देवेंद्रांची मृगेंद्रता

11 Mar 2022 15:47:13
मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बाँब फोडून आणि मुद्देसुद मांडणी करून रुद्रावतार दाखविला. या राजकीय भूकंपाचे हादरे एवढे जबरदस्त होते की अजूनही कंप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे कारस्थान फडणवीस यांनी एकहाती उघडकीस आणले आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा विरोधात असताना त्यांनी एक अशक्य कामगिरी करून दाखविली आणि लोकशाहीची बूज राखली आहे.
 

dvendra 
एकोऽहम् असहाय्योऽहम् कृशोऽहमपिरीछिद:।
स्वप्नेऽप्येवंविधा चिन्ता मृगेन्द्रस्य न जायते॥


या संस्कृत सुभाषिताचा अर्थ - सिंह जेव्हा खोल विहिरीत पडतो, संकटात सापडतो, तेव्हाही तो असा विचार करत नाही की मी एकटा आहे, असाहाय्य आहे वगैरे. सिंहाची मुळी जातकुळीच ही असते की तो प्रतिस्पर्ध्यावर तुडून पडतो, आपले सिंहपण दाखवतो. मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला रुद्रावतार हा त्या सुभाषिताची प्रचिती देणारा होता. चोहोकडे असलेली संकटाची स्थिती, निव्वळ दगाबाजी करून सत्तेत बसलेले सरकार, पोलीस आणि अन्य यंत्रणांचा तुफान गैरवापर, पाताळयंत्री आणि कारस्थानी विरोधक, जातीवरून लक्ष्य करणारे लोक अशा सगळ्या परिस्थितीत घेरलेले असताना फडणवीस यांनी हा स्फोट केला. एरवी राजकीय भूकंप-राजकीय भूकंप अशी पोपटपंची करणार्यांची तोंडे बंद करणारा असा तो धरणीकंप होता. त्या भूकंपाचे हादरे एवढे जबरदस्त होते की तिथे उपस्थित असलेल्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासू नेता का म्हणतात, हे त्या दिवशी कळले.

फडणवीस यांच्या या भाषणातील स्फोटक आशय ही तर चिंतनाची (आणि चिंतेची) बाब होतीच, तसेच त्यातील राजकीय चातुर्यसुद्धा वाखाणण्याजोगे होते. म्हणजे अॅड. चव्हाण यांच्या तोंडचे संवाद म्हणून दाखविताना ‘अजित पवार सहकार्य करत नाहीत, दिलीप वळसे पाटील काहीच करत नाहीत’ हे त्यांनी आवर्जून बोलून दाखविले. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी आहे. त्यातील एक गट भ्रष्ट आणि विधिनिषेध न पाळणारा आहे, तर दुसरा गट आपले काम चोख बजावणारा आहे हे त्यांनी व्यवस्थित निदर्शनास आणून दिले. आता यातला काम करणारा गट कोणता आणि विधिनिषेध न पाळणारा गट कोणाला मानणारा आहे, हे राजकारणाची थोडी समज असलेल्यांनाही सहज कळू शकते. थोडक्यात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिलखताला अनेक भेगा गेलेल्या आहेत, हेही त्यांनी दाखवून दिले आणि त्या भेगांवर आपण वार करू शकतो, हेसुद्धा.

शिवसेनेला वेठीस धरणारे खासदार संजय राऊत ऊठसूठ बाँब फोडायची भाषा करतात. शेंडा न बुडखा असे आरोप करून चमकोगिरी करतात. बेफाम विधाने आणि अफाट दावे यांनी भरलेली त्यांची तथाकथित पत्रकार परिषद म्हणजे माध्यमियांना मेजवानीच! टोला लगावला, घणाघात केला, निशाणा साधला असे शब्दांचे बुडबुडे फोडून त्यांच्या आरत्या ओवाळण्यात या माध्यमियांना धन्यता वाटते. अशा मंडळींसाठी तर हे भाषण म्हणजे एक वस्तुपाठच होता. ‘जे आरोप करायचे ते संपूर्ण पुराव्यानिशी’ हे सूत्र फडणवीसांनी पुरेपूर पाळले. हवेतले आरोप करत तोंडाचे डबडे वाजविणार्या नवाब मलिक यांच्या विरोधातील एकच प्रकरण (आरोप नव्हे!) बाहेर काढून फडणवीसांनी तुरुंगात त्यांची रवानगी केली. त्यामुळे त्यांच्या शब्दाला अगोदरच वजन आलेले. त्यात इथे जे काही मांडले ते व्हिडिओ चित्रीकरणाच्या साक्षीने! हा सूर्य आणि हा जयद्रथ!!

