श्री समर्थ व्यायाम मंदिराचा समर्थ खांब नीता ताटके

विवेक मराठी    04-Mar-2022
Total Views |

प्रज्ञा जांभेकर
@9967063331
जल दीपासनाचं प्रात्यक्षिक सुरू आहे. कपाळावर काचेचा पाण्याने भरलेला ग्लास, त्यात पेटती मेणबत्ती ठेवलेली. या स्थितीत झोपून, बसून, उभं राहून वेगवेगळी आसनं सुरू आहेत. प्रेक्षक ती आसनं बघताना श्वास रोखून उभे आहेत.

1
 
या प्रात्यक्षिकांचा वेगवेगळ्या आसनांचा संच करून झाल्यानंतर उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट. हे आकर्षक दृश्य नेहमी बघायला मिळेल याची शक्यता तशी कमीच, मात्र मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर समर्थ व्यायाम मंदिरात नियमित, नेहमी जाणार्‍या सगळ्यांसाठी हे दृश्य तसं परिचित आहे आणि या दृश्यात ठळकपणे दिसणार्‍या नीता ताटकेही...
 
सध्या त्या मंदिराच्या व्यवस्थापकीय संचालक तर आहेतच, तसंच त्या मल्लखांब विभागप्रमुखही आहेत. दादरच्या गोखले रोडवर 1923मध्ये जिम्नॅस्ट प्रल्हाद लक्ष्मण काळे यांनी स्थापन केलेल्या समर्थ व्यायाम मंदिराची एक शाखा 1949मध्ये शिवाजी पार्क मैदानावर सुरू झाली होती. तिथं नीताताईंचे वडील अरविंद फणसीकर जात असत. त्यांच्याबरोबर नीताताईही नियमितपणे तिथे जायला लागल्या. त्या तिथे जायला लागल्या, त्या काळात मल्लखांब ही फक्त मुलांची - मुलग्यांची मक्तेदारी होती. स्पर्धात्मक मल्लखांबापासून तर मुली कोसों दूर होत्या. मग त्या मुली लाठीकाठी, जंबिया, फरीगदगा - फरी आणि गदगा या ढाल-तलवारीसारख्या साधनांनी खेळायच्या द्वंद्वात्मक खेळाची प्रात्यक्षिकं सादर करायला लागल्या. पुढे समर्थ व्यायाम मंदिरात मुलींसाठी वेतावरच्या मल्लखांबाची जी पहिली बॅच तयार झाली, त्यात नीताताईही होत्या. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षीच मल्लखांबाचा सराव सुरू केला होता. अमरावतीत हनुमान प्रसारक मंडळात 1970च्या दशकात मल्लखांबाच्या स्पर्धा होत असत, पण त्या मुलींसाठी होत नसत. तिथे मुली प्रात्यक्षिकं सादर करत. नीताताई आठवीत, नववीत असताना वरिष्ठ गटात स्पर्धा खेळत आणि कनिष्ठ गटात पंच म्हणून काम करत. त्यांनी पंच परीक्षाही दिल्या.
 
नीताताईंचं वाचन अफाट आहे. एकदा त्यांच्या हातात ‘जिम्नॅस्ट’ हे अमेरिकेतलं नियतकालिक आलं, ज्यात क्रीडा मानसशास्त्रावर एक लेख आला होता. तो वाचल्यानंतर या क्षेत्रात काम करायचा त्यांचा मानस तयार झाला. त्या प्रवासासाठी आईने मार्गदर्शन केलं. नीताताई मुंबईत शारदाश्रम शाळेत होत्या. त्या एक चांगल्या विद्यार्थी होत्या. त्या वेळी दहावीच्या परीक्षेच्या आधी होणार्‍या प्रीलिम परीक्षेला अतिशय महत्त्व होतं. नेमकी त्याच वेळी सुरतला स्पर्धा होती. त्या वेळी वेर्णेकरसरांनी स्पर्धेला जायची परवानगी दिली, हे नीताताई आवर्जून सांगतात. दहावीनंतर त्यांनी क्रीडा संस्कृती असलेल्या कीर्ती महाविद्यालयात जायचा निर्धार केला, कारण तिथे मानसशास्त्र हा विषय होता. तो त्यांच्या क्रीडा कारकिर्दीसाठी सुवर्णकाळ ठरला. त्या एनसीसीत दाखल झाल्या.
 
