ज्ञानेश्वरांच्या अत्यंत सुघट रचनांच्या अंतर्भागात लताच्या स्वरांची दीपकळी प्रकाशली की अर्थाचे कवडसे त्या ज्ञानदीपातून बाहेर फांकू लागतात. स्वराची, अर्थाची, भावभावनांची अनेक बिंब-प्रतिबिंबं डोलू लागतात. श्रोत्यांना मग अनायासे ज्ञानाची दिवाळी होते! या स्वरदीपातून जे तेज बाहेर डोकावतं, ते केवळ ज्ञानदेवांच्या ज्ञानसाधनेचं वा लतादीदींच्या स्वरसाधनेचं नसतं. ते असतं या दोघांच्याही अंत:करणातल्या निर्मळ सद्भावनेचं प्रस्फुरण!
अखेर वसंतपंचमीच्या दुसर्या दिवसाला ‘लताषष्ठी’चा टिळा लागला. एक अमृतकल्लोळ शांत झाला.
ज्ञानदेवांनी ज्ञानाचं वर्णन करताना म्हटलं, ‘ज्ञान कशासारखं हे कसं सांगणार? ज्ञान ज्ञानासारखंच असतं. त्याची तुलना नाही.
त्याला दुसरी उपमा नाही.’
जैसी अमृताची चवी निवडिजे।
तरी अमृताची सारखी म्हणिजे।
तैसे ज्ञान हे उपमिजे। ज्ञानेसेचि॥
लताचा स्वर कसा? लताच्या स्वरासारखा!
आपल्या अबोली-कोरांटीसारख्या शब्दांनी तिला आदरांजली कशी वाहायची? त्याकरता ज्ञानदेवांचा घमघमता शब्दमोगरा उधार घ्यावा लागेल!
लताचा दिव्यस्वर माउलींनी ऐकला असता, तर दैवी स्वराची लक्षणं आपल्याला सांगितली असती..
स्वर शुद्ध हवा. कापरासारखा अंतर्बाह्य निर्मळ, शुचिर्भूत! ‘आंग मन जैसे कापूराचे’.
स्वराकार कसा हवा? तर ‘वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी!’ मोगर्याची कळी गुंफलेली असो वा मोकळी, तितकीच टपोरी व शुभ्रसुगंधी असते, तसा दाणेदार स्वर हवा!
‘काश्मीरांचे स्वयंभ, कां रत्नबीजा निघाले कोंभ’ असं ज्याचं तेज, आणि ‘जैसा निर्वातीचा दीपु, सर्वथा नेणे कंपु!’ अशी ज्याची स्थिरता, असा असतो दैवी स्वर!
‘अतींद्रिय परि भोगवीन इंद्रियाकरवी’ - या मर्त्य, लौकिक जगातच मी तुम्हाला अलौकिकाचा प्रत्यय देईन, हे असतं त्याचं ब्रीद!
- पूर्ण विकसित कमलिनी आपल्या हृदयातून उमटणारे दिव्य गंधलोट मुक्तपणे उधळते. त्यावर रावापासून रंकापर्यंत सर्वांचा सारखाच अधिकार असतो!
