तसेच भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे योग्य भान आणि उच्च-शिक्षणाची दिशा नेमकी कोणती असली पाहिजे याचा अचूक अंदाज या गुणांच्या आधारे पार्थसारथी हे योग्यच नाव होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या एका भोजन समारंभात छागलांनी जवळच उभ्या असलेल्या पार्थसारथींकडे ही जबाबदारी देणे योग्य ठरेल असे पंतप्रधान इंदिराजींना सांगितले आणि त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले.
 
या विद्यापीठात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना अधिकाधिक सवलती मिळाव्यात, त्यांच्या वैचारिक समृद्धीसाठी त्यांना पुरेसे स्वातंत्र्य मिळावे आणि पारंपरिक शिक्षणपद्धतीपेक्षा काही वेगळे प्रयोग येथे व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. साहजिकच इतर विद्यापीठात सहसा न आढळणारे आयोजनाचे व आचारांचेही स्वातंत्र्य या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच मिळाले. नेमक्या याच स्वातंत्र्याचा लाभ उठवत जागोजागच्या राधिका मेननसारख्या विद्वान-विदुषींनी देशविरोधी विचार ‘व्यवस्था विरोधाच्या’ आवरणाखाली पद्धतशीरपणे मांडायला सुरुवात केली. देशविरोधी घोषणा द्यायच्या, कुलगुरूंचा आणि इतर अधिकार्‍यांचा बिभत्स छळ करायचा आणि कायदेशीर कारवाई होताच ‘मनूवादसे आझादी’ असा कांगावा करायचा. 1974मध्ये गुजरातच्या व बिहारच्या विद्यार्थी आंदोलनातूनच देशभर सरकार विरोधात वणवा पेटला व सत्तांतरही झाले, तसे आत्ताही होईल यासाठी विद्यापीठ सतत चित्रविचित्र कारणांमुळे धगधगत ठेवायचे, हे गेल्या काही वर्षांत तर या सर्वांचे धोरणच ठरले आहे.
 
दिल्ली उच्च न्यायालयाने 3 मार्च 2016च्या आपल्या निकालपत्रात म्हटल्याप्रमाणे जे.एन.यू.च्या विद्यार्थ्यांकडून दावा केले जाणारे ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ हे निव्वळ विवेकहीन असून ते शरीर पोखरणार्‍या दुर्धर रोगासारखे आहे. या रोगावर उपाय म्हणून कठोर शस्त्रक्रियेची गरज खुद्द न्यायालयानेच व्यक्त केली होती.

kashmir 
‘हिंदू दहशतवादा’चा भ्रम
 
कम्युनिस्टांचा असली चेहरा वेळोवेळी जनतेसमोर आणणार्‍या डॉ. बाबासाहेबांना मुंबईतील पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत पाडण्याचे कारस्थानही याच लाल कंपूचे होते. आपल्या क्रांतीच्या सगळ्याच योजना नेस्तनाबूत होत आहेत, हे पाहून कालांतराने वर्गयुद्धाकडून वर्णयुद्धाकडे वळलेल्या कम्युनिस्टांनी विद्यापीठांमधून डॉ. बाबासाहेबांच्या नावाचाही बिनदिक्कतपणे गैरवापर करायला सुरुवात केली.

 
विद्यापीठातील याच डाव्या गटांनी आपल्या लाल पोथीत ‘हिंदू दहशतवादाचा’ नवा अध्याय जोडायचा प्रयत्न मध्यंतरी करून पहिला. संघाचा प्रचंड वेगाने वाढणारा सामाजिक आणि राजकीय प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसने हिंदू दहशतवादाचा ‘भ्रम’ फैलावण्याचे कारस्थान रचले. या भ्रमाला बौद्धिक रसद पुरवायला हे कंपू ज्या तयारीने पुढे आले होते, ते काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यातील श्रमविभागणीला साजेसेच होते. ‘रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये हिंदूंच्या दहशतवादाची उदाहरणे आहेत’ असे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.

