योद्धा पत्रकार दि.वि. गोखले

26 Mar 2022 17:50:18
हिंदुत्ववादी विचारांचे ज्येष्ठ पत्रकार व युद्धअभ्यासक दि. वि. गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आरंभ होत आहे. त्यानिमित्त विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांना ‘विवेक’च्या संपादकपदाच्या कार्यकाळात दि.विं.चा लाभलेला सहवास, श्रीरामजन्मभूमी संघर्षातील त्यांचा सहभाग, त्यांच्या लेखनाचा व विचारांचा प्रभाव याविषयीच्या आठवणी जागवणारा लेख.
gokhale
 
 
जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी मी विवेकमध्ये संपादक म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा माझा दि.वि. गोखले यांच्याशी प्रथम परिचय झाला. त्या वेळी ते महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक होते. मी संपादक असलो, तरी त्या वेळी मुंबईत व पत्रकारितेतही अगदी नवखा होतो. त्या वेळी दि.वि., ब.ल. वष्ट व नंतरच्या काळात ज.द. जोगळेकर या तीन शिक्षकांचा लाभ मला मिळाला. हे तिघेही हिंदुत्ववादी विचारांचे असले, तरी भिन्न प्रकृतींचे होते. दि.विं.चे व्यक्तिमत्त्व प्रथमदर्शनी थोडे उग्र, तिखट वाटणारे. पण एकदा त्यांचा नीट परिचय झाला की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उमदेपणाचा प्रत्यय यायला लागे. त्यांची महायुद्धावरची पुस्तके पूर्वीच वाचलेली असल्याने त्यांचा युद्धशास्त्राचा व्यासंग माहितीचा होताच, तसेच त्यांच्याशी होणार्‍या चर्चेतून राजकीय प्रवाहांचे विश्लेषण कसे करावे याचे पाठ मिळायला सुरुवात झाली. दि.वि. केवळ बोलके किंवा लिहिते पत्रकार नव्हते, तर आणीबाणीत सत्याग्रह करून त्यांनी कारावासही भोगला होता. मुंबई मराठी पत्रकार संघाचे काम असो की स्वा. सावरकर स्मारकाचे काम असो, कार्यकर्तेपण आणि संस्था उभारणीचे कौशल्य हा संघातून मिळालेला वारसा त्यांनी आपल्या पत्रकार जीवनातही कायम ठेवला होता.
 
 
महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाल्यावर त्यांनी विवेकमध्ये ‘दर्पण’ या सदराद्वारे नियमित लिखाणास सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘धावते जग’ या सदरात ते विविध विषयांवर भाष्य करीत. या सदरात लेखकाचे नाव दिले जात नसले, तरी त्या सदरावर दि.विं.ची छाप होती व महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकीयाइतकेच ते वाचकप्रिय होते. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांच्यावर जी धोरणात्मक बंधने होती, ती विवेकमध्ये लिहायला लागल्यानंतर निघून गेली व त्यांची लेखणी मुक्त होऊन लिखाण करू लागली. तो सर्व कालखंडच हिंदू जागृतीचा कालखंड होता. तामिळनाडूतील मीनाक्षीपुरमचे धर्मांतर, त्यानंतर झालेला जनजागृतीचा कार्यक्रम, एकात्मता यज्ञ, काश्मीरमधील हिंदूविरोधी अत्याचाराला आलेले उधाण, शहाबानू खटला, त्यानंतर श्रीरामजन्मभूमीचा संघर्ष अशा सर्व घडामोडींचा हा काळ होता. याचा परमोच्च कळस म्हणजे बाबरी ढाचाचे पतन. या सर्व काळातले दि.विं.चे लिखाण ही विवेकच्या वाचकांसाठी असलेली मोठी वैचारिक मेजवानी. वैचारिक स्पष्टता, आक्रमक युक्तिवाद व शब्दप्रभुत्व यामुळे त्यांचे ‘दर्पण’ हे सदर विवेकचे प्रमुख आकर्षण बनले.
 