 
फडणवीसांचा हा वार वर्मी बसल्यामुळेच की काय, शरद पवार यांना लगोलग प्रतिक्रिया द्यावी लागली. अर्थात नेहमीप्रमाणे त्यांनी कुत्सितच भाष्य केले, परंतु त्यातून त्यांना झालेल्या तीव्र वेदना लपल्या नाहीत. विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात जाऊन 125 तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यश मिळवल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक करतो. पण 125 तासांचं रेकॉर्डिंग करण्याची प्रकिया किती दिवस सुरू असेल, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रकारचे रेकॉर्डिंग शक्तिशाली यंत्रणाच करू शकतात. सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडेच अशा यंत्रणा असल्याचे शरद पवार म्हणाले. जणू काही पवार आणि त्यांच्या ताटाखालचेच असलेल्या राज्य सरकारच्या अशा काही यंत्रणाच नाहीत. असल्याच तर त्या यंत्रणा कोणी संतच चालवतात जणू!


लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या ‘साहेबां’नी सरकारी वकिलामार्फत पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी कारस्थान रचण्यात आणले. हे काम किती खालच्या पातळीवर जाऊन करण्यात येत आहे, हेच तर फडणवीस यांनी दाखवून दिले.
 
फडणवीसांचे हे कौतुक करत असतानाच त्यांनी मांडलेले अनेक मुद्दे चिंता करण्यासारखे आहेत. त्यातील मुख्य म्हणजे सत्ताधार्यांकडून विरोधकांचे अक्षरश: शिरकाण करण्याचे कारस्थान रचले जाते आहे. या सरकारचा अदृश्य हात असलेले शरद पवार यांची ख्यातीच कट-कारस्थान, दगाबाजी आणि विरोधकांना आयुष्यातून उठविण्यासाठी आहे. दुसरा पक्ष शिवसेनेबद्दल काय बोलावे? तिची मुळात लोकशाहीवर कधी श्रद्धा नव्हतीच. लोकशाही नव्हे, ठोकशाही हा शिवसेनेचा सुरुवातीपासूनच मूलमंत्र राहिला आहे. अशा या दोन प्रवृत्तींची जेव्हा गाठ पडते, तेव्हा एक जहरी मिश्रण तयार होते. तेच आज आपण पाहत आहोत.

हे सरकार सत्तेवर आल्यापासून हा प्रकार दिसून येत आहे. ठाण्यातील अनंत करमुसे मारहाण प्रकरणापासून याची चुणूक दिसून येते. करमुसे यांच्या घरी गेले व त्यांना सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरी नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. सुशील कुलकर्णी यांच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याचे जे प्रकरण काल फडणवीस यांनी मांडले, ते याच माळेतले होय. त्यानंतर अशी अनेक प्रकरणे घडली, ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून सर्वच मंत्र्यांनी लोकशाही संकेतांना धाब्यावर बसविले. विरोधी नेत्यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी कारस्थाने करणे, त्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे, जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलने करणार्या कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अडकविणे, सरकारविरोधात मत व्यक्त करणार्या नागरिकांवर हल्ले करणे आणि त्यांना पोलीस केसमध्ये अडकविणे या नित्याच्या बाबी बनल्या आहेत. कोरोनासाठी बनविलेल्या जंबो हॉस्पिटलमधील गैरव्यवहाराचे पुरावे द्यायला किरीट सोमैय्या पुण्यात आले, तेव्हा शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली, ही अलीकडची घटना आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री घरात दडून बसलेले असताना फडणवीस प्रत्यक्ष तळागाळात जाऊन काम करत होते. त्या वेळी सरकारी अधिकार्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सहकार्य करू नये, असा आदेश काढण्यापर्यंत या सरकारची मजल गेली होती.

त्याचीच पुढची पायरी म्हणजे तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान रचण्यात येत आहे. हे कारस्थान फडणवीस यांनी एकहाती उघडकीस आणले आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा विरोधात असताना त्यांनी एक अशक्य कामगिरी करून दाखविली आणि लोकशाहीची बूज राखली आहे. त्याला दाद देण्याऐवजी यामागे केंद्रीय यंत्रणा असल्याची मखलाशी पवार करत आहेत. याला दुर्दैव म्हणणे हेसुद्धा खूप कमी होईल. याला खरा शब्द म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे वापरत असलेला शब्दच होय - ‘दळभद्री’!
Powered By Sangraha 9.0