@आशुतोष अडोणी
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेता डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांना या वर्षीचा पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. सत्यान्वेषण हे द्विवेदी सरांच्या जीवनाचे अधिष्ठानच. त्यातूनच त्यांच्यातला विचारवंत आणि लेखक आकाराला आला आहे. हा विचारवंत राष्ट्रजीवनातील एक सत्य खणखणीतपणे मांडण्यात कधीही संकोच करत नाही. हे सत्य असते, हजारो वर्षांपासून विविध भेदांवर मात करून हे राष्ट्र एकात्म, एकरस ठेवणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद! सर या राष्ट्रवादाचे समर्थ भाष्यकार आहेत. त्यांच्या या भाष्याचे अद्वितीय, अलौकिक कलात्म आविष्करण म्हणजे टीव्ही मालिका आर्य चाणक्य आणि उपनिषद गंगा!
‘कला फिर चाहे वह नाट्य, चित्र, शिल्प किसीभी रूप मे हो, उसमें रस होना चाहिये, उससे आत्मप्रतिती होनी चाहीये। देखने वाले, सुनने वाले में रस की उत्पत्ति हो, भाव की उत्पत्ति हो, यह किसी भी कला का उद्देश्य होना चाहिये। टेढ़े-मेढ़े पत्थर को आकार दिया कि उससे रस बहने लगता है। लकीरें जैसे ही आकार लेती है,वे बोलने लगती है। रंग जैसे ही लकीरों में भरने लगते हैं, वे आँखों को अनुभव देने लगते है। शब्द जैसे ही एक गति एक लय एक विचार पाते हैं, वे कविता हो उठते है, काव्य हो उठते है, गद्य बन जाते हैं। साहित्य आकार लेने लगता है। आखिर पत्थर, रेखाओं, रंगों, शब्दों में रचनाकार डालता क्या है? वह डालता है एक विचार, एक प्रतिती।
कला का लक्ष्य केवल एक रचनाबंधन, एक कलाप्रस्तुती मात्र कभी नहीं है। उसका लक्ष्य है आत्मस्वरूप का साक्षात्कार, आत्मप्रतिती। कला का उद्देश्य है परम तत्त्व की ओर ले जाना।’
डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी धाराप्रवाह बोलत होते. नागपूरच्या कलाक्षेत्रातील मान्यवर त्यांचे शब्द असोशीने टिपून घेत होते. भरतमुनी ते टॉल्स्टॉय असा कलाविषयक विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा एक विविधांगी, विस्तीर्ण पट उलगडणारे ते एक अप्रतिम भावचिंतन होते. कलेच्या मूळ प्रयोजनाचा तो एक मूलगामी वेध होता. सरांचे हे शब्द ऐकत असताना मला आठवत होता त्यांचा ‘पिंजर’. पुरो आणि रशीद यांच्या त्या लोकविलक्षण कथेत क्लायमॅक्सला सरांच्या प्रतिभाशाली दिग्दर्शनातून प्रचंड उंचीवर पोहोचलेला तो शेवटचा प्रसंग!
कथेची पार्श्वभूमी देशविभाजनाच्या धगधगीत यातनापर्वाची. जमिनीवरची एक ‘लकीर’ जगण्याची भाग्यरेषा कशी बदलवून टाकते, समाजस्वास्थ्य किती रोगट आणि विकृत करून टाकते, त्या दाहक आणि कटू वास्तवाची. त्या अभद्र अस्वस्थतेत रुजलेल्या एका विचित्र प्रेम त्रिकोणाची. कुरितीच्या आणि निर्मम प्रथांच्या नृशंसतेची. त्यातून उद्ध्वस्त होणार्या स्त्रीजीवनाच्या दुर्दैवी भोगवट्याची. देशाच्या सीमावर्ती भागातील एक निरागस मुलगी, पुरो. घराण्याच्या मूळ गावातील रामचंद्रशी तिचे लग्न ठरते. त्या निकट सहजीवनाची रोमांचक स्वप्ने आणि अननुभूत मधुर संवेदनांनी ती मोहरून गेली असतानाच धार्मिक वैमनस्यात