 
ज्या दिवशी बाबरी ढाच्याचे पतन झाले, तो दिवस अजूनही जसाच्या तसा आठवतो. त्या दिवशीची कारसेवा कशी करायची यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने जे नियम आखून दिले होते, त्यामुळे त्या दिवशी काही विशेष घडेल असे कुणालाही वाटत नव्हते. परंतु बाबरी ढाच्यावर कारसेवकांनी चढाई केल्याच्या जशा बातम्या येऊ लागल्या, तसे दि.वि., बाळासाहेब जोग, सरदेसाई व मी असे सर्व जण एकत्र जमलो. हे नेमके काय व कसे घडले व त्याचे परिणाम नेमके काय होतील, हे कोणालाच काही समजत नव्हते. सर्वत्र गोंधळलेली अवस्था होती. कोणाची काहीही प्रतिक्रिया असली, तरी हा हिंदूंच्या सामूहिक पराक्रमाचा शिखरबिंदू आहे, यावर आम्हा सर्वांचे एकमत झाले व त्यावर आठवडाभर वाट न पाहता विवेकचा त्वरित विशेषांक काढण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यात दि.विं.चा लेख म्हणजे पराक्रम व आनंद यांचे शब्दांनी साकारलेले लेणे होते. या काळात लिहिलेले त्यांचे लेख ‘श्रीअयोध्या’ या पुस्तकात संग्रहित केले आहेत. श्रीरामजन्मभूमी लढ्याचा व त्या अनुषंगाने झालेल्या हिंदुत्वाच्या जागृतीचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी दि.वि.ने त्यांचे त्या काळातील लेख, किमान हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
 
 
बाबरी ढाच्याच्या पतनानंतर दि.वि., बाळासाहेब जोग व मी अशा तिघांनी अयोध्या व उत्तर प्रदेश, दिल्ली असा अभ्यासदौरा केला व त्या दौर्‍यातून बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज येऊ लागला होता. दि.विं.ची पिढी ही फाळणीच्या दु:खाने विद्ध झालेली हिंदुत्ववादी पिढी. स्वा. सावरकर जिवाच्या आकांताने फाळणीचा इशारा देत असतानाही हिंदू समाजाने तिकडे लक्ष दिले नाही व आपण फाळणीपासून देशाला वाचवू शकलो नाही, याबद्दलचे दु:ख मनात सलत असलेली ही पिढी. त्यांच्या या जखमेवरची खपली थोडी जरी निघाली, तरी अस्वस्थ होणारी. याच काळात बेल्जियमचे प्रख्यात विचारवंत कॉन्राड एल्स्ट यांचे एक भाषण आयोजित केले होते. त्या भाषणानंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेत दि.विं.नी फाळणीबद्दल एल्स्ट यांचे मत विचारले होते. तेव्हा त्यांना एल्स्ट म्हणाले, “तुम्ही हिंदुत्ववादी फाळणीबद्दल एवढे दु:खी का होता, हे मला कळत नाही. आता स्वतंत्र भारतात पंधरा-वीस टक्के मुस्लीम आहेत, तरी तुम्हाला त्यांना हाताळता येत नाही. फाळणी झाली नसती, तर ते पस्तीस टक्के झाले असते. तेव्हा तुम्ही त्यांना कसे हाताळले असते? फाळणी करून परमेश्वराने हिंदूंवर कृपा केली असून तुम्हाला हिंदू म्हणून जगण्याची शेवटची संधी दिली आहे. तिचा वापर करून मुस्लीम समाजाला कसे सांभाळायचे ते शिका व मग भारताची स्वप्ने पाहा.” त्यावर दि.विं.नी “तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे” असे उत्तर दिले होते.
 
 
 
हिंदू समाज आपल्या अस्तित्वासाठी लढू लागला आहे, हे दि.विं.नी आपल्या डोळ्यादेखत पाहिले व ही त्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब होती. हिंदू समाजाची प्रवृत्ती लढाऊ होत नाही याबद्दल ते अस्वस्थ असत. याच अस्वस्थतेतून त्यांनी साप्ताहिक सोबतमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर ‘हिंदूंना न पावलेला देव’ असा लेख लिहून खळबळ उडवून दिली होती. परंतु त्यांनी आपल्या हयातीत अटलबिहारी वाजपेयी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी पाहिला व आयुष्यभर पाहिलेले स्वप्न साकारू लागल्याचा अनुभव त्यांना घेता आला. त्यानंतर त्यांना फार काळ आयुष्य मिळाले नाही. परंतु त्यांची जन्मशताब्दी साजरी होत असताना अयोध्येतील श्रीराममंदिराचे काम सुरू होणे व काश्मीर फाइल्ससारख्या चित्रपटाला लोकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळणे या गोष्टी त्यांना निश्चितपणे समाधान देऊन जात असतील व हिंदू समाजाच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल ते आश्वस्त झाले असतील, हे निश्चित.
 
Powered By Sangraha 9.0