‘आझादी’चे बुरखे फाडणारा चित्रपट

17 Mar 2022 18:49:03
गेल्या काही दिवसांत भारतासह जगभरात या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद सकारात्मक असून यामुळे वर्षानुवर्षे मानसिक गुलामीत अडकलेल्या चित्रपटसृष्टीने एक मोकळा श्वास घेतला आहे. ही लढाई आतातरी आपण सर्व हिंदू गांभीर्याने घेऊ व राष्ट्रविरोधी शक्तींचे मनसुबे हाणून पाडू, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. अन्यथा, ‘बस नाम रहेगा अल्लाह का..’ या ओळी वास्तवात, व्यवहारात उतरल्यास काय होऊ शकते, हे आपण ‘द काश्मीर फाइल्स’मधून पुन्हा एकदा पाहिले आहेच.

the
 
‘हम क्या चाहते, आझादी!’ या घोषणेची विषवल्ली कुठून येते, तिची बीजे कशात आहेत, ही कोणती ‘आझादी’ आहे आणि तिचे परिणाम काय होऊ शकतात, हे विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून पुन्हा एकदा लख्खपणे आपल्यापुढे मांडले गेले. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे भीषण वास्तव चित्रपटातून मांडण्याचे धाडस करण्यासह हे वास्तव आणि इतिहासातील अशा अनेक घटना दडवून ठेवणार्‍या ‘इकोसिस्टिम’चा बुरखा फाडणे, हेदेखील या चित्रपटाचे अत्यंत महत्त्वाचे असे यश आहे आणि यासाठी अग्निहोत्री यांच्यासह काश्मीर फाइल्सची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र ठरते.
 
 
हे संपादकीय वाचकांच्या वाचनात येईल, तोपर्यंत आपल्यापैकी अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी एव्हाना हा चित्रपट पाहिलेला असेल. काश्मीर खोर्‍यात कशा प्रकारे हिंदू हळूहळू अल्पसंख्य बनत गेला, त्यांच्यावर कसे अनन्वित अत्याचार झाले, देशाच्या स्वातंत्र्यापासून तत्कालीन नेतृत्वांनी सातत्याने या प्रश्नात केलेले दुर्लक्ष आदी विषय आपण गेली अनेक वर्षे मांडत आहोत. या जागृतीबरोबरच ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठीही काम सुरू आहे, गेली सात-साडेसात वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने काश्मीर विषयाला प्राधान्य दिलेले आहे. काश्मीर प्रश्नातील सर्वांत मोठा अडथळा असलेले 370 कलम हटवण्यात आले, कदाचित लवकरच काश्मिरी हिंदूंची खोर्‍यात पुन:स्थापना झालेलीही आपल्याला दिसू शकेल. इतकेच काय, तर कदाचित येत्या काही वर्षांत काश्मिरात पहिला हिंदू मुख्यमंत्रीही आपल्याला दिसू शकेल. त्यामुळे काश्मीर प्रश्नाची लढाई आपण लढतो आहोत आणि त्यात यशही मिळताना दिसत आहे. परंतु, याचबरोबर आणखी एक लढाई आपल्याला लढायची आहे, जी केवळ एखाद्या सीमावर्ती राज्यातील नसून संपूर्ण भारतात असंख्य ठिकाणी, आपणा सर्वांच्या आवतीभोवती सुरू आहे. गेली अनेक वर्षे आपल्यातील अनेकांना अशी लढाई सुरू असल्याची जाणीवच नव्हती आणि तरीही असंख्य जखमा मात्र आपण सातत्याने झेलत होतो. ही लढाई काय आहे, कुणाविरुद्ध आहे, याची जाणीवदेखील कश्मीर फाइल्सने करून दिली असल्याने हा चित्रपट ऐतिहासिक ठरतो.
 
