विश्वस्तांसाठी दिशादर्शक कार्यशाळा

26 Mar 2022 13:02:29
@शशिकांत सावळे
‘विवेक ज्ञानगंगा’ हा विवेक समूहाचा नव्याने सुरू झालेला उपक्रम. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकोपयोगी विषयांवरच्या कार्यशाळा घेणे ही त्यामागची मुख्य भूमिका. याद्वारे आतापर्यंत आरोग्यविषयक, शेअर बाजारविषयक कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्या. विवेक म्हणजे विश्वासार्हता हे समीकरण लोकांच्या मनात असल्याचा उपयोग हा नवा उपक्रम रुजतानाही होतो आहे. या दोन विषयांनंतर आम्ही घेऊन येत आहोत स्वयंसेवी संस्थांच्या विश्वस्तांसाठीची मार्गदर्शनपर कार्यशाळा. विवेक ज्ञानगंगा आणि विवेक व्यासपीठचा SPARC उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. साधारण पाच सत्रांच्या एक दिवसीय कार्यशाळेत या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागींना लाभणार आहे. या तज्ज्ञ मार्गदर्शकांपैकी एक माजी धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांचा या कार्यशाळेविषयीचा माहितीपर लेख. ज्या विश्वस्तांना याची आवश्यकता वाटते आहे, त्यांनी आवर्जून या कार्यशाळेत सहभागी व्हावे.
 
trust
 
स्वयंसेवा संस्था चालवताना आवश्यक असलेले कायदेशीर बाबींचे अद्ययावत ज्ञान विश्वस्तांना द्यावे, त्यांचे काम अधिकाधिक सुरळीत आणि नियमानुसार होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यातून विश्वस्त संस्था अधिकाधिक प्रभावीपणे काम करू लागाव्यात, यासाठी ही कार्यशाळा आहे. कार्यशाळा ऑनलाइन होणार असल्याने, महाराष्ट्राच्या विविध भागांत राहणार्‍या विश्वस्तांना यात एकाच वेळी सहभागी होता येईल, ही त्यातली विशेष जमेची बाजू.
 
 
महाराष्ट्रात विश्वस्त कायदा 1950 साली अंमलात आला. विश्वस्त संस्थांचा नियमबद्ध विकास होण्यासाठी, त्यांच्या व्यवहारात पारदर्शकता राहण्यासाठी या कायद्याद्वारे काही नियम केलेले आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात संस्थेचे आणि विश्वस्तांचे हित असते. तसे न झाल्यास विश्वस्तांबद्दल आणि पर्यायाने संस्थेच्या कारभाराबद्दल समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात. तसेच कार्यपद्धतीसंदर्भात विश्वस्तांचे आपसात मतभेद असतील, तर त्याचाही संस्थेच्या कामावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तिच्या उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता होण्यात अडथळे येऊ शकतात. त्यासाठी विकासोत्सुक विश्वस्त संस्थांच्या विश्वस्तांनी या कायद्याचा अभ्यास असणे अतिशय आवश्यक ठरते. म्हणूनच विश्वस्तांना या कायद्याचा त्यातील सर्व महत्त्वाच्या नियमांसह सविस्तर परिचय करून देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
 
 
कुठल्याही देशातील नागरिकांची सांस्कृतिक गुणवत्ता, ज्याला human devolopment index - मनुष्य विकास निर्देशांक म्हटले जाते, त्यावर मोजली जाते. या निर्देशांकाचे मोजमाप त्या राज्यातील व्यक्तीच्या आर्थिक, शारीरिक आणि शैक्षणिक गुणवत्तेवर असते. या तिन्ही बाबींचा विकास करणारी प्रमुख केंद्रे म्हणजे विद्यादान करणार्‍या शाळा, कॉलेज यासारख्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा देणारी हॉस्पिटल्स, आणि मंदिर-मशिदी-चर्च अशा प्रार्थनास्थळांचे प्रशासन हे मुख्यत्वे विश्वस्त संस्था करीत असतात. हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आरोग्य विकास, तर शाळा-कॉलेजेसच्या माध्यमातून शैक्षणिक विकास आणि मंदिर-मशीद-चर्च यांच्या माध्यमातून सांस्कृतिक विकास होत असतो. म्हणून या विश्वस्त संस्थांची नियमबद्ध प्रगती होणे हे आपल्या राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजघडणीत विश्वस्त संस्थांचे असलेले महत्त्व लक्षात घेतले की अशा कार्यशाळांची किती गरज असते, हेही समजते.
 
