लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रातील 1914 ते 1920 या महत्त्वाच्या कालखंडावर प्रकाश टाकणार्या ‘टिळकपर्व’ या ग्रंथाचे 30 मार्च रोजी पुण्यातील लोकमान्य सभागृहात प्रकाश झाले आहे. अरविंद व्यं. गोखले लिखित, राजहंस प्रकाशन व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचे एक प्रकरण येथे देत आहोत.
‘गीतारहस्य’ हा एक अद्भुत ग्रंथ तर आहेच, तसेच तो हिंदू धर्मविषयक तत्त्वज्ञानाने भारलेला गेल्या दोन शतकांतला एक सर्वोत्तम ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे टिळकांनीच म्हटल्याप्रमाणे ‘गीतेचे बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्लोकांचे मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टिपा, पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना वगैरेंसह’ परिपूर्ण आहे. ‘गीतारहस्या’त प्रामुख्याने दोन भाग पाडण्यात आले, त्यापैकी पहिल्या भागात आधुनिक वाटावीत अशा पद्धतीची प्रकरणे आहेत. उपसंहारासह एकूण पंधरा प्रकरणे पूर्वार्धात आहेत आणि उत्तरार्धात गीतेचे बहिरंग परीक्षण करण्यात आले आहे. त्यात गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, हल्लीच्या गीतेचा काल, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व ख्रिस्ती बायबल असे एकूण सात स्वतंत्र भाग आहेत आणि त्यानंतर गीतेचा श्लोकवार अर्थ देण्यात आला आहे. या शेवटच्या भागात गीतेचे मूळ श्लोक, त्यांचे मराठी भाषांतर आणि टिपा देण्यात आल्या आहेत. अगदी आजच्या भाषेतही लिहायचे, तर एवढा सर्वसाक्षी ग्रंथ झाला नाही. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहायला घेतला आणि तुरुंगातच लिहून पूर्ण केला. हा एवढा मोठा अलौकिक ग्रंथ लोकमान्यांनी विक्रमी वेळेत लिहून पूर्ण केला. 2 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांनी ग्रंथलेखनास प्रारंभ केला आणि पहिली आठ प्रकरणे त्यांनी एक महिना सहा दिवसांमध्ये पूर्ण केली. हे काम 413 पानांचे होते. त्यांनी 30 मार्च 1911 रोजी संपूर्ण लेखन संपवले आणि त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रस्तावना लिहायला घेतली. पुस्तकाची अनुक्रमणिका, समर्पण हेही त्यांनी त्याबरोबरच पूर्ण केले. कोणत्या मजकुरापुढे कोणता मजकूर घ्यायचा, याबद्दलचा तपशीलही त्यांनी स्वतंत्ररित्या लिहून ठेवला. याचा अर्थ त्यांना आपण या तुरुंगातून जिवंत बाहेर पडू की नाही, याची खात्री नव्हती, असा होतो.
त्यांनीच स्वत: प्रस्तावनेत आपल्याला आता शेवटही दिसू लागला असल्याचे ‘कृतांतकटकामलध्वज-जरा दिसों लागली, पुरस्सर गदांसवे झगडता तनू भागली’ या महाराष्ट्र कविवर्य मोरोपंतांच्या श्लोकातून सांगितले आहे. या ग्रंथाची संकल्पना त्यांच्या मनात वयाच्या अगदी सोळाव्या वर्षांपासूनच घोळत असली पाहिजे. त्यासाठी लागणारा अपूर्व असा व्यासंग त्यांच्या अंगी होता, म्हणूनच अगदी कोणत्याही अर्थाने सुखासमाधानाची स्थिती नसताना हे लेखन पार पडले. गीतारहस्याची पहिली जाहिरात केसरीत प्रसिद्ध झाली, तो दिवस होता 8 जून 1915. या जाहिरातीत ‘विक्रीस तयार, विक्रीस तयार, विक्रीस तयार’ असे त्या वेळच्या प्रथेप्रमाणे प्रारंभीच तीन वेळा म्हटले होते. जाहिरातीत ‘बाळ गंगाधर टिळककृत भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र, मूळ गीता-श्लोक व त्यांचे मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टिपा वगैरेंसह. पृष्ठसंख्या डेमी अष्टपदी 32 अधिक 856 मिळून