 
या देशातील बहुसंख्य समाज हिंदू, या देशाची संस्कृती-मूल्ये-परंपरा हिंदू.. मात्र या हिंदूंवर इतिहासाच्या अनेक टप्प्यांवर झालेले अत्याचार मांडणे म्हणजे ‘हिंदू जातीयवाद’ मानला जाई. त्यावर एखादा चित्रपट काढणे हे तर फारच मोठे पाप. त्यामुळेच फाळणीच्या वेळी आताच्या पाकिस्तानात झालेला हिंदूंचा नरसंहार असो वा काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार, हे आणि असंख्य विषय आपल्यापुढे कधी मांडले गेले नाहीत वा मांडू दिले गेले नाहीत. टिपूने केलेले अत्याचार, औरंगजेबाचे अत्याचार हेही असेच झाकले गेले. उलट टिपू, औरंगजेब यांचे चक्क गुणगान करण्यात आले. विशेष म्हणजे, आपल्यातील बहुसंख्यांच्या हे लक्षातच आले नाही, कारण त्याकरिता एक व्यवस्था अखंडपणे कार्यरत होती. विद्यापीठे वा अन्य शिक्षणसंस्था, वैचारिक, साहित्यिक संस्था-संघटना, चित्रपट-कलाक्षेत्र अशा सर्व ठिकाणी ही व्यवस्था आजही तितक्याच ताकदीने कार्यरत आहे, किंबहुना गेल्या सात-साडेसात वर्षांत अधिक त्वेषाने काम करत आहे. स्वत:ला पुरोगामी, लिबरल, सेक्युलर, समतावादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी म्हणवून घेणारी ही व्यवस्था प्रत्यक्षात कशी आहे, हे काश्मीर फाइल्स चित्रपटात अत्यंत उत्कृष्ट व तितक्याच ‘बोल्ड’ स्वरूपात दाखवले आहे. असे धाडस भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर क्वचितच कुणी केले असेल.
 
चित्रपटातील ‘सरकार भले उनका हो लेकिन सिस्टिम हमारी है’ या संवादासह अनेक ठिकाणी ही व्यवस्था ठळकपणे दिसत राहते. विद्यापीठे-शिक्षणसंस्थांतून विद्यार्थी आंदोलनांच्या नावाखाली कोणता विखार पेरला जातो आहे, स्वत:ला लिबरल म्हणवणारी मंडळी देशाच्या तरुणांचे कसे ‘ब्रेनवॉशिंग’ करत आहेत, हे उत्तमरित्या चित्रित झाले आहे. ‘हम देखेंगे’ या फैझ अहमद फैझ लिखित गझलेचेच उदाहरण घ्या. ही गझल शाहीनबागेपासून ते काश्मिरी फुटीरतावाद्यांपर्यंत अनेकांनी प्रतीकात्मकरित्या एखाद्या पद्याप्रमाणे वापरली आहे. ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ अशी ओळ असणारी गझल कथित सेक्युलरांचे पद्य होते, परंतु ‘सर्वे भवन्तु सुखिन:, सर्वे सन्तु निरामया:’ किंवा ‘वसुधैव कुटुंबकम’, ज्यात विशाल वैश्विक आशय सामावला आहे, ते मात्र या मंडळींना वर्ज्य. कारण ते हिंदू आहे, येथील प्राचीन काळापासूनची मूल्ये मांडणारे आहे. आधुनिक काळात ‘इन्फॉर्मेशन वॉर’ कसे खेळले जात आहे, अजेंडे कसे निश्चित केले जात आहेत आणि आपण सर्व जण या वास्तवापासून किती अनभिज्ञ आहोत, याची जाणीव या चित्रपटाने पुन्हा एकदा ठसठशीतपणे करून दिली आहे.
 
 
या अशा व्यवस्थेविरुद्ध आगामी काळात हिंदू समाजाला लढायचे आहे. हे वास्तव मांडण्याचे मोठे धाडस अग्निहोत्री व त्यांच्या टीमने केले असून त्यामुळे हा चित्रपट ऐतिहासिक ठरतो. गेल्या काही दिवसांत भारतासह जगभरात या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद सकारात्मक असून यामुळे वर्षानुवर्षे मानसिक गुलामीत अडकलेल्या चित्रपटसृष्टीने एक मोकळा श्वास घेतला आहे. ही लढाई आतातरी आपण सर्व हिंदू गांभीर्याने घेऊ व राष्ट्रविरोधी शक्तींचे मनसुबे हाणून पाडू, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. अन्यथा, ‘बस नाम रहेगा अल्लाह का..’ या ओळी वास्तवात, व्यवहारात उतरल्यास काय होऊ शकते, हे आपण ‘द काश्मीर फाइल्स’मधून पुन्हा एकदा पाहिले आहेच.
Powered By Sangraha 9.0