स्वरांच्या नंदनवनातील पारिजात नेहमीच दरवळत राहणार

विवेक मराठी    07-Feb-2022
Total Views |
@अमोल पेडणेकर
 
महान माणसे पुन्हा पुन्हा घडत नसतात. शतकात एखादे नाव अजरामर होते. लता मंगेशकर हेदेखील असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. ते एक केवळ नाव नाही, ती केवळ एक व्यक्ती नाही, तर संगीतातली दिव्य शक्ती आहे. 80 वर्षे गादी चालवणे - कित्येक सम्राटांनाही जे जमले नाही, ते या सुरांच्या सम्राज्ञीला जमले होते. लोकप्रियतेच्या आढळ ध्रुवतार्यासारख्या त्या भारतीय जनमानसावर कायम राज्य करीत राहिल्या. या काळात यशाचा काटा एक तसूभरही न हलता तो स्थिर होता. अशा थोर सम्राज्ञीचे आपल्यातून जाणे हे मनाला चटका लावणारे आहे.
 
lata mangeshkar
भारतीय चित्रपट सृष्टीतील अनभिषिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा वयाच्या 93व्या वर्षी मृत्यू झाला. सवयीप्रमाणे सकाळी उठल्यावर व्हॉट्सअॅप वाचायला सुरुवात केली. लता मंगेशकरांच्या मृत्यूची बातमी मनावर धडकून गेली. मागील दोन-तीन दिवसांपासून लतादीदींच्या प्रकृतिअस्वास्थ्यासंदर्भात बातम्या येत होत्या. त्यामुळे आज आलेली ही बातमी धक्कादायक होती असे नाही. पण मनावर आघात करणारी नक्कीच होती. जेव्हापासून समजायला लागले, तेव्हापासून लता मंगेशकरांचे गाणे ऐकत आम्ही स्वत:ला घडवले असे काहीसे मी म्हणेन. तिचे बालगीत, भक्तिगीत, राष्ट्रगीत असो, प्रेमगीत नाहीतर विरहगीत असो.. या सगळ्यांनी संपूर्ण भारतीयांच्या मनावर जणू भुरळ घातली होती. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्या आमच्या सोबत होत्या. कधी त्यांच्या गीतातून आम्हाला आनंद देत होत्या, कधी प्रेमरसामध्ये रंगवत होत्या, कधी शृंगाराची तर कधी विरहाची भावना व्यक्त करण्यासाठी स्वर देत होत्या. अनेक अर्थांनी लतादीदी आपल्या संपूर्ण आयुष्याशी जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे लता मंगेशकरांचे जाणे हे सगळ्या भारतीयांना आपल्या जवळचे कोणी तरी आपल्यातून निघून गेले आहे या भावनेचे आहे. कारण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला लतादीदींच्या गाण्याने आम्हाला जणू जवळ घेऊन कुरवाळलेले - गोंजारलेले आहे.
 
 
अशी महान माणसे पुन्हा पुन्हा घडत नसतात. शतकात एखादे नाव अजरामर होते. लता मंगेशकर हेदेखील असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. ते एक केवळ नाव नाही, ती केवळ एक व्यक्ती नाही, तर संगीतातली दिव्य शक्ती आहे. 80 वर्षे गादी चालवणे - कित्येक सम्राटांनाही जे जमले नाही, ते या सुरांच्या सम्राज्ञीला जमले होते. लोकप्रियतेच्या आढळ ध्रुवतार्यासारख्या त्या भारतीय जनमानसावर कायम राज्य करीत राहिल्या. या काळात यशाचा काटा एक तसूभरही न हलता तो स्थिर होता. अशा थोर सम्राज्ञीचे आपल्यातून जाणे हे मनाला चटका लावणारे आहे.
 
आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्यांच्या गीतातून लतादीदी आपल्या सोबत का होत्या? कारण लतादीदींचे गाणे जिवंत वाटे. त्यांच्या गाण्यात ज्या भावना असत, त्या भावना स्वरांच्या वाटेने मनापर्यंत पोहोचत. त्या गाणे केवळ गात नसत, तर ते गाणे त्या जिवंत करत. त्यांच्या गाण्याने चित्रपटातील प्रसंग जिवंत करीत. कित्येक वेळेला गाण्यातील शब्दातला अभिनय चित्रपटातील नायिकांच्या चेहर्यावर दिसत नसे. पण लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे कानावाटे प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचत असे. इतकी ताकद लतादीदींच्या गाण्याच्या सादरीकरणामध्ये होती.
 
