काश्मीरमधील इस्लामी दहशतवादी फारुख मलिक बिट्टा कराटे याने नव्वदीच्या दशकात काश्मीरमधील अनेक हिंदूंना निर्दयपणे आपल्या बंदुकीने ठार केलं. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने या क्रूरकर्मा बिट्टा कराटेची भूमिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महानायक साकारणार्या चिन्मयने हे दहशतवादी खलनायकी पात्र साकारण्याचं आव्हान कसं पेललं, या चित्रपटाविषयीच्या त्याच्या भावना, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अन्य कलाकारांबरोबरचा अनुभव, प्रेक्षकांच्या भावूक प्रतिक्रिया या सार्याबाबत त्याच्याशी साधलेला हा संवाद.
‘द कश्मीर फाइल्स’साठी जेव्हा तुझी निवड झाली, तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती?
मुळात एका चांगल्या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवड झाली याचा आनंद होता. निवडीची प्रक्रिया थोडी गमतीदार होती. मी जे पात्र चित्रपटात केलंय फारुख मलिक बिट्टाचं, त्यासाठी विवेक अग्निहोत्री सर अभिनेत्याच्या शोधात होते. त्यांनी अनेक काश्मिरी आणि उत्तर भारतीय अभिनेत्यांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या. पल्लवीजींनी त्या भूमिकेसाठी माझं नाव सुचवलं होतं. पण विवेक सरांचं म्हणणं होतं की तो मराठी भाषक आहे. तो कसा काश्मिरी माणसाची भूमिका करेल? पण पल्लवीजींचा विश्वास होता. माझं या भूमिकेसाठी कास्टिंग होण्याचं श्रेय त्यांचं आहे. मी एक मराठी अभिनेता असताना त्यांनी काश्मिरी माणसाच्या भूमिकेसाठी माझा विचार करणं हेच विशेष होतं. विवेक सरांनी माझी ऑडिशन घेतली. त्या ऑडिशनच्या आधी पल्लवीजींनी नेमका सिनेमा कशाबद्दल आहे याविषयी सविस्तर सांगितलं होतं. ऑडिशन बघितल्यानंतर विवेकजींना बहुतेक कुठेतरी विश्वास वाटला की मी हे करू शकेन. अर्थातच जेव्हा ही भूमिका मला मिळाल्याचं सांगण्यात आलं, तेव्हा अतिशय आनंद झाला होता.
चित्रपटाचा एकंदर विषय, पटकथा पाहता यावरून काही वाद निर्माण होऊ शकेल याची कल्पना आली होती का? हा विषय जाणून घेतल्यानंतरही तू ही भूमिका स्वीकारलीस, त्यामागे काय विचार होता?
या चित्रपटावरून काही वाद निर्माण होईल का याचा विचार मी तेव्हा केला नव्हता. माझी निवड झाल्यानंतर मला पटकथा वाचायला देण्यात आली होती. आज प्रेक्षकांना जितका धक्का चित्रपट बघून बसतोय, तितकाच धक्का स्क्रिप्ट वाचून बसला होता. मला वाटलं की नव्वदीच्या दशकात हे सर्व घडलं आहे. ज्या वेळी हा सर्व अत्याचार झाला, आपण फार मोठे नव्हतो, तरी फार लहानही नव्हतो. मी साधारण अकरा वर्षांचा होतो. हे माहीत होतं की अनेक काश्मिरी हिंदूंना त्यात घर सोडावं लागलं होतं. माझ्या काही जवळच्या मित्रांकडून मी त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. ज्या ज्वलंतपणे ते या सिनेमात मांडण्यात आलेलं आहे, ते त्या पटकथेतही होतं. ती वाचल्यानंतर मला असं वाटलं की ही गोष्ट सांगितली जाणं गरजेचं आहे. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना ही गोष्ट माहीत नाही. चित्रपटावरून वाद होईल का, त्याचा मी त्या वेळी फार काही विचार केला नव्हता. आपल्याला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे, चांगली भूमिका मिळाली आहे, त्यामुळे आपण ती उत्तम प्रकारे करावी हीच भावना होती.
यापूर्वी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहेस. आणि या चित्रपटामध्ये तू या घटनेतील काश्मीरमधील त्या वेळच्या मुख्य दहशतवाद्याची भूमिका केली आहेस. एक महानायक आणि दुसरा महाखलनायक अशा दोन टोकाच्या भूमिका साकारताना काय आव्हानं होती?