बारा कमी नऊशे. कागद जाड व बाइंडिंग मजबूत. किंमत रुपये तीन’ असा उल्लेख आहे. पुस्तके मिळण्याचे ठिकाण या उल्लेखासमोर केसरी ऑफिस, पुणे सिटी आणि एजंट केसरी, कांदेवाडी, मुंबई असे पत्ते आहेत. ‘या पुस्तकाबद्दल आमचेकडे काही गृहस्थांनी मागणी केली होती; पण ती नावे आम्ही आगाऊ नोंदवून ठेविलेली नाहीत, सबब अशा गृहस्थांनी मेहेरबानीने पुन्हा कळवावे’ अशी टीप त्याखाली आहे आणि ‘म्यानेजर, केसरी’ यांच्या नावे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर, म्हणजे एक महिना आणि बारा दिवसांनी, म्हणजे 20 जुलै 1915 रोजी दुसर्यांदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून तीत ‘पुन्हा छापत आहोत’ असा वाचकांना दिलासा आहे. पहिल्या आवृत्तीच्या सहा हजार प्रती पहिल्या बेचाळीस दिवसांतच संपल्या, याचा अर्थ आजच्या भाषेत त्यावर वाचकांच्या उड्या कशा पडल्या असतील, ते लक्षात येते. हा कदाचित त्या दिवसांमधला एक विक्रमच म्हणायला हवा. ‘गीतारहस्याची मागणी करूनही आजपर्यंत ज्यांच्याकडे पुस्तके रवाना झालेली नाहीत, त्यांची नावे पुन्हा छापत असलेल्या प्रतींसाठी नोंदली आहेत. परंतु त्यास दुसरीकडून प्रत मिळाली असल्यास त्यांनी कळवावे, म्हणजे नाव रद्द करू’ असे आवाहनही त्यात करण्यात आले. गीतारहस्याची ही नवी प्रत ऑगस्टअखेर तयार होत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. ही नवी आवृत्ती अखेरीस सप्टेंबरमध्ये छापून तयार झाली आणि 7 सप्टेंबर 1915च्या अंकात ‘पूर्वीप्रमाणे छापून गीतारहस्य पुन्हा विक्रीस तयार झाले’ असल्याची जाहिरात करण्यात आली. विशेष हे की हीही आवृत्ती प्रत्येकी एकच मिळणार असल्याने आणि तीही लवकरच संपायची शक्यता असल्याने असेल; पण मुंबईचे बाळकृष्ण तुकाराम घरत यांनी केसरीतच 5 ऑक्टोबर 1915 रोजी जाहिरात देऊन तीत लोकमान्य टिळककृत भगवद्गीतारहस्य आमच्याकडून मागविणार्यास श्रीतुकाराम महाराजकृत ‘भगवद्गीतानुभव’ पुस्तक भेटीदाखल देण्यात येईल, असे म्हटले होते. या जाहिरातीत ‘पुस्तकविक्रीचे नवीन दुकान’ असे शीर्षक असून ‘463 ठाकुरद्वार रोड, पोस्ट काळबादेवी, मुंबई’ असा पत्ता देण्यात आला आहे. घरत हे केसरीचे अधिकृत विक्रेते नव्हते आणि या जाहिरातीवरून असे दिसते की, त्यांनी पुस्तकविक्रीचे नवे दुकान उघडले होते आणि आपल्या या दुकानाचे अधिक आकर्षण म्हणून त्यांनी गीतारहस्यासमवेत संत श्रीतुकाराम महाराजकृत भगवद्गीतानुभव मोफत देण्याचे मान्य केले. आजच्या आवृत्तींच्या परिभाषेत लिहायचे, तर दीड महिन्यातच या एकाच ग्रंथाच्या सहा आवृत्त्यांचा ऐवज खपलेला होता. त्याची तेव्हाची किंमत तीन रुपये होती, म्हणजे या अल्पावधीत या एका ग्रंथाने अठरा हजार रुपये कमावले होते. हा हिशेब अशासाठी मांडला की, त्या वेळी हे तीन रुपयेही खिशाला तोशीस देणारे होते आणि गायकवाड वाड्याच्या बाहेर रांगा लावून वाचक हा ग्रंथराज विकत घेत होते. एका व्यक्तीला एकच प्रत मिळेल असा दंडक घालण्यात आला होता. पुण्याबाहेरच्या विक्रेत्यांनाही त्यांनी अशाच पद्धतीने विक्री करावी, अशी सूचना करण्यात आली होती. छापल्या तेवढ्या प्रती संपल्या आणि लगेचच दुसर्या आवृत्तीची छपाई हाती घेण्यात आली. ती होऊन दुसरी आवृत्ती बाजारात येईपर्यंत एका व्यक्तीने आपल्याकडे गीतारहस्याची प्रत विकत मिळेल, अशी जाहिरातच केसरीमध्ये दिलेली होती. टिळकांनी कसबा गणपती, पंढरपूरचा विठ्ठल आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना या ग्रंथाच्या पहिल्या प्रती अर्पण केल्या.