लतादीदी गानसम्राज्ञी आहेत, त्या अतिशय सुरेख गातात ह्या सगळ्या गोष्टी आता 80 वर्षे लतादीदींना ऐकलेल्या भारतीय समाजाला फार जुन्या झालेल्या आहेत. त्यात वेगळे सांगण्यासारखे आणि लिहिण्यासारखे काही नाही. ते एक कायम स्वरूपाचे सत्य आहे. एखादा गायक किंवा एखादी गायिका किती गायली यापेक्षा ती कशी गायली हे महत्त्वाचे आहे. एखादा माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने विचार केला, तर लतादीदी भारतीयांच्या मनावर आपल्या सुरांचे साम्राज्य निर्माण करीत जगल्या. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीच्या सृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीचा शृंगार आणि कृष्णाच्या मुरलीची साद हे सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवला असला पाहिजे, याविषयी तिळमात्रही शंका नाही.
 
lata mangeshkar
 
भारतीय संगीताच्या सृष्टीत मधुर, भारदार आणि पल्लेदार आवाजाच्या गायक-गायिकांची वाण नव्हती. पण लताच्या स्वरातील जादू काही वेगळीच होती. गायनकलेचा थोर वारसा तर त्यांनी वडील स्व. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळवला. पण वडिलांचा गुणांचा वारसा त्यांच्या मुलांना सहसा टिकवता येत नाही असा कटू अनुभव या दुनियेत आपण वारंवार घेत असतो. लता मंगेशकरांनी मात्र एकेकाळी मराठी रंगभूमीला आपल्या गायनप्रभुत्वाने जिंकणार्या स्वराच्या जनकाचे ऋण सव्याज फेडले आहे. लता आणि तिच्या भावंडांना लहानपणी अत्यंत हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. लता यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि तिच्या स्वर कंपनांमध्ये जी कारुण्याची छटा वारंवार उमटते, त्यामागे बालपणीच्या त्या दडलेला आठवणींचा ठसा असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्या कठीण काळामध्ये हातात हात घालून एकत्रितपणे या भावंडांना संघर्ष करावा लागला. लतांनी बालवयात आलेल्या या आपत्तीला न जुमानता निष्ठेने संगीताची साधना अखंडपणे चालू ठेवली होती. ध्रुवबाळाने अढळपदासाठी केलेल्या तपश्चर्येची त्यांच्या त्या परिस्थितीशी तुलना करता येईल. त्यांच्या त्या परिश्रमाचे चीज मराठी चित्रपट सृष्टीत झाले आणि त्यांच्या स्वरतेजाने सर्व दिपून जावे असा प्रकार घडला. तेव्हापासून लताच्या यशाचे पाऊल कधी मागे पडले नाही. भारतीय चित्रपट सृष्टीतील संगीत स्वरांची अक्षरश: कंठमणी बनल्या.
 
त्याांच्या यशाचे आणि कीर्तीचे रहस्य ज्याप्रमाणे त्यांना लाभलेल्या स्वर्गीय नादमाधुर्याच्या ईश्वरी देणगीमध्ये आहे, त्याप्रमाणे कुठल्याही गीतांमधील अर्थ आणि भावना केवळ स्वरांतून प्रगट करण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. भजन असो किंवा शृंगाराने रसरसलेली लावणी असो, मनमोहक भावगीत असो की गझल असो, पल्लेदार ख्याल असो की नजाकतदार ठुमरी असो.. त्या सगळ्या विविध प्रकारांचे केवळ शास्त्रोक्त दर्शन लता लीलया आपल्या स्वरांच्या माध्यमातून करून देत होत्या. लता मंगेशकर प्रत्येक गाण्याला जिवंत आत्मा प्राप्त करून देत असत, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
 