रंगलेल्या घराण्यांंच्या परंपरागत वैरातून रशीद नावाचा मुसलमान तरुण तिला पळवून नेतो. त्यानंतर सुरू होते तत्कालीन स्त्रीजीवनाची एक करुण कहाणी. रशीदच्या तावडीतून पळून आलेल्या पुरोला ती बळजोरीने का होईना पण परधर्मीयासोबत राहिलेली असल्याने घराचे दरवाजे कठोरपणे बंद होतात. अगतिकतेने तिला पुन्हा रशीदकडेच जावे लागते. पुरोचा हा जीवनसंघर्ष पुढे खूप नाट्यमय आणि चित्तथरारक वळण घेत जातो. अमृता प्रीतम यांच्या या कथेत काय नाही? हिंदू-मुस्लीम जात्यंधतेची किनार आहे, दंगली आहेत, समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचे भेदक चित्रण आहे, जीवनातील अतर्क्य आणि अनाकलनीय प्रारब्धभोग आहेत. मानवी संबंधातील विचित्र गुंतागुंत आहे. मानवी भावभावनांचे, जगण्यातील भेसूरतेचे आणि कुरूपतचे प्रत्ययकारक चित्रण आहे. पुरो आणि रशीद यांच्या रूपाने चांगुलपणाचे मनोवेधक कवडसेही आहेत. जगण्याची दुर्दम्य विजिगीषा त्यात आहे आणि हतबल नियतिशरणताही. पण या सार्या अस्वस्थ भावप्रत्ययातून आपल्याला प्रेक्षक म्हणून फिरवत नेताना डॉ. चंद्रप्रकाशजींची दिव्यत्वाचा ध्यास घेतलेली दिग्दर्शकीय प्रतिभा चित्रपटाच्या शेवटाला मानवी मनाच्या मूळ शुद्ध स्वरूपाला साद घालते. सत्य-शिवम-सुंदराचा ध्यास घातलेल्या मूलभूत मानवी प्रेरणेला, त्याच्या हळव्या, प्रांंजळतेला पुरो-रशीदच्या विशुद्ध भावमिलनातून दिग्दर्शक ज्या उन्नत उदात्त उंचीवर नेतो, तो केवळ एका चित्रपटाचा शेवट नसतो, तर तो असतो मानवी जगण्याचा, त्याच्या प्रयोजनाचा एक विलक्षण भावविभोर आत्मप्रत्यय!
हा आत्मप्रत्यय, मानवी जीवनाच्या परमतत्त्वाचा शोध आणि बोध हाच सरांच्या कलासाधनेचा उत्क्रांत बिंदू आहे. याच उत्क्रांत बिंदूच्या अनिवार शोधात राजस्थानातील सिहोरच्या या प्रतिभेने मायानगरी मुंबई जवळ केली. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सहज प्राप्त केलेल्या वैद्यकीय उच्च शिक्षणावर आणि त्यातून प्राप्त होणार्या संभाव्य सुखासीनतेवर आणि समृद्धीवर पाणी सोडून चित्रसृष्टीची बेभरवशाची, कंटकाकीर्ण, खडतर वाट निवडली. हा एक आत्मशोध होता. थेट त्यांच्या आवडत्या नचिकेताच्या आणि सिद्धार्थच्या जातकुळीचा स्वत:ची दुर्धर परीक्षा घेणारा. जगण्यातील श्रेयस आणि प्रेयस याचे भान आणि विवेक जागवण्याचे किती अद्भुत सामर्थ्य छोट्या आणि मोठ्या पडद्यामध्ये दडले आहे, याचा साक्षात्कार त्यांना विद्यार्थिदशेतच झाला होता. आता सिद्धता होती ते श्रेयस जागवणार्या जगावेगळ्या प्रयोगांची, चित्रसाधनेची!
ही साधना निव्वळ लोकानुरंजनाच्या मागे धावणारी नव्हती. या साधनेत उथळतेला, उठवळतेला स्थान नव्हते. कचकड्याचा काल्पनिक शृंगार इथे चालणार नव्हता. गुलजार स्वप्नांच्या मोहमयी कल्पकथेच्या आणि कामिनींच्या कमनीयतेच्या भांडवलावर गल्ला भरणारी ही कारागिरी नव्हती, तर जगण्यातील ज्वलंत वास्तव आणि जनजीवनाची व्यामिश्रता, जटिलता जशी आहे तशी, त्याच्या सार्या सुरूप, कुरूप रंगरूपासह मांडून, बघणार्याच्या संवेदनांना गदगद हलवणारा, त्यांना अंतर्मुख करणारा, हा एक चित्रयज्ञच होता.
डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केलेल्या काही कलाकृती
जीवनाचे सत्य आणि भेदक चित्रण त्यात होते. किती भेदक? परवा ‘मोहल्ला अस्सी’ बघत होतो. बाजारीकरणाच्या क्रूर आणि निष्ठुर हातांनी जीवनाचा गळा कसा घोटला जातो आहे, सामान्य पापभीरू माणसांचे जीवनचित्र किती विद्रूप होत आहे, याचे विलक्षण अस्वस्थ करणारे चित्रण! वाराणसीच्या गंगाकिनार्यावरील पंड्यांच्या निमित्ताने बदलत्या समाजजीवनाचा, त्यातील नैतिक-अनैतिकतेचा, ढासळत्या नीतिमूल्यांचा, बाजारशरण अगतिकतेचा एक विस्तीर्ण पण विद्रूप पट ज्या प्रत्ययकारक रितीने आपल्या जाणिवांना अंतर्बाह्य धक्के देतो, ते सारेच स्तंभित करणारे. याही चित्रपटात शेवटाला आपल्या घरंगळणार्या मूल्यनिष्ठेला सावरणारा आणि सार्या जगाच्या विरोधात जगताना आपला एक दिवा अस्सीघाटावरील वार्यांपासून जपणारा पांडे प्रेक्षकांसाठी श्रेयसाचीच वाट प्रशस्त करत जातो.
या चित्रपटात बोलीभाषेतील शिव्यांचा मुक्त वापर केल्याबद्दल सरांवर खूप टीका झाली होती. प्रत्यक्ष चित्रपट बघताना मात्र त्या शिव्या आपल्या अंगावर येत नाहीत, जाणवतही नाहीत. उलट त्यांचा वापर त्या पात्रांना अधिकाधिक करुण करत जातो. त्यांच्याबद्दलची एक अनुकंपाच मनात दाटत जाते. व्यक्तिरेखा उभ्या करताना भाषेलाच नेपथ्य म्हणून सशक्ततेने वापरण्याचा हा प्रयोग केवळ अद्भुत.
जगण्यातील कार्पण्य आणि विरूपता आहे तशी दाखवण्याचे, प्रसंगी कलाकृतीसाठी व्यावसायिक दृष्टीने आत्मघातकी ठरू शकणारे हे धाडस सर करू शकतात, याचे कारण त्यांच्या सार्या कलाप्रेरणेला असलेली सत्यान्वेषणाची असोशी! त्यामुळे त्यांच्या कलाकृती कलेशी, कलाधर्माशी विलक्षण प्रामाणिक आहेत. सरांच्या वैयक्तिक वैचारिक भूमिका त्यांना वेठीला धरत नाहीत, हे त्या कृतींचे मला जाणवलेले फार मोठे वैशिष्ट्य!
सत्यान्वेषण हे सरांच्या जीवनाचे अधिष्ठानच. त्यातूनच त्यांच्यातला विचारवंत आणि लेखक आकाराला आला आहे.हा विचारवंत राष्ट्रजीवनातील एक सत्य खणखणीतपणे मांडण्यात कधीही संकोच करत नाही. हे सत्य असते, हजारो वर्षांपासून विविध भेदांवर मात करून हे राष्ट्र एकात्म, एकरस ठेवणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद! सर या राष्ट्रवादाचे समर्थ भाष्यकार आहेत.त्यांच्या या भाष्याचे अद्वितीय, अलौकिक कलात्म आविष्करण म्हणजे टीव्ही मालिका आर्य चाणक्य आणि उपनिषद गंगा!आर्य चाणक्य ही सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची चित्तथरारक सत्यकथा. देशाला एकसंध करणार्या या विभूतिमत्त्वाची कथा छोट्या पडद्यावर आणून सरांनी अक्षरश: इतिहास घडवला.
जी व्यक्ती, समाज किंवा राष्ट्र आपला इतिहास विसरते, ते आपले भविष्य घडवू शकत नाही. इतिहास समजून घ्यायचा असतो तो वर्तमानाचा वास्तव वेध घेऊन बलदंड आणि देदीप्यमान भविष्याची पायाभरणी करण्यासाठी! आमच्या राष्ट्राचा इतिहास रंगवला जातो तसा पराभवाचे रडगाणे नाही, ते दिव्य-दाहक पराक्रमाचे, जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे, पाशवी बर्बरतेवर मात करणार्या संघर्षमय विजिगीषुतेचे, एकरस-एकात्म राष्ट्रभावाचे उत्कट गौरवगान आहे हे चाणक्य मालिकेने मनामनावर बिंबवले. सूत्रमय कथा, प्रगल्भ वैचारिक मांडणी, प्रभावी भाषा, प्रवाही पटकथा आणि प्रतिभासंपन्न दिग्दर्शन यातून ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. ही मालिका एका कृतिशील राष्ट्रभक्त कार्यकर्त्याचे भावचिंतन होते. या चिंतनाने प्रेक्षकांना इतिहासाचा जाज्वल्य बोध, वर्तमानाची सावध जाण आणि भविष्याचा वेध घेण्यास भाग पाडले, एक आत्मभान दिले.