लताबाईंचा कोणता गानभाव सर्वश्रेष्ठ मानायचा? भक्ती, शृंगार, विरह, आनंद, प्रेम, दु:ख.. सर्व रसांमधली त्यांची गाणी तितकीच उत्कट आहेत. पण त्यांनी गायलेल्या ज्ञानेश्वरांच्या विराण्यांमध्ये या सर्व रसांचं एकत्व अनुभवता येतं! स्वत: लताबाईही म्हणत की “मला ज्ञानदेवांच्या रचना गाताना पवित्र दिव्यानंद मिळतो.” देववाणीपासून दूर आलेल्या सामान्यजनांना गीतेच्या अमृतापासून वंचित राहावं लागू नये म्हणून ज्ञानदेव गीतेला मराठीत आणतात. ‘गीतार्थे विश्वभरु। मांडू आनंदाचे आवारु॥’ असं आवाहन करतात. काळाचं चक्र फिरत राहतं नि मग ज्ञानदेवही आम्हाला समजेनासे होतात. तेव्हा मग अमृतकंठी, मातृहृदयी नि ईश्वरशरण अशी स्वरलता पुढे सरसावते. विस्मरणात गेलेला ज्ञानाचा दिव्य मकरंद पुन्हा युक्तीने आपल्याला चाखवते! गगनावेरी गेलेल्या या स्वरवेलीला धरून आपणही आपल्या लौकिक जगापासून थोडे उंच उठतो. हृदयनाथांच्या दैवदत्त प्रतिभेने ज्ञानदेवांच्या रचनांना नवसंजीवनी मिळते आणि श्रवणभक्तीची एक सोपी नि सुरेल पायवाट खुली होते. मराठी भाषेचं हे अलौकिक देशिकार लेणं स्वरलेणं बनून मराठीजनांच्या कानात डोलू लागतं!
‘ओम् नमोजि आद्या। वेदप्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा॥’
लताच्या स्वरांनी ज्ञानदेवांच्या अशा रचनांमधलं गांभीर्य नि पावित्र्य जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवलं.
पसायदान हे मुळात याच चालीत, याच स्वरात अवतरलं असेल असं वाटावं, इतकी शब्द-सूर-अर्थाची एकतानता!
दीनानाथांनी कल्पवृक्ष लावला तो कन्येच्या कंठात नव्हे, सामान्य माणसांच्या दारात! तिच्या सहस्रावधी गीतांनी कल्पतरूंचं वनच उभं केलं.
पुढां स्नेह पाझरे। मागां चालती अक्षरें।
शब्द पाठी अवतरे। कृपा आधीं॥
तसे लताच्या गाण्यात स्वर, शब्द नंतर पोहोचतात. आधी पाझरतो, पुढे धावत येऊन आपल्याला कवेत घेतो तो भाव! ही भावात्मकता हे त्यांचं सर्वात मोठं बलस्थान. या भावनिर्मितीकरता कोणत्याही कृत्रिम स्वरमेळाचा आधार लताबाईंना कधी घ्यावा लागला नाही. अर्थाच्या पलीकडचा भावही या स्वरांनी अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचवला.
ज्ञानदेवांच्या रचना म्हणजे
साच आणि मवाळ। मितुले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे॥
असे शब्द पोहोचवण्याकरता तसाच अमृताचा कल्लोळ असणारा कंठ असायला हवा. ‘अवचिता परिमळु, झुळकला अळुमाळु, मी म्हणे गोपाळु, आला गे माये!’ हे नितांत कोमल शब्द त्यातल्या उच्च ईश्वरी भावनेसह लताबाई स्वरात सहज गुंफतात.
‘तो सावळा सुंदरु, कासे पीतांबरु’ असं त्या उच्च रवाने सांगतात, तेव्हा त्या झळझळीत स्वरांच्या तेजात न्हालेला लावण्याचा पुतळा आपल्याला याचि देहि याचि डोळा अक्षरश: दिसतो. आणि ‘अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु, हरि पाहिला रे!’ असा आनंदसोहळा साजरा करताना आपलं मनही लहानग्या मुक्तेसारखं टाळ्या पिटत ‘हरि पाहिला रे, हरि पाहिला रे!’ म्हणून थुईथुई नाचू लागतं!
रेखाचित्र
सखाराम उमरीकर
मग ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ ऐकताना बासरीच्या गोड गुंजारवावर आपलं मन भुंग्यासारखं त्याच रूपाभोवती फिरत राहतं, तेव्हा ‘सांडि तू अवगुणु रे भ्रमरा’ असा जाणता, सावध इशाराही हळूच मिळतो.