इंग्रजांनी अडकवून ठेवलेल्या या ग्रंथाचे हस्तलिखित सुटकेनंतर हाती पडायला लागलेला वेळ आणि त्याची छपाई उरकून तो प्रत्यक्ष वाचकांच्या नजरेसमोर यायला उजाडलेले पुढले वर्ष लक्षात घेता टिळकांनी पहिल्या चार महिन्यांमध्येच एक मोठा विक्रम केला होता. टिळकांच्या हयातीत या ग्रंथाच्या तीन आवृत्त्या निघाल्या होत्या. अलीकडच्या काळात विशेषत: परदेशात पहिल्या आवृत्तीचे अप्रूप जास्त असते. त्यासंबंधीच्या बातम्याही प्रसिद्ध होत असतात. पण त्या काळात गीतारहस्याने याही बाबतीत एक नवा विक्रम केला होता. अनेक जण आपल्याकडे पहिल्या दिवशी खरेदी केलेला हा ग्रंथ आहे याचा एका परीने दिमाख दाखवण्यासाठी आपल्या परिचितांच्या घरी जात आणि आपल्याकडे हा ग्रंथ आहे, असे सांगत. तरी बरे, स्वत: टिळक पहिल्या आवृत्तीच्या वेळी त्या ग्रंथावर सही करून द्यायला गायकवाड वाड्याच्या प्रांगणात उपस्थित नव्हते, अन्यथा हे दृश्य आगळेवेगळेच दिसले असते.
तुरुंगात लिहिलेला ग्रंथ म्हणून गीतारहस्याचे ओजस्व औरच आहे, पण शंभर वर्षांनंतरही त्याचे तेज यत्किंचितही कमी झालेले नाही, यातच या ग्रंथाचे विशेषत्व आहे. हा ग्रंथ तत्त्वज्ञानाने परिपूर्ण आणि चिंतनाने सजलेला आहे. हा ग्रंथराज कसा आकाराला आला, तेही समजून घेण्याची आवश्यकता आहे. ऑगस्ट महिन्यात टिळकांना त्यांच्या हस्तलिखिताच्या वह्या मिळाल्या. मंडालेहून परतल्यावर लगेचच टिळकांनी सरकारकडे पत्र लिहून सरकारच्या संग्रही असलेल्या सर्व वह्या तातडीने परत मिळाव्यात, अशी मागणी केली. त्याला पोलीस अधिकारी गायडर यांनी स्वत:च्या सहीने उत्तर दिले. त्यात ते म्हणतात, ‘आपल्या एकूण नऊ वह्या सरकारकडे आहेत. त्या सरकारच्या न्याय आणि विशेष विभागाकडे पाठवून देण्यात आल्या आहेत.’ दि. 3 ऑगस्ट 1914 रोजी मुंबई सरकारचे उपसचिव ए.एफ. किंडरस्ले यांनी टिळकांना लिहिले की, ‘आपल्या एकूण नऊ वह्या आपल्याकडे पाठविण्यात येत आहेत, कृपया त्याची पोच द्यावी, आपण ती द्याल अशी खात्री आहे.’ इंग्रज सरकारने आधी त्या ओरिएंटल ट्रान्स्लेटरकडे आणि नंतर महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्याकडे पाठवून त्यात काही आक्षेपार्ह मजकूर नाही ना, याची खात्री करून घेतली. शास्त्रीबुवांच्या दृष्टीने हे काम अप्रिय परंतु ज्ञानवर्धक असल्याने त्यांनी ते आनंदाने स्वीकारले होते. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे त्यांनी सांगितल्याने सरकारनेही ते निर्दोष असल्याचे स्पष्ट केले. त्यावर सरकारने कोणताही आक्षेप नोंदविलेला नव्हता. विशेष हे की, शि.ल. करंदीकर यांनी ‘टिळक भारत’ लिहिण्यापूर्वी स्वत: सचिवालयात जाऊन ‘गीतारहस्यासंबंधात काही आक्षेप नोंदविलेले असल्यास आपल्याला ते पाहायची परवानगी मिळावी’ अशी मागणी केली, ती त्यांना देण्यात आली आणि या वह्यांसंबंधी ‘ओरिएंटल ट्रान्स्लेटर’कडून आलेल्या गुप्त नोंदींमध्ये ‘त्यांच्या लिखाणाची सविस्तर माहिती घेण्यात आली, पण कुठेही त्यात सरकारविरोधी लिखाण आढळले नाही’ असे म्हटले आहे.