1981-82मध्ये राजधानी दिल्लीत होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष संचलनामध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिकं सादर करण्यासाठी समर्थ व्यायाम मंदिराच्या 6 जणींची विशेष निवड झाली. अर्थातच त्यात नीताताई होत्याच, हे वेगळं सांगायला नकोच. याविषयाची आठवण त्यांनी सांगितली. गॅरिसन ग्राउंडवर त्यांचा सराव सुरू होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर त्यांना हे सादरीकरण करायचं होतं. सरावासाठी त्यांच्या आसनापासून काहीसा लांब असा खांब ठेवला होता. पहाटे दाट धुक्यात सराव सुरू व्हायचा, तो सकाळी साडेदहापर्यंत. ती प्रात्यक्षिकं इतकी मनमोहक होती की रोज त्यांच्या खांबाची फ्रेम थोडी जवळ आणली जात होती. असं करता करता तो खांब पंतप्रधानांच्या अगदी समोर आला. प्रत्येक वेळी तो खांब हलवायचा आणि पहारीने खड्डा खणून पुन्हा नव्या ठिकाणी ठोकायचा, असं करावं लागलं. अखेर पंतप्रधानांसमोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रात्यक्षिकं सादर झाल्यावर मेहनतीचं चीज झालं. समर्थ व्यायाम मंदिरात सगळ्यांसाठी डायरी लेखन करणं हा एक अलिखित नियम होता. त्या डायरीत नीताताईंनी असे अनेक किस्से लिहून ठेवले आहेत.
 
शिकण्याची आवड असलेल्या नीताताईंनी बारावीनंतर रुपारेल महाविद्यालयातून बी.ए., एम.ए. केलं. क्रीडा मानसशास्त्रात संशोधन करून त्यांनी एम.फिल. आणि पीएच.डी. केली. ‘मल्लखांबामुळे होणारे मानसशास्त्रीय फायदे’ हा त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय होता. डॉ. नीता ताटके गेल्या अकरा वर्षांपासूनच रुपारेल महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आहेत, तसंच मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचे पती संजीव ताटके कॉम्प्युटर इंजीनिअर असून त्यांनी खरगपूरच्या आयआयटीमधून बी.टेक. केलं. त्यांचा मुलगा केदार पाच वर्षांचा होईपर्यंत नीताताईंना त्यांचं वेळापत्रक बदलायला लागलं. त्यानंतर केदारही समर्थ व्यायाम मंदिरात यायला लागला, तिकडेच रुळला आणि पुढे जिम्नॅस्टिक्सचा राष्ट्रीय खेळाडू झाला.
 
प्रचंड मेहनती असलेल्या नीताताई अत्यंत काटेकोरपणे वेळेचं नियोजन करतात. शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता याबरोबरच सामाजिक पाठबळही महिलांसाठी महत्त्वाचं असतं हे त्यांचं ठाम मत, तर सामाजिक पाठिंबा आपला आपणच वाढवला पाहिजे, असं त्यांचं प्रामाणिक निरीक्षण. त्या म्हणतात की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला चांगली माणसं भेटली. त्यामुळे रजेचा प्रश्न कधी आला नाही. नर्तक फुलवा खामकर यांच्या आईने केलेल्या मार्गदर्शनानंतर त्यांनी घरातल्या कामकाजाचं योग्य नियोजन केलं. त्यामुळे घर सांभाळून करिअरची कास धरणं त्यांना सहजसाध्य झालं. तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. 
कोरोना काळात खेळाडूंच्या सरावावर बंधनं आली, तेव्हा त्या खेळाडूंच्या मदतीने नीताताईंनी डॉक्युमेंटेशनचं काम मार्गी लावलं. पहिल्या प्रात्यक्षिकापासून ते आत्तापर्यंतच्या स्पर्धांची छायाचित्रं, सीडींचे अल्बम त्यांनी तयार केले. तसंच फायलिंग केलं. एरवी व्यग्र असलेल्या त्यांच्या आयुष्याला कोरोनातल्या निर्बंधांमुळे उसंत मिळाली. त्यांनी त्या काळात अनेक सकारात्मक उपक्रम राबवले. अंध, परदेशी विद्यार्थ्यांना जल दीपासनाचं प्रशिक्षण द्यायचा उपक्रम त्यांच्या विशेष आवडीचा आहे.
 
मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर या शारीरिक शिक्षण संस्थेने गेल्या 73 वर्षांपासून या क्षेत्रात काम केलं आहे. कोरोनापूर्वी दररोज संध्याकाळी सुमारे बाराशे मुलं विविध क्रीडाप्रकारांमध्ये व्यग्र असत. देशी खेळांबरोबरच मल्लखांब, खो-खो, कबड्डी, योग, जिम्नॅस्टिक, कुस्ती, शरीरसौष्ठव, वेट लिफ्टिंग, अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉली बॉल, ज्युडो, कराटे आणि लेझिम, दंड-बैठका यांसारख्या आधुनिक खेळांवर या संस्थेत विशेष लक्ष दिलं जातं. या प्रशिक्षण सेटअपचं एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक शिक्षक त्यांच्या सेवा पूर्णपणे मानद क्षमतेने देतात. प्रशिक्षक, मुळात संस्थेचे भूतकाळातील विद्यार्थी, केवळ चॅम्पियनच नव्हे तर भविष्यातील शिक्षक तयार करण्यात गुंतलेले असतात. संस्थेने आतापर्यंत विविध क्रीडाशाखांत एक हजाराहून अधिक राष्ट्रीय विजेते तयार केले आहेत आणि त्यापैकी 20 जण सरकारच्या वतीने दिल्या जाणार्‍या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. संस्थेच्या 30हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ही संस्था प्रौढ पुरुष आणि महिलांसाठी दोन योग केंद्र, शासनमान्य डी.एड. कोर्स, तसंच शारीरिक शिक्षण - डी.पी.ई.मधील अर्धवेळ विनाअनुदानित प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवते. क्रीडा आणि संबंधित प्रकाशनांचं ग्रंथालय हे या संस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
 
गेली अनेक वर्षं मल्लखांब या देशी खेळासाठी सर्वस्व वाहणारे, देशात तसंच परदेशात मल्लखांबाचा प्रसार करून या खेळाला जागतिक ओळख मिळवून देणारे उदय देशपांडे यांची 2017-18 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने निवड केली, तेव्हा ते या खेळातील पहिले शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते ठरले. समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख प्रशिक्षक व मानद प्रमुख कार्यवाह आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांबपटू, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते प्रशिक्षक, जागतिक मल्लखांब, भारतीय मल्लखांब महासंघ, महाराष्ट्र मल्लखांब संघटना अशा संघटनात्मक पातळीवर गेली अनेक वर्षं विविध पदांवर देशपांडे यांनी अफाट कार्य केलं आहे. समर्थ व्यायाम मंदिर म्हटलं की उदय देशपांडेसरांचंच नाव डोळ्यासमोर येतं. या व्यायामशाळेचे सर्वेसर्वा असलेल्या देशपांडे यांना नीताताई त्यांच्या कामातून तितकीच मोलाची साथ देत आहेत.
 
2025 हे वर्ष समर्थ व्यायाम मंदिराचं शताब्दी वर्ष आहे. त्याआधी दादरच्या जीर्ण झालेल्या मंदिराच्या इमारतीच्या जागी 22 मजली आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल बांधायचं, असा संस्थेचा मानस आहे. मुंबई महानगरपालिकेकडे त्याचा नियोजन आराखडा सादर झाला आहे. 80 कोटी रुपयांचा निधी जमा करायचं काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजनात नीताताईंचा सहभाग आहे.
 
नीताताई या काळाबरोबर चालतात. ज्या काळी त्यांनी खेळायला सुरुवात केली, त्या वेळी मुलींसाठी ते क्षेत्र खुलं नव्हतं. आज त्या मल्लखांबाच्या क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी घडवत आहेत. समर्थ व्यायाम मंदिरात प्रशिक्षण घेणार्‍या हिमानी परबला 13 नोव्हेंबर 2021 रोजी मल्लखांबासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला. या क्रीडाप्रकारात या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराची ती पहिली मानकरी ठरली. मुंबईत झालेल्या पहिल्या मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हिमानीने चार सुवर्ण आणि दोन कांस्यपदकं जिंकली. श्री समर्थ व्यायाम मंदिरात तिने वयाच्या पाचव्या वर्षी मल्लखांब शिकायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात हिमानी उत्कृष्ट किंवा असामान्य खेळाडू नव्हती, पण सुरुवातीपासूनच तिचा निर्धार पक्का होता. परिपूर्ण होईपर्यंत ती मल्लखांबातले बारीकसारीक धडे गिरवण्यासाठी नेहमीच उत्सुक असायची, असं नीताताई सांगतात.
 
मल्लखांब मुलींसाठी नाही असा ज्या काळी सामाजिक समज होता, त्या काळी नीताताईंनी समर्थ मंदिरात खेळायला सुरुवात केली, तिथेच हिमानीने खेळायला सुरुवात करत त्या खेळात देशातला दुसर्‍या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पुरस्कार पटकावला आणि नीताताई त्याच्या साक्षीदार आहेत. नीताताईंच्या पहिल्या बॅचने हिमानीच्या यशाचा पाया घातला होता, हे विसरून चालणार नाही. मल्लखांब या खेळात मुलांच्या भविष्याबद्दल पालकांना नेहमीच संशय वाटतो; पण मल्लखांब त्यांच्या मुलांना योग्य ओळख आणि चांगली नोकरीदेखील मिळवून देऊ शकतो, याची आता हिमानीच्या यशामुळे त्यांना जाणीव होईल अशी नीताताईंना आशा आहे.
प्रज्ञा जांभेकर
9967063331