lata mangeshkar
 
लता एक चमत्कार आहे असे म्हणतात. विविध चालींची विविध अंगांची गाणी त्यांच्या गळ्यातून फुलून आली. कधी ती तरुण मुलांची अल्लड गाणी होती, कधी त्यात अवखळपणा, तर कधी प्रणयाची झाक होती, प्रेमाने रंगलेली गाणी, विरहाची गाणी, कधी भक्तिरसाने ओथंबलेली अशी होती. पडद्यावरील अनेक नायिकांना त्यांनी आवाज दिला. अनेक पिढ्यांतील नायिकांनी पडद्यावर आपल्या आकर्षक रूपांनी, मोहक हालचालींनी लोकांच्या मनात स्वत:विषयी रोमँटिक प्रतिमा निर्माण केली आहे. पण त्या प्रतिमांना सजीव केले होते ते त्यावर चित्रित झालेल्या लता मंगेशकरांच्या गाण्यांनी. ही सगळी गाणी लतांनी गायलेली होती. काळाच्या प्रवाहात विसरल्या गेल्या त्या नायिका, त्यांचे आकर्षक चेहरेही पुसट झाले, पण ती गाणी मात्र लोकांच्या मनात आजही जशीच्या तशी आहेत. आठवणींचा एखादा झोका आला की गाणी अजूनही संजीवनी लागल्यागत कानात गुणगुणतात. लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याचा आलेख काढायचा, तर त्याला दिवस पुरणार नाही. त्यांची नुसती गाणी आठवणे हासुद्धा एक आनंदोत्सवच आहे. सुरेल स्वरांची यात्रा आणि तीही लताच्या गाण्यांची म्हणजे एक मेजवानीच असते. त्यांचे प्रत्येक गाणे आपल्या मनावर साम्राज्य करीत होते, करीत आहे आणि करीत राहणार. अवघ्या तीन मिनिटांच्या एका गाण्याने समोरच्याचे हृदय चोरून नेणे ही कमालच आहे. कोट्यवधी भारतीयांचे हृदय चोरून नेण्याची कमाल गेली 80 वर्षे लता मंगेशकर करत आलेल्या आहेत.. हीसुद्धा एक कमालच आहे ना!
 
महाराष्ट्रीय माणसाच्या लग्नसमारंभात एक वेळ मंगलाष्टके म्हटली जाणार नाहीत. ‘गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का.. जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा..’ हे लताचे आर्त सुरात म्हटलेले गाणे काल-परवापर्यंत मी अनेक लग्नसमारंभात ऐकले आहे. लता मंगेशकर ही महाराष्ट्रातल्या आणि राष्ट्रामधल्या कोट्यवधी जनतेची मने रिझवणारी एक महान शक्ती होती. सामान्य जनतेच्या अधिकाधिक दु:खमय होत चाललेल्या जीवनात उदात्त आनंदाचे काही क्षण प्राप्त करून देण्याची लता मंगेशकरांची ही कामगिरी म्हणजे एक थोर राष्ट्रसेवा होती. चिनी आक्रमणानंतर साक्षात पंतप्रधान नेहरूंच्या नेत्रात अश्रू उभे करण्याचा मान त्यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भरलो पानी’ या देशभक्तिपर गीताला लाभला.
 
 
लताचे गाणे म्हणजे सप्तसुरांचे इंद्रधनुष्य. लताचे गाणे म्हणजे स्वरांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला मंदिराचा कळस. लताचे गाणे म्हणजे स्वरांच्या अमृताचे कारंजेच. लता म्हणजे भारतीय गायनकलेच्या नंदनवनातील पारिजात आहे. आज लता मंगेशकर आपल्यातून गेल्या आहेत. पण आपल्या मंजुळ स्वरांनी भारतीय आसमंत निरंतर भारावून टाकीत राहणारे फार मोठे आयुष्य त्यांना आपल्या स्वरातून लाभलेले आहे.
 
माधुर्याची सर्वोच्च पराकाष्ठा ही लता मंगेशकर यांच्या आवाजाची खासियत होती. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृती पोहोचवणारी लता मंगेशकर याच खरी आमची इंटरनॅशनल कल्चर अॅम्बेसिडर होत्या. त्यांच्या स्वरांमुळे हिंदी जाणणार्या सगळ्या राष्ट्रांमधील सांस्कृतिक सीमा संपलेल्या होत्या. लताच्या गाण्यातील आवाज ऐकत असताना जणू ईश्वराचा आवाज आपल्या कानावर पडत असल्याचा भास होत असल्याचा अनुभव अनेकांनी बोलून दाखवलेला आहे. लता आपल्यातून गेल्या आहेत. पण हा ईश्वरी आवाज ऐकत असल्याचा भाव आहे ना, तो आपल्या मनातून गेलेला नाही. तो कायमचा राहणार आहे. ‘मेरी आवाज ही पहचान है.. नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है।’ लता मंगेशकरांनी गायलेले हे गाण्याचे बोल सत्य आहेत. लता मंगेशकर यांचा आवाज हीच त्यांची ओळख आहे आणि लता नेहमीच आमच्या मनावर राज्य करीत होत्या, करीत आहेत आणि करीत राहणार. स्वरांच्या नंदनवनातील पारिजात आमच्या मनात सदैव दरवळत राहणार, हे मात्र नक्की.