टिळकांना या वह्या मिळाल्याने त्या कधीच न मिळण्याबाबत व्यक्त करण्यात आलेला संशय निराधार असल्याचे स्पष्ट झाले. या वह्या मिळाल्याने टिळकांकडून त्याची मुद्रणप्रत तयार करण्याचे काम एकीकडे आणि देशावर गेल्या अनेक वर्षांपासून आलेल्या ब्रिटिश संकटाला दूर करायची तयारी दुसरीकडे सुरू करण्यात आली. त्यातच गायकवाड वाड्यातील गणेशोत्सवात गीतेवर त्यांचे प्रवचन झाले. दि. 25 ऑगस्ट 1914 रोजी त्यांचे हे प्रवचन झाले. दि. 26 ऑगस्ट रोजी ज.स. करंदीकर यांचे आणि 28 ऑगस्ट रोजी शिवरामपंत परांजपे यांचे भाषण झाले. या दोन्ही व्याख्यानांचे अध्यक्ष स्वत: टिळक होते. 19 सप्टेंबरपासून चार दिवस त्यांची गीतारहस्यावर प्रवचने झाली. कोणताही मुद्रणदोष राहू नये यासाठी त्यांनी कृ.प्र. उर्फ काकासाहेब खाडिलकर आणि रघुनाथ हरी भागवत यांच्याकडून गीतारहस्याचे हस्तलिखित वाचून घेतले. चित्रशाळा छापखान्यात ग्रंथाची छपाई होेत असताना एखाद्या नवख्या तरुण लेखकाप्रमाणे ते छापखान्यात जाऊन बसत असत. मंडालेहून आलेले टिळक हेच स्वत: प्रुफे तपासायला येऊन बसत आहेत म्हटल्यावर त्या छापखान्यातली कामगार मंडळीही प्रत्येक दुरुस्त्या दोन-तीनदा तपासून घेऊनच प्रुफांसाठी गॅल्या तयार ठेवत. टिळक इतके उत्साही की, बर्याचदा ते चित्रशाळा उघडण्यापूर्वीच तिथे जाऊन उभे राहात. त्या वेळी असलेल्या शिशाच्या टायपांमध्ये प्रत्येक प्रूफ वाचून दुरुस्त्या करणे हे तसे कटकटीचेच काम होते. अवघ्या सहा महिन्यांमध्ये 856 छापील पानांचे हे लिखाण त्यांनी लिहून पूर्ण केले. हाही लेखनाचा एक विक्रम. गीतारहस्य प्रसिद्ध करण्यात आले, तो दिवस होता अधिक वैशाख शके 1837. म्हणजेच 1915मध्ये जूनच्या मध्यात हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. मंडालेच्या तुरुंगात त्यांना वेळच वेळ होता असे म्हणणे म्हणजे त्यांच्या या लेखनाला कमी लेखणे होय. त्यांना वेळ होता, पण त्या वेळेत ते देशाचेही चिंतन करीत आणि एखाददुसर्या (महिन्यातून एकच पत्र लिहिण्याचा निर्बंध लक्षात घेतला तर) पत्राने आपल्या कुटुंबाचीही वास्तपुस्त करीत. त्यातच त्यांचे फ्रेंच, जर्मन आणि पाली भाषेचे शिक्षण चाले ते अलाहिदा. त्यांचे हे सर्व ग्रंथलेखन शिसपेन्सिलीने केले गेले आहे. त्यांना पेन्सिलीच्या तुकड्याला टोक करायचीही परवानगी नव्हती. त्यांच्यावर देखरेख करणार्या पहारेकर्याकडून किंवा तुरुंगाधिकार्याकडून त्यांना हे टोक करून दिले जात असे. आजही जेव्हा केसरी-मराठा ग्रंथशाळेत त्यांच्या या वह्या पाहायला मिळतात, तेव्हा आपले डोळे पाणावतात.