माझ्या सुदैवाने या दोन्ही भूमिका मी एकत्र केल्या नव्हत्या. ‘पावनखिंड’चं चित्रीकरण मार्च 2020मध्ये संपलं होतं. आणि ‘द कश्मीर फाइल्स’चं चित्रीकरण डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या काळात झालं. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान मोठं अंतर होतं. एका अभिनेत्याला परस्परविरोधी अशा भूमिका करायला मिळणं यापेक्षा त्याच्यासाठी मोठी संधी काय असू शकते! ‘द कश्मीर फाइल्स’मधील भूमिका करताना सगळ्यात मोठं आव्हान होतं ते काश्मिरी भाषेचा लहेजा, त्याचे उच्चार नैसर्गिक सहजतेने करता येणं. त्यात कृत्रिमपणा जाणवू नये. या चित्रपटात शारदा पंडितची भूमिका करणारी अभिनेत्री भाषा सुंबली हिने त्यात खूप मदत केली. ती स्वत: काश्मिरी आहे. राष्ट्रीय नाट्यविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. काश्मिरी भाषा, त्यातील लहेजा शिकण्यासाठी तिने पहिल्यापासूनच माझ्यावर प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे ते आव्हान सोपं झालंं.
आणि दुसरं आव्हान म्हणजे मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करणं. पण पहिल्या दिवसापासून या सर्व लोकांनी आपल्या मोठेपणाचं दडपण येऊ दिलं नव्हतं. हा नवीन आहे किंवा पहिल्यांदाच इतकी मोठी भूमिका करतोय, अशी वागणूक त्यांनी दिली नाही.
इतकी नकारात्मक भूमिका, ज्याची लोकांना चीड येईल, तर ती करताना काही मानसिक त्रास वगैरे जाणवला का?
चित्रीकरण करताना तसा काही त्रास जाणवला नव्हता. पण पटकथा वाचताना मी एकदम हललो होतो. मी विवेकजींना फोन करून विचारलं की खरंच हे घडलंय का? ते म्हणाले, हे फक्त हिमनगाचं टोक आहे. जे घडलंय ते यापेक्षा जास्त क्रूर आहे. एवढं क्रौर्य आपणही दाखवू शकणार नाही, म्हणून इतकंच दाखवतोय. म्हणजे तुम्ही कल्पना करा की कशा पद्धतीने हे अत्याचार झाले असतील. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी हे सर्व विचार होते. प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यान तसं दडपण नव्हतं. फक्त एवढंच वाटत होतं की दिग्दर्शकाला जे आपल्या माध्यमातून पोहोचवायचं आहे, ते योग्य प्रकारे पोहोचलं पाहिजे. विषय संवेदनशील आहे. कुठे अति होता कामा नये, किंवा कमी होता कामा नये, याचं भान राखायचं होतं.
चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आता जे तू बोललास, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविषयी काय सांगशील ?
मुळात विवेक अग्निहोत्री हे उत्तम लेखक आहेत. आपल्या सिनेमातून आपल्याला काय नेमकं काय मांडायचं आहे, ते त्यांना व्यवस्थित माहीत आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांचा या संपूर्ण विषयावरचा रिसर्च इतका तगडा आहे की बॅकग्राउंडमध्ये असलेल्या एखाद्या फाटोचेही योग्य संदर्भ त्यांच्याकडे आहेत. जेव्हा दिग्दर्शक गोंधळलेला नसतो आणि तो काय करतोय हे त्याला माहीत असतं, अशा दिग्दर्शकासोबत काम करणं सोपं जातं.