 
भारतात सुमारे पस्तीस लाख विश्वस्त संस्था आहेत. ही संख्या जगातल्या कुठल्याही इतर प्रगत देशापेक्षा कितीतरी जास्त आहे. अमेरिका व इंग्लंड यासारख्या प्रगत देशांतही सुमारे वीस लाख विश्वस्त संस्था आहेत. या पस्तीस लाख संस्थांपैकी सुमारे सात लाख संस्था महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच या क्षेत्रात जगात भारत अग्रेसर, तर भारतात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
 
 
यावरून, वेगवेगळ्या संस्थात्मक उभारणीच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याची कल्पना भारतात अधिक खोलवर रुजली आहे, असे म्हणता येईल. अशा संस्थांच्या माध्यमातून स्वत:चा विकास स्वत:च्या बळावर करावयाचा, त्यासाठी शासनावर अवलंबून राहावयाचे नाही हा विचार यामागे आहे. तो महाराष्ट्रात अधिक दृढ असल्याचे स्वयंसेवी संस्थांच्या आकडेवारीवरून दिसून येते. या विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणूनच विश्वस्त संस्थांच्या कामकाजाकडे लक्ष ठेवणार्‍या आणि त्यांचे नेतृत्व करणार्‍या धर्मादाय आयुक्तालयाचे आपल्या राज्यात फार महत्त्वाचे स्थान आहे.
 
संस्थाविकासात आयुक्तालयाची भूमिका महत्त्वाची
या संस्थांच्या कामाचे सामाजिक विकासातील योगदान लक्षात घेत धर्मादाय आयुक्तालयाने विश्वस्त संस्थांच्या विकासासाठी काम केले पाहिजे. संस्थेसाठी निर्णय घेताना विश्वस्त जी भूमिका घेतात, ती समजून घेतली पाहिजे. विश्वस्तांना आयुक्तालयात येण्याची इच्छा होईल असे मोकळे वातावरण तिथे हवे. तिथे गेल्यानंतर आपण जे काम करतो त्याचे योग्य प्रकारे मूल्यमापन होते आहे, कौतुक होते आहे असे विश्वस्तांना वाटले पाहिजे. कुठल्याही प्रकारे आयुक्तालयात जाण्याची त्यांना भीती वाटायला नको. छोट्या कामांसाठी वारंवार आयुक्तालयात जाण्याची जर वेळ विश्वस्तावर येत असेल, तर तेही योग्य नाही.

 
स्वयंसेवी संस्थांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी विश्वस्त आणि आयुक्तालय यांच्यात योग्य तो समन्वय व संवाद असायला हवा. विश्वस्तांनी संघटित होऊन आयुक्तालयासमोर त्यांच्या मागण्या निर्भीडपणे मांडायला हव्यात आणि आयुक्तालयानेही त्याच्यावर गांभीर्यानेे विचार करायला हवा. संस्थांचे रेकॉर्ड आणि बदल अर्ज नवीन तंत्रज्ञानानुसार राखले गेले पाहिजेत आणि तत्परतेने त्यावर निर्णय झाला पाहिजे. (आयुक्तालयाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करीत असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात आजही जुन्या पद्धतीनेच कामकाज होते आहे. यातही आवश्यक ते बदल झाले, तर विश्वस्तांना संस्थांचे प्रशासन करणे सुलभ होईल.)
चॅरिटी हे विश्वस्त संस्थांचे मूलतत्त्व. म्हणजे लोकांनी दिलेल्या दानाच्या मदतीने समाजासाठी निरपेक्षपणे काम करणे अध्याहृत आहे. म्हणूनच विश्वस्तांनी विश्वस्त संस्थेचा विकास करीत असताना हे मूलतत्त्व लक्षात ठेवून कुठलीही आर्थिक अपेक्षा न ठेवता सेवेच्या भावनेतून काम करणे अपेक्षित आहे.
तरीही आपल्या कामाचे गाडे सुरळीत ठेवण्यात विश्वस्तांना अनेक अडचणी येत असतात. त्यातल्या काही शासन स्तरावरच्या असतात, तर काही नेमक्या माहितीच्या अभावामुळे उत्पन्न होतात. या अडचणी सोडवायला साहाय्यभूत ठरतील असे विषय या एकदिवसीय कार्यशाळेत घेतले जाणार आहेत. त्यातले काही असे-
 