शब्दावरचं आवरण आपल्या स्वरांनी हलकेच दूर करून त्या अनायासे गहन अर्थाशी आपली भेट घडवतात. शब्दांच्या उच्चारणाचंही तसंच.
‘परिमळु विद्गदु रे भ्रमरा’ असो किंवा ‘अवघेचि झाले देहब्रह्म’ म्हणत असताना शब्दांच्या उच्चाराकडे आपलं लक्षही न जाता त्यांचा अचूक उच्चार आपल्या मनावर नकळत बिंबला गेलाय.अत्यंत शुद्ध, स्पष्ट, पण ठासून केलेले शब्दोच्चार नाहीत, तर सहज, सुघट, स्वच्छ नि डौलदार असे उच्चार!
गोरख कल्याणसारखा अनवट राग आणि ‘मोगरा फुलला मोगरा फुलला’सारखे उत्कट शब्द, त्याला लताच्या स्वरांचा स्पर्श होतो अन पाहता पाहता काव्यरसाचा वेलू गगनावर पोहोचतो! ‘घनु वाजे घुणघुणा। वारा वाहे रुणझुणा’ ऐकताना वार्याची शीतल झुळूक अंगावरून जावी, असे स्वर लहरत येतात..
‘भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा का’ म्हणतानाची ती स्वरातली व्याकूळ उतावीळ, देवकीनंदनाशिवाय हे चांदणं-चाफा-चंदन काहीच मला आवडत नाही म्हणताना ‘नाऽऽवडे हो’ म्हणतानाची लाडिक तक्रार! ‘तुम्ही गातसा सुस्वरे’ म्हणताना कोकिळेच्या तानेसारखाच सर्रकन स्वर वरती झेपावतो आणि ‘दर्पणात मला पाहायला गेले, तरी तिथे तोच तो दिसतोय अशी माझी अवस्था त्याने केली’ हे सांगताना एक अगतिक शरणभाव येतो! मीपणाचा याहून सुंदर विलय कुठे अनुभवायला मिळणार?
‘अरे अरे ज्ञाना झालासि पावन। तुझे तुज ज्ञान कळो आले।’ हे इतकं सरळ, सहज आणि गोड वाटतं की पुन्हा ज्ञानदेवांच्याच पंक्ती आठवतात. हे सांगणं कसं आहे, तर
- पक्व झालेल्या फळाचा दर्वळ सुटावा किंवा अमृताच्या शीतल लहरी याव्यात, तसं स्वाभाविक, निर्मळ, कोवळं सांगणं. आणि मग मध्येच तो एक शून्य प्रहर येतो! ‘दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या!’ त्या ‘शून्य’मध्ये एकाच वेळी जी रिक्तता आणि पूर्णता जाणवते, ती क्षणार्धात दाखवण्याची लतादीदींची क्षमता केवळ अद्भुत अशी आहे. त्या एका शब्दात ‘पूर्णमदं पूर्णमिदं’ असा अनुभव येतो.
वाचे बरवें कवित्व। कवित्वी बरवें रसिकत्व।
रसिकत्वी परतत्व। स्पर्शु जैसा॥
हा परतत्त्वाचा स्पर्श त्या स्वराला होता, म्हणूनच आपले रसिकत्वही बरवें झाले!
आपल्यासारख्या सामान्य श्रोत्यांना बसल्या जागी ईश्वराची अनुभूती देणारं हे स्वरसामर्थ्य दैवी आहे, पूर्वसुकृताचं फळ आहे असं
जाणवतंच. पण या दैवदत्त सामर्थ्याला अपार कष्टांची, प्रयत्नांची जोड होती.
तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा।
पूजा केली होय अपारा। तोषालागी॥
अशी स्वकर्माची पूजा तिने मनोभावे मांडली. आपल्या अंतर्जाणिवेने ज्ञानदेवांच्या शब्दांची स्वरमूर्त घडवली.