दुसरं म्हणजे त्यांचा चित्रीकरणाचा वेग प्रचंड आहे. त्यांनी अतिशय वेगात या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. तो वेग आला की कलाकारांनाही बरं वाटतं की चित्रपट कुठेच रेंगाळत नाही. इतका गंभीर विषय, त्याचा त्यांच्यावर आमच्यापेक्षाही दहापट ताण होता. पण तो त्यांनी कधीच आम्हाला जाणवू दिला नव्हता. सेटवरचं वातावरण हसतंखेळतं होतं असं नाही म्हणणार. कारण विषयच तसा नव्हता. पण सेटवर आम्हाला कधी ताणतणाव जाणवला नाही. आपण जे म्हणतो की ‘कॅप्टन ऑफ द शिप’, तसे ते होते. जहाजाचं सुकाणू कॅप्टनच्या ताब्यात असलं पाहिजे, तसं पहिल्या दिवसापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत ‘द कश्मीर फाइल्स’ नौकेचं सुकाणू अगदी व्यवस्थित त्यांच्या हातात होतं.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुला मिळणार्या प्रतिक्रिया कशा स्वरूपाच्या होत्या?
चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. एकतर लोकांची माझ्याबाबतची महत्त्वाची प्रतिक्रिया जी जाणवते, ती म्हणजे आश्चर्य. कसं केलंस तू हे? काश्मिरी भाषा कशी काय बोललास? तुला तर आम्ही महाराजांच्या भूमिकेत पाहत होतो, अचानक हे काय केलंस? अर्थात या सगळ्याच्या तळाशी प्रेक्षकांचं प्रेम आहे. मला असेही मेसेजेस येत आहेत, की आम्हाला तुझा राग येतोय. तुझं तोंड बघावंसं वाटत नाही. पण मला पूर्ण कल्पना आहे की हा राग आहे, तो त्या व्यक्तिरेखेसाठी आहे, चिन्मय मांडलेकरविषयी नाही. किंबहुना त्यांनी माझ्या कामाला दिलेली दाद आहे, असं मी म्हणेन.
आता या चित्रपटावर उलटसुलट चर्चा होतेय. चित्रपट पाहून लोकांना अश्रू अनावर होत आहेत, तर काही लोक चित्रपट न पाहताच त्यावर टीका करत आहेत. तुझी या चित्रपटाबाबतची भावना काय आहे?
मला दोन गोष्टी कळतात. एक म्हणजे मला माहीत आहे की चित्रपटात जे दाखवलं गेलंय ते खोटं नाही. या चित्रपटात दाखवलेली एकही घटना किंवा एकही वाक्य खोटं नाही. दुसरं म्हणजे तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे की काही लोक न बघताच टीका करत आहेत. माझं म्हणणं आहे की, तुम्ही आधी चित्रपट बघा. चित्रपट तुम्हाला आवडलाच पाहिजे, चित्रपटात जे सांगितलंय त्याच्याशी तुम्ही सहमत असलंच पाहिजे असं माझं बिल्कुल म्हणणं नाही. पण एखादी गोष्ट न बघताच तिला नाकारणं पूर्णपणे चुकीचं आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे... एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणूनही.
मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जे लोक स्वत:ला ‘ब्रॉड माइंडेड’ मानतात, ते लोकच हा चित्रपट पाहू नये असं सांगत आहेत.
तसंच हीदेखील वस्तुस्थिती आहे की प्रेक्षक चित्रपट बघितल्यानंतर रडतात. ते रडणारे सगळेच काश्मिरी नाहीत, त्यांच्याबरोबर काही घडलंय असंही नाही. तरीसुद्धा हा चित्रपट लोकांच्या संवेदनशीलतेला साद घालत असेल, तर त्या चित्रपटाचं काही तरी मेरिट असलं पाहिजे. त्यामुळे लोकांनी चित्रपट पाहावा आणि मग टीका करा, नावं ठेवा, कौतुक करा. केवळ आकसापोटी चित्रपट न पाहताच टीका करू नये, असं वाटतं.
लोकांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट का पाहावा याचं उत्तर तू काय देशील?
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट का पाहावा याचं उत्तर मी काय देऊ? गेल्या काही दिवसांत या चित्रपटाने विक्रमी व्यवसाय केला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचा विचार करायचा, तर अन्य हिंदी चित्रपट ज्या उंचीवर प्रदर्शित होतात, त्या उंचीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अत्यंत कमी प्रमोशन झालं. अत्यंत कमी स्क्रीन्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. तरीही गेल्या काही दिवसांत लोकांनी चित्रपटाला गर्दी केली आहे, त्यामुळे स्क्रीन्स वाढवायला लागल्या. लोकांनी आधीच ठरवलं आहे की हा चित्रपट पाहायचा आहे. मी आणखी काय सांगणार?