 
ट्रस्ट डीड आणि ट्रस्टी - संस्थेची दीर्घकालीन उद्दिष्टे स्पष्ट करणारे हे अतिशय महत्त्वाचे पथदर्शक डॉक्युमेंट असते. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते तयार करावे कसे, आणि त्यानुसार विश्वस्तांनी कार्ययोजना कशी करावी या प्राथमिक तरी महत्त्वाच्या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.

 
बदल अर्ज (चेंज रिपोर्ट्स) - कोणताही संस्थात्मक बदल त्वरित धर्मादाय आयुक्तालयात नोंदवला जाणे हे संस्थांना बंधनकारक आहे. मात्र संस्थेने दाखल केलेले हे बदल अर्ज आयुक्तालयात दीर्घकाळ प्रलंबित राहतात आणि त्यामुळे संस्थेची महत्त्वाची कामे - उदा., मिळकत विक्रीची परवानगी, रिक्त जागांवर विश्वस्तांच्या नेमणुका इत्यादी वेळेवर होत नाहीत आणि त्याचा परिणाम संस्थेच्या प्रगतीवर होत असतो. बदल अर्ज प्रलंबित राहणे ही आयुक्तालयाच्या प्रशासनातील त्रुटी असली, तरी त्याचे परिणाम विश्वस्त संस्थांच्या प्रगतीवर होतात. हे चेंज रिपोर्ट्स कसे सादर करावेत, त्याचा पाठपुरावा याविषयी अधिक माहिती कार्यशाळेत देण्यात येईल.
देणग्या मिळवण्याची तंत्रे व त्याबाबतचे नियम - स्वयंसेवी संस्थांचा आर्थिक विकास हा त्यांना मिळणार्‍या देणग्यांवर अवलंबून असतो. देणग्या मिळवण्याची नवीन तंत्रे विकसित होत आहेत, त्यांचाही विश्वस्तांनी अभ्यास करायला हवा. त्यासाठी विश्वस्त संस्थेचे प्रशासन स्वच्छ आहे हे दर्शवणारे रेकॉर्ड त्यांना ठेवता आले पाहिजे.
तेव्हा, देणग्यांबाबतचे कायदेशीर नियम समजून घेणे, या संस्थांना लागणार्‍या आयकराच्या अटी माहीत करून घेणे, हिशेब अद्ययावत कसे ठेवावे या आणि अशा अनेक संबंधित मुद्द्यांवर विचार व नेमके मार्गदर्शन या कार्यशाळेच्या माध्यमातून होऊ शकेल. विश्वस्तांच्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे मिळतील आणि एकूणच ही महत्त्वाची यंत्रणा अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचा उपयोग होईल. तेव्हा विविध स्वयंसेवी संस्थांच्या बहुसंख्य विश्वस्तांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहोत.
 
 - शशिकांत सावळे
(लेखक धर्मादाय आयुक्तालयाचे माजी आयुक्त आहेत आणि अनेक स्वयंसेवी संस्थांचे सल्लागार आहेत.)
Powered By Sangraha 9.0