पण या गानकर्तृत्वाचाही लता मंगेशकर नावाच्या देहाशी संबंध केवळ उपचारापुरता होता! स्वत्वाचा विलय इतका, की स्वत:च्या श्वासाचीही खूण कुठल्या गीतात तिने मागे सोडलेली नाही. परमेश्वराकडून जे आलं, ते आपल्या मीपणाची भेसळ न करता तिने आपल्यापर्यंत पोहोचवलं.
ज्ञानेश्वरांच्या अत्यंत सुघट रचनांच्या अंतर्भागात लताच्या स्वरांची दीपकळी प्रकाशली की अर्थाचे कवडसे त्या ज्ञानदीपातून बाहेर फांकू लागतात. स्वराची, अर्थाची, भावभावनांची अनेक बिंब-प्रतिबिंबं डोलू लागतात. श्रोत्यांना मग अनायासे ज्ञानाची दिवाळी होते! या स्वरदीपातून जे तेज बाहेर डोकावतं, ते केवळ ज्ञानदेवांच्या ज्ञानसाधनेचं वा लतादीदींच्या स्वरसाधनेचं नसतं. ते असतं या दोघांच्याही अंत:करणातल्या निर्मळ सद्भावनेचं प्रस्फुरण! का भिंगारि दीपु ठेविला। बाहेरि फांके।’ तशा शब्द-स्वरातून आतल्या वृत्ती झळकतात.
ज्ञानदेवांचं आयुष्य काय किंवा ‘दीदी’ म्हणून कोवळ्या खांद्यावर कुटुंबाचा, व्यवहाराचा, दुनियादारीचा भार पेलणार्या लताचं पूर्वायुष्य काय, आत अमृताचे निर्झर फुटावेत असं सहजसुंदर मुळीच नव्हतं.
पण गतायुष्याला त्यांनी ‘आक्रोशेविण क्षमा’ केली.
आयुष्याची सगळी खारट, तुरट चव पोटात घालून हे अमृताचे समुद्र बनले. ‘बोलते जे अर्णव पीयूषांचे’ असे झाले! आकाशाएवढं विशाल झालेलं ज्ञानदेवांचं चित्त. पण ते सगळ्या जगाच्या दु:खाचं प्रतिबिंबाने झाकोळलं नाही, तर प्रकाशलं! ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेचि झाले देहब्रह्म’ हे करुणेतून प्रकटणारं देवत्व किती तरल आणि तरीही किती संयतपणे सुरातून प्रकटलंय.
गाणं गाताना एखादी जागा, एखादा स्वर, आर्त वा विव्हल लावणं वेगळं नि संपूर्ण गाणं त्या विकल भावावर तोलणं वेगळं! पैलतिरीच्या काऊच्या हाका ऐकू आल्या आहेत आणि त्यामुळे मनात आनंदाचे कल्लोळ उठले आहेत. साक्षात पंढरीनाथाच्या भेटीची वेळ जवळ आली आहे, असं सांगणारा हा शकुन! त्यातल्या मुक्तीच्या अर्थाची थेट जाणीवही द्यायची नाही, पण त्याला वरवरच्या भोगावस्थेतही रेंगाळू द्यायचं नाही, हे ज्ञानेश्वर जसं खुबीने करतात, तितक्याच सहजपणे लताचा स्वर हे काम करून जातो. एका बाजूला मिलनाचा आनंद आणि दुसर्या बाजूला निर्वाणाची ओढ असा तोल सांभाळण्याचं अवघड काम हा स्वर लीलया करतो.
या रचना ऐकताना ‘जैसे अंगाचेनि सुंदरपणें। लेणियासी आंगचि होय लेणें। अलंकारिले कवण कवणे। हे निर्वचेना॥’ अशी अवस्था होते. ज्ञानदेवांचे समृद्ध शब्द, हृदयनाथांची अचूक स्वरयोजना की लताच्या स्वरांचा दिव्यस्पर्श, कशाची ही किमया आहे, हे कोडं आपल्याला सुटत नाही. कुणामुळे कोण सुंदर दिसतंय हे कळेनासं होतं. आणि मग हे स्वरसुख कुणी भोगायचं यावरून इंद्रियांमध्ये कलह माजतो..