मला या ग्रंथलेखनाची आणखी एक आठवण या निमित्ताने होते. अनेकांना ती अशक्य कोटीतली कथा वाटेलही, पण ती मी स्वत: लोकमान्य टिळकांचे नातू आणि माझे पहिले संपादक जयंतराव टिळक यांच्याकडून ऐकलेली आहे. 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले आणि केसरीच्या प्रांगणात पाणी शिरले. बघता बघता ते वाढत गेले आणि ग्रंथशालेत भसाभसा शिरले. पाणी वाढत होते आणि डोळ्यांदेखत त्या ग्रंथशाळेतल्या अनेक ग्रंथांना आत्मसात करून गेले. केसरीच्या जुन्या अंकांच्या काही फाइल्सही पाण्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यांचा लगदाही नंतर पाहायला मिळाला. त्या फाइल्स जिथे होत्या, त्याच्याच वरच्या बाजूला गीतारहस्याचे हस्तलिखित आणि लोकमान्यांनी लिहिलेली पत्रे, तसेच ‘पंडित मोक्षमुल्लर भट्ट’ अशी सही असलेले मॅक्समुल्लर यांचे पत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. ज्या ठिकाणी हे पाणी शिरून त्या हस्तलिखिताचाही लगदा होण्याची शक्यता होती, तिथे हे पाणी थांबले आणि त्या हस्तलिखिताला कोणतीही बाधा पोहोचली नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत तरल्याची कथा आपण ऐकतो, तशी ही कथा खुद्द जयंतरावांच्या तोंडून ऐकताना मी शहारून गेलो होतो आणि डोळ्यात पाणी जमा झालेले होते. त्या काचपेटीबाहेर लाल खुणेची एक आडवी रेघ होती. त्या खुणेपर्यंत पाणी आले आणि ते ओसरले. पुढे कित्येक दिवस मी त्या ग्रंथालयात गेलो की, सर्वप्रथम काचपेटीतल्या त्या हस्तलिखितापुढे नतमस्तक होत असे. बालकृष्णाचा पाय यमुनेच्या पुराला लागल्यावर ते पाणी ओसरले आणि कंस राक्षसाकडून येणार्या मृत्यूपासून त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी तो वसुदेव कृष्णासह यमुनापार पोहोचला, ही कथा जशी, तशी ही एक कथा. त्या ग्रंथालयाची इमारत पाडली जाईपर्यंत ती खूण तशीच होती.
सांगायचा मुद्दा हा की, पानशेतचा पूरही हिमालयाची उंची असलेल्या त्या ग्रंथाला स्पर्श करू शकला नाही. असा हा कर्मयोगशास्त्राचे विस्तृत विवेचन करणारा आणि आपल्या वैचारिकतेच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा ग्रंथ शतकातून एकदाच होतो, असे म्हटले तरी चालेल. महाभारत काळ आणि कृष्णार्जुन संवाद याविषयी इतकी अलौकिक माहिती देणारा श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ तात्त्विक आणि पारमार्थिक चर्चा करतो आणि तोही रसाळपणे वाचणार्याला मोहवून टाकतो. तत्त्वज्ञानाचे सार त्यात आहे. ‘टिळक भारत’ या आपल्या ग्रंथात शिवराम लक्ष्मण (शि.ल.) करंदीकर यांनी गीतारहस्याविषयी लिहिताना म्हटले आहे की, ‘मूळ गीता हा ग्रंथ आपल्या साध्या भाषासरणीने बालांनाही मोहविणारा, आपल्या व्यवहारोपयोगी शिकवणीने संसारी माणसांनाही मार्गदर्शन करणारा आणि आपल्या तत्त्वज्ञानाने विचारवंतांना थक्क करून सोडणारा. इतका सुटसुटीत ग्रंथ जगात दुसरा नाही असे म्हटले तरी चालेल. अलौकिक ग्रंथाचा विशेष हा असतो की, त्यांचे स्वारस्य व प्रयोजन कालाने मर्यादित झालेले नसते. रमणीयतेच्या रूपाचे वर्णन करताना कवीने ‘क्षणे क्षणे यन्नवतामुपैति तदेव रूपं रमणीयताया:।’ हे चरण लिहिले. जिवंत वाङ्मयाच्या रूपाचे वर्णन करू पाहणार्या माणसाला या चरणात फारसा फरक करावा लागणार नाही. ‘युगे युगे यन्नवतामुपैति। तदेव रूपं स्थितवाङ्मयस्य।’ हे लक्षण स्वीकारले, तर गीताग्रंथाला ते तंतोतंत लागू पडते. प्रत्येक युगाच्या जरुरीप्रमाणे समाजाचे योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून ज्या विचाराला प्राधान्य देणे आवश्यक ठरेल, तो विचार गीतेच्या मुरलीतून उमटवून दाखवता येईल, अशीच गीतेची थोरवी आहे. समाजाच्या कल्याणाचा विचार करणार्या कर्तृत्ववान पुरुषांनी या तर्हेनेच गीता ग्रंथाचा उपयोग केला आहे.’