उमलत्या वयात या व्यक्तिरेखेचे नितांत गारुड मनावर होते आणि चाणक्य म्हणजे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी हे समीकरणही! सरांनी ही अजरामर भूमिका ज्या तादात्म्याने छोट्या पडद्यावर जिवंत केली, ते सगळे केवळ अद्भुत! यापुढे चाणक्याच्या भूमिकेत दुसरा कुणीही भावणे निव्वळ अशक्य. भूमिकेशी अद्वैत म्हणजे काय, याचे उत्तुंग उदाहरण म्हणजे सरांचा चाणक्य!
सर हा विलक्षण भावप्रत्यय आपल्या सर्वांना देऊ शकले याचं कारण ते ही भूमिका प्रत्यक्षातही जगत आहेत. तीच विचारांची निर्भीड स्पष्टता, तोच बाणेदारपणा, तीच धगधगीत मूल्यनिष्ठा, राष्ट्रहिताची तीच अपार कळकळ आणि तेच स्फटिकवत शुभ्र चारित्र्य! ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ हाच त्यांचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील बाणा आहे. सरांकडे बघताना मला नेहमी चाणक्यांच्या जीवनचरित्रातला एक प्रसंग आठवतो. सारे प्रमुख सहकारी सोडून चालल्याची वार्ता आल्यावर चाणक्य म्हणतात,
‘एका केवलमर्थसाधनविद्यौ सेना शतेभ्योऽधिका नन्दोन्मूलन दृष्टवीर्यमहिमा बुधिस्तु मा गा गम॥’
- ‘सारे सोडून गेले? हरकत नाही. पण नंदांचा समूळ उच्छेद करा ही माझी प्रज्ञा तर मजजवळ आहे ना? मग भय कशाचे?’
स्वप्रज्ञेवरचा हा बलदंड विश्वास सरांचा एक विलोभनीय पैलू आहे.
सरांशी कधी मर्मबंध जुळतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या पहिल्या पुस्तकाने - ‘आर्त अनावर’ने अवचित तो योग जुळवून आणला. प्रत्यक्ष परिचय नव्हताच. नागपुरात ते अन्य एका कार्यक्रमासाठी आले होते. सरांना भीतभीतच “प्रकाशनाला अतिथी म्हणून याल का?” विचारले. खरे तर ती पहिलीच भेट, पण वर्षांनुवर्षाचे नाते असल्यासारखे सर आत्मीयतेने म्हणाले, “बाद मे क्यूं आशू? अब दो दिन यही हूं। परसो कर लेते है, किताब अभी पढनेको दे देना।”
बरेचदा दुरून मोहवणार्या प्रतिभावंतांच्या जवळ गेल्यावर चटका बसतो, तो त्यांच्या कुरूप मनोकार्पण्याचा. त्या पार्श्वभूमीवर दिगंत कीर्ती आणि यश कमावलेल्या या श्रेष्ठ कलासाधकाची विलक्षण ऋजुता, प्रांजळता, साधेपणा आणि सलगी नतमस्तक करणारी होती. त्या क्षणापासून मी सरांच्या ताब्यात आहे. त्यांच्या आत्मीय आणि निरपेक्ष लोभाच्या वर्षावात आकंठ भिजतो आहे. प्रत्यक्षातला चाणक्य माणूसवेल्हाळ आणि मैत्रीवर जीव ओवाळणारा होता का माहीत नाही, हा चाणक्य मात्र तसा आहे.. समोरच्याला जीव लावणारा, ऋणानुबंध सतत जोजावत ठेवणारा!
त्यांचा वेधक अभिनय, प्रतिभाशाली दिग्दर्शन, मूलगामी चिंतन याबद्दल खूप लिहिता येईल. लिहिलंही जाईल. माझ्यासारख्याला त्यांच्या निखळ, नितळ स्वभावाचे, त्यांच्यातील सच्च्या माणूसपणाचे, संवेदनशील चिंतकाचे आणि निर्मळ कलासाधकाचे दर्शन जवळून अनुभवायला मिळावे, त्यांचा जीवीचा जिव्हाळा लाभावा, हा केवढा मोठा पूर्वसंचित भाग्ययोग!
म्हणूनच सरांना पद्मश्री घोषित झाल्याचे वृत्त खूप सुखावून गेले. त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेला मिळालेला हा मानाचा कुर्निसात आहे. सरांचा बहुप्रतीक्षित ‘पृथ्वीराज’ही लवकरच पडद्यावर येतो आहे. पुन्हा एकदा एका श्रेष्ठ वीराग्रणी राष्ट्रपुरुषाच्या जीवनादर्शाचा एक उत्तम, उदात्त आणि उन्नत भावप्रत्यय आपल्या ओंजळीत येणार आहे. कारण एक चित्रतपस्या त्यामागे तारण म्हणून उभी आहे.