ऐका रसाळपणाचिया लोभा। श्रवणीचि होती जिभा।
बोले इंद्रिया लागे कलंभा। एकमेका॥
शब्द, स्वर हा खरं तर कानाचा विषय. पण जीभ म्हणते, यात कितीतरी रस आहेत आणि रस तर आमचा विषय! नाकाला त्यातला परिमळ जाणवतो, त्वचेवर रोमांच येतात, नेत्रांना साक्षात रूप दिसतं! मन तर धावू धावू या शब्दांना आलिंगन द्यायला उत्सुक आहे - हे केवळ कानांनी नाही, मनाने, सर्वेंद्रियांनी भोगायचं परिपूर्ण सुख आहे!
आणि ज्ञान इतक्या रसाळपणे गाऊन पोहोचवलं, तर श्रोते ‘पुरे’ कशाला म्हणतील!
ज्ञानाचे बोलणे। आणि येणे रसाळपणे।
आता पुरे कोण म्हणे। आकर्णिता॥
आपल्याला हा दिव्यकंठ चिरंतनपणे गातच राहायला हवा होता.
‘श्रवणसुखाचां मांडवी। विश्व भोगी माधवीं।’ असा तिच्या स्वरमंडपाखाली सदैव फुललेला श्रवणसुखाचा वसंत आपण भोगला. पण नव्वदीपार गेलेलं समृद्ध जगणं संपत आलंय, अशी जाणीव झाल्यानंतर या गानकोकिळेने घातलेली साद पैलतिरावर मुरली वाजवत असलेल्या त्याला ऐकू गेली असेल. ‘रंगा येई वो’ असं म्हणून तिनं त्याला निर्वाणीचं बोलावणं धाडलं असेल.. विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाई म्हणून निरनिराळ्या नावांनी त्याला हाक मारली असेल.
तुझाच वेध मला लागलाय रे वैकुंठेश्वरा, जगत्पालका, आता धावत ये कसा! कटीवरचे कर तसेच असू देत, रत्नजडित मुकुट नि पीतांबर असाच, असशील तसा ये! तुझ्या कमलनयनांचं ध्यान मला लागलंय. येई वो, रंगा येई वो! आता या जगात मांडलेला खेळ आवरून ठेवलाय. चल, तुझ्या कमरेला खोचून तुझ्या मुरलीला घेऊन चल.. तिथे पैलतिरावर तुझ्या मांडलेल्या खेळाच्या रंगात मला रंगू दे! तुझी रासलीला अनुभवू दे!
तिच्या या सुरेल आर्त विनवणीने तो पाघळलाच! येऊन तो आपल्या मुरलीला घेऊन गेला..
तिचा गानअवतार संपलाय.
कां सरलेया गीताचा सुमारंभु। न वचे राहवलेपणाचा क्षोभु।
भूमी लोळोनि गेलिया अंबु। वोल थारे॥
गाण्याचा कार्यक्रम संपला, तरी कानात स्वर रेंगाळत राहतात, जमिनीवरचं पाणी वाहून गेलं तरी ओल मागे राहते. वारा ओसरला तरी डोल उरतो, कापूर संपला तरी वास मागे उरतो.
तसं तिचं स्वरलाघव मागे उरलंय.
तरीही विश्व चालत राहील. आचंद्रसूर्यपर्यंत, काही ना काही स्वरूपात जीवसृष्टी असेल तोवर हा स्वरही पृथ्वीवर असेलच. मग कधीतरी विश्वही नसेल. परत एकदा अथांग पोकळीत निखळ चैतन्य केवळ उरेल.