 
दांभिकतेचा अंत लवकरच

संघ आणि संघाचे सर्वसमावेशक हिंदुत्व यांच्याशी शत्रुत्व पुकारलेले कम्युनिस्ट आक्रसत जाऊन आता केवळ एका राज्यापुरते सीमित झाले आहेत आणि त्यांनी ज्याचा द्वेष करण्यात आपल्या अनेक पिढ्या खर्ची घातल्या, तो संघ मात्र प्रत्यक्षात कुठेच न दिसूनही देशाच्या कानाकोपर्‍यात फैलावत आहे. 1925मध्ये स्थापना झाल्यापासून आपल्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात कठोर मेहनत, आत्मपरीक्षण आणि आपल्या रचनेत व विचारांत समाजानुकूल बदल घडवीत संघाने देशाच्या मुख्य धारेत पुढील पन्नास वर्षांतच स्थान मिळवले. ‘जातिभेदाच्या पलीकडे जाऊन एकसंध हिंदू समाज निर्माण करणे’ या ध्येयासाठी संघातील अनेक पिढ्यांनी ही ‘समता’ आपल्या आयुष्याचा भाग बनवीत खरोखरच असा समाज उभा करण्याचा प्रयत्न भारतात सर्वदूर केला.
सोशल इंजीनिअरिंगचा हा प्रयोग म्हणजे निवडणुकीतील मतांकरता असणारा तात्कालिक उपाय नव्हता, तर या देशाचा जीवनरसच शोषून घेणारी भेदाभेदांची अमंगल वहिवाट तिच्या खुणांसकट मिटवून टाकण्याचे मनापासून स्वीकारलेले आव्हान होते. संघाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो संघटनांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांमध्ये कामाचे व्यापक जाळे विणले आहे. समतापूर्ण विचारांवर अतूट श्रद्धा असल्यानेच हे काम सातत्याने वाढते आहे.
 
भारतात कम्युनिस्ट विचारांचे बीज रोवणार्‍या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या खर्‍या ‘मानवतावादी’ विचारांची गळचेपी करणारा हाच डाव्या विद्वानांचा गट होता. “माझ्या राष्ट्रावर जो कोणी आक्रमण करील, मग तो चीन असो की रशिया असो, त्यांच्या आक्रमणाचा सामना करणे हाच माझा ‘राष्ट्रवाद’ आहे” असे सांगणार्‍या श्रीपाद अमृत डांग्यांवर ते प्रखर राष्ट्र्वादी आहेत आणि म्हणून क्रांतिविरोधक आहेत असा आरोप याच मंडळींकडून केला गेला. ‘द युनिव्हर्स ऑफ वेदान्त’ या बानी देशपांडेंच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणारे डांगे भारतीय संस्कृतीचे व वेदान्ताचे समर्थक आहेत म्हणून त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे सांगणारीही हीच मंडळी होती.
 
370वे कलम रद्द होणे, श्रीराममंदिर उभारणीस सुरुवात अशा एकापाठोपाठ एक प्रकरणात राष्ट्रवादी विचार कमालीचे भक्कम होत असताना आजवर या विचारांचा द्वेष करणारे मुळापासून हादरले आहेत. संघ- व मोदी विरोधाची जी काही ‘काडी’ हाताशी लागेल अशी शक्यता वाटते, त्या ’काडी’ला अक्षरश: लोंबकळून ते तरण्याचा प्रयत्न करताहेत. रोहित वेमुला प्रकरण, शाहीन बाग, शेतकरी आंदोलन, जे.एन.यू.तील तथाकथित फी वाढ, ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रदर्शनाला विरोध ही अशा प्रयत्नांची गेल्या काही वर्षांतील उदाहरणे. एका ‘काडी’तून ‘क्रांती’ घडवण्याचा केविलवाणा प्रयत्न!

 
आपल्या विचारांमागे जनमत बांधता येत नाही, देशव्यापी संघटना उभ्या करता येत नाहीत, सर्वस्व झोकून द्यावे असा मुळात विचारच नाही आणि त्यामुळे समर्पित कार्यकर्त्यांची फळीही तयार होत नाही.. या दुर्दशेचे कारण असणारी ‘दांभिकता’ सोडायची मात्र अजूनही तयारी नाही. परिणामी खोटा प्रचार, बौद्धिक कसरती, विद्यापीठातील लाल अड्ड्यांवरचे पद्धतशीर प्रोग्रॅमिंग आणि दिशाभूल करणार्‍या याचिका हीच काय ती विरोधाची साधने उरली आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ने या टोळीच्या या उरल्यासुरल्या साधनांवरही आता हल्ला चढवला आहे. जे होणार आहे ते अटळ आहे. दांभिकपणा हा असाच संपुष्टात येत असतो.
 
राष्ट्रवादी विचारांच्या या लढाईत मोलाची कामगिरी बजावणार्‍या या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे म्हणूनच मन:पूर्वक अभिनंदन!
Powered By